‘राणा.. अरे विश्वंभरला माहितीच नाही आहे की, तो जे हिरे विकत घेतोय ते राघवचे पळवलेले आहेत. जॉनीने त्याला पटवून दिलंय की त्याने हा माल जीवाची बाजी लावून मुंबईपर्यंत आणला पण ऐनवेळी समोरची पार्टी फिरली… आता जॉनी तर पैसे अडकवून बसला आहे, कस्टमसकट ज्यांनी ज्यांनी मदत केली, त्यांचे हात पण ओले करायचे आहेत. म्हणून मग तो एकरकमी पैसे मिळणार असतील, तर स्वस्तात सगळा माल द्यायला तयार आहे.’
—-
‘राणा खबर पक्की आहे! शेठ विश्वंभर साडे चार करोडच्या हिर्यांची लूट विकत घेतोय.’
‘राघवच्या पळवलेल्या मालाला हात घालतोय तो? येवढे धाडस?
‘धाडस करतोय हे त्याला कुठे माहिती आहे? त्याला वाटतंय की, स्मगलिंगचा माल आहे, समोरचा पैशाला अडकलाय, स्वस्तात मिळतोय तर घे पदरात पाडून.’
‘म्हणजे?’
‘राणा.. अरे विश्वंभरला माहितीच नाही आहे की, तो जे हिरे विकत घेतोय ते राघवचे पळवलेले आहेत. जॉनीने त्याला पटवून दिलंय की त्याने हा माल जीवाची बाजी लावून मुंबईपर्यंत आणला पण ऐनवेळी समोरची पार्टी फिरली… नाही म्हणाली. आता जॉनी तर पैसे अडकवून बसला आहे, कस्टमसकट ज्यांनी ज्यांनी मदत केली, त्यांचे हात पण ओले करायचे आहेत. म्हणून मग तो एकरकमी पैसे मिळणार असतील, तर स्वस्तात सगळा माल द्यायला तयार आहे.’
‘आणि विश्वंभर फसला?’
‘जागेवरती पन्नास लाखांचा फायदा कोण सोडेल? ते हिरे कमीत कमी पाच कोटीचे आहेत शेठ!’ जग्गाचे वाक्य संपले आणि राणाच्या चेहर्यावरती लबाड लांडग्याचे हास्य पसरले.
‘जग्गा… ते हिरे आपल्याकडे आले तर?’
‘वेड लागलंय का राणा? राघवचा पळवलेला माल आहे तो. आणि राघव कसा सैतान आहे ते तुला माहिती आहे! जगाच्या अंतापर्यंत पाठलाग करून जीव घेईल तो. सध्या तर तो शेपटावर पाय पडलेल्या सापासारखा जॉनीला शोधतोय.’
‘मी तुझ्यापेक्षा त्याला चांगला ओळखतो जग्गा! तो सैतान आहे. पण तो चुकूनही कधी पोलिसांच्या लफड्यात पडत नाही आणि पोलिसांच्या वाकड्यात शिरत नाही! आज आयुष्यात पहिल्यांदा त्या राघवला धडा शिकवण्याची संधी आली आहे अन ती मी सोडणार नाही. ह्या संधीची वाट राघव मला दोन करोडला चुना लावून पळाल्यापासून मी पाहतो आहे.’
‘बरं मग?’
‘विश्वंभर शेठचे हिरे पोलिसांच्या ताब्यात गेले तर?
‘राणा, सकाळ सकाळ भांग प्यायली का तू? ते हिरे पोलिसांच्या ताब्यात गेल्यावर तुझा माझा काय फायदा?’
‘फायदा आपलाच आहे जगोबा… ते पोलिस आपणच असलो तर?’ राणाच्या वाक्याने जग्गाच्या डोळ्यात शेकडो ज्योती उजळल्या. ‘आणि पोलिसांच्या ताब्यात हिरे गेलेत समजले की राघव आदळ आपट करेल पण नाद नक्की सोडेल. सहा आठ महिने शांत बसू. एकदा मामला थंडा पडला की, तेच हिरे परत एखादा शेठ गाठून विकून टाकू.’
