आपण लग्नच केलं नाय तर बायको आणि मुलाबाळांचं झंझट कशाला पाठी लागंल! एक तर आपला धंदा बिनभरोशाचा. कधी आत तर कधी बाहेर. पोलीस कधी पण उचलून नेतात. एरियात कसलाही गुन्हा घडला तरी टोक्याला पहिला उचलणार. मग खून असो, मारामारी असो, पाकिटमारी असो, सोनसाखळी चोरी असो की बाईची छेडछाड असो- टोक्याला शोधत पोलीस अगदी घरापर्यंत येणार. तिथे नाही सापडलो तर माझे अड्डे एरियात कुठे कुठे आहेत हे पोलिसांना पक्कं माहीत आहे. मग मला सन्माननीय पाहुण्यासारखे पोलिसांच्या गाडीत बसवून नेणार. पण एक सांगतो, आपल्यावर कधी हात नाही उचलला त्यांनी. उलट मोठे सायब म्हणणार, काय टोक्या सायब, चायपाणी घ्या आणि पटापट या गुह्यात कोण सामील आहेत त्यांची नावं झटपट सांगा. मला खरोखरच माहीत नाही, असं सांगायची सोयच नसते. एरियातल्या सगळ्या टोळ्या तशा स्वतंत्र असल्या तरी त्यांची लिंक माझ्याशी जोडलेली असते हे पोलिसांना माहीताय. आपण एरियातल्या कुठल्या पण गुंडाची कुंडली झटक्यात मांडू शकतो. मग विचारात पडल्यासारखं करून आणि गुन्ह्याची तपशीलवार माहिती समजून घेऊन दोन मिनिटात मी त्या संशयित गुन्हेगाराचे नाव सांगून मोकळा होतो. तोपर्यंत पोलिसांनीही सीसीटीव्ही फुटेज तपासलेले असते. काही माहिती लागली तर पुन्हा बोलावू असं सांगून माझी पाठवणी करतात. आयुष्यात खूप गुन्हे केले. आता भाय म्हणून ओळखला जात असलो तरी पोलिसांचा खब-या म्हणून काम करतो, हे एरियात कुणालाच माहीत नाही. त्यामुळे कसलंही लफडं झालं तरी मांडवळीसाठी लोक माझ्याकडेच येतात.
आता तुम्ही मला सांगा, या सगळ्या झमेल्यात बायको करून आणि मुलाबाळांचा विस्तार वाढवून कशाला उगाच त्यांना संकटात टाकायचं? आपल्याला स्वतंत्रपणे, स्वत:च्या मस्तीत जीवन जगायला आवडतं. आम्ही जे धंदे करतो त्याची सावली आपल्या मुलाबाळांवर कशाला पडू द्यायची! म्हणूनच जे ब्रम्हचारी आहेत त्यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे. त्यांचे विचार उच्च असतात. म्हणूनच उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी महाराज त्यांच्या राज्यात दोन मुले बस्स, असा कायदा करणार असल्याचे समजताच मला खूप आनंद झाला. मला वाटत होतं की ते यापुढे देशाच्या उज्वल भवितव्यासाठी पाच वर्षं राज्यातल्या सर्वांनीच (विवाहितांनीसुद्धा) ब्रम्हचारी व्रत पाळावं, असा काहीतरी कायदा ते करतील. पण तसे ते फार दयाळू आहेत, त्यामुळे त्यांनी ‘हम दो-हमारे दो’ असा कायदा करण्याचं सूतोवाच केलं. ‘छोटं कुटुंब, सुखी कुटुंब’ या पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणेची त्यांना आठवण झाली आणि निदान दोन मुलांना तरी या जगाचं तोंड पाहायला मिळावं ही करुणेची भावना त्यांच्या मनात दाटून आली असावी.
