• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

पोक्याच्या सूक्ष्म उद्योगाचे प्रेरणास्थान

- टोक्या टोचणकर (टोचन)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
July 14, 2021
in टोचन
0

माझा मानलेला परममित्र पोक्या त्या दिवशी खूप खूष होता. काही नवीन आयडिया सुचली की त्याच्या आनंदाला पारावार राहात नाही. चोरबाजारात जाऊन त्याने सक्काळी सक्काळी दोन मोठ्या दुर्बिणी आणल्या होत्या. जवळजवळ तोफेच्या आकाराची ती नळकांडी होती. मी विचारताच तो म्हणाला, ही सूक्ष्मदर्शक दुर्बीण आणि ती दुसरी मध्यमदर्शक दुर्बीण. आपल्या लघुउद्योगाच्या विकासासाठी आणि वाढीसाठी त्यांची या घडीला नितांत गरज आहे.
आता पोक्याचे उद्योग सगळ्या एरियात माहीत होते. पण पोक्याला चैन पडत नव्हती. तुझ्या डोक्यात हे भलतंच खूळ कसं काय शिरलं, असं विचारताच पोक्या अगदी राणेसायबांसारखा टिपेच्या आवाजात म्हणाला, आबाबाबा, मोदीसायबांनी मंत्रिमंडळाचा केवढा मोठा विस्तार केला! जेवढे मंत्री जास्त तेवढा देशाचा विकास अधिक. मी तर म्हणतो, आणखी दोन तरी मंत्री सिंधुदुर्ग जिह्याला हवे होते. कुठे शोधूक जावची पण गरज नव्हती. दादांच्या घरात तर होते. म्हंजे कसा. बापाशीचा काम थोडा हलका झाला असता, पण तरीही एवढ्या विद्वान आणि सर्वज्ञ माणसाची पारख शेवटी मोदींनी केली आणि आपल्या माणसांना हाकलून वाड्यात नवीन भरती केली. याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत.
कारण मोदींना माणसांची जेवढी पारख आहे तेवढी भाजपमधील कोणत्याही नेत्यांना नाही. उगाच नाही त्यांनी मिळतील त्या पक्षांतून मिळतील ते नेते आणले आणि आपल्या पक्षाचा सर्व बाजूंनी महाविस्तार केला. कोणीही कसाही असो; मोदींनी त्याच्या सर्व अवगुणांकडे दुर्लक्ष केलं आणि केवळ पक्षहीत डोळ्यांसमोर ठेवून पक्ष फुग्यासारखा फू फू फुगवण्यासाठी प्राणाची पराकाष्ठा केली. ती पाहून कुणी म्हटले हे बाळसे नव्हे तर ही सूज आहे. पण मोदींनी त्याची कधीच पर्वा केली नाही. शेवटी पक्ष वाढला पाहिजे, पसरला पाहिजे, त्याचा महाविस्तार झाला पाहिजे हेच त्यांचे स्वप्न होते आणि आहे. वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो तर कुणाचे काहीही होऊ शकते. ज्यांना मोदींचा परिसस्पर्श झाला त्याच्या आयुष्याचे सोने झाले असे समजावे. कृपाशंकर सिंह यांची कितीतरी बदनामी झाली तरी मोदींचा दयाळू आणि कनवाळू जीव त्यांच्या भाजप प्रवेशासाठी किती अधीर झाला होता हे सर्वांनी पाहिले. त्यांनी त्यांचे गुण पाहिले. दोष नाही पाहिले. आताच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर काही दिवसांनी किंवा आठवड्यांनी आणखी विस्तार होऊन जम्बो मंत्रिमंडळ आकारास येणार असल्याचे मला उच्चस्तरीय सूत्रांकडून कळलं आहे. त्यात कदाचित कृपाशंकरांवरही कृपा होऊ शकते. कारण मी मोदींच्या एकंदर व्यक्तिमत्वाचा सूक्ष्म अभ्यास केला आहे. तू म्हणशील ही खोगीरभरती आहे, पण तसं नाही हे तुला लवकरच कळेल. मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळातील काही चांगल्या कार्यक्षम मंत्र्यांची खाती कमी केली, अशी टीका त्यांच्यावर होत असली तरी त्या टीकेत तथ्य नाही. नितीन गडकरी, सुरेश प्रभूू ही उदाहरणे तू देऊ नकोस. उलट त्यांच्यावरचा भार कमी होऊन त्यांनी अधिक कार्यक्षमतेने खात्याचा गाडा हाकावा ही मोदींची अपेक्षा तुला ठाऊक नाही. जेवढी माणसे जास्त तेवढा कामाचा भार हलका होतो आणि पूर्वीपेक्षा अधिक वेगाने काम होतं, हा आपला अनुभव आहे. आपल्या टोळक्यात जेव्हा पन्नास माणसे होती तेव्हा आपली कार्यक्षमता आतापेक्षा कितीतरी पटीने अधिक होती. आपण एरियावाईज त्यांची विभागणी केली होती. मंत्रिमंडळाचंही तसंच असतं. हे मी तुला सांगावं इतका मी मोठा नाही, पण तुझ्यासारखा मित्र असताना मी आपल्या लघु उद्योगाचा श्रीगणेशा तुझ्याच मार्गदर्शनाखाली केला आणि आपला धंदा भरभराटीला आणला. धंद्याला बरकत यायची असेल तर असे धाडसी निर्णय पटापट आणि एका रात्रीत घ्यावे लागतात. त्यामुळे मोदींनी योग्य तेच केलं आहे. त्यापासून प्रेरणा घ्यायची सोडून तू असा नाराज का?
ते सर्व खरं असलं तरी यात तुला आनंद होण्यासारखे काय आहे, असं मी म्हणताच पोक्या वैतागला. म्हणाला, तुला नाही कळणार. शेवटी सोनारालाच सोन्याची किंमत कळते. दगडाला शेंदूर फासून त्याचा देव बनत नाही, असं तू म्हणत असलास तरी तुला दादांची किंमत कळणार नाही. परवा कोटात किती रुबाबदार दिसत होते ते. आणि खातंही कसं त्यांच्या आवडीचं दिलंय. आजपर्यंत त्यांनी थोडे का लघुउद्योग केले! किती लांबलचक यादी होईल त्यांची. मध्यम किंवा मोठे उद्योग लोकांच्या नजