अवघ्या सहा-सात वर्षांत शाखाप्रमुख ते आमदार ही झेप विस्मित करणारी होती. चेंबूरच्या गल्लीकुचीत हिंडणारा माणूस थेट मालवणचा लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत शिरतो हा चमत्कार राणे यांचा नव्हता, शिवसेनाप्रमुखांचा होता. त्यांचा स्पर्श झालेल्या अनेकांच्या जीवनात तो घडून आला. त्यांचा ज्यांनी नम्रतेने आदर राखला ते राजकीय जीवनात नीट सुस्थिर झाले. पण आपणच अडकित्ता आहोत, येणारी कुठलीही सुपारी आपण फोडूच हा भ्रम मागच्या आठवड्यात संपुष्टात आला. एका साध्या लहानशा सुपारीने अडकित्ताच तोडून दाखवला हे उभ्या देशाने पाहिले.
—-
अल्पकाळाकरिता का होईना, पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर एकेकाळी बसलेले, नारायण तातू राणे हे मागील आठवड्यातील एका दिवशी, एका तीव्र वादळात भोवंडत असताना मराठी माणसांनी पाहिले. अगदी अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात केला आहे. देशाच्या मंत्रिमंडळात वर्णी लागणे हा कुठल्याही राजकीय नेत्याच्या वाटचालीतला अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. महाराष्ट्रातून भाजपचे चार खासदार केंद्रीय मंत्री झाले. त्यात सर्वांत प्रदीर्घ राजकीय कारकीर्द नारायण राणे यांचीच आहे. १९८५ला ते मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले त्याला आता ३६ वर्षे झाली. तिथून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास थेट केंद्रीय मंत्रीपदापर्यंत येऊन ठेपला आहे. त्याचा आनंद व अभिमान खरे तर सर्वसामान्य मराठी माणसाला खूप वाटायला हवा होता, पण तसे काही झालेले दिसले नाही. समाजमाध्यमांवर नारायण राणे यांच्या संदर्भात जे काही येते, त्याखाली सामान्य माणसांच्या ज्या प्रतिक्रिया येतात त्या वाचल्या तरी त्यांच्याविषयी जनमानसात नेमक्या काय भावना आहेत ते अगदी स्पष्ट समजून येते. राणे यांच्याबद्दल आम मराठी माणसांच्या मनात प्रचंड राग आहे व तो तितक्याच तीव्रतेने दरवेळी उमटलेला दिसतो.
राणे हे शिवसेनेचे प्रॉडक्ट आहेत हे त्यांच्यासह सर्वांनाच मान्य व स्वीकृत आहे आणि म्हणूनच केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर दीड महिन्यांनी ते प्रथमच मुंबईत येणार तेव्हा दादरला शिवतीर्थावर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर त्यांना आदरांजली वाहणार हे जाहीर झाल्यावर कोणालाही आश्चर्य वाटले नाही. एखाद्या चित्रपटात शोभावा असाच राणे यांचा एकूण जीवनप्रवास आहे. कसलीही सुस्थापित सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीने मुंबईसारख्या महानगरात अस्तित्त्व निर्माण करावे हे कौतुकास्पद नाही असे कोण म्हणेल? मुंबईचे नगरसेवक, बेस्टचे अध्यक्ष, आमदार, महाराष्ट्राचे मंत्री, पुढे चक्क मुख्यमंत्री अशी एकापेक्षा एक चढत्या भाजणीची अन् प्रतिष्ठेची पदे त्यांना अवघ्या १४-१५ वर्षांत मिळत गेली हे अकल्पनीय व तितकेच अविश्वसनीय आहे. या चमत्कारांच्या मालिकेचे खरे कर्ते करविते होते वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे!
