शिवसेना भवनावर बोलावलंय, असा साधा निरोप जरी आला तरी भल्याभल्यांच्या पोटात गोळा येतो. मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य गाजविणार्या एकमेव संघटनेचे हक्काचे कार्यालय असा लौकिक या वास्तूने मिळविला. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सची इमारत, टाइम्स ऑफ इंडियाची वास्तू आदींची नावे जशी अभिमानाने घेतली जातात, तोच सन्मान शिवसेना भवनाला मिळालाय.
—-
भारतीय जनता पक्षाच्या कोणा आमदाराने ‘शिवसेना भवनाची तोडफोड करू’ असे विधान सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी आणि भाजप पक्षनेतृत्वाला खूष करण्यासाठी केले. ते त्यांच्या चांगलेच अंगलटी आले. नंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. परंतु तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. त्यांच्या या बेछूट विधानाचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. या बाष्कळ विधानाचा समाचार घेतला गेला. कारण ‘शिवसेना भवन’ हे लाखो शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी भारतीयांचे श्रद्धास्थान आहे. शिवसेना भवन म्हणजे शिवसैनिकांसाठी मंदिर आहे तर रंजल्या गांजल्या मराठी माणसांसाठी ते न्याय मंदिर आहे.
शिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ला झाली. परंतु शिवसेनेच्या स्थापनेनंतर १९७७ साली दादर येथे शिवसेना भवन बांधले गेले. शिवसेना म्हणजे शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनाप्रमुख म्हणजे शिवसेना. त्यामुळे सुरुवातीची काही वर्षे बाळासाहेब ठाकरे यांचे घर म्हणजे एकतर ‘कदम मॅन्शन’ किंवा वांद्रे इथला ‘मातोश्री’ बंगला हेच शिवसेनेचे ऑफिस असायचे. मधली दोनएक वर्षे दादर येथील पर्ल सेंटरचे दोन रूम्स हे शिवसेनेचे कार्यालय होते. तिथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सर्वांना भेटत असत. शिवसेनेच्या कारभाराचा व्याप वाढला आणि शिवाजी पार्कच्या नाक्यावर ऐन मोक्याच्या जागेवर १९ जून १९७७ रोजी संघटनेला हक्काचे घर मिळाले. उमर या मुसलमान माणसाची ही मूळ जमीन होती. आधी तिथे काही दुकानांचे गाळे होते. त्या सर्वांना पुढे सेनाभवनात जागा मिळाली. गोरे या आर्किटेक्टच्या संकल्पनेतून किल्ल्याच्या धर्तीवरची सेनाभवनाची दगडी मजबूत इमारत उभी राहिली.
शिवसेना भवनाची उभारणी ही सामान्य शिवसैनिकांसाठी स्वप्नपूर्ती होती. कुणी तिकीट लावून सांस्कृतिक कार्यक्रम घेतले. कुणी ऑफिस-ऑफिसात जाऊन पावत्या फाडल्या. कुणी देणगीदारांकडे खेटे घातले. त्यातून पैसा उभा राहिला. नंतरही कोणी फरशी लावण्याची जबाबदारी घेतली, तर कोणी फर्निचरची. या भवनासाठी जागा मिळविण्यापासून ते या भवनाच्या उभारणीच्या कामापर्यंत सर्व नेत्यांनी, शिवसैनिकांनी अथक मेहनत घेतली. भवनातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्वतः शिवसेनाप्रमुखांच्या देखरेखीखाली आणि मार्गदर्शनाखाली श्री. सहस्त्रबुद्धे यांनी तयार केला. या भवनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या वास्तूत आई भवानी तुळजाभवानीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जावी अशी इच्छा माँसाहेब मीनाताई ठाकरे यांनी व्यक्त केली होती. त्याप्रमाणे या मूर्तीची प्रतिष्ठापना येथे लगोलग करण्यात आली. तुळजाभवानीच्या साथीने येथे दरवर्षी नवरात्रौत्सव साजरा केला जातो.
शिवसेना भवनाने आजवर अनेक चांगल्या-वाईट घटनांचा अनुभव आपल्या ठायी जपला आहे. ज्या वर्षी या वास्तूची निर्मिती झाली त्या सालात जनता पार्टीचे सरकार केंद्रात होते. त्यापूर्वी आणीबाणीला शिवसेनेने पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे शिवसेनाविरोधी जनता पार्टीवाल्यांच्या मनात शिवसेनेविषयी द्वेषाची भावना निर्माण झाली होती. याचवेळी मोरारजी देसाई आणि जगजीवनराम यांची एक सभा शिवतीर्थावर झाली होती. या सभेनंतर शिवतीर्थावरून बाहेर पडलेल्या जनता पार्टीच्या समर्थकांनी शिवसेना भवनावर तुफान दगडफेक केली. या दगडफेकीचे वृत्त समजताच शिवसेनेचे कमांडर दत्ताजी साळवी यांनी दिवाकर रावते यांना चोख प्रत्युत्तराचा आदेश दिला. मग काय? शिवसैनिकांनी हल्लेखोरांशी जोरदारपणे मुकाबला केला. या हल्ल्याप्रकरणी रावते, दत्ताजी नलावडे, गणेश महाले आदी आठ जणांना अटकही झाली. या वास्तूने हा प्रहारही झेलला. परंतु या वास्तूचे महत्त्व कमी झाले नाही. उलट दिवसेंदिवस या वास्तूचा दबदबा आणि दरारा वाढतच गेला. विधिमंडळात या हल्ला प्रकरणी जोरदार चर्चाही झाली.
