दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठल मंदिरात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित होण्याची परंपरा असलेल्या ‘रिंगण’च्या यंदाच्या ‘संत नरहरी सोनार विशेषांका’चं प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालं. याच अंकातील लेखाचा संपादित अंश… साने गुरुजींच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाच्या लढ्याची थरारक हकीकत सांगणारा.
—-
साधारणपणे १९४४ साली गाडगेबाबांनी तुकडोजीबाबांना अस्पृश्यांना पंढरपूरच्या मंदिरात प्रवेश मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असं सांगितलं. त्यानंतर तुकडोजी महाराजांनी १९४६च्या आषाढी अस्पृश्यांच्या मंदिरप्रवेशापर्यंत मंदिरात जाणार नाही, असा निर्धार केला आणि ते चोखोबारायांच्या समाधीजवळच बसून राहिले. या घटनेच्या अगोदर काही महिने त्यांनी त्यांचे गुरू अडकोजी महाराजांच्या समाधीमंदिरात जाणंही बंद केलं होतं. कारण त्यातही अस्पृश्यांना प्रवेश नव्हता. पुढं गुरूजींच्या प्रचार दौर्यातही ते सहभागी झाले. साने गुरूजी उपोषणाला बसल्यावर त्यांनी तुकडोजी महाराजांना पत्र पाठवलं, ‘राष्ट्रसंता, माझ्या संकल्पाच्या पूर्तीकरता आपण धावून या.’ लवकरच तुकडोजी महाराज पंढरपुरात दाखल झाले. भजन आणि भाषणातून त्यांनी मंदिर प्रवेशासाठी रान उठवलं.
१ ऑगस्ट १९४७ला उपोषण सुरू झालं. १० ऑगस्टला संपलं. बडवे पंचमंडळींच्या ठरावाची कोर्टात शहानिशा होऊन ३० ऑक्टोबरला अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाची तारीख ठरली. त्यानंतर सनातन्यांनी काय केलं? वेगवेगळ्या पुस्तकांत शोधल्यावर पुढच्या घटनाक्रमाचं एक उत्तर मिळतं, ते असं, अस्पश्य मंदिरात जाऊन आपला देव बाटवणार म्हणून याची सनातन्यांनी धास्ती घेतली. त्यांनी त्यावर एक अजब युक्ती काढली. महापूजेच्या निमित्ताने ते मंदिरात गेले आणि काही मंत्र म्हणून विठ्ठलाचं तेज एका घागरीत काढलं. आता खरा देव या घागरीतच आहे. त्यामुळं अस्पृश्यांनी बाटवलेल्या देवाचं दर्शन घ्यायला मंदिरात जाऊ नका, असा फतवा या सनातन्यांनी काढला. या सनातनी टोळीचे पुढारी होते पंडितप्राण भगवानशास्त्री धारूरकर.
याच धारूरकरांनी अनेक वारकरी महाराजांना वेदांत शिकवला होता. त्यामुळं गुरूच्या दबावापोटी आणि गुरूद्रोहाच्या पातकाच्या भीतीनं काही वारकरी महाराजांनी विठ्ठलावर बहिष्कार टाकला. त्यांच्यातल्याही अनेकांनी बहिष्काराची गुरू आज्ञा मान्य केली नाही. धारूरकरांचे शिष्य नसणार्या काही सनातनी फडकर्यांनी बहिष्कार केला. काहींनी अस्पृश्यांच्या मंदिरप्रवेशाला विरोध केला, पण नंतरही ते दर्शनासाठी जातच राहिले. त्यापैकी एक महत्त्वाचं नाव होतं, आप्पासाहेब वासकर. त्याची माहिती मिळवण्यासाठी वासकर फडाचे आताचे प्रमुख राणा महाराजांना भेटण्यासाठी वासकर वाड्यात पोचलो. राणा महाराज फडाच्या मालकांसाठी असलेल्या गादीवर बसले. मागच्या भिंतीवर आप्पासाहेब वासकर आणि विवेकानंद वासकर यांचे फोटो होते. तिथे झालेली प्रश्नोत्तरं अशी होती.