अशा शेकडो हजारो नारायणांचा उदय ज्यांच्यामुळे होऊ शकला ते बाळासाहेब केवळ एक राजकीय नेते नव्हते, तर स्वतःच एक पॉवर हाऊस, कल्ट फिगर, आयडॉल आणि फिनॉमिना होते. मी इथे या इंग्रजी संज्ञा जाणीपूर्वक वापरल्या आहेत. बाळासाहेबांनी १९६६मध्ये शिवसेनेची स्थापना केली तेव्हा महाराष्ट्राचे राजकीय वातावरण अगदी थिजल्यासारखे झाले होते. १९६०च्या संयुक्त महाराष्ट्र स्थापनेनंतर राज्यावर काँग्रेसचे एकछत्री राज्य स्थिर झालेले दिसत होते. ग्रामीण भागात शेकाप तर शहरी भागात समाजवादी कम्युनिस्ट, जनसंघ यांचे लहानसहान कप्पे होते. रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट, पण तेही ठराविक वस्त्यांपुरतेच मर्यादित झालेले होते. यशवंतराव चव्हाणांच्या बेरजेच्या राजकारणाने सर्व पक्ष हतप्रभ झालेले होते. या पार्श्वभूमीवर, पेशाने व्यंगचित्रकार आणि पदाने साप्ताहिकाचे संपादक असलेले बाळ केशव ठाकरे हे मैदानात उतरले अन् एखाद्या ज्वालामुखीचा प्रस्फोट व्हावा तसे सगळे वातावरणच भारून गेले. त्याला कारण होते प्रबोधनकरांची प्रज्ञा व बाळासाहेबांची ऊर्जा, शिवछत्रपती हा आदर्श, शिवसेना हेच नाव, भगवा हाच झेंडा, वाघ हे चिन्ह आणि मराठा तितुका मेळवावा हा मंत्र असा उद्घोष करीत बाळासाहेबांनी मराठी तरुणांना साद घातली. हा तरूण प्रामुख्याने मुंबई परिसरातला होता. त्याची व्यथा होती रोजगार मिळण्याची. मुंबईसारख्या सतत वाढत्या विराट औद्योगिक महानगरात, त्यातल्या अर्थचक्रात अगदी तळातले सुद्धा स्थान या तरुणाला मिळत नव्हते. त्याची ही व्यथा समजून घ्यायला ग्रामीण भागातून आलेले काँग्रेसी सत्ताधारी तयार नव्हते अन् विरोधी पक्षांनाही कसलेच देणेघेणे नव्हते. तरुणाईच्या या हताशेला संपादक बाळासाहेबांनी ‘मार्मिक’मधून तोंड फोडले व तिचे रूपांतर सार्वजनिक संतापात केले. बघता बघता लाखो मराठी युवक त्यांच्याभोवती गोळा झाले. त्यांचा शब्द हाच आदेश मानू लागले, ते सांगतील त्याच्यावर तुटून पडू लागले. कनिष्ठ मध्यमवर्गातील एका मध्यवयीन कुटुंबवत्सल व्यक्तीचे आविष्करण एका प्रबल शक्तीत झाले हे फारच अद्भुत होते. त्याचा उलगडा ना राजकीय पंडितांना झाला, ना चतुरस्र संपादकांना झाला, ना विचक्षण विचारवंतांना झाला.
राजकारणात उतरण्यासाठी, टिकण्यासाठी अन् प्रभाव निर्माण करण्यासाठी भारतामध्ये किमान दोन गोष्टींची आवश्यकता असते. धर्म, जात, वर्ण, वंश, वर्ग, पंथ यापैकी किमान एका बाबीवर आधारलेला जनसमूह आणि हालचाली व घडामोडींसाठी लागणारा पैसा अन् साधनसामग्री यापैकी काहीही बाळासाहेबांकडे नव्हते. बेरोजगार झुंडीकडे अभाव आणि विवंचना याशिवाय दुसरे काय असणार? पण लाखमोलाची दौलत त्यातल्या प्रत्येकाकडे होती अन् ती म्हणजे त्यांचे उसळते तारुण्य! त्यांच्या नेत्याकडे होते चेतवणारे वक्तृत्व, आव्हानक भाषा, झुंजार लढवय्या बाणा! मराठी माणसाला मुंबईत त्याचे अस्तित्व मिळवून द्यायचे असेल तर त्याला मराठ्यांच्या क्षात्रधर्माचीच दीक्षा दिली पाहिजे हे निश्चित करून त्यांनी संघटनेची तशी मांडणी अन् बांधणी केली. मुंबईतल्या मराठी माणसांचे सर्व वर्ग, सर्व स्तर त्यांनी आपलेसे केले. त्यात दादर, गिरगाव, पार्ले, गोरेगाव, वरळी, घाटकोपरचा मध्यमवर्गीय मराठी समाज होता, तसाच परळ, भायखळा, कुर्ला, शिवडी, विक्रोळी, लालबाग, माहीमचा कष्टकरी मराठी माणूसही होताच. यात बहुसंख्येने कोकणातील, तेव्हाच्या जुन्या रत्नागिरी जिल्ह्यातील मंडळी होती. बाळासाहेबांची दृष्टी चित्रकाराची अन् नजर व्यंगचित्रकाराची असल्याने, सभोवतालच्या गर्दीतली फुरफुरती तरुणाई हेरणे व तिला तिच्या मगदुराप्रमाणे, योग्य ठिकाणी गुंफून घेणे यात ते अत्यंत निष्णात होते. त्यातूनच त्यांनी शिवसेनेची संघटनात्मक संरचना पक्केपणाने उभी केली. शिवसेना म्हणजे उसळती गर्दी, ओसंडता उत्साह हे अगदी खरे, पण शिवसेना म्हणजे घट्ट बांधणीची पोलादी संघटना अन् बाळासाहेबांच्या शब्दावर जान कुर्बान करणारे समर्पित सैनिक हे त्याहून खरे!
