‘आम्ही सोविएत फौजांशी लढत होतो, तेव्हा अमेरिका आम्हाला स्वातंत्र्ययोद्धे मानत होती, आम्हाला मदत करत होती. आम्ही अमेरिकेच्या अतिक्रमणाशी लढायला लागलो, तेव्हा दहशतवादी ठरलो. दोन्ही वेळा आम्ही आमच्या भूमीवरून परक्यांना हुसकावण्यासाठीच लढत होतो.’
– गुलबुद्दीन हेकमतयार, अफगाणिस्तानचे माजी पंतप्रधान
—-
अफगाणिस्तानातून अमेरिकेने नुकतीच संपूर्ण सैन्यमाघार घेतली. त्या पार्श्वभूमीवर ब्रायन नॅपेनबर्गर यांनी दिग्दर्शित केलेली ‘टर्निंग पॉइंट : ९/११ अँड द वॉर ऑन टेरर’ ही डॉक्युसिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे आणि ती चर्चेतही आलेली आहे. हेकमतयार यांचं वर उल्लेखलेलं विधान याच मालिकेतलं आहे. ९/११ अर्थात ११ सप्टेंबर २००१ साली अल-कायदाच्या दहशतवाद्यांनी अमेरिकेवर चढवलेल्या हल्ल्याच्या विसाव्या स्मृतीदिनाच्या औचित्याने प्रदर्शित झालेली ही पाच तासांची लघुपटमालिका अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे.
२००१ साली जन्माला आलेली जगभरातली पिढी आज विशीत आहे. त्यांना ओसामा बिन लादेन आठवण्याची शक्यता नाही. ९/११च्या हल्ल्याने जगभरात निर्माण केलेली दहशत आणि भयाची लाट त्यांच्या परिचयाची नाही. त्या सालाच्या काही वर्षं मागे जन्माला आलेल्या अनेक अमेरिकन मुलांनी तरूणपणी सैन्यात प्रवेश घेतला आणि ‘मातृभूमीच्या रक्षणासाठी’ ते ६००० मैल अंतरावरील अनोळखी प्रदेशात लढायला गेले. त्यातले काही शहीदही झाले. आपण इथे नेमके का आलो आहोत याचा त्यांना पत्ताही नव्हता (या सिरीजमध्ये अफगाण युद्ध लढलेल्या एका तरूण सैनिकाची अंगावर काटा आणणारी मुलाखत आहे. तो म्हणतो, माझ्यातला एक भाग अफगाणिस्तानातच मेला. असं व्हायला नको होतं).
ओसामा बिन लादेन नावाच्या दहशतवादी नेत्याने अफगाणिस्तानातून योजना आखून अमेरिकेवर ९/११चा हल्ला चढवला, अमेरिकेची जगभरातली ओळख असलेले वर्ल्ड ट्रेड सेंटरचे दोन टॉवर नागरी विमानांचा क्षेपणास्त्रांसारखा वापर करून पाडून टाकले. तेव्हाच्या जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या प्रशासनाने तात्काळ दहशतवाद्यांची पाळंमुळं खणून काढण्याचा निर्धार केला आणि वॉर ऑन टेरर जाहीर केलं. त्याअंतर्गत अमेरिकी फौजा अफगाणिस्तानात पोहोचल्या. त्यांनी दहशतवाद्यांना वेचून वेचून ठार मारलं. बराक हुसेन ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत ९/११चा कर्ताधर्ता ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानातल्या अबोटाबादमध्ये टिपण्यात आलं. अमेरिकेला हानी पोहोचवणार्या आणि भविष्यात घातक ठरतील अशा सर्व शक्तींचा नि:पात करून अमेरिका अफगाणिस्तानातून बाहेर पडली… असा इतिहास ही जागतिक महासत्ता अधिकृतपणे सांगते… पण, हा इतिहास किती खोटा आहे आणि किती बेगडी आहे, ते त्याच अमेरिकेत तयार झालेली ही डॉक्युसिरीज सांगते…