‘मी काय म्हणतो राणा, आता येवढी रिस्क घ्यायचीच आहे, तर मग लगे हाथ जॉनीला तरी कशाला सोडायचे? आयुष्यात कधी नाही ते लक्ष्मी चालत येतीये, तर एकदाच आयुष्याचे कल्याण करून घेऊ!’
‘येवढी मोठी प्लॅनिंग आपल्याला जमेल? त्यासाठी विश्वासातली माणसे लागतील, पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागेल… आणि सगळे फसले तर?’
‘तू त्याची काळजी करू नकोस राणा! मी बघतो काय करायचे ते. ज्याने मला ही हिर्यांची टिप दिलीये, तो अजून लाखा-दोन लाखात जॉनीची पण टिप देईलच! तू फक्त पैशाचा बंदोबस्त कर.’
—
‘जग्गा, इतक्या रात्री भेटायला बोलावलेस?’
‘राणा, फोनवर बोलण्याचा विषय नाही. राघवचे हात बहुदा जॉनीच्या जवळ पोचलेत. जॉनीला पण खबर लागली असावी. परवा होणारी डील उद्याच रात्री होणार आहे. शेठच्या कसोलीच्या फार्महाऊसला भेट होणार आहे. जॉन एकटाच असेल किंवा त्याचा ड्रायव्हर रस्तोगी बरोबर असेल. शेठबरोबर त्यांचा
मॅनेजर भटनागर आणि तीन बॉडीगार्ड असतील. तीनही बॉडीगार्ड शकूरची खास माणसे आहेत आणि शार्पशूटर आहेत.’
‘इतर काही बंदोबस्त? कुत्री किंवा लपवलेली काही माणसे?’
‘तशी खबर तर नाही. जॉनीची नियत तशी चांगली आहे. याच वेळी त्याला दुर्बुद्धी कशी सुचली काय माहिती! त्याच्याकडून शेठला काही धोका नाही!’
‘शकूरची नियत कशी आहे जग्गा?’ शांतपणे राणाने विचारले आणि जग्गा आ वासून त्याच्या तोंडाकडे पाहत राहिला…
—
‘आओ आओ जॉनी सेठ… हॅ हॅ हॅ…’ उगाच अघळ पघळ हसत विश्वंभरशेठने मनावरचा ताण थोडा हलका केला. तशी भीती नव्हती म्हणा. जॉनी पहिल्याच भेटीत विश्वासू माणूस वाटला होता. मुख्य म्हणजे तो शेठने ठरवलेल्या ठिकाणी एकटा आलेला होता. वेळ पडली तर शेठजीच्या डाव्या हाताला बसलेला मुन्ना क्षणात बंदुकीचा बार उडवायला तयार होता. नोकराच्या वेषातला भीमा बारीक नजर ठेवून होताच आणि मुख्य म्हणजे गॅरेजच्या जवळ दबा धरून बसलेला हसन कोणत्याही क्षणी हॉलमधला वेध घेऊ शकत होता.’
‘अरे आम्ही कसले सेठ? सेठ लोक तर तुम्ही. अडचणीच्या वेळी मदतीला धावला आहात शेठ! हे तुमचे उपकार जॉनी कधीच विसरणार नाही!’
‘हॅ हॅ हॅ…’
‘सौदा पुरा करूयात शेठ? मला पण रात्रीच्या विमानाने उडायचे आहे!’
‘हां हां बिलकुल बिलकुल… माल लाये हो?’ शेठजीने वाक्य पूर्ण करताच, जॉनीने आपल्या खिशातून एक बासरी काढली आणि समोरच्या टेबलावर ठेवली. एक विशिष्ट खटका दाबताच, ती दोन भागात दुभंगली आणि हॉलमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे लकाकले.
‘दहा हिरे आहेत शेठ. प्रत्येक हिरा कमीत कमी पन्नास लाखाचा आहे. पहिल्या भेटीत तुम्ही स्वत: पारख केलीच होतीत. पुन्हा करायची असेल, तरी माझी हरकत नाही. तुम्ही पैसे मोजताय, काळजी घ्यायचा तुम्हाला पूर्ण हक्क आहे.’
