प्रबोधनकारांना सर्रास ब्राह्मणद्वेष्टे म्हटलं जातं. तसंच त्यांना मुस्लिमविरोधकही म्हणणारे विरोधक आहेतच. पण त्या सगळ्यांनी प्रबोधनकारांचा कोल्हापुरातला पहिला मुक्काम समजून घ्यायला हवा. त्यांची गट्टी जशी ब्राह्मण असणार्या काका तारदाळकरांशी जमते, तशीच सुफी साधू बादशहा अवलियाशीही जमते.
—-
प्रबोधनकारांनी बहुजनांचं शोषण करणार्या ब्राह्मणांच्या विरोधात आयुष्यभर लिहिलं. तेही कोणतीही लपवाछपवी न करता थेट लिहिलं. भिक्षुकशाहीच्या षडयंत्रांवर त्यांच्याइतकं नेमकेपणाने बोट खूप कमी जणांनी ठेवलं असेल. तरीही काका तारदाळकरांसारख्या एका ब्राह्मण स्नेह्याविषयी लिहिताना त्यांचे लेखन अत्यंत प्रेमादराने भरून वाहू लागते. त्यांच्या चांगल्या वागण्याचं श्रेय ते तारदाळकरांना भरभरून देतात. कुठेही लपवाछपवी करत नाहीत. कारण प्रबोधनकारांचं ना कोणत्या ब्राह्मणाशी वैयक्तिक वैर होतं, ना ब्राह्मण समाजाशी वैर होतं. त्यातल्या काहीजणांच्या स्वतःलाच सर्वश्रेष्ठ मानण्याच्या अहंकारामुळे एकंदर समाजाचं नुकसान होताना आणि बहुजनांवर अन्याय होताना ते पाहायचे, तेव्हा मात्र त्यांची लेखणी समशेरीपेक्षाही तेजाने तळपली.
प्रबोधनकारांनी ब्राह्मणांच्या विरोधात लिहिलं, त्यापेक्षाही तिखटपणे त्यांनी इस्लाम आणि ख्रिश्चनांमधल्या पुरोहितशाहीच्या विरोधात लेखणी चालवली. ते उघड हिंदुत्ववादी होते. पण म्हणून आजच्या काही बनावट हिंदुत्ववाद्यासारखे सगळ्याच मुसलमानांना शत्रू मानायचा मूर्खपणा ते करत नव्हते. जसे विरोधात लिहूनही ब्राह्मणांमध्ये त्यांचे मित्र होते, तसेच मुसलमानांमध्येही होते. कोल्हापुरात ब्राह्मण जातीच्या काका तारदाळकरांशी त्यांची गट्टी जमली, तशीच मुसलमान समाजात जन्मलेल्या बादशहा अवलियाशीही.
या बादशहाची बैठक प्रबोधनकार चालवत असलेल्या छापखान्याच्या वरच्या माडीवर असायची. तो सुफी साधू होता. त्याचं घर शेजारीच होतं. तिथे त्याचा भाऊ राहायचा. तो हकीम होता. आयुर्वेदिक आणि युनानी औषधं द्यायचा. रोज दुपारी बारा वाजता बादशहासाठी जेवण यायचं. बादशहा दिवसातून एकदाच जेवायचा. बाकी कायम चिंतन सुरू असायचं. बादशहा स्वभावाने दिलदार होता. तो जितका रगेल तितकाच रंगेल, असंही प्रबोधनकार म्हणतात. अनेक जण त्याच्याकडे दुवा घ्यायला यायचे. असं कुणी आलं की सतत हसतमुख असणारा बादशहा त्यांच्याशी अत्यंत प्रेमाने आणि रसाळ भाषेत हलक्याफुलक्या तत्त्वज्ञानाच्या गोष्टी सांगायचा. भेटायला येणारी मंडळी समाधानाने परतायची.
खरं तर प्रबोधनकार कोल्हापुरात आनंदात होते. कारण दौलती नावाचा छापखान्याचा फोरमन प्रामाणिक आणि उद्योगी होता. तो स्वतःच छपाईची कामं मिळवायचा. बिलं वसूल करायचा. त्यामुळे प्रबोधनकारांना लेखन आणि ऑइल कलरमधली पोर्ट्रेट पेंटिंग करण्यासाठी मोकळा वेळ मिळायचा. या मोकळ्या वेळामुळेच प्रबोधनकारांचा बादशहाशी लवकरच स्नेह जमला. प्रबोधनकारांना व्यवहारात किंवा संसारात काही अडचणी आल्या तर तेही त्या बादशहाच्या कानावर घालत. त्यावर बादशहा खदाखदा हसायचा. मग त्यावर बिनतोड तोडगा सुचवून धीर द्यायचा.
