जनुभाऊ निंबकरांच्या आग्रहाला बळी पडून प्रबोधनकार पुन्हा नाटक कंपनीत गेले. त्या फंदात न पडता प्रबोधनकार कोल्हापुरात स्थिरावले असते, तर इतिहास कदाचित निराळा असता.
—
संगीतसूर्य केशवराव भोसलेंना घडवणारे स्वदेशहितचिंतक नाटक कंपनीचे जनुभाऊ निंबकर कोल्हापुरात प्रबोधनकारांच्या बिर्हाडावर वस्तीला आले होते. त्यांची प्रबोधनकारांशी थेट ओळख नव्हती. पण एकाच धंद्यात असल्यामुळे दोघे एकमेकांना नावाने ओळखत होते. जनुभाऊ काही प्रबोधनकारांना भेटण्यासाठी कोल्हापुरात आले नव्हते. ते आले होते किशा काशीकर या नऊ-दहा वर्षांच्या गाणार्या मुलाला नाटक कंपनीत घेण्यासाठी. गोपाळराव काशीकर हे त्यांचा मुलगा किशासह ललितकलादर्श कंपनी गाजवत होते. तिथल्या भांडणांमुळे ते कंपनी सोडून घरी बसले होते. त्यामुळे त्यांना गळाला लावून स्वत:बरोबर घेऊन जाण्याची खटपट जनुभाऊ करत होते.
या सगळ्या खटपटी प्रबोधनकार राहत होते त्या गंगावेशीतल्या पाटलाच्या माडीवर सुरू होत्या. बैठकांवर बैठका सुरू होत्या. मध्यस्थ नवनवीन पर्याय सुचवत होते. त्यांचे मतभेद होत होते. काशीकर कुटुंबातल्या मंडळींच्या अटी समोर येत होत्या. असं चर्चांचं गुर्हाळ दिवसरात्र सुरू होतं. शेवटी जनुभाऊंनी कंपनीच्या भागीदारीची ऑफर दिली. त्याला भुलून गोपाळराव आणि किशा काशीकर या दोघांनी खामगावच्या मुक्कामात स्वदेशहितचिंतकच्या मुक्कामावर कंपनीत रुजू होण्याचं मान्य केलं.
हे सारं रामायण सुरू असताना जनुभाऊंसारख्या जाणकाराने प्रबोधनकारांमधला हरहुन्नरी नाटकवाला हेरला नसता, तरच नवल. आपलीही आम्हाला निकडीची गरज आहे, असं सांगत प्रबोधनकारांवर जाळं टाकण्याचं काम जनुभाऊंनी सुरू केलं होतंच. प्रबोधनकार सांगतात तसं `पार्सलबरोबर लेबलाच्या थाटाने’ जनुभाऊंनी प्रबोधनकारांना पटवलं. त्याचं वर्णन प्रबोधनकार असं करतात, `फार तपशिलांच्या भानगडीत न पडता, मीही पतंगासारखा पुन्हा नाटक मंडळीच्या आकर्षक दिव्यावर झाप टाकली. रंडीबाज राजकारणाप्रमाणे मोहिनीबाज नाट्यकारणाचा कडवट अनुभव जमेला असताही, एखाद्या हिप्नटाइज्डाप्रमाणे जनुभाऊंनी केवळ आपला किशा-प्राप्तीचा हेतू साधण्यासाठी मला आपल्या पचनी पाडला.’