शेठजींनी भटनागरला खूण केली आणि भटनागर तपासणी साहित्य घेऊन कामाला लागला. प्रत्येक हिर्याची पारख करून तो मान डोलवत होता अन हिरा शेठजींच्या ताब्यात देत होता. शेठजी पुन्हा एकदा पारखी नजरेने तो तपासत होते आणि समोरच्या छोट्या पेटीत जमा करत होते. तब्बल पंचवीस मिनिटे सर्वांचे श्वास वेगळ्याच लयीत धडधडत होते. शेवटचा हिरा तपासून शेठजींनी पेटीत टाकला आणि हिर्याबरोबरच सर्वांचा जीव देखील भांड्यात पडला. योग्य ती खूण ओळखून भीमाने टेबलावर ग्लास लावायला सुरुवात केली आणि भटनागरने नोटांनी गच्च भरलेली ब्रीफकेस जॉनीसमोर उघडली.
‘सगळ्यांनी हात वर करा आणि शांत उभे रहा!’ हॉलच्या दारातून आवाज गरजला आणि शेठजीला मोठा ठसकाच लागला. दारात सफारी सूट घातलेले दोन लोक उभे होते, दोघांच्याही बंदुका आतल्या माणसांवर रोखलेल्या होत्या आणि त्यातील एकाने डाव्या हाताने हसनचे मानगूट गच्च पकडलेले होते.
‘फक्त दोघेच?’ कुत्सित हसत बंदूक दोघांवर रोखत जॉनी बोलला. त्याची संशयी नजर मात्र शेठजीवरून फिरून आली होती.
हॉलमधले वातावरण चांगलेच गरम झाले होते. शेठजी तर कोणत्याही क्षणी धोतर बदलावे लागेल या विचारानेच घामाघूम झाले होते.
‘सीआयडी!’ हातातले आयकार्ड नाचवत एक सफारी बोलला आणि जॉनी चमकला. त्याने तशीच बंदूक ताणत हात पुढे केला आणि ते कार्ड ताब्यात घेतले. त्या कार्डवरती काय बघायचे असते हे त्याला माहिती देखील नव्हते हा भाग वेगळा. त्याने प्रश्नार्थक नजरेने दुसर्या सफारीवाल्याकडे पाहिले आणि त्याने शांतपणे हसनची मानगूट सोडत खिशात हात घातला आणि आयकार्ड बाहेर काढले.
‘फक्त दोनच माणसे सीआयडीसाठी कधीपासून छापेमारी करायला लागली?’ धीर एकटवत भटनागर विचारता झाला आणि त्याच क्षणी त्याच्या मानेला एक थंडगार स्पर्श जाणवला. त्याच्या मागे उभ्या असलेल्या मुन्नाने बंदुकीची नळी त्याच्या मानेवर चिकटवली होती. दुसर्याच क्षणी बंदूक ताणत भीमा देखील जॉनीच्या मागे उभा राहिला. शेठजी आता फक्त भोकाड पसरायचे बाकी होते आणि जॉनी परिस्थिती कशी हाताळावी या विचारात पडला होता. सीआयडीच्या वेषातले राणा आणि जग्गा मात्र मनात खदखदून हसत होते.
‘ही शकूरची नाहीत; आमची माणसे आहेत. शकूरची माणसे तुमच्या घरी यायला निघाली, तेव्हाच आम्ही त्यांना उचलले आणि आमची माणसे त्यांच्या जागी पेरली! जॉनी, कुठलाही वेडा विचार न करता, आमच्याबरोबर चल. मी माणुसकीला जपणारा अधिकारी आहे, मला एन्काउंटर या प्रकाराची चीड आहे. पण माझ्या सोबत्यांचा काही भरवसा नाही!’ शांतपणे मुख्य अधिकारी म्हणाला आणि जॉनी मुळापासून हादरला.
मुन्नाच्या भूमिकेतल्या अधिकार्याने जॉनीच्या हातात बेड्या ठोकल्या आणि मोर्चा भटनागर आणि शेठकडे वळवला. तिघांना ताब्यात घेत सीआयडीची टीम बाहेर पडली आणि त्याचवेळी राणाच्या डोक्यात मागच्या बाजूने जोरदार घाव बसला आणि तो बेशुद्ध होत खाली कोसळला.