ही अनुबोधपट मालिका सुरू होते ९/११च्या हल्ल्यापासून. कशी विमानं हायजॅक झाली, त्यांचे मार्ग कसे वळवण्यात आले. वर्ल्ड ट्रेड सेंटरवर पहिलं विमान कसं धडकलं. त्यानंतर दुसरं विमान धडकेपर्यंत सर्वशक्तिमान अमेरिकेच्या अध्यक्षांनाही एक किरकोळ अपघात घडला आहे, असंच कसं वाटत होतं, याचं दर्शन ही मालिका घडवते… ही मालिका अमेरिकन प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून बनवलेली आहे. ९/११चा हल्ला ही अमेरिकनांच्या हृदयाला झालेली भळभळती जखम आहे. दिग्दर्शक तिची खपली काढून तीच कुरवाळत बसणार का, असा प्रश्न इतर देशातल्या प्रेक्षकांना पडत असतानाच तो फ्लॅशबॅकमध्ये जातो अफगाणिस्तानवरच्या सोविएत आक्रमणाच्या काळात… त्यानंतर पुढचे पाचही तास ही मालिका काळात पुढे मागे आंदोळत राहते… ९/११ हा तिचा संदर्भबिंदू राहतो… दर एपिसोडमध्ये ९/११ची कहाणी थोडी पुढे जाते आणि तिला जोडून मागचे पुढचे संदर्भ येत राहतात…
अफगाणिस्तानातल्या कम्युनिस्ट उठावाला पाठबळ देण्यासाठी १९७९ सालातल्या डिसेंबरात सोविएत फौजा तिथे घुसल्या, तिथून खरंतर ९/११ची कहाणी सुरू होते. अफगाणिस्तानात कम्युनिस्ट विचारांचे नेते होते, त्यांनी कट्टरतावादी मुस्लिम गटांचं सरकार उलथून टाकलं होतं आणि त्यांना पाठबळ पुरवण्यासाठी सोविएत फौजा तिथे घुसल्या होत्या. यात अर्थाअर्थी अमेरिकेचा काहीच संबंध नव्हता. अमेरिकेला मुस्लिम कट्टरवाद्यांशी काही देणंघेणं असायचं कारण नव्हतं. पण तो काळ शीतयुद्धाचा होता. दूर आपापल्या देशांत बसून जगातल्या प्रमुख ठिकाणांचा निव्वळ आपला लष्करी तळ, आपल्या ‘प्रभावा’खालील प्रदेश अशा कोरड्या पद्धतीने विचार करतात महासत्ता. अमेरिकेला अफगाणिस्तानचं फक्त भूराजनैतिक स्थान आणि तिथे सोविएतांचा कब्जा होणं एवढंच काय ते दिसलं. त्यावर अत्यंत आततायी निर्णय घेतला गेला तो जे सोविएत सेनेच्या विरोधात ते आपले ठरवून त्यांना पाठबळ देण्याचा. अमेरिकेसारख्या प्रगतिशील म्हणवणार्या उदारमतवादी देशाने ही अविवेकी चूक करण्याची गरज नव्हती. पण, तथाकथित शीतयुद्धातलं सत्तासंतुलन राखण्यासाठी अमेरिकेने मुस्लिम कट्टरवाद नावाच्या भस्मासुराला बळ देण्याचा निर्णय केला… त्यांना स्वातंत्र्ययोद्धे संबोधण्यात आलं आणि त्यांना अमेरिकन शस्त्रास्त्रं, इतर सामग्री आणि भरपूर अमेरिकन डॉलर दिले गेले… तेव्हा ओसामा बिन लादेन हा अमेरिकेच्या दृष्टीनेही अनेकांपैकी एक ‘स्वातंत्र्ययोद्धा’ होता… मुजाहिदीन होता…