शिवसेना भवनावर बोलावलंय, असा साधा निरोप जरी आला तरी भल्याभल्यांच्या पोटात गोळा येतो. मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य गाजविणार्या एकमेव संघटनेचे हक्काचे कार्यालय असा लौकिक या वास्तूने मिळविला. मुंबईच्या इतिहासातील लॅण्डमार्क म्हणून जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सची इमारत, टाइम्स ऑफ इंडियाची वास्तू आदींची नावे जशी अभिमानाने घेतली जातात, तोच मान आणि सन्मान शिवसेना भवनाला मिळाला आहे.
शिवसेना भवनाच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेनाप्रमुखांनी सांगितले की `शिवसेना भवन’ ही शिवसैनिकांची हक्काची वास्तू आहे. तिचे आम्ही केवळ राखणदार आहोत. या वास्तूचं पावित्र्य प्रत्येकाने राखलं पाहिजे. हे भवन महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा बदलायला लावीलच. पण त्याचबरोबर हे एक सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र बनलं पाहिजे असा माझा आग्रह आहे. याच संदर्भात `मार्मिक’मध्ये १९ जून १९७७च्या अंकात `तुमच्या निष्ठेची फुले इथे उधळा’ या शीर्षकाखाली अग्रलेख आला. या अग्रलेखात त्यांनी म्हटले, `शिवसेना भवन ही मराठी माणसाच्या जीवनातील पहाट आहे. जीवनातील अंधार दूर करणारे ते सामर्थ्य येथेच त्याला गवसणार. चला, उठा! तुमच्या या पवित्र वास्तूचे दर्शन रविवार, दिनांक १९ जून १९७७ रोजी सकाळी १० वाजता घ्या. इथे जातिभेद नाहीत, बडवे नाहीत. सर्वांना दारे उघडी आहेत. या, या. तुमच्या निष्ठेची, श्रद्धेची फुले या इथे उधळा. ज्यांनी ज्यांनी ही पवित्र वास्तू उभारण्यास हातभार लावला त्या सर्वांना आई जगदंबा उदंड आयुष्य देवो.’
जुन्या शिवसेना भवनात पहिल्या मजल्यावर प्रशस्त हॉल होता. त्यात बैठका-मेळावे यांचे आयोजन होत होते. दुसर्या मजल्यावर भवानी बँक, बेस्ट कामगार सेना, स्था. लो. समिती महासंघ, भा. वि. सेना यांची कार्यालये होती. त्याचबरोबर मा. शिवसेनाप्रमुखांचे दालन होते. तिसर्या मजल्यावर भारतीय कामगार सेनेचे कार्यालय आणि साप्ताहिक ‘मार्मिक’चे कार्यालय होते. या वास्तूमधूनच शिवसेनेची यशस्वी घोडदौड महाराष्ट्रभर सुरू झाली. १९८५ साली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली. त्यावेळी स्वत: बाळासाहेबांनी प्रत्येक उमेदवाराच्या मुलाखती येथे घेतल्या. बाळासाहेबांच्या चाणाक्ष नजरेने अचूक उमेदवारांची पारख केली आणि शिवसेनेने या महापालिकेवर भगवा फडकविला. १९९० साली विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार बाळासाहेबांनीच निवडले. उमेदवार निवडताना या वास्तूला कधी जातीपातीचे ग्रहण लागले नाही. शिवसेनाप्रमुखांनी देखील कुणाही उमेदवाराला त्याची जात विचारली नाही. याची साक्षदेखील ही वास्तू अभिमानाने देत राहिली आहे.