नारायण राणे हे त्या फळीतले एक कार्यकर्ते. कोकणी असल्याने शिवसेनेकडे ओढा. त्यात चेंबूरच्या घाटला गावातला रहिवास, सिंधुदुर्गातल्या प्रत्येक गावखेड्यातील वस्तीवाड्यातील घरटी एक तरी मुंबईत येणारच. कापड गिरण्यांत नाहीतर मिळेल तर कारखान्यात नोकरी धरणारच. अशा सर्व श्रमिक मंडळींना मुंबईसारख्या महानगरात शिवसेनेचा भक्कम आधार मिळाला. ते प्रारंभीचे दिवस अतिशय संघर्षाचे होते. सर्व प्रांतीयांच्या आपापल्या लॉब्या होत्या. उद्योगपती, मध्यम लहान कारखानदार, ठोक अन् मध्यम व्यापारी, शिवाय सर्व सरकारी, निमसरकारी, खासगी कार्यालयात, उद्योगधंद्यात राजकीय पक्षांच्या युनियन्स… सगळे आपापल्या जागी तगडे होते. हे सगळे मराठी अस्मिता ठळक करू पाहणार्या शिवसेनेला मुंबईत सहजगत्या जागा देतील हे असंभवच दिसत होते. संघर्ष अटळ होता, त्यात तग धरणे, टिकून राहणे हीच पहिली व एकमेव अट होती. बाळासाहेब हे पक्षाचे पुढारी नव्हते तर सेनेचे सेनापती होते. शिवसेनेने तरुणाईला साजेसा चढाईचा व लढाईचा कार्यक्रम सैनिकांपुढे ठेवला. राणे यांच्यासारखे तारुण्यात नुकतेच पाऊल ठेवणारे असंख्य मराठी युवक या कार्यक्रमाने भलतेच खूश झाले. त्यांना काहीतरी करून दाखवायला मनमोकळा अवकाश मिळाला.
एका बाजूला शिवसेना शाखांचे सामाजिक उपक्रम सुरू असत. त्यात रक्तदानापासून वृक्षारोपणापर्यंत आणि एसएससी व्याख्यानमालांपासून क्रीडास्पर्धांपर्यंत त्याला जे भावेल ते आयोजित केले जाई, तर दुसर्या बाजूला त्या त्या भागातला धान्याचा काळा बाजार, पाकीटमारी, छेडछाड करणार्या गुंडांचा बंदोबस्त, काम करून कमी मजुरी देणे, अफू, गांजा, चरस विकणे, सिनेमा तिकिटे दाबून ब्लॅकने पैसा कमावणे अशा काय वाटेल त्या समस्या शाखांमध्ये येत. त्यांचा निपटारा करण्यासाठी धाडस, ठोशास ठोसा, टगेगिरी असणारे सैनिकपण आवश्यक ठरे. एरियाची बारीकसारीक माहिती, सगळया व्यवहारांवर करडी नजर आणि आव्हानाला थेट भिडण्याची तयारी या भांडवलावर ही फळी प्रभावी कामगिरी करत असे. राणे हे सर्व बघत बघतच शिवसेना नेते शरद आचार्य आणि वामनराव महाडिक यांच्या अवतीभवती वावरू लागले. तिशी ओलांडली तरी ते संघटनेत कोणी नव्हते. मात्र, त्यांची भ्रमंती चेंबूर, चुनाभट्टी, कुर्ला, नायगाव, परळ, लालबाग, शिवडी अशा खास ठिकाणी असे. त्यातूनच त्यांनी रत्नागिरीतल्या गावोगावचे जिगरबाज शिवसैनिक मित्र म्हणून जोडले. १९८४ सालच्या प्रारंभी सेनेचे पहिले अधिवेशन झाले आणि लगोलग बाळासाहेबांनी संघटनेची पुनर्रचना सुरू केली. कारण पुढच्याच वर्षी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या. राणे यांची नियुक्ती शाखाप्रमुख म्हणून करण्यात आली. राणे ३२-३३व्या वर्षी राजकीय करियरला आकार देण्यासाठी गंभीरपणे व धडाडीने काम करू लागले. परिणामी, १९८५ला त्यांना चेंबूर परिसरातून तिकीट मिळाले आणि राणे चक्क नगरसेवक झाले.