साने गुरुजींच्या उपोषणाविषयी काय वाटतं?
– साने गुरूजींचे वारकरी संप्रदायावर फार उपकार आहेत.
अस्पृश्यांच्या स्पर्शाने देव बाटेल म्हणून धारूरकरशास्त्रींनी देवाचं तेज घागरीत काढून घेतलं, यात काही तथ्य वाटतं का?
– धारूरकरशास्त्रींनी शास्त्राच्या दृष्टीनं योग्य केलं. पण असं केल्यानं देव निस्तेज होत नसतो.
आप्पासाहेब वासकर धारूरकरशास्त्रींकडे वेदांत शिकायला जात असतानाही त्यांनी मंदिरावर बहिष्कार टाकला नाही, हे कसं घडलं?
-यात तात्त्विक दृष्टिकोन आहे. द्रोणाचार्य हे अर्जुनाचे गुरू होते. पण जिथं गुरूविरोधात लढावं लागलं तिथं अर्जुन द्रोणाचार्यांविरोधात लढले. तसाच हाही मुद्दा आहे.
मुळात वारकर्यांना वेदांत शिकण्याची गरजच काय?
– संतसाहित्य हा वेदांताचाच भाग आहे. त्यामुळं संतसाहित्य समजण्यासाठी वेदांताचा आधार लागतोच. पण माझे आजोबा म्हणायचे की वेदांताचा वापर कीर्तनात मीठासारखा किंवा लोणच्यासारखा करावा.
अनेक वारकरी महाराज माळ घालणार्या वारकरी गुरूपेक्षा वेदांती शिक्षण देणार्या गुरूला महत्त्व देत मंदिरात गेले नव्हते. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं माळ घालणारा गुरू महत्त्वाचा की वेदांत शिकवणारा गुरू महत्त्वाचा?
– माळ घालणारा गुरू हाच वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचा. आपले निवृत्ती महाराज वक्ते यांनी जवळजवळ अठरा अध्यापकांकडे अध्ययन केलं. त्यांनी ब्राह्मण बनावं यासाठी शास्त्रानं जे विधी सांगितले आहेत ते सगळे केले. ब्राह्मणाचा दर्जा प्राप्त व्हावा म्हणून शास्त्रात जेवढ्या ठिकाणी स्नान करायला सांगितलं तेवढ्या ठिकाणी जाऊन स्नान केलं. एवढं सगळं केल्यावरच ते स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेऊ लागले. हे सगळं जरी असलं तरी तो भाग निराळा. त्यांना ज्यांनी माळ घातली तेच त्यांचे वारकरी गुरू.’
वेदांत शिकवणार्या गुरूची म्हणजे धारूरकरशास्त्रींची आज्ञा मोडणं हे कृत्य वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने गुरूद्रोह होता का?
– गुरूद्रोह होऊच नाही शकत, कारण शास्त्रींनीही कोणाला मंदिरात जाऊ नका, अशी आज्ञा केलेलीच नाही. त्यांनी देवाचं तेज काढलं. पण म्हणून मंदिरात जाऊ नका असं त्यांनी कोणालाही सांगितलं नाही. त्यांनी त्यासाठी कोणावरही दबाव टाकला नाही.
राणा महाराजांनी सांगितलं. पण त्यांचं सांगणं पटणारं नव्हतं. खरंखोटं करण्याचा उपाय सोपा होता, पुन्हा मंदिर प्रवेशाचं महाभारत. या पुस्तकात धारूरकरांनी मंदिरात जाऊ नये म्हणून कोणावर आणि कसा दबाव टाकला याच्या गोष्टी सांगितल्या आहेत. वारकरी महाराजांनी मंदिरात जाऊ नये यासाठी धारूरकर पंढरपुरातल्या मठामठातून हिंडले. त्यांच्यावर गुरूद्रोहाचा दबाव टाकला. या दबावामुळेच इच्छा असूनही दासगणू महाराजांनी धारूरकरशास्त्रींच्या शब्दाला मान देत एक वर्ष मंदिरावर बहिष्कार टाकला होता. श्रीकृष्णदासजी लोहिया यांनी १९५५मध्ये यज्ञ करून मंदिरात प्रवेश केला. तेव्हा सनातन्यांनी त्यांच्याविरोधातही सभा घेतली. धुंडा महाराज देगलूरकर तेरा-चौदा वर्षांच्या बहिष्कारानंतर मंदिरात गेले. त्यांच्याविरोधात सनातन्यांनी रूक्मिणी पटांगणावर सभा घेत गुरूद्रोही म्हणून त्यांचा निषेध केला. ज्ञानेश्वर महाराज अंमळनेरकरांनी १९६७मध्ये बहिष्कार उठवला. त्यांच्यासोबत अनेक महाराजांनी दर्शन पुन्हा सुरू केलं. म्हणून सनातन्यांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. त्यांच्या मठात जाणं-येणं बंद केलं. ही माहिती अंमळनेरकर संस्थानच्या वेबसाईटवर मिळते.