अमेरिकन सत्ताधीशांच्या हे लक्षातच आलं नाही की कट्टर मुस्लिम टोळ्यांना, तालिबानांना फक्त सोविएत फौजांबरोबर लढायचं नाहीये, त्यांना हुसकावून लावायचं नाहीये… त्यांना अफगाणिस्तान मध्ययुगातच ठेवायचा आहे, तिथल्या स्त्रीला पुरुषाची भोगवस्तू बनवून घरात, बुरख्यातच डांबायचं आहे… या रानटी विचारसरणीला आधुनिकतेचंच वावडं आहे आणि अमेरिका ही तर त्या आधुनिकतेचं जगभरातलं एकमेव प्रतीक बनलेली महासत्ता होती… यथावकाश ओसामा बिन लादेन हा भस्मासुर अमेरिकेवर उलटला… इस्लामी जगतात शरियाचाच कायदा लागू झाला पाहिजे, धर्मनिरपेक्ष लोकशाही वगैरे कल्पना इथे असता कामा नयेत, ही त्याची भूमिका होती… इस्लामला सगळ्यात मोठा धोका अमेरिकेच्या आधुनिक विचारांचा आहे, त्यामुळे अमेरिकनांना संपवणं, अमेरिकेला संपवणं हे इस्लामला मानणार्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे, असं तो मानत होता… युद्धांमध्ये नागरी वस्त्यांवर हल्ले न चढवण्याचे संकेत असतात (अमेरिकेसकट सगळे देश या संकेतांचं उल्लंघन सर्रास करतात), पण निष्पाप अमेरिकन नागरिक, स्त्रिया, बालकं यांचीही हत्या करा, तुम्हाला पुण्यच मिळेल, असं ओसामा सांगत होता… त्याने अमेरिकेविरुद्ध युद्धाचं रणशिंग फुंकलं होतं… अमेरिकेला धडा शिकवण्यासाठीच ११ सप्टेंबर २००१चा हल्ला झाला आणि ओसामा बिन लादेन जगातला सर्वात मोठा वाँटेड दहशतवादी ठरला…
म्हणजे जग ‘कम्युनिझम-मुक्त’ करण्याचा, कोणीही न दिलेला ठेका परस्पर घेऊन अमेरिकेने कट्टर मूलतत्त्ववाद्यांना बळ पुरवलं आणि ते अस्त्र जवळपास २० वर्षांनी अनेक विमानांच्या स्वरूपात अमेरिकेवरच येऊन आदळलं… इथे अमेरिका काही धडा शिकेल अशी शक्यता होती… पण, डुब्या या नावाने कुख्यात झालेले आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे धाकटे भाऊ शोभावेत असे जॉर्ज डब्ल्यू. बुश हे अध्यक्ष असताना आणि डिक चेनी यांच्यासारखे युद्धखोर सहकारी असताना हे शहाणपण सुचण्याची काही शक्यता नव्हती… सर्वसामान्य अमेरिकन नागरिक हे जगातल्या कुठल्याही इतर देशांतल्या नागरिकांइतकेच या पार्श्वभूमीबद्दल अनभिज्ञ होते… फक्त बाकीच्या देशांना जगाचं नेतृत्त्व वगैरे करायचं नसतं, त्यामुळे तिथल्या नागरिकांचा अडाणीपणा खपून जातो… इथे अमेरिकेच्या सर्वशक्तिमान असण्याच्या धारणेला प्रचंड मोठा हादरा बसला आणि भयाची लाट पसरली… या कॉकटेलमधून सुरू झालं एक र्हस्वदृष्टीचं सूडचक्र… दहशतवाद्यांचा सूड घेण्यासाठी अमेरिकेच्या अध्यक्षांना न भूतो न भविष्यति असे अधिकार देण्यासाठी प्रतिनिधीगृहात मांडलेल्या विधेयकाला फक्त एका कृष्णवर्णीय महिला प्रतिनिधीने विरोध केला आणि तिला काही तासांत हजारोंनी जिवे मारण्याच्या धमक्या आल्या, इतकी विद्वेषाची लाट प्रबळ होती… एक अधिकारी या अनुबोधपटात सांगतो ते फार महत्त्वाचं आहे, तो म्हणतो, सर्वसामान्य माणसं भावनाशील असतातच. त्यांचा नेता भावनेच्या पलीकडे जाऊन विवेकाने विचार करणारा आणि शांतपणे, देशाने स्वीकारलेली मूल्यं न सोडता निर्णय करणारा असावा लागतो… तो आम्हाला लाभला नाही… जिथे निवडणुकांच्या सोयीसाठी भावना जागवून त्यांच्याशी खेळणारे आणि राजकीय लाभ मिळवणारे नेते असतात, तिथली परिस्थिती तर आणखीच अवघड होणार… असो.
