माह्या आजीले एकडाव म्या इचारलं व्हतं का, ‘आज्जे भुत असतेत का?’ आता ह्या सवाल एकदम माह्या वयाच्या लेकरायनं इचाराव असा नोता. त्याच्यात माही आजी तसी खानदेसी होती; पन आता पुरी वर्हाडी झाली होती. वर्हाडी मानसं बोलाले खवचट असतेत. तिरकस बोलतेत. सिधे कईच बोलत नाही. तेच्यात माही आजी वरीजनल खान्देशी, त्याच्यापायी ह्या तिरसकरपना अखीनच धारधार होएल होता. थे म्हने का, ‘म्हून म्हनलं तुले का ज्याना टायम मोठ्या संग राहात जावू नोको…’ आमची आजी माह्या मोठ्या भावाले भूताड्या म्हने!
गोष्टीनं फौजा हाकलने असा एक वाक्प्रचार हिंदीत हाय. बोलन्यान भूतं हाकलनारे मातर वर्हाडी लोकच असू शकते. सिधे कईच बोलनार नाही ना. म्हंजे बाप आपल्या लेकराले अभ्यास कर, असं सिधं नाही म्हननार. थो लेकराले जवड बलवन अन् मोठ्या लाडानं म्हनन, ‘बापू किती अभ्यास करसीन? टिव्ही पाह्यना… आपून घेतला कायले इतला पच्चीस हजाराचा टिव्ही? त्याले मयना तीनशाचं कनेक्शन, घरची इज असीच फुकट जाईन का?’ आता याच्यावर लेकराले का बोलाव ते समजत नाही. थो गांगरते. आपल्याले खरंच टिव्ही पाहाचा हाय का आपला बाप कारगीलची तयारी करत हाय, याचा इचार करत असतानीच बाप पुना सांगते, ‘का हाय का आफनच खर्च केला असं नाईना… का हाय का थे टिव्हीवाले सिरीयला बनोतेत, त्यायचा पैसा न टायम खर्च होते. कलाकार काम करतेत, तू नाही पायला टिव्ही त त्यायची इतली आटाआटी वाया नाई जानार का?’ आता इतलं बापानं समजवल्यावर पोट्टंबी टिव्ही लावून अभ्यासाले बसते! आता थोबी वर्हाडीच ना…
त हे असं हाय. अठी मानसं भुतावानी असते न भूतं मानसावानी असतेत. एकडाव आमच्या एका मैतराले भूतानं धरलं होतं. म्हंजे मांगच्या टायमाले म्या सांगलं नोतं का की, भूत कोनाले झोंबते म्हनजे त्याचं झाडं धरते. तसं याच्या आंगात भूत आल्तं… आता असं काही झालं का भूतानं धरेल मानसाचं बिहेवियर (ह्या इंग्रजी शब्द हाय, नाही त तुमी अंडरवियरसारखं काही समजाचे.) एकदम बदलूनच जाते. त्याचा आवाज बदलते. जमल्यास त्याची भाषाबी बदलून जाते. म्हंजे एखांद्या मुसलमान चाचूचं भूत झोंबलं एखाद्यांले त तो, ‘मय क्या तेरकू एकदम बिलगनेकोच्च मांग रह्या था क्या? पयले हात मिला, फीर नजर जला होर फीर बदनसे बदन खिला…’ असं कायतबी बोलते. आमाच एक मित्र असाच बोले त्याले मुसलमान आशीक झोंबला व्हता तवा अन् तथो हे फकस्त रेखीकडं पाहूनच म्हने… याचा अर्थ तुमी ध्यानात घ्याचा हाय!
…त सांगत होतो का आमच्या मैतराले भूत झोंबलं. त थो अमिताभचे डायलाग मारे अन् नदीवर पोहालेच जातो म्हने… का व्हय न कोंचं व्हय काही समजेना. मंग अस्या टायमाले आमच्या मारती भगतालेच बलवे. तो म्हने कितीबी जल्लाद भूत असलं तबी सिधा करे त्याले.