प्रबोधनकारांचा किशा काशीकरांशी आयुष्यभर पितापुत्रासारखा ऋणानुबंध राहिला, असं प्रबोधनकारांनीच `जुन्या आठवणी’ या पुस्तकात नोंदवलं आहे. किशा त्यांना मामा अशी हाक मारत असत, तसा उल्लेख `माझी जीवनगाथा’मधल्या एका प्रसंगात आहे. प्रबोधनकारांनी दिलेल्या माहितीनुसार- `किशाबापू काशीकर वयाच्या आठव्या वर्षी रंगभूमीवर आले. सतत आठ वर्षं नाट्यव्यवसायांत कीर्ती मिळवून शिक्षण घ्यायला लागले. अवघ्या पाच वर्षांत बीए होऊन पुढे दोन वर्षांत एलएलबी झाले. त्यांनी शास्त्र आणि साहित्य विषयांवर अनेक नामांकित ग्रंथ लिहिले असून गेली काही वर्षं `संधिकाल’ हे साप्ताहिकही चालविले. दिनकर चिमणाजी देशपांडे हे त्यांचे दत्तकघरचे नाव. ता. १ ऑक्टोबर १९४८ रोजी किशाबापू काशीकर अर्धांगवायूच्या झटक्याने कोल्हापूर येथे कालाधीन झाले.’
एकीकडे काशीकर कुटुंब जास्तीत जास्त फायदा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी जनुभाऊंशी घासाघीस करत होतं, तेव्हा प्रबोधनकार फार व्यवहाराचा विचार न करता स्वदेशहितचिंतकात गेलेले दिसतात. त्या काळातल्या आपल्या मानसिकतेचं वर्णन करतात, ते समजून घेतलं की त्यांनी असे घाईगडबडीने निर्णय का घेतले असतील, याचा अंदाज बांधता येतो. ते लिहितात, `कोठेतरी काहीतरी धडपड करून पनवेलच्या कुटुंबाच्या संरक्षण पोषणाची यातायात करायची. व्यवसायाचा निश्चित मार्ग अजून ठरलेला नव्हता. समोर येईल त्या संधीवर स्वार होऊन भविष्यातील अंधारात स्थायी जीवनाचा ध्रुवतारा शोधणारा धडपड्या मी.’ अशा स्थिर जगण्याच्या शोधात असणार्या प्रबोधनकारांना तसं आयुष्य फक्त सरकारी नोकरीच्या दरम्यान काही वर्षं अनुभवता आलं. बाकी ते आयुष्यभर अस्थिरच राहिलेले दिसतात. व्यवस्थेच्या मुळांवर घाव घालणार्याला व्यवस्था कधीच स्थिर होऊ देत नसते. ते एका क्रांतिकारकाचे भोग प्रबोधनकारांना भोगावे लागले. त्याची सुरुवात या संघर्षाच्या काळातल्या धडपडीत दिसते. प्रचंड प्रतिभा आणि क्षमताही आत उसळी घेतेय, पण त्याला न्याय देऊ शकेल असं कामच उपलब्ध नाहीय. जबाबदार्यांमुळे फारसे हातपाय हलवताही येत नाहीत. अशा परिस्थितीत तरूण प्रबोधनकार नवनव्या संधी शोधण्यासाठी तुलनेने स्थिर आयुष्य पुन्हा पुन्हा उधळून टाकताना दिसतात. ते समजून घेता येतं.
या वयाच्या विशीत प्रबोधनकारांना एखादा आधारस्तंभ किंवा गॉडफादर मिळाला असता, तर त्यांचं आयुष्य स्थिर झालं असतं आणि त्यांना जास्त निवांतपणे कामही करता आलं असतं. प्रबोधनकारांसारख्या प्रचंड आवाका असलेल्या प्रतिभावंताचा गॉडफादर बनू शकतील अशी दोनच माणसं या काळात दिसतात. एक बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड आणि दुसरे अर्थातच छत्रपती शाहू महाराज. दामोदरशेठ यंदेंपासून वि. स. वाकसकरांपर्यंत आणि केळुसकर गुरुजींपासून `जागृति’कार पाळेकरांपर्यंत या सयाजीरावांच्या अगदी जवळच्या मंडळींचे प्रबोधनकारांशी उत्तम स्नेहसंबंध होते. `प्रबोधन’च्या वर्गणीदार किंवा देणगीदारांच्या नावांच्या यादीत बडोद्याची वाचक मंडळी सापडतात. पण आश्चर्य म्हणजे प्रतिभावंतांची कदर करणार्या सयाजीरावांशी प्रबोधनकारांचा संबंध मात्र आलेला दिसत नाही. निदान तसे उल्लेख `माझी जीवनगाथा’ किंवा इतर कुठेही सापडत नाहीत. बहुतेक प्रबोधनकारांचा जहालपणा सयाजीरावांसारख्या सर्वसमावेशक राज्यकर्त्याला आवडणारा नसावा. कारण काहीही असो, असा संबंध आलेला दिसत नाही.
