नारायण राणे ह्यांच्या प्रशासनचा अनुभव आणि संघटनकौशल्याबाबत वादच नाही. गावागावातून त्यांचे घडवलेले कार्यकर्ते आहेत. पण ते सर्व कार्यकर्ते साहेबांसारखेच कमावून स्थिरस्थावर झाले आहेत. राणेंसाठी आजदेखील ते रस्त्यावर उतरतील आणि स्वतःवर फौजदारी खटले दाखल करून घेतील असा जर राणेंचा समज झालेला असेल तर तो गैरसमज नक्कीच दूर झाला असणार. त्यांच्या अटकेनंतर कोकणातले एक गाव देखील बंद नाही झाले. कोणी निषेध म्हणून स्वतःचे दुकान, हॉटेल बंद नाही केले. महाराष्ट्रात दबदबा असणारा नेता का नुसताच एक राजकीय बुडबुडा असा प्रश्न पडावा इतकी त्यांची अटक साधारण आणि सामान्य ठरली. प्रसाद लाड आणि दरेकर यांना भाजपाने नाममात्र सोबत म्हणून पाठवले होते. मी नॉर्मल (सामान्य) नाही असे दुपारी म्हणणारे राणे रात्री पंधरा हजारांचा जामीन घेऊन, परत असे बेताल वक्तव्य करणार नाही ह्याची हमी देऊन, दोन वेळा पोलीस ठाण्यात हजर राहून स्वतःचे आवाजाचे नमुने देखील तपासासाठी देईन अशी ग्वाही देऊन स्वतःची कशीबशी सुटका करून घेतात, तेव्हा बाळासाहेबांनी घडवलेले लढवय्ये शिवसैनिक राणे ते हेच का असा प्रश्न पडतो. राणेंची झाकली मूठ सव्वा लाखाची होती ती त्यांनी आता उघडली तर त्यात पुत्रप्रेमाने झालेली राखरांगोळी निघाली. दिल्लीच्या काठीचा आधार घेऊन राजकारणात तरंगणारे राणे बघणे हे फार केविलवाणे दृश्य आहे. ह्या वयात एक बिन महत्वाचे केंद्रीय मंत्रिपद देऊन भाजपा त्यांना लहान लहान गावामधून मोदींचा ढोल वाजवत यात्रा काढण्यास भाग पाडत आहे आणि ते त्यांना करावेच लागते ह्यातच ह्या माजी मुख्यमंत्र्यांची राजकारणात टिकायची केविलवाणी धडपड दिसून येते. राणेंची धग आता संपली आहे, कार्यकर्त्यांसोबत नाळ तुटली आहे आणि निव्वळ उद्धव ठाकरे ह्यांची निंदानालस्ती करण्यासाठी त्यांची उपयुक्तता आज शिल्लक राहिली आहे हे कटुसत्य आहे.
राणेंना केलेली अटक घटनात्मकपद भूषविणारे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ह्यांच्याबाबत केलेल्या बदनामीकारक वक्तव्यावरून होती हे लक्षात घेतले पाहिजे. भाजपाकडून उद्धवजींवर खालच्या पातळीवरील टीका करणे सुरूच असते. पण कानफटात मारायची भाषा जर सेनेने खपवून घेतली असती तर आजपर्यंत राहुल गांधी, ममतादिदी आणि इतर नेत्यांबाबत जे घडत आले तेच उद्धवजींबद्दल घडू शकले असते. उद्धवजी हे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. करोनाच्या संकटातून त्यांनी ज्या सक्षमपणे महाराष्ट्राला बाहेर काढले त्यामुळेच भाजपाचा मतदारदेखील आज त्यांचा चाहता झालेला आहे. विनम्र स्वभावाने त्यांनी आक्रस्ताळ्या भाजपाची गोची करून ठेवली आहे. त्यांच्यावर कामाच्या बाबतीत फार टीका करता येत नाही हे ओळखून राणेंनी त्यांच्यावर अनवधानाने झालेल्या गफलतीच्या अनुषंगाने टीका करणे, लायकी काढणे आणि कानफटात मारू असे म्हणणे यामागे कुटील डाव होता. ते बुळे आहेत असे दाखवून देऊन त्याद्वारे त्यांच्या प्रतिमेचे अपरिमित नुकसान करून ठेवण्याचे हे मोठे कटकारस्थान होते. राणे बरळत होते तेव्हा दरेकर, जे स्वतः एक राजकीय लाभार्थी आहेत ते दात काढून हसत होते. भाजप किती रसातळाला गेलेला आहे हे दाखवण्याची जणू तिथे चढाओढच सुरू होती. जोपर्यंत सोबत होते तोपर्यंत उद्धव हे भाजपाला आदरणीय होते पण त्यांनी साथ सोडताच उद्धव हे पप्पू आहेत, आळशी आहेत अशी प्रतिमा निर्माण करण्याचे कारस्थान भाजपाने रचले आहे. तसेच आदित्य ठाकरे फिल्मी पार्ट्या करत फिरत असतात अशीही भाजपाच्या आयटी सेलने अफवा उठवली आहे. भाजपा व संघ परिवार ह्या प्रकारचे अफवांचे आणि बदनामीचे पीक घेण्यात तरबेज आहे. ज्यांनी महात्मा गांधीची बदनामी करून गोडसेची पूजा केली त्याना हा खेळ नविन नाही. मैदानात थेट मुद्द्यावरून विरोध न करता नथीतून तीर मारणारा रा. स्व. संघ आणि भाजपाचा विद्रूप चेहराच आज राणेंच्या अटकेनंतर समोर आला आहे. राणेंची री ओढीत कोणीही सोम्या गोम्या महाराष्ट्रातील जनप्रतिनिधींना कानफाटीत मारेन म्हणू लागला असता त्यामुळेच जामीन मिळणार माहिती असूनही राणेंची अटक करून त्यांना हिसका दाखवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज मोदींच्या दबावाच्या राजकारणाला पुरून उरले आहेत. वेळ पडली तर शिंगावर घेऊ म्हणणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राने ह्यानिमित्ताने बघितले. राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात असूनही अटक व जामीन ही नामुष्की पत्करावी लागली. मंत्रीपदाच्या माध्यमातून तोंड बंद ठेवून समाजाला उपयोगी पडेल असे काम करावे इतकी माफक अपेक्षा ह्या वयातील राणेंकडून करणेदेखील चुकीचे ठरेल, इतके राणे आणि त्यांचे पुत्र वाहावत गेले आहेत. ह्या सर्व प्रकरणातून पुनः एकदा उद्धवजींनी बाजी मारली.