थो आला न त्यानं एकदम त्याच्या स्टाईलमंधं चौकशी सुरू केली. तुमी आमच्या मारती भगताले वळखत नाही म्हून त्याची चौकशी किती खतरनाक रायते, हे तुमाले मालूम नाही. आमच्या गावचे लोक अजूकबी म्हनतेत का, ‘एकडाव ईडी परवडली; पन मारती भगत नाही परवडला!’ याच्यावरून आमचा मरती किती खतरनाक हाय हे तुमी समजून घ्या.
त, तवा त्यानं चवकशा सुरू केल्यावर समजलं का भूत कवा लागलं… आमच्या गावात टाकीज होती; पन टुरींग टाकीज होती. म्हंजे बायका तिकडं अन् मान्स इकडं न मंधं आंतरपाट धराव तसा पडदा राहे. त्याच्यापाई सिलसिलात अमिताभ रेखाले बिलगला का मान्सायले थो उजव्या बाजूनं बिलगेल दिसे न बायकाले थो डाव्या बाजूनं दिसे… बरं आमच्या बाजोरीया सेठच्या या टाकीजमंधं येएल रील असी राहे का रेखाच्या साडीचा रंग दर दिवशी अल्लेच दिसे… आता हे टाकीज प्रकरन मंग कवा सांगीन; पन आता भूताच्या मंधं टाकीज काहून आली, असा सवाल तुमाले पडेल असीन. त थे असं हाय का, आमच्या गावात कई नवे सिनमे येच ना. अमजद खान मेल्यावर आमच्या गावात ‘शोले’ रीलीज झाला व्हता. त्याच्यापायी मंग एकदम करंट सिनमे पाहाचे असीन त अदलाबादले जा लागे. आमच्या गावाच्या बाद आंध्रची बॉर्डर लागे. त अदिलाबादमंध एकदम करंट सिनमे ये. म्हंजे बंबईत सिनमा रीलज झाला का अदलाबादले ये. मंग आमच्या गावातले शौकीन सायकलनं चायीस किलोमिटर जाऊन सनिमा पाहे अदिलाबादले. का हाय का आमच्या गावच्या रमस्या, सुभ्या, वसंता, विज्या, अज्या… अशा या गँगनं ताजा सिनमा नाई पाह्यला त अमिताभ, धर्मेंद्र, शत्रू अन् रेखा, हेमा नाराज होएना. एकडाव त यायनं आत्ता रीलीज झालेला सिनमा नाय पायला अदलाबादले जाऊन त अमिताभचा जादूगर नावाचा सिनमा आपटला होता ना!
…त हे असे सिनमा पाहाले जाए. येतानी ढाब्यावर जेवे. एक त सेकंड शोच पहाले जाए. तवा काही मॅटनी गी नोता. राती मंग बाराच्या बादच गावाकडं निंघे अन् पाह्यटं तीन-चार वाजता गावात ये. त ह्या आमच्या भुर्याले भूतानं झपाटलं ते तो असाच सिनमा पाहून रातीच्या टायमाले येत होता तवा. झालं असं का हे सिनमा गँग गेली अमिताभचा नसीब पाहाले तवा भुर्या गावात नोता. तो त्याच्या मोठ्या भावाच्या साळीच्या लगनाले गेलता. मोठ्या भावाच्या साळीच्या लगनापाई आदीच थो गममंध होता न गावात आल्यावर त्याले यायनं आमी नसीब पायला, असं सांगलं. त्याच्या ताज्या जखमेवर हे नमक चोळल्यावानी झालं. त्याले वाटलं, बहीनमाय माहं नसीबच असं हाय. भावाची साळी दुसर्याची झाली थे ठीक; पन आपल्या नसीबात अमिताभचा नसीब पन नाही? मंग तो एकटाच गेलता सिनमा पाहाले. न येतानी त्याले भूतानं धरलं होतं.