मी माझा मानलेला परममित्र पोक्या याला फोन करून योगी यांच्या या नव्या घोषणेबद्दल प्रतिक्रिया विचारली, तेव्हा तो भडकला; मला म्हणाला, तुला अक्कल नाही. तू संसार केला नाहीस, म्हणून इतरांनी संसार करून मुलांच्या संख्येत दोनपेक्षा अधिक मुलांची भर घालू नये हा आग्रह आणि कायदा चुकीचाच आहे. आता मला चार पोरं आहेत. माझ्या धंद्यात ती मला हातभार लावतातच की. चौथ्या पोरीचं लग्न लावून दिलं. आज ती दुबईत सुखाने संसार करतेय. अंगात धमक असेल मुलं पोसण्याची तर खुशाल मुलांचं नंदनवन निर्माण करावं. कोणाचं कितवं मुलं काय पराक्रम करून देशाचं नाव उज्वल करेल याचा नेम नसतो. म्हणूनच उत्तर प्रदेशात दोनपेक्षा अधिक मुले असणार्यां ना निवडणुकीचे तिकीट नाही, कसल्याही सरकारी सवलती नाहीत हे चुकीचंच वाटतं.
पोक्याचे विचार ऐकून मीसुद्धा रामदेवबाबांसारखे ध्यान लावून मनात खोल शिरून विचार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मलाही त्यांच्यासारखंच आत्मज्ञानी झाल्यासारखं वाटू लागलं. आपण जन्माला येणार आहोत, हे आपल्याला कुठे माहीत असतं? जन्म आपल्या हाती नसतो आणि मृत्यूसुद्धा. मग येणा-या संततीला रोखणं म्हणजे महापापच. त्यातून उद्याचे संत, वैज्ञानिक, पंतप्रधान, राष्ट्रपती जन्माला येणार असतील तर त्यांनी जन्माला येऊ नये? हा अन्याय आहे, असं वाटून मी या कायद्याची भलामण करणार्यार लोकांचे विचारही विचारात घेतले. एका धर्मात कितीही बायका करण्याची मुभा आहे म्हणून त्या धर्मातले लोक सतत बायका करून पोरंच जन्माला घालत असतात, असा विचार करून त्या पुरुषांना काबूत आणण्यासाठी या कायद्याचा बडगा उगारण्याचा रोख असावा. पण त्यामुळे इतर समजूतदार कुटुंबाचं काय, असं वाटून गेलं.
मग मी आमच्या शेजारच्या आयेशा भाभीला या येऊ घातलेल्या कायद्याबद्दल विचारलं. आयेशा आता प्रौढ आहे. पाच मुलगे आहेत. तीन कतारला आहेत. दोन मुलींचे निकाह झालेत. ती म्हणाली, हर मजहब का एक उसूल होता है। हम उसका पालन करते है। बालबच्चे ये तो अल्ला की देन है। लेकिन आज ऐसी घडी आयी है की फॅमिली प्लॅनिंग आवश्यक है। ये मर्द और औरत दोनों को समझना चाहिये। आजपर्यंत जे झालं ते झालं पण यापुढे तरी धर्मातील अन्याय करणारे कायदे, नियम यांना आळा बसला पाहिजे. आमच्यात जे खरोखरच सुशिक्षित आहेत ते दोनपेक्षा जास्त मुले होऊ देत नाहीत. सुखवस्तू आहेत. धर्मांधतेच्या आहारी गेलेले नाहीत. शांत डोक्याने विचार करतात आणि मानवधर्माचं पालन करतात. त्यात स्त्रिया आहेत, पुरुष आहेत. अशा सुधारणावादी स्त्री-पुरुष विचारवंतांना मुस्लीम राष्ट्रात जगू देत नाहीत, त्यांचे विचार मांडू देत नाहीत. त्यांना स्वदेश सोडून दुस-या देशात आश्रय घ्यावा लागतो. भारतात हे प्रमाण कमी असले तरी जिथे आमची बहुसंख्य वस्ती आहे तिथे स्त्री बंधनात आहे. तिला मुक्त करण्याची गरज वाटते.
आयेशाच्या बोलण्याने मी चाट झालो. मला उत्तर प्रदेश, काश्मीर आठवला. आपल्याकडेही ‘स्त्री, शूद्र, ढोल आणि ढोर हे फक्त बडवण्याच्याच लायकीचे’ असे मागासलेले विचार असलेल्यांची, स्त्रियांना पोरवडे वाढवण्याचं साधन मानून चूल आणि मूल यांच्याशी जखडणारी विचारसरणी कशी डोकं वर काढते आहे, ते आठवलं. उत्तर प्रदेशाच्या या प्रस्तावित सुधारणावादी कायद्याला विरोध करायला उभे ठाकलेले स्वधर्मीय आठवले आणि आणि या प्रश्नाचा मी विचारवंतासारखा विचार करू लागलो. त्याच्या गुंत्यात अडकून गेलो.