शिवसेनाप्रमुख बरीच वर्षे २३ जानेवारी या वाढदिवशी सर्व शिवसैनिकांचे अभिवादन शिवसेना भवनात स्वीकारायचे, भेटायचे. दर गुरुवारी बाळासाहेब महाराष्ट्रातील शिवसैनिकांना, सामान्य मराठी माणसाला भेटायचे. त्यांच्या तक्रारी, गार्हाणी ऐकून त्यांचे निराकरण करायचे. शिवसेना भवनात सेना-भाजपा युतींच्या अनेक बैठका येथे पार पाडल्या. १९९५ साली शिवसेनाप्रमुखांनी या वास्तूच्या साक्षीनेच महाराष्ट्रात शिवशाहीचे सरकार स्थापन करून दाखविले. शिवसेना भवनात भारतीय कामगार सेनेचे कमांडर दत्ताजी साळवी, स्थानीय लोकाधिकार समितीचे सुधीर जोशी, ज्येष्ठ नेते वामनराव महाडिक व प्रमोद नवलकर, भुजबळ, सरपोतदार, डाके आदींनी स्वत:चा आगळावेगळा ठसा उमटविला. शिवशाही सरकारच्या काळात मुख्यमंत्री करण्यासाठी व मंत्रिमंडळ बनविण्यासाठी घेण्यात आलेल्या विधिमंडळ शिवसेना पक्षाच्या बैठकादेखील येथेच पहिल्यांदा पार पाडल्या.
‘शिवसेना भवन’ नवीन वास्तू
सन १९९२-९३ मध्ये मुंबईत १३ बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटांमध्ये २५१ माणसे मरण पावली आणि ७५० हून अधिक माणसे जखमी झाली. शिवसेना भवनाजवळच्या पेट्रोलपंपावर असलेल्या गाडीमध्येही बॉम्बस्फोट झाला होता. शिवसेना भवनच उद्ध्वस्त करण्याचा अतिरेक्यांचा तो प्रयत्न होता. शिवसेना भवन ही वास्तू नेहमीच इस्लामी दहशतवादाच्या हिटलिस्टवर राहिली आहे. दुसर्या दिवशी स्वत: शिवसेनाप्रमुख शिवसेना भवनाची स्थिती पाहण्यासाठी आले. शिवसेना भवनाला आणि शिवसेनाप्रमुखांच्या चेंबरमध्ये मोठमोठ्या भेगा पडल्या होत्या. स्फोट झाले त्यावेळी शिवसेनाप्रमुख तेथे नव्हते हे नशीबच! या अपघातामुळे शिवसेना भवन आता दुरुस्त करावे लागेल किंवा नव्याने बांधावे लागेल, हे त्यांच्या लक्षात आले. काही वर्षे तशीच गेली आणि शिवसेना भवन पुन्हा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.
काही वर्षांनंतर म्हणजे गुरुवार, दिनांक २७ जुलै २००६ रोजी नवीन शिवसेना भवनाचे उद्घाटन झाले. अत्यंत आधुनिक शिवसेना भवन! हा दिवस म्हणजे शिवसेनेचे मुख्यमंत्री पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस! हा मंगल योगायोग महाराष्ट्राला वेगळी दिशा देणारा ठरला. गोपीनाथ मुंडे मुद्दाम या कार्यक्रमासाठी आले होते. ते म्हणाले, `मुंबईत बॉम्बस्फोट होतायत, १९९३सारखी परिस्थिती उद्भवू पाहते आहे. पण शिवसेनाप्रमुखच मुंबईकरांचे दहशतवादापासून रक्षण करू शकतात असा विश्वास देशभरातील हिंदूंच्या मनात असून शिवसेना भवन हे त्या विश्वासाचं केंद्र आहे.’ आणि मग शिवसेनाप्रमुखांचे भाषण झालं. मा. बाळासाहेबांचे शब्द ऐकण्यासाठी जणू काळच थांबला! मा. बाळासाहेब म्हणाले, `जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, मातांनो आणि भगिनींनो, आज उद्धवचा वाढदिवस, रामदासचाही वाढदिवस, आणखी किती जणांचे आहेत मला माहीत नाही. त्या सार्यांना माझ्या शुभेच्छा! एवढं काही भव्यदिव्य काही उभं राहील असं वाटलं नव्हतं. पण हे सारं शिवसैनिकांच्या अथक मेहनतीमुळे घडलं आहे. शिवसेना भवनाची ही वास्तू छान आहे. ही वास्तू शिवसेनेला चांगले दिवस आणील.’
२०१४ आणि २०१९ साली शिवसेना महाराष्ट्रात सत्तेवर आली. २०१९ साली तर चमत्कार घडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. सेनाभवन हे अशा अनेक ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार आहे. कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेतृत्वाला आणि कार्यकर्त्याला हेवा वाटावा असे सेना भवन आहे. शिवसेना भवनाचे महाराष्ट्राला खंबीर नेतृत्व दिले आहे. ते मराठी माणसाच्या सर्वांगीण विकासाचे आशा स्थान आहे. लाखो शिवसैनिकांचे श्रद्धास्थान आहे, ऊर्जा स्थान आहे. उगाचच कुणी सवंग लोकप्रियतेसाठी शिवसेना भवनाच्या वाटेला जावू नये.
– योगेंद्र ठाकूर
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)