—
राणाने डोळे उघडले आणि त्याच्या डोक्याच्या मागच्या भागातून एक तीव्र कळ उमटली. पुन्हा एकदा डोळे बंद करून, त्याने शरीराला मोकळे सोडले. डोळे बंद असले, तरी हळूहळू भानावर आलेल्या मेंदूने आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घ्यायला सुरुवात केली होती. थोडा लांबून एका बाईच्या रडण्याचा आवाज येत होता, तर दुसरी एक बाई तिला काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करत होती. अध्येमध्ये टाईपरायटरचा खडखडाट देखील ऐकायला येत होता. पायाला खालची फरशी प्रचंड गार लागत होती आणि अंग देखील थंडीने काकडले जात होते, म्हणजे अंगावरचे कपडे आणि बूट दोन्ही गायब होते. हाताला आणि पायाला ताण पडत होता; म्हणजे हात आणि पाय दोन्ही बांधलेल्या अवस्थेत होते हे नक्की. परिस्थितीचा अंदाज घेत, राणाने खोलीतल्या प्रकाशाला अॅडजेस्ट करत हळूहळू डोळे उघडले..
त्याचा अंदाज बराचसा बरोबर निघाला. हात पाय बांधलेल्या अवस्थेत तो एका खुर्चीत बसलेला होता आणि अपेक्षेनुसार खुर्ची पोलिस स्टेशनमधलीच होती. थोडी नजर आणखी सावरल्यानंतर आपल्यापेक्षाही दारुण अवस्थेत बांधून ठेवलेले जग्गा आणि जॉनी त्याला दिसले आणि त्याला जरासा धीर आला. जग्गाची अवस्था जरा तरी बरी होती, पण
जॉनी मात्र चांगलाच काळानिळा पडलेला होता. बहुदा जॉनीच्या या खास ‘पाहुणचारा’साठी राघवने चांगली रक्कम पोलिसांना मोजली असावी.
समोर खुर्ची ठेवल्याचा आवाज झाला आणि राणाने नजर वर केली. हार्डली तीस-बत्तीसचा असावा समोरचा इन्स्पेक्टर. मात्र मजबूत बांधा आणि करारी नजर भल्याभल्यांना थरथरवणारी होती. ‘इन्स्पेक्टर राजन वाघमारे’ची पाटी छातीवर डौलाने मिरवत होती.
‘गुन्हेगारी विश्वात फार थोड्या लोकांनी ज्याचा चेहरा बघितला आहे तो ‘राणा द ग्रेट’ अशा अवस्थेत बघवत नाहीये बा!’ मान तिरकी करत राजन टवाळ स्वरात बोलला आणि राणाच्या चेहर्यावरती हसू फुटले..
‘मी काही विनोद केला का?’ जळजळीत स्वरात इन्स्पेक्टर राजन विचारता झाला.
‘जॉनीची अवस्था बघता आणि शेठजींची अनुपस्थिती लक्षात घेता, माझी अवस्था चांगली ठेवण्याची तुमची सद्भावना मी समजू शकतो साहेब. आता माझे हात पाय सोडून सरळ विषयाला हात घालाल का?’
‘तुला ‘चतुर राणा’ म्हणून का ओळखतात ते आता चांगले लक्षात आले माझ्या,’ हात जोडत खदखदा हसत राजन म्हणाला आणि त्याने राणाचे हात पाय सोडायला सुरुवात केली. राणा शांतपणे मागे टेकला आणि एक हवालदार पाणी घेऊन हजर झाला. इन्स्पेक्टरने खिशातले सिगारेटचे पाकीट पुढे केले आणि राणाने नजर शांतपणे त्याच्या नजरेत मिसळली.
‘शेठजी आणि त्यांचा मॅनेजर?
‘झाले गेले विसरून जायचे; अगदी जप्त केलेल्या पैशासकट… मान्य केले शेठनी. शेठजी बसले असतील आता बंगल्यावर दारू ढोसत आणि बचावलेल्या जिवासाठी देवाचे आभार मानत,’ डोळे मिचकावत राजन म्हणाला.
‘वाह! आणि जॉनी?’