९/११चा सूड घेण्यासाठी अमेरिकी सेना अफगाणिस्तानात उतरली तेव्हा आपल्याला नेमकं काय करायचंय याची त्यांना कल्पना नव्हती. पंजशीरचा शेर या नावाने ओळखल्या जाणार्या अहमदशहा मसूदसारख्या योद्ध्याने तालिबानांना अफगाणिस्तानच्या उत्तर भागात रोखलं होतं. तो कट्टरतावाद्यांशी लढत होता. त्याला बळ देण्याची, त्याचा नॉर्दर्न अलायन्स बळकट करण्याची खेळी अमेरिकेने खेळून पाहिली… या काळात तोराबोरा टेकड्यांमध्ये ओसामा शंभर टक्के दडलेला आहे आणि त्याला टिपणं शक्य आहे, अशी माहिती अमेरिकेकडे असताना अमेरिकेने त्याच वेळी त्याला टिपला कसा नाही, हे एक मोठं गूढ आहे… त्याचबरोबर ९/११च्या हल्ल्यांशी काहीच संबंध नसलेल्या इराककडे मोर्चा वळवून त्यांच्याकडे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन आहेत, असं परस्पर ठरवून त्या देशावर हल्ला का चढवला गेला, हेही एक गूढ आहे… या दोन्ही प्रश्नांची उत्तरं या मालिकेत मिळत नाहीत, पण अमेरिकेतल्या शस्त्रास्त्र निर्मिती लॉबीला सतत कुठे ना कुठे युद्ध चालू ठेवायचं असतं… त्यांना युद्ध मॅन्युफॅक्चर करावं लागतं… या लॉबीचेच म्होरके बुश सरकारमध्ये असल्याने ही दु:साहसं केली गेली आणि हजारो अफगाण नागरिकांबरोबर अनेक अमेरिकन सैनिकांनाही मृत्यूच्या तोंडी देण्यात आलं… या मालिकेत जॉर्ज डब्ल्यू. बुश, ओबामा, ट्रम्प आणि आताचे जो बायडेन हे चार अध्यक्ष दिसतात. बुश यांची प्रतिमा तर अर्धवट बुद्धीचे माथेफिरू अशीच होती. पण जागतिक शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार पटकावणारे आणि जगभरातील उदारमतवाद्यांचे डार्लिंग असलेले ओबामा अफगाणिस्तानातल्या निरपराध नागरिकांचे बळी घेणार्या ड्रोन हल्ल्यांचे शिल्पकार होते, हे इथे समजतं. त्यातल्या त्यात सेन्सिबल ट्रम्प बोलतात, अफगाणिस्तानाशेजारी चीन आहे, रशिया आहे, ते दोन्ही देश त्या देशात सैन्य पाठवत नाहीत, सहा हजार मैलांवरून आपण कसली लढाई लढतो आहोत? अर्थात, ट्रम्प हे शेवटी ट्रम्पच. आपण ठरवलं तर अफगाणिस्तान हा देशच जगाच्या नकाशावरून नष्ट करून टाकू, अशा निर्बुद्ध वल्गना ते लगेचच करून मोकळे झालेले दिसतात. ओसामा बिन लादेनचा खात्मा केल्यानंतर अमेरिकेतलं जनमत पालटत जातं. मुळात ९/११ कुणाच्या लक्षात राहिलेलं नाही, मग वॉर ऑन टेररचं प्रयोजन काय? आता आपलं काम संपलं असं ठरवून अमेरिकेने तालिबानांच्या हाती हा देश आयता सोपवला आणि ते बाहेर पडले…
या काळात ग्वांटानामो बे या छळछावणीत कोणत्याही सुनावणीविणा ८००हून अधिक अफगाण नागरिकांना डांबण्यात आलं. त्यांचा सर्व संकेत उल्लंघून छळ करण्यात आला. त्यातल्या एका कैद्याकडून सद्दामचा आणि ९/११चा संबंध आहे, असं वदवून घेण्यात आलं. अखेर दोन कैद्यांना शिक्षा देऊन, पन्नासेक जणांना दोषी ठरवून बाकीच्यांची निर्दोष मुक्तता करण्याची नामुष्की अमेरिकेवर ओढवली. ज्या तालिबानांना टिपण्यासाठी अमेरिकन सैनिकांनी जिवाची बाजी लावली, त्या तालिबानांबरोबर अमेरिकेने राजनैतिक वाटाघाटी केल्या आणि आमच्या सैनिकांवर हल्ले केलेत तर याद राखा, एवढ्यावर देश त्यांच्या स्वाधीन केला.
अफगाणिस्तानात सोविएत राजवटीच्या काळात आणि अमेरिकेच्या उपस्थितीच्या काळात सुधारणेचे वारे वाहिले. महिला नोकरी करू लागल्या. बिना बुरख्याच्या बाहेर पडू लागल्या. मुलं शिकू लागली. अत्यंत भ्रष्ट सरकार असूनही व्यापारउदीमाची घडी बसू लागली. अमेरिका काही हे सगळं करायला तिथे गेली नव्हती, हे बरोबरच. पण शस्त्रशक्तीच्या बळावर परक्या सार्वभौम भूमीत शिरणं हा गुन्हाच आहे. त्यात अल कायदावर सूड उगवणं, बिन लादेनचा खात्मा या गोष्टी न करता भलत्याच गोष्टींमध्ये तब्बल २० वर्षं गुंतून राहणं, अब्जावधी डॉलर तिथे ओतणं हे सगळं कशासाठी केलं गेलं?