तिथून पुढचा त्यांनी केलेला प्रवास जाणकारांच्या समोर आहे. कसलेही उच्च शिक्षण नसताना केवळ जगातले व्यवहार पाहता त्यांनी स्वतःला घडवले. अजिबात प्रभावी नसलेला आवाज, कसलीही नागर शैली नसलेले टपोरी छाप बोलणे, एकंदर वावरातील अनगडपणा, या उणिवांवर त्यांनी वेगाने मात केली. पुढ्यात येणार्या विषयाचा अभ्यास, अधिकारी कर्मचारी यांच्यावर जरब आणि शिवसेनाप्रमुखांना अपेक्षित कामाचा झपाटा या बळावर त्यांची कडक प्रतिमा उभी राहिली. त्याच प्रतिमेच्या प्रेमात ते गेली ३६ वर्षे पडलेले आहेत. त्यांची पुढील एकूण वाटचाल फारच भरधाव वेगाने झाली. रोजच्या रोज त्यांची महत्त्वाकांक्षा उंचउंच फोफावत गेली. शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्यावर मुलाप्रमाणे प्रेम तर केलेच, पण बेस्ट समितीचे अध्यक्षपदही सलग तीन वर्षे दिले. मुंबई जिंकल्यावर सेनेचा झंझावात महाराष्ट्रभर सुरू झाला. मुंबईकर कोकणी मंडळींनी ते वारे पार तळकोकणपर्यंत नेले. वामनराव आप्पांच्या मागोमाग अनेक नगरसेवक नियमित गावोगावी जाऊ लागले, तिकडच्याही समस्या सोडवू लागले. राणेदेखील त्यात होते. सत्ता आणि पदे या बळावर कोणालाही नमवू शकतो, माणसे घाबरतात, दबतात या अनुभवाचा आनंद घेणे त्यांना आवडू लागले. सत्तेमागे समृद्धीचे शेकडो मार्ग येतात, त्यामागे येतो दर्प, इतरांबद्दलची तुच्छता. दरम्यान, १९९०च्या विधानसभा निवडणुका आल्या. राणे यांना आमदारकीचे स्वप्न पडू लागले. त्यांनी थेट शिवसेना नेते शरदबाबू आचार्य यांच्या चेंबूरच्याच जागेवर दावा केला. शरदबाबू सर्वार्थाने ज्येष्ठ होते, पण राणे यांनी हट्ट खूप ताणला. आप्पासाहेब महाडिक आणि विठ्ठल चव्हाण यांनी त्यांना बरेच समजावले अन् मालवणच्या जागेचे आश्वासन दिले, असे म्हणतात. हट्ट करीत राहावे, त्याने काहीतरी मोलाचे पदरात पडतेच पडते, मग आणखी पुढची तयारी करावी हे त्यांना उमगले आणि राणे आमदारही झाले.