खरं तर ‘न मानावे तैसे गुरूचे वचन। जेणे नारायण अंतरे ते।।’ असं तुकोबारायांनी म्हटलंय. त्याचा अर्थ असा की ज्यामुळे देवापासून अंतर पडतं ते गुरूचं वचन मानू नये. हे सगळं तुकोबारायांनी सांगितलं असतानाही ही महाराज मंडळी गुरूद्रोहाच्या पातकाच्या भीतीने मंदिरात जात नव्हती. खरं तर संतांनी सर्वांना कळणारा वेदांत मराठी भाषेत सांगितला. संतांची वाणी वेदांताला पाणी भरायला लावणारी होती. ज्ञानेश्वर माऊलींनी तर वेदाला फोल केलं. तरी त्याच्या नादी लागून अनेकजण विठ्ठलापासून वंचित राहिले. धारूरकरांनी जातीविषमता, कर्मकांड आणि गुरूबाजी अशा वारकरी संप्रदायाशी विसंगत गोष्टी वेदांताबरोबर वारकर्यांना शिकवल्या. त्यामुळंच अनेक वारकरी महाराज संतविचार सोडून सनातन्यांच्या कळपात ओढले गेले. तुळशीची माळ घालणार्या वारकरी गुरूपेक्षा त्यांना वेदांत शिकवणारा सनातनी धर्मगुरू आणि शंकराचार्य महत्त्वाचे वाटू लागले. संतांनी काय सांगितलं, यापेक्षा धर्मशास्त्रात काय सांगितलंय, यावर ते भर देऊ लागले.
धारूरकरांच्या वेदांतानं असा घोळ घातला होता. त्यांचा तेव्हाच्या वारकरी संप्रदायावर जबरदस्त प्रभाव होता. त्या प्रभावापासून गाडगेबाबा आणि त्यांचे अनुयायी दूर होते. त्यामुळेच ते साने गुरूजींच्या लढ्यात थेटपणे सामील झाले आणि तनपुरे मठात साने गुरूजींनी समता यज्ञाचं कंकण बांधलं. पण पुढं त्याच तनपुरे मठात १९७५ साली कर्मकांडी महायज्ञ केला गेला. त्या यज्ञाचं कंकण बांधलं भगवानशास्त्री धारूरकरांनी. यावरून गाडगेबाबांचा वारकरी संप्रदायावरचा प्रभाव ओसरू लागला की संतविचारांच्या विरोधी असलेलं कर्मकांड, जातिभेद आणि गुरूबाजीसारखा कचरा संप्रदायात शिरणार हे उघड आहे. हा कचरा साफ करायला गाडगेबाबांचा खराटाच लागणार.बडव्यांनी सोवळ्यात क्वारंटाइन केलेल्या विठोबाच्या मुक्तीची गोष्ट शोधायला गेलो आणि घरी आल्यावर मलाच क्वारंटाइन व्हावं लागलं. पंढरपूरच्या या संपूर्ण प्रवासात आम्हाला साने गुरूजींना विरोध केलेल्या सनातन्यांची बाजूही ऐकायची होती. कारणं काहीही असोत, पण या सनातन्यांचा वारसा सांगण्याची कोणाचीच हिंमत नव्हती. आमच्या पूर्वजांनी साने गुरूजींना विरोध करून बरोबर केलं, असं छातीला हात लावून सांगणारा एकही माणूस आम्हाला भेटला नाही. मला वाटलं साने गुरूजींचा विजय यातच आहे.