‘हिरे ताब्यात घ्यायचे आणि जॉनीला आयुष्यभराचा धडा शिकवण्याचे पन्नास लाख मिस्टर राघव यांच्यातर्पेâ सप्रेम भेट!’
‘मला मोकळे करण्याचे आणि नक्की हे सगळे घडले कसे ते सविस्तर सांगण्याचे?’ शांतपणे राणाने विचारले.
‘पाच कोटी…’ आळस ताणत राजन म्हणाला आणि राणा हादरलाच!
‘वेड लागलंय का इन्स्पेक्टर? या गुन्ह्यात जास्तीत जास्त मला कैदेची शिक्षा होईल. तुम्हाला देखील ते चांगले माहिती आहे.’
‘तुला सोडायचे दोनच कोटी मागतोय मी राणा. उरलेले तीन कोटी तुझी खबर राघवला न देण्याचे आहेत. जॉनीबरोबर तुझा एन्काउंटर केला तर राघव पैशांचा वर्षावच करेल. नाही का?’ राजनच्या आवाजातील थंडपणा राणाचे काळीज चिरत गेला…
‘पण हे सगळे घडले तरी कसे? माझा प्लॅन अगदी फूलप्रूफ होता!’
‘माणूस कधी कधी अतिआत्मविश्वासाने आंधळा होतो राणा! जग्गापर्यंत ज्या टिप्स जात होत्या, त्या सगळ्या आमच्यामार्फतच जात होत्या. जग्गाला जेव्हा हिर्यांच्या व्यवहाराची खबर समजली, त्याच दिवशी नेमके आम्ही त्या खबर्याला एका गुन्ह्यात उचलले. त्याच्याकडून मग तुमच्या पुढच्या हालचालींची माहिती मिळत गेली आणि आमचे काम अजूनच सोपे झाले. पुढच्या प्लॅनसाठी जग्गाने त्या खबर्याचीच मदत मागितली आणि मग आमच्यासाठी तर स्वर्ग दोन बोटे उरला. त्यातच शेठने संरक्षणासाठी शकूरची माणसे मागवली आणि मग आम्ही आमची माणसे शकूरची म्हणून नेमली. तुझ्यामुळे आमचे काम खूप सोपे झाले ‘चतुर’ राणा, म्हणून तुला थोड्याशा मोबदल्यात हे जीवदान. ते मिळाल्यावरती, तू पुन्हा मुंबईचा रस्ता धरणार नाहीस याची आम्हाला खात्री आहेच. बरोबर ना?’
राणाने खिन्नपणे मान डोलवली आणि पुढच्या अपेक्षेने राजनकडे पाहिले.
—
त्या भव्य गोदामात सहा सात खुर्च्या टाकलेल्या होत्या. समोर टेबलावर सगळा ‘सरंजाम’ सजवलेला होता. मधल्या खुर्चीत एक सावळी पण तजेलदार व्यक्ती आतुरतेने कोणाची तरी वाट बघत बसली होती. तिची नजर सतत दरवाज्याकडे धावत होती. दरवाजातून जॉनीचे मानगूट पकडून इन्स्पेक्टर राजन आता शिरला आणि त्या व्यक्तीच्या चेहर्यावर समाधान पसरले.
‘कबूल केल्याप्रमाणे ‘तोहफा’ आणलाय राघवशेठ!’ राजन नम्रपणे म्हणाला.
‘आणि बाकीच्या भेटवस्तू?’
‘शेठकडून रोख चाडेचार करोड, राणाकडून पाच करोड आणि फाटक्या जग्गाकडून पन्नास लाख फक्त!’ मान तिरकी करत राजन म्हणाला.
‘जग्गाचे पैसे जमा धरूच नका. शकूरचा वाटा, कलाकारांची बिदागी, पोलिस ठाण्याचा सेट आणि युनिफॉर्मचा खर्च यातच उडणार आहेत ते सगळे!’ शांतपणे समोरचा ग्लास उचलत खुर्चीवर बसत जॉनी बोलला आणि राजनने खदखदा हसत नेहमीच्या सवयीने त्याला हात जोडले.
– प्रसाद ताम्हनकर
(लेखकाचे गुन्हेगारी कथालेखनावर प्रभुत्व आहे)