प्रबोधनकारांचा छत्रपती शाहू महाराजांशी जवळचा संबंध आला. पण तो खूप उशिरा म्हणजे १९१८ साली. त्याच्या बरोबर दहा वर्षं आधी प्रबोधनकार कोल्हापुराचा चिटणीसांच्या छापखान्यासाठी काही महिने राहिले होते. याच काळात छत्रपती शाहू महाराज जनहिताचे निर्णय घेत आधुनिक कोल्हापूरची उभारणी करू लागले होते. त्यामुळे प्रबोधनकार आणखी काही महिने कोल्हापुरात राहिले असते, तर ते शाहू महाराजांच्या संपर्कात निश्चितपणे आले असते. शाहू महाराजांची गुणग्राहकता बघता, त्यांनी प्रबोधनकारांसारख्या तिखट लेखणीच्या पत्रकाराला नक्कीच हेरलं असतं. तशा बुद्धिवंतांची महाराजांना गरजही होती. त्यात प्रबोधनकार छापखान्यासारख्या ग्रंथव्यवहाराशी संबंधित व्यवसायात होते. पुढे स्वतःच्या मालकीच्या छापखान्यासाठी प्रबोधनकारांनी आयुष्यातली महत्त्वाची दहा वर्षं जिवाचा आटापिटा केला, तो छापखाना कोल्हापुरात त्यांच्या हातात होता. आज या जर तरच्या आडाख्यांना काही अर्थ नाही, पण प्रबोधनकार आणखी काही काळ कोल्हापुरात स्थिरावले असते, तर इतिहास वेगळाच असता, असं मागे वळून बघताना म्हणता येतं. तसं घडलं असतं तर महाराष्ट्राचं जास्त भलं झालं असतं.
पण तसं होणं नव्हतं. प्रबोधनकार कोल्हापुरात जम बसलेला असतानाही नाटकाच्या प्रेमापोटी पुन्हा नाटकमंडळीत दाखल झाले. स्वदेशहितचिंतक नाटक कंपनीचा आजच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावला दौरा असताना ते कंपनीच्या छावणीत पोचले. त्या काळात कापड व्यवसाय हा सर्वात आघाडीचा उद्योग असल्याने कापूस पिकवणार्या वर्हाडात संपन्नता पाणी भरत होती. नाटक कंपन्यांचे वर्हाडात कायम दौरे असायचे. प्रबोधनकारांनी वर्णन केलेल्या नाटक कंपनीच्या प्रत्येक दौर्यात त्यांच्या लिखाणाचा एखादा अनोळखी चाहता त्यांना भेटायला आल्याची नोंद सापडतेच. इथे खामगावातही हे घडलं. पण भेटायला आलेला चाहता कुणी साधासुधा वाचक नव्हता, तर ते होते मराठी संगीत नाटकांच्या जमान्यातले थोर नाटककार श्रीपाद कृष्ण उर्फ तात्यासाहेब कोल्हटकर.
तात्यासाहेब कोल्हटकर हे व्यवसायाने वकील होते. `सुदाम्याचे पोहे’ हे त्याचं विनोदी लिखाण फक्त गाजलंच नाही तर त्याने मराठी विनोदी लिखाणाचा पाया रचला. ते कवी, कादंबरीकार आणि समीक्षक म्हणूनही गाजले. `बहु असोत सुंदर’ हे महाराष्ट्रगीतही त्यांचंच. पण त्यांची मुख्य ओळख नाटककार अशीच आहे. वीरतनय, मूकनायक, वधूपरीक्षा, मतिविचार, गुप्तमंजुष, प्रेमशोधन अशी त्यांची बारा नाटकं आहेत. तेव्हा मराठी रंगभूमीवर सुरू असलेल्या नाटकांपेक्षा वेगळ्या पद्धतीची नाटकं त्यांनी लिहिली. त्यांना लोकप्रियता मिळाली पण किर्लोस्कर–देवलांच्या नाटकांसारखी प्रतिष्ठा मिळाली नाही. पण त्यांच्या लिखाणाचा प्रभाव राम गणेश गडकरींपासून आचार्य अत्रेंपर्यंत बर्याच महत्त्वाच्या लेखकांनी अभिमानाने मिरवला.