जो बायडेन म्हणाले की आम्ही काही राष्ट्रउभारणीसाठी अफगाणिस्तानात गेलो नव्हतो. मग ज्या कामासाठी गेला होतात, ते काम पूर्ण केलंत का? ९/११चा हल्ला झाला तेव्हा एकच अल कायदा होती, एकाच देशात तिचं ठाणं होतं. आज अमेरिकेचा सूड घ्यायला सज्ज अशा किमान चार प्रमुख दहशतवादी संघटना तयार झाल्या आहेत. अमेरिकी अत्याचारांना बळी पडलेल्या अफगाणांची मुलं बालवयात तालिबानांना आयती मिळाली ब्रेनवॉशिंगसाठी. नवे अतिरेकी घडवण्यासाठी.
‘आपल्याला कोणत्या प्रकारची राजवट हवी आहे, ते ठरवण्याचा अधिकार फक्त अफगाण नागरिकांचा आहे,’ असं एका दृश्यात बराक ओबामा म्हणताना दिसतात तेव्हा ते अत्यंत खोटं आणि मानभावीपणाचं वाटतं… ज्या नागरिकांच्या शांततेने जगण्याच्या अधिकाराची दोन महासत्तांनी आळीपाळीने वाताहत घडवून आणली, त्या देशातल्या नागरिकांच्या राजवट ठरवण्याच्या अधिकाराबद्दल ओबामांनी बोलावं आणि बायडेन यांनी तीच री ओढून सैन्य मागे घ्यावं, देश तालिबानांना सोन्याच्या थाळीत सजवून सुपुर्द करावा, यातून तथाकथित वॉर ऑन टेररची समाप्ती कशी झाली असेल? तसं मानणं ही अमेरिकेची आत्मवंचना नाही का? अफगाणिस्तानात सत्तेवर आलेले तालिबानी ना लोकशाहीवादी आहेत ना आधुनिक जीवनमूल्यांवर विश्वास ठेवणारे. त्यांनी शरिया लागू करण्याची घोषणा केली आहे, अफगाण महिलांना पुन्हा अंधारयुगात ढकललं आहे. ही मूलतत्त्ववादी वृत्ती जिला शत्रू नंबर वन मानते त्या आधुनिक जीवनशैलीचं सर्वात मोठं प्रतीक आजही अमेरिकाच आहे. जिने २० वर्षं अफगाण ‘स्वातंत्र्ययोद्ध्यां’चं शिरकाण केलं, ग्वांटानामो बेमध्ये ज्यांना छळलं, ती अमेरिकाच आहे… आज ना उद्या वॉर अगेन्स्ट अमेरिकाचा पुढचा अध्याय अफगाणिस्तानाच्या भूमीतच रचला जाईल… तेव्हा अमेरिका काय करणार आहे?
या डॉक्युसिरीजमध्ये एक अधिकारी म्हणतो, वॉर ऑन टेरर ही फार सपाट आणि भोंगळ संज्ञा होती. तिच्याखाली अमेरिकेच्या अध्यक्षांकडे आणि त्यांच्याभोवती जमलेल्या कोंडाळ्याकडे अमेरिकेच्या मूलतत्त्वांना हरताळ फासतील इतके अधिकार एकवटले आणि त्यांनी त्या अधिकारांचा अपरिमित गैरवापर केला, अमेरिकेच्या उदात्त संकल्पनेला आणि तिच्या ब्रीदाला काळिमा फासला. हे वॉर ऑन टेररिस्ट असते आणि हल्लेखोरांना धडा शिकवण्यापुरतेच सीमित असते तर ना अमेरिकेची एवढी गुंतवणूक झाली असती, ना अमेरिकी जवान मारले गेले असते, ना अफगाणिस्तानची सर्वंकष वाताहत झाली असती…
…पण जगाचा इतिहास सुज्ञतेच्या लेखणीने लिहिला जात नाही… अजूनही माथेफिरू लोक आणि सत्ताच तो आततायीपणाच्या शाईने लिहीत असतात…
…अमेरिकेच्या सरकारने ओसामाला ठार मारण्यासाठी किंवा सैन्यमाघारीसाठी राष्ट्राध्यक्षांच्या वाढदिवसाचा मुहूर्त शोधला नाही आणि त्या देशात त्या देशावरच्या हल्ल्याची आणि त्याच्या प्रतिशोधाची इतक्या मोकळेपणाने चिकित्सा होऊ शकली, एवढ्या गोष्टी आपण तूर्तास लक्षात ठेवल्या तरी पुरे… अफगाणिस्तान अमेरिकेचा शेजारी नव्हता, आपला शेजारी आहे, तिथे जे काही घडणार आहे, त्याचे परिणाम आपल्यालाही भोगावे लागणार आहेत. त्यामुळेही ही डॉक्युसिरीज वेळ काढून पाहायला हवी.