आता मारतीच्या चवकशीत इतकी मायती बाह्यर आल्यावर भूत कोनाचं झोंबलं न कुठी, याच चवकशी रायली. मारतीनं आधी त भुर्याले मस्त हानला. त्याले चानसच भेटला होता. मांग मारतीच्या आंगात नवरात्रीले देवीमाय आल्ती न तो घुमाले लागला होता, ‘मी दुर्गादेवी हायऽऽ मी तुमच्या गावावर नाराज हायऽऽ’, असं चिल्लावत थो घुमाले लागला. त ह्या भुर्या त्याले बाभयीचा काटा टोचे अन् मंग देवी आंगात येएल मारत्या मंधच आपला रोल सोडून ‘कोन व्हयबे सायाचा?’ असं इचारे न लोक हासे. त्याचा बदला आता मारतीनं घेऊनच टाकला. हानत जाए न इचारे, ‘तू कोन व्हय न हे झाडं काहून पकडलं?’ त भुर्या त्याले अल्लगच आवाजात इचारे, ‘मी कोन व्हय याच्यासी तुले का कर्याचं हाय? काम का हाय थे सांग…’
त मारत्या भगत त्याले अखीन एक हानून इचारे, ‘हे झाडं कामून धरलं तुहा? तुले का पाह्यजेन?’
‘का पाह्ययेन म्हंजे?’ भुर्याच्या आंगातल्या भुतानं इचारलं.
‘तुही काही इच्छा राह्यली हाय का? कशात वासना असली त भूत होते ना मानूस मेल्यावर… त तुही काही वासना हाय का? म्हंजे तुले कोंबडी खाची हाय का?’ आता हे इचारल्यावर मारत्यानं माराच्या आदीच भुर्याच्या आंगातलं भूत म्हने, ‘नाही… मले कोंबडी नाही खाची.’ आता मारत्याले कोंबडी खाची असूनबी भूत नाही म्हनते हे आयकून मारत्या अखीनच चिडला अन् अखीन एक लात पेकाटात हानत म्हनला, ‘कोंबडी नोको? कसाबे तू भूत? मंग का पायजेन? इंग्लीस दारू पायजेन का?’
भुर्याचे हात-पाय बांधले होते, नाही तं भुर्या मारत्यापेक्षा मजबूत व्हता. थो म्हने, ‘मले दारुबी नोको न तुले पाह्यजेन म्हून मी हो म्हननार नाई… हात-पाय बांधून का मारतं बे? मर्द अससीन त हात-पाय खोल माहे न मंग येना आंगावर…’ मारत्याले जे समजाचं थे समजलं; पन थो म्हने गाववाल्यायले, ‘पाहा, लयच जल्लाद भूत हाय हे… हात-पाय सोडले ना याचे त ह्या अवघ्या गावाचा घास घ्याचा. निर्व्यसनी भूत लयच खतरनाक असते.’
मंग त्यानं भुर्याच्या आंगातल्या भुताले पैसे पाह्यजेन का असं इचारलं. थो नाही म्हने. जुवा खेलाचा हाय का? बकरी कापाची का तुह्या नावान? कोनी तुह्यावर जुलूम केला हाय का? त्याचा बदला घ्याचा हाय का? त भुर्या म्हने जुलूम करत हाय त्याचा बदला त माहा मी घेईनच; पन मले काहीच नोको.
‘किमान पुरनाची पोयी?’ तरीबी भुर्याचं भूत नाईच म्हने. भुर्यायच्या मायले शक होता का त्याच्या चुलत्यानंच हे भूत भुर्यायच्या मांग लावलं हाय. काहूनका भुर्यानं धुर्यावरून होएल भांडनात सख्ख्या चुलत्याच्या आंगावरच उभारी उगारली होती. भुर्याच्या चुलत्यानं हे भूत लावलं याचा अर्थ हे भूत नक्कीच चंद्याचं असलं पाह्यजेन. काहूनका चंद्यानं बारा सालापयले नदीत खुदखुसी केलती अन् न चंद्या ह्या भुर्याच्या चुलत्याच्या नात्यात येत होता…
चंद्याचं भूत म्हनल्यावर मारत्यानं इचारलं, तुले बाई पाह्यजेन का? कोंच्या पोरीवर तुहा जीव आला हाय का? त भुर्याच्या आंगातलं भूत म्हने, ‘मले का बाईचोख्या समजला का? माहा कोन्याच पोरीवर जीव नाही न मले बाई नोको न काहीच नोको…’
येच्यावरून हे सिद्ध झालं का हे भूत चंद्याचं नाई… मंग व्हय कोनाचं न त्यानं भुर्यािले काहून धरलं?