अवघ्या सहा-सात वर्षांत शाखाप्रमुख ते आमदार ही झेप विस्मित करणारी होती. चेंबूरच्या गल्लीकुचीत हिंडणारा माणूस थेट मालवणचा लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत शिरतो हा चमत्कार राणे यांचा नव्हता, शिवसेनाप्रमुखांचा होता. त्यांचा स्पर्श झालेल्या अनेकांच्या जीवनात तो घडून आला. स्वप्नातही न पाहिलेली लोकस्वीकृती, प्रतिष्ठा, मानसन्मान, संघटनात्मक व लोकप्रतिनिधी म्हणून पदे, करणात्मक अधिकार असलेली सत्ता, सुखसुविधा, संपत्ती हे सगळे सामान्य माणसांच्या वाट्याला येऊ शकले, त्यामागे बाळासाहेबांची तपश्चर्या आणि पुण्याई होती. तिचा ज्यांनी नम्रतेने आदर राखला ते राजकीय जीवनात नीट सुस्थिर झाले. मराठी माणसाने त्यांना सदैव प्रतिष्ठाच दिली. जे अतिमहत्त्वाकांक्षेच्या ज्वराने फणफणले, त्यांचा ताप जनतेनेच पुनःपुन्हा उतरवला. रूढ वाटांपेक्षा नवा मार्ग, नवी दिशा शोधणे यासाठी प्रज्ञा व प्रतिभा लागते. शिवाय डोंगर फोडण्याइतके परिश्रमही करावे लागतात. शिवसेनाप्रमुखांनी हे परिश्रम स्वतः जातीने केले. म्हणून ते ‘कल्ट फिगर’ ठरले व किमान तीन पिढ्यांनी त्यांना ‘आयडॉल’ मानले. त्यांच्या जागी ज्यांनी स्वतःचीच स्थापना करण्याचा प्रयत्न केला ते हास्यास्पद तरी ठरले किंवा केविलवाणे तरी. राणे आमदार झाले, पुढे युती सरकारमध्ये दुग्धविकास मंत्री झाले. सुधीरभाऊंना अपघात झाल्यानंतर त्यांचे महसूल खातेही साहेबांनी राणेंनाच दिले. त्यांच्या महत्त्वाकांक्षेने एव्हाना शीग गाठली होती. शिवसेनेत कधीही नसलेले जातीपातीचे विष बाहेरील काहीजणांनी घाटावरच्या आमदारांमध्ये भिनवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याला उत्तर म्हणून शिवसेनामुखांनी राणेंना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आणले. खरे तर हा पूर्ण कोकणाचाच सन्मान होता. मुंबईत येऊन पोटासाठी राबणार्या सर्वसामान्य गोरगरीब कोकणी मंडळींनी शिवसेनेसाठी ज्या खस्ता खाल्ल्या त्यांचा हा गौरव बाळासाहेबांनी केला होता. पण हे आपले कर्तृत्व असल्याचा समज राणेंनी करून घेतला. आपल्या अहंकारावर ते सतत आणखी गाठी मारत राहिले.
एव्हाना साहेबांचे वय झाले होते. त्यांच्या संघटनेला महाराष्ट्राने हक्काचा राजकीय पक्ष म्हणून प्रेमाने स्वीकारले होते. सत्ता गेली म्हणून विचलित न होता, साहेब संघटनेचे सत्त्व आणि तेज राखण्यावर भर देत होते. याचवेळी, महाबळेश्वर शिबिरात नेते, उपनेते, पदाधिकारी यांनी उद्धवजींना कार्याध्यक्षपदी निवडले. शांत, संयमी, सुसंस्कृत उद्धवजी कालानुरूप संघटनेला नवे वळण, नवी शैली देऊन पुढे नेतील हा विश्वास त्यामागे होता, पण अतिमहत्त्वाकांक्षी मंडळींना स्वतःच पॉवर हाऊस, कल्ट फिगर, आयडॉल होऊन आपला फिनॉमिना रेटण्याची तीव्र इच्छा झाली. त्यातून संघटनेत संशय, अविश्वास, गटबाजी, अंतर्कलह यांचा निवडुंग माजवण्याचा प्रयत्न होऊ लागला. शिवसेनाप्रमुख हे सहन करणे शक्यच नव्हते. त्यांनी शिस्तीची कुर्हाड उगारून निवडुंग छाटून काढला. २००५ या एका वर्षात आधी राणे व नंतर लगेच राज ठाकरे यांना बाहेरचा रस्ता पकडावा लागला. राज यांनी स्वतःची मांडणी केली जमेल तशी, पण राणे सत्तेविना तळमळतच होते. ती