यांच्या भूमिका काय होत्या?
= मामासाहेब दांडेकर
साने गुरूजींच्या उपोषणकाळात मामासाहेब दांडेकर यांच्याकडे वारकरी संप्रदायाचं अघोषित नेतृत्व होतं. त्यांनी साने गुरुजींच्या लढ्याला पाठिंबा दिला नाही, असं राजा मंगळवेढेकर लिहितात, ‘वारकरी संप्रदायाचे त्या काळात प्रमुख गणले गेलेले सोनोपंत दांडेकर यांनी अनुमती दर्शवली नव्हती, सही करण्यास नकार दिला होता, ही त्यातल्या त्यात दुःखाची गोष्ट होती. अस्पृश्यता हा धर्म नसून अत्यंत वाईट, माणुसकीहीन अशी दुष्ट रूढी आहे, हे काय त्यांना कोणी सांगायला, पटवायला हवे होते?’ त्यांच्या भूमिकेविषयी आचार्य अत्रे पंढरपूरमधल्या भाषणात म्हणतात, ‘नरसोपंत केळकर आणि सोनोपंत दांडेकर म्हणतात की विठोबापुढे एक नवीन दांडा बांधावा. आणि तेथपर्यंत स्पृश्य-अस्पृश्य भक्तांना येऊ द्यावं.’ मात्र अस्पृश्यांना मंदिर प्रवेश झाल्यानंतर त्यांनी मोकळेपणाने येऊन दर्शन घेतलं.
= किसन महाराज साखरे
वारकरी संप्रदायातली कट्टर वैदिक मांडणी करणारे विद्वान म्हणून आळंदीतल्या साधकाश्रमाचे प्रमुख किसन महाराज साखरे यांचं नाव घ्यावं लागतं. संप्रदायात त्यांचा अधिकार मोठा मानला जातो. पण त्यांनी अस्पृश्यांच्या मंदिरप्रवेशानंतर आतापर्यंत पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात येऊन दर्शन घेतलेलं नाही.
= वासुदेव महाराज अकोटकर
विदर्भ माऊली म्हणून वारकरी संप्रदायात ओळखले जाणारे वासुदेव महाराज अकोटकर विठोबा मंदिराला बडव्यांच्या तावडीतून मुक्त करण्याच्या लढ्यात होते. त्यांनी त्याविषयी विस्तृत अहवाल लिहून नाडकर्णी कमिशनकडे पाठवला होता.
= सोपानकाका देहूकर
हे तुकोबारायांचे वंशज मंदिर प्रवेश विरोधी समितीचे प्रमुख होते. इतर फडकर्यांच्या दबावाला बळी पडून ते या नादाला लागले होते. पुढे त्यांनी तसंच देहूकर फडाचे दुसरे प्रमुख भागवतबुवा देहूकर यांनीही मंदिरप्रवेश केला. शेवटी सोपानकाकांच्या मनात आपण केलेल्या विरोधाची सल कायम राहिली.
= गोपाळशास्त्री गोरे
गोपाळशास्त्री गोरे यांनी धारूरकर शास्त्रींच्या सोबतीने घागरीत विठोबाचं तेज उतरवण्याची पूजा केली होती. मंदिर प्रवेशाच्या पन्नासाव्या वर्षीही त्यांनी मूर्तीची शुद्धी करण्याची मागणी केली होती. पण मृत्यूच्या काही महिने आधी ते समितीचे अध्यक्ष शशिकांत पागे यांच्यासोबत २९ ऑक्टोबर २००९ला दर्शनासाठी आले. दर्शन घेताना ते काही तास तिथे पश्चात्तापाने रडत बसले. त्यांच्यासोबत त्यांचे शिष्य चंद्रशेखर देगलूरकर यांनीही बहिष्कार संपवला.
– ज्ञानेश्वर बंडगर
(लेखक इंजीनिअरिंगचे विद्यार्थी असून तरूण कीर्तनकार आहेत.)