आता मारत्यानं थर्ड डिग्रीच लावली. मिर्चीची धुनीच देल्ली भुताले. इचारलं. ‘सिधा सांग, तुनं हे झाड कामून धरलं थे?’
त भुर्याच्या आंगातलं भूत म्हने, ‘म्या कायले धरलं? मी आपला बसेल होतो नदीच्या पुलावरच्या पाईपच्या कठड्यावर रातीचा शांत!’
‘त मंग यानं का केलं असं का तू याले धरला?’ मारत्यानं इचारलं.
‘म्या याले धरलाच नाही ना राजेहो! ह्याच तिथून चालला व्हता सायकलनं न मले म्हने का, ‘चल चल मेरे भाई तेरे हात जोडता, तेरे पैर पडता!’ म्या म्हनलं हात-पैर कायको जोडता बावा, मै वैसेच्च आता ना!’
मारत्यालेच नाही त सार्या गावाले अचरजच वाटला ना! हे असं कसं होत असते? मंग भुर्यानं भुताले इचारलं, ‘मंग आता का म्हननं हाय तुहं?’ त भूत म्हने, ‘तेच्यात का, माहं काहीच म्हननं नाही न नोतंबी, ह्या हापाय जोडत होता त आलो, तुमी जा म्हनत असान त जातो…’
जा म्हनल्यावर भूत गेलं… मग खुलासा झाला का भुर्या अमिताभचा सिनमा पाहून येत होता नसीब. एकलाच होता. अमावस्येची रात होती. गुडूप आंधार होता. भुर्या नदीच्या पुलावर आला न मंग त्याले त्या स्पॉटवरचे भूत आठवा लागले. पुलात काँट्रक्टरनं गाडेल दहीवालीचं भूत, खुदखुसी करेल चंद्याचं भूत, पुलावरून बैलगाडी पडून मरेल बावन्याचं भूत… मंग भीतीनं यानं मिटकीच मारली ना. घायबरून सायकलनं तो पुल ओलांडत असतानी भीती घालवाले गाने म्हनत होता. घायबरला मानूस गाने म्हनते. आता नुकताच थो अमिताभचा नसीब ह्या सिनमा पाहून आलता. तेच्यात हे गानं हाय, ‘चल चल मेरे भाई तेरे हात जोडता हुं, तेरे पाँव पडता हुं…’ आता ताजं ताजं गानं आयकलं होतं न अमिताभ म्हंजे एकदम डेअरिंगबाज मानूस, त्याची आठवन कहाडली त डेअरींग येते म्हून भुर्यो नेमकं थेच गानं म्हनत होता. त्याले हे पयलीच ओळ पाठ होती म्हून थो थेच रीपीट टेलिकास्टमंध म्हनत होता. थे अनोयखी भूत पुलाच्या कठड्यावर बसेल होतं रातीले नदीची थंड हवा खात. त्याले वाटलं का, हातपैर जोडून रायला या मानूस त याच्यासंग गेलं पायजेन. आता भूतानं मानूसकी दाखवली न आला. मानसं मातर त्याचा चांगला हेतू समजून न घेता त्याले मारहान करत होते…
तरीबी भुताची शांती कर्याची म्हून मंग गाववाले जसं जमनं तसं अदलाबादले गेले न त्यायनं सामुहिक नसीब पाह्यन्याच कारेकरम केला… आता अमिताभभाऊले हे समजलं त!
– श्याम पेठकर
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक, संपादक व सामाजिक कार्यकर्ते आहेत)