होती काँग्रेसकडे. राणे थेट त्या तंबूत दाखल झाले अन् महसूलमंत्रीपदाचा मोक्षप्रसाद त्यांना मिळाला, पण तिथेही त्यांना मुख्यमंत्रीपदच हवे हाते. जे देणे काँग्रेसला शक्यही नव्हते अन् परवडणारेही नव्हते. अनेक वेळा दिल्लीच्या वार्या करून झाल्या. सतत नकार मिळाले. मराठी माणसानेही राणे पिता-पुत्राच्या पदरात पराभव घातले. या सगळ्याचे नीट निरीक्षण करून एखाद्याने शांतपणे आत्मपरीक्षण केले असते आणि वर्तनशैलीपण बदलली असती, पण साठी ओलांडलेल्या राणे यांच्याकडून ते झाले नाही. त्यांची धुसफूस, चिडचीड वाढत गेली. दरम्यान, राजकीय वारे बदलले. केंद्रीय सत्ता भाजपकडे गेली. स्वाभिमान संघटना स्थापन करून राणे काँग्रेसपासून दूर झाले. त्यांचा लंबक भाजपच्या दिशेने हेलकावू लागला. महाराष्ट्रातल्या जनतेने हे सर्व खेळ पाहिले आणि तिच्या मनात नारायण राणे या व्यक्तीबद्दल तीव्र संताप वाढत गेला. त्यांना जवळ केले म्हणून भाजपबद्दलही नाराजीची भावना वाढली. एकनिष्ठ मित्राचा घात करणार्या, कपटी भाजपला उद्धवजींनी जो जबरदस्त तडाखा दिला तो पाहून तर मराठी माणूस फारच खूश झाला. त्याने उद्धवजींना आपला नायक म्हणून सहर्ष स्वीकारले. महाराष्ट्राइतकीच त्यांची लोकप्रियता देशभरात वाढीस लागली.
मराठी मुलुखातली सत्ता गेल्याने सैरभैर झालेल्या फडणवीस-मोदी यांच्या भाजपला राणे हाच आधार वाटू लागला. सेनेला शह देण्यासाठी त्यांनी राणे यांना केंद्रीय मंत्रीपद देऊ केले. त्याबरोबर पिता-पुत्र चौखूर उधळू लागले. त्यांचा दर्प, अहंता, तुच्छताबुद्धी शतगुणित होऊन उफाळून येऊ लागली. राजकारण हे मतभेदाचे क्षेत्र असले तरी तिथेही सभ्यता, शिष्टाचार यांच्या मर्यादा पाळाव्याच लागतात. सत्तरीला आलेल्या राणेसाहेबांनी त्या मर्यादेच्या चिंध्या केल्या. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे केवळ शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, ते १२ कोटी जनतेचे वैधानिक मानबिंदू आहेत. त्यांचा एकेरी उल्लेख आणि शारीरिक आघाताची भाषा मराठी माणूस चालवून घेईल, हे संभवत नाही. शिवसैनिकांना तर ते सहनच होऊ शकत नाही. राणे यांच्याकडून ‘ती’ आगळीक घडताच, सध्या शांत, सोशिक वाटणारी शिवसेना ताडकन १९७०चे ‘अवसान’ घेऊन पेटून खवळून उठली. तिने गावोगाव उन्मत्त, मग्रूर धश्चोटांची घरचोरांची मस्ती जिरवली. भाजपचे साजूक संस्कारी सोवळे बिळात लपले ते बाहेर येऊच शकले नाहीत. दोन ठिकाणी जामीन फेटाळल्यावर तिसर्या ठिकाणी बेताल बडबड न करण्याची समज मिळून, माननीय केंद्रीय मंत्री बाहेर पडू शकले. पुढे कायद्याची प्रक्रिया चालू राहील. त्यातून जे घडायचे ते घडेल. मात्र आपणच अडकित्ता आहोत. येणारी कुठलीही सुपारी आपण फोडूच हा भ्रम मागच्या आठवड्यात संपुष्टात आला. एका साध्या लहानशा सुपारीने अडकित्ताच तोडून दाखवला हे उभ्या देशाने पाहिले.
शिवछत्रपतींनी एका पत्रात असे वाक्य लिहिले आहे की, ‘अग्नी तृणाने झाकतात याचे नवल वाटते.’ बंगालचा प्रयोग अंगलट येऊनही भाजपचे चाणक्यश्रेष्ठी तोच उद्योग पुन्हा महाराष्ट्रात का करत आहेत?
– नंदन रहाणे
(लेखक कडवे शिवसैनिक आणि इतिहास, साहित्य, संस्कृतीचे अभ्यासक आणि लेखक कवी व्याख्याते आहेत.)