अशी आहे ग्रहस्थिती
राहू वृषभेत, रवि मिथुन आणि नंतर कर्केत, बुध मिथुनेत, शुक्र-मंगळ-रवि कर्केत, चंद्र कन्येत, तूळ, वृश्चिक आणि सप्ताहाच्या अखेरीस धनुराशीत, शनि आणि प्लूटो (वक्री) मकरेत, गुरू आणि नेपच्यून (वक्री) कुंभेत, २० जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी, २३ जुलै रोजी गुरूपौर्णिमा.
—————
मेष – आयात-निर्यातीच्या क्षेत्रात काम करत असाल तर भरघोस यश पदरात पडणार आहे. त्यामुळे आठवडा आनंदात जाईल. १७ जुलै रोजी कर्केत होत असणार्या रवी-शनि समसप्तक योगामुळे व्यवहारात पारदर्शकता ठेवावी लागेल. अन्यथा एखादा हिसका बसू शकतो. कागदपत्रे सांभाळून ठेवा. वाहन चालवताना काळजी घ्या.
वृषभ – येत्या आठवड्यात अनपेक्षित लाभ होण्याचे योग जुळून येत आहेत. गोड बोलून खूप काही पदरात पडून घेण्याचा काळ आता सुरू होत आहे. इच्छित फलप्राप्ती होईल, चांगले लाभ मिळतील. योगकारक शनि, गुरू आणि १८ व १९ जुलै रोजी होणारा गुरू, बुध, चंद्र नवपंचम योग विशेष लाभदायी ठरणार आहे. गुरूपौर्णिमा विशेष यशप्राप्तीची.
मिथुन – तुमच्या मनात असणारी कामे या आठवड्यात पूर्ण होणार आहेत, त्यामुळे आठवडा खूपच आनंदात जाणार आहे. शुक्र-मंगळ आणि गुरू-नेपच्यून समसप्तक योगामुळे तुमच्या आयुष्यात भाग्यकारक घटना घडतील. निखळ प्रेमाचा अनुभव येऊ शकतो. विवाहेच्छुकांना मनासारखे स्थळ मिळेल. गुरूपौर्णिमा शुभसंकेताची. आर्थिक आवक चांगली राहिल्याने खिसापाकीट भरलेले राहील.
कर्क – कामातला उत्साह वाढणार आहे, मन प्रसन्न राहणार आहे. मात्र, दुसरीकडे आर्थिक समीकरण सांभाळावे लागणार आहे. उगाचच कुठेही वायफळ खर्च करू नका. एखाद्या कामातून अनपेक्षित लाभ मिळू शकतो. खूप दिवसांपासून थकीत असणारी जुनी येणी वसूल होऊ शकतात. मात्र, त्यासाठी आर्थिक तडजोड करावी लागू शकते.
सिंह – खिशात चांगले पैसे असल्यामुळे तुम्हाला खर्च करायची इच्छा होईल. पण तसे करू नका, गरजेनुसारच पैसे खर्च करा. राशीमध्ये येणार्या शुक्र-मंगळामुळे जोडीदाराबरोबर निखळ प्रेमाचा अनुभव मिळेल. मात्र, सुखस्थानात असणार्या राहूमुळे आनंदावर विरजण पडणार नाही याची काळजी घ्या. पौर्णिमा थोडी चिंता देणारी राहील.
कन्या – व्यवसायात उत्कर्ष होण्याचा काळ आता सुरू होत आहे. आगामी काळात नवे करार होतील. त्यामुळे कामाची गती वाढण्यास मदत होणार आहे. कामाच्या निमित्ताने प्रवास होऊ शकतो, त्यामुळे खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. चैनीच्या वस्तू करंदी करण्यासाठी पैसे खर्च होऊ शकतात. महिलांनी आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये, ते महागात पडू शकते.
तूळ – छप्पर फाड के मिळण्याचा योग्य जमून येत आहे. तुम्ही म्युच्युअल फंड, एलआयसी यामध्ये गुंतवणूक केली असेल तर चांगले लाभ मिळणार आहेत. वडिलोपार्जित संपत्तीमधून चांगली धनप्राप्ती होण्याचे योग आहेत. गुरू-बुध नवपंचम योगामुळे भाग्यवर्धक घटनांचा अनुभव येईल. एखादा जवळपासचा प्रवास होण्याचा योग आहे. पौर्णिमेच्या दिवशी घरात एखादा कौटुंबिक सोहळा घडू शकतो.
वृश्चिक – डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ही दोन तत्त्वं पाळून काम करावे लागणार आहे. व्यवसायवाढीसाठी चांगला काळ आहे. मात्र, त्यासाठी पथ्यं पाळावी लागणार आहेत. मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याशी संबंध बिघडणार नाहीत याची खबरदारी घ्या. या ना त्या कारणामुळे घरात खर्च वाढू शकतो.
धनू – अनेक दिवसांपासून सुरू असणार्या आरोग्याच्या तक्रारी आता हळूहळू कमी होतील. मात्र, खाण्यापिण्यावर योग्य ते नियंत्रण ठेवा. सध्या साडेसातीचा काळ सुरू आहे, त्यामुळे तुम्ही द्विधा मन:स्थितीत सापडू शकता. गुरूकृपा असल्यामुळे भाग्यवर्धक घटना अनुभवायास मिळतील. मात्र, पौर्णिमाच्या काळात एखादी छोटी चिंता लागून राहील.
मकर – चणे आहेत तर दात नाही असा काहीसा अनुभव या आठवड्यात येईल. एखादे काम पूर्ण करण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न करत असाल पण ते पूर्ण होणार नाही. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. पौर्णिमेच्या दिवशी संमिश्र अनुभव येतील. ध्यानधारणेकडे लक्ष द्या, म्हणजे आनंदी राहाल.
कुंभ – येत्या आठवड्यात गुरूकृपेचा चांगला लाभ होणार आहे. त्यामुळे आनंदात राहाल. कुठे प्रेमप्रकरण सुरू असेल तर जरा जपूनच पाऊल टाका, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. कलाकारांना चांगले अनुभव येतील. मन:स्वास्थ खराब होईल, असे बोलणे टाळा. सहलीचे बेत आखाल, पण ते ऐनवेळेला रद्द होऊ शकतात, त्यामुळे हिरमोड होऊ शकतो.
मीन – नवीन नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करत असाल तर यश मिळेल. भागीदाराबरोबरच्या चर्चा सफल होतील. पौर्णिमेच्या दिवशी एखादा साक्षात्कार होणारा अनुभव येईल. परदेशात कोणत्या कामाबद्दल चर्चा सुरू असेल तर त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल. अध्यात्मिक क्षेत्रात चांगली प्रगती कराल. त्यामुळे मन आनंदी राहील.