असे तात्यासाहेब प्रबोधनकारांना भेटण्यासाठी नाटक कंपनीच्या मुक्कामाच्या ठिकाणी धावत आले. येताच त्यांनी विचारलं, `कुठं आहेत आमचे वकीलसाहेब?’ परीक्षेच्या फीला दीड रुपया कमी पडला म्हणून मॅट्रिकची परीक्षा देता न आलेल्या आणि परिणामी वकील बनण्याचं स्वप्नं भंग पावलेल्या प्रबोधनकारांचा शोध तेव्हाच्या महाराष्ट्रातला एक गाजलेला वकील घेत आला. तेही त्यांचा उल्लेख वकील म्हणून करत होता, यामुळे कंपनीतली सगळीच मंडळी बुचकळ्यात पडली.
प्रबोधनकारांच्या या वकिलीची गोष्ट ते महाराष्ट्र नाटक कंपनीच्या पुण्यातल्या मुक्कामातली आहे. तेव्हा किर्लोस्कर नाटक कंपनी तात्यासाहेब कोल्हटकरांचं `गुप्तमंजुष’ नावाचं नाटक करत होती. त्यावर नाटककार ठोसर यांनी `नाट्यकलारुक्कुठार’ नावाचं उपरोधिक टीका करणारं पण विनोदी पुस्तक लिहिलं. ते पुस्तक त्यांनी किर्लोस्कर नाटक कंपनीचे शंकरराव मुजुमदार चालवत असलेल्या रंगभूमी या मासिकाकडे अभिप्रायासाठीही पाठवलं. आधीच या पुस्तकाने नाट्यवर्तुळात खळबळ उडवली होती. त्यात अभिप्राय दिला नाही तरी पंचाईत आणि दिला तर तो कसा द्यायचा हे कळत नव्हतं. न. चिं. केळकर, नाट्याचार्य खाडिलकर, शंकरराव मुजुमदार अशी मंडळी रोज महाराष्ट्र नाटक कंपनीच्या मुक्कामाच्या ठिकाणी यायची. त्यांच्या चर्चेत यावर मार्ग निघत नव्हता. तेव्हा महाराष्ट्र नाटक कंपनीच्या त्र्यंबकराव कारखानीसांनी अभिप्राय लिहिण्यासाठी प्रबोधनकारांचं नाव सुचवलं. `नाट्यकलारुक्कुठार’वर प्रबोधनकारांनी सुदर्शन या टोपणनावाने `डोंगर पोखरून उंदीर काढला’ या शीर्षकाचं परीक्षण लिहून दिलं. ते रंगभूमी मासिकात छापूनही आलं. पुस्तकाने दाखवलेले नाटकातले दोष न नाकारता रोखठोक पण उपरोधिक शैलीत लिहिलेलं हे परीक्षण वाचून तात्यासाहेब खुष झाले होते. त्यावर त्यांची प्रतिक्रिया होती, `मी धंद्याने वकील खराच, पण या वकिलाचीही वकिली ठाकरे यांनी करून केस जिंकली, म्हणून मला त्या आमच्या वविâलाची भेट घेऊन थँक्स मानायचे आहेत.’ हे आभार मानण्यासाठी तात्यासाहेब नाटक कंपनीच्या मुक्कामावर आले. त्यानंतर प्रबोधनकारांचे फक्त तात्यासाहेबांशीच नाही तर संपूर्ण कोल्हटकर कुटुंबाशीच जिव्हाळ्याचे संबंध जुळत गेले.
– सचिन परब
(लेखक ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या वेबसाईटचे संपादक आहेत.)