किचनमधे ती आल्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, पण मग खळखळून हसावं-बोलावं किंवा खाजगी आवाजात गॉसिप करायचं असेल तर तेही करावं. ही निरीक्षकपदावर ताबडतोब स्वत:ची नेमणूक का करून घ्यायची? मागे एक पाहुणी तर माझ्या किचनमधल्या सगळ्या बरण्या एकटक बघत होती. एक बंद कपाट पण तिने उत्सुकतेने उघडून बघितलं. शेवटी साडीवर विषय नेल्यावर ती खुलली.
—-
तसा पाहुणे म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडीचा विषय… (टीकेसाठी असं नाही). पाहुणे घरी आले की आपल्याला इकडच्या तिकडच्या काही गोष्टी समजतात. घरात ताण असला तर तो निवळतो. आपली आठवण त्यांना आहे या जाणिवेने सगळ्यांनाच बरं वाटतं. अनलिमिटेड गप्पा गोष्टी होतात.
त्या पाहुण्यांबरोबर ‘ती पाहुणी’ असेल तर मात्र गृहिणीवर कधीकधी नाही म्हटलं तरी थोडासा ताण हा येतोच.
आपण पाहुण्यांसाठी खास वेगळ्या कपबशा काढून ठेवतो. दूध पाणी उकळत ठेवतो. वेलची किंवा आलं स्वादासाठी टाकतो. एवढ्यात ती आत येते… एका दृष्टिक्षेपात माझी साडी, कानातले, बांगड्या निरखून अभ्यासाचा एक विषय संपवून टाकते.
काय करतेस गं?
चहा… (पहिला प्रश्न तर सोप्पा निघतो. माझ्या जिवाला बरं वाटतं!)
सगळीजणं घेता ना तुम्ही?… मी संवादोत्सुकपणे.
हो (ती एकटक उकळत्या चहाकडे बघत राहाते. आता काय कविता करायची हिच्यावर?)
मग मी साखर घालते. ती त्या डब्याकडे बघते. साखरेकडे बघते. साखरेचे चमचे मोजतेय की त्यातले शेकडो दाणे मोजतेय, काही कळत नाही… संदिग्ध म्हणतात तसं वातावरण पसरलेलं असतं.
हल्ली दूध पूर्वीसारखं मिळत नाही, मी हसत म्हणते (शाब्बास सई); सरफेस टेन्शन कमी करण्याचा माझा आटापिटा असतो.
ती गप्पच… अरे बापरे, यांनी दुधाचा व्यवसाय सुरू केलाय की काय? तिला वाटेल मी टोमणा मारतेय.
मी घाबरत घाबरत चहापत्ती टाकते…
उकळी आली… ओत पटकन, ती बोलते.
अरे वा! ही काय मला चहाचं प्रशिक्षण द्यायला आलीय की काय? परमेश्वरा, तूच बघ आता काय ते…
ज्याच्यावर अजिबात संशय नव्हता, अशा डब्यात बिस्कीटचा पुडा मिळतो. मी डब्याला धन्यवाद म्हणते आणि तिच्यासकट सगळ्यांचा चहा मी बाहेर नेऊन ठेवते.
ये गं, बाहेर बसून चहा घेवूया, मी आग्रहाचं आमंत्रण देते. सूक्ष्मदर्शक यंत्रापासून सुटका करुन घ्यायचा माझा विचार असतो. मग ती नाईलाजाने बाहेर येते आणि शिक्षा दिल्यासारखा बसून चहा घेते. ना गप्पात सहभागी होत, ना हसण्यात! हल्ली दिल्लीहून मुंबईत जे पक्षनिरीक्षक येतात, त्यांचे चेहरे असेच असतात.
किचनमधे आल्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, पण मग खळखळून हसावं-बोलावं किंवा खाजगी आवाजात गॉसिप करायचं असेल तर तेही करावं. ही निरीक्षकपदावर ताबडतोब स्वत:ची नेमणूक का करून घ्यायची?
मागे एक पाहुणी तर माझ्या किचनमधल्या सगळ्या बरण्या एकटक बघत होती. एक बंद कपाट पण तिने उत्सुकतेने उघडून बघितलं. शेवटी एकदा मुगाच्या बरणीत तिला टोका दिसला. ती त्याच्याकडे टक लावून बघत होती. मुगाच्या बरणीत टोका, ही गोष्ट हळुहळु टोक्यांच्या बरणीत मूग अशी होऊ शकते, याचा अंदाज मला आला… आता काय करायचं?… मी अगदी ‘हे’ होऊन गेले.
हिला वाचनाची फारशी आवड नाही. मुलांची अभ्यासाची पुस्तकं एकीकडून दुसरीकडे ठेवत असेल तेवढाच पुस्तकांशी सबंध… रोजच्या वर्तमानपत्राची घडीपण संध्याकाळपर्यंत तशीच असते.
शेवटी साडीवर विषय नेल्यावर ती खुलली. मग आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या. पण जाताना टोका डोक्यातून घरी घेवून गेली की इथेच ठेवून गेली, ते काही कळलं नाही.
एकदा एकीने तर माझं कपड्यांचं कपाट पण उघडून बघितलं होतं. म्हणजे काय? आम्ही कपाटात ब्लाऊज पण कसेही कोंबायला नकोत? एवढी उत्सुकता जागी झाली असेल तर सोताच्या घरातला प्रिâज उघडून बघ आणि विचार करत बस की हे बुडबुडे आलेलं वरण मी कधीकाळी ठेवलंय?
एक जण तर आल्या आल्या फर्निचर हलवायच्या सूचना देते.
हे कपाट इकडे ठेवा आणि टेबल तिकडे ठेवा. म्हणजे छान वाटणार!
हूं… अगं दोन दिवसापूर्वीच बदललंय सगळं! घर वेगळंच वाटतं मग!
मग तेच अधिक छान होतं, ती आग्रहाने म्हणते.
मी काहीच बोलत नाही. मनातल्या मनातही नाही. तुझं काय जातं, असंही मनात म्हणत नाही!
एकदा एक म्हातारी मी पोळ्या करत असताना बाजूला येवून राष्टरगीताला उभं राहतात तशी स्तब्ध येऊन उभी राहिली. मला वाटलं की एक पोळी झाल्यावर निघून जाईल… नाही दुसरी पोळी पण बघून झाली. मला काय कळेना… माझ्या प्रत्येक पोळीचा आकार वेगळा असतो म्हणून हिला मजा येतेय की काय? एक दोन पोळ्या बघायच्या, मनातल्या मनात काय ते बरेवाईट शिक्के मारून घ्यायचे आणि जायचं बाहेर. पण छॅ..
बरं काही प्रश्न विचारेल किंवा काही सांगेल असंही नाही.
उदा. तू आजवर किती पोळ्या केल्या आहेस? जास्तीत जास्त आणि कमीत कमी किती?..
किंवा वयाच्या कितव्या वर्षी तू पीठ भिजवायला शिकलीस? जास्तीत जास्त तू किती किलो पीठ भिजवू शकतेस? असे अनवट म्हणता येतील असे प्रश्न तरी विचारायचे. ते पण नाही. (मला पण तिला बोलतं करायचा कंटाळा आला. किती राबणार आपण?) निस्तं निरीक्षण… जसं काही उद्या परीक्षा आहे आणि आजच्या आज सगळा अभ्यास संपवायचा आहे. पोर्शन कव्हर झाल्याशिवाय हालता येणार नाही. शिरा मार!
काय बघताय? मी नाईलाजाने.
पोळ्या कशा करतेस त्या बघतेय… चेहर्यावर इस्त्री आणि ज्ञानलालसेचे भाव!
(आयुष्यात पहिल्यांदा का? मी मनातल्या मनात… काय ही शिक्षणाची ओढ!)
बाहेर पडा जरा मस्तपैकी चटईवर… (जे तुम्ही यायच्या आधी माझं स्वप्न होतं) मी न राहवून म्हटलं.
होय झोपते… असं म्हणून ती नाईलाजाने बाहेर गेली. एका ज्ञानपिपासू विद्यार्थिनीला वर्गाबाहेर काढल्यासारखं मला क्षणभर वाटलं… पण काही इलाज नव्हता. एकतर पोळ्या लाटून लाटून मी घामाघूम झाले होते… आणि परत वर आणि हे…
नाराज झाली असेल का आजी?… पानात अननसाचा पाक जास्त वाढायला हवा…
आम्ही कुणाकडे गेलो तर मी लगेच किचनमधे घुसत नाही. एकतर बाहेर खूप विषयांवर गप्पा रंगतात. राजकारण, समाजकारण, पर्यावरण, किल्ले, साहसी मोहिमा इ.इ. शिवाय करू दे तिला मोकळेपणी चहापाणी. मुक्तपणे शोधू देत तिला डबे… बिस्किटांचे-चिवड्याचे! मध्येच आरशात बघूदेत… केसांवर कंगवा मारूदेत.
हसून बघूदेत.
रडून बघूदेत.
आयुष्याचा आनंद घेऊदेत.
पण यजमानांनीच आग्रह केला, वहिनी आत बसा की… किंवा घरातली वैनीच आत या या म्हणत असेल (तिचं किचन नुकतं नीट लावलेलं असणार), तर बाहेर हट्टाने बसून राहणं बरं दिसत नाही.
मी आत जाते… तिच्यावर ताण येणार नाही असं बोलते. डब्यांकडे रोखून बघत नाही. कधी गप्पा रंगतात. तर कधी जेवण, नाश्ता, मुलं, अभ्यास, महागाई, कामवाली इ. त्याच त्याच चक्रात फिरत राहतात.
– डॉ सई लळीत
(लेखिका खुसखुशीत ललित लेखन आणि सादरीकरणासाठी प्रसिद्ध आहेत)