बादशहाचं साधं सोपं तत्त्वज्ञान प्रबोधनकारांनी नोंदवून ठेवलंय. ते असं, `अहो, आहे काय त्यात एवढे? त्यांनी असा पेच मारला, तर आपण अगदी तस्साच नवा पेच मारून बसवायचा त्याला गप्प. संसार ही एक लढाई आहे. माणसाला व्यवहारातले पाचपेच अगदी तोंडपाठ पाहिजेत. आपण सरळ नीतिमत्तेने वागावे. म्हणजे कोणाचे काही चालणार नाही. अहो, माशी कुठे बसते? अंगावर निंदकाच्या माशा येतील कशाला आपल्याजवळ घोंग्घोंग करायला?’
बादशहाच्या निकट सान्निध्याने माझं कोल्हापूरचं वास्तव्य सर्वतोपरी आनंदात उत्साहात ढवळून निघत असे, असं प्रबोधनकारांनी नोंदवलंय. अर्थातच प्रबोधनकार फार काळ कोल्हापुरात राहिले नाहीत. त्यानंतर ते एकदा कोल्हापूरला गेले असताना बादशहा अवलिया गावाच्या बाहेर डोंगरातल्या एका घळीत एकांतवासात राहत होता. प्रबोधनकार त्याला तिथे जाऊन भेटले. त्यानंतर फार वर्षांनी प्रबोधनकारांचं बिंदू चौकात भाषण होतं. तेव्हा बादशहाने पुतण्याला आवर्जून सभेच्या ठिकाणी पाठवलं आणि घरी येण्याची व्यवस्था केली. प्रबोधनकार भेटले तेव्हा बादशहा आजारी होते. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. त्यांना बिछान्यातून उठण्याची मनाई होती. पण प्रबोधनकार येताच बाहशहा अत्यंत जिव्हाळ्याने उठून उभे राहिले. त्यांना सावरण्यासाठी भाऊ आणि पुतणे धावत आले. त्यांनी प्रबोधनकारांना पोटाशी कवटाळलं आणि म्हणाले, `केशवराव, आज तुम्ही भेटलात, मला फार आनंद झाला. परमानंद झाला. मी आता परतीच्या मार्गाला लागलोय. हा शेवटच्या भेटीचा आनंद.’
बादशहा यांनी जास्त बोलू नये असा हकीम असणार्या भावाचा आग्रह होता. पण ते प्रबोधनकारांशी भरपूर बोलत होते. त्यांच्या उत्साहामुळे प्रबोधनकारांना छापखान्याचे दिवस आठवले. बादशहा बोलतच होते, `अरे बाबांनो, आम्ही आता भरपूर बोलून घ्यायचे नाही, तर केव्हा रे? अशी माणसं काय वरचेवर भेटतात?’ प्रबोधनकारांना त्यांनी सांगितलं, `केशवराव, जीवनाच्या अखेरीला भेटताय, बरं वाटलं. भक्ती आणि श्रद्धा हेच मोठं भांडवल. आज दोघांना त्याचं भरपूर व्याज मिळालंय.’ त्यांनी दोन कप चहा मागवला. एक कप प्रबोधनकारांना दिला आणि दुसरा पथ्य असतानाही स्वतः घेतला. त्यावर त्यांचं स्पष्टीकरण होतं, `छापखान्यात स्टोववर यांनी चहा केला की माझा जादा एक कप ठरलेला असायचा. आज तो मी सोडेन का?’ प्रबोधनकारांनी लिहिलंय की त्यांनी बादशहाच्या पायांवर मस्तक घासून निरोप घेतला.
पुढे थोड्याच दिवसांत बादशहा अवलियांचं निधन झाल्याची बातमी प्रबोधनकारांनी वृत्तपत्रांमध्ये वाचली. कोल्हापुरात आजही खाटिक गल्ली आहे. तिथे प्रिंटिंगची कामं करणारे छोटे छोटे कारखानेही आहेत. तिथेच कुठेतरी या अवलिया बादशहांची आठवण कुणी जपून ठेवली असेल का? एकदा जाऊन शोधायला हवं. कारण ती फक्त बादशहांची स्मृती नसेल तर ते प्रबोधनकारांच्या जातधर्माच्या पलीकडे जपलेल्या मैत्रीचंही स्मारक असेल.
(लेखक ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या वेबसाईटचे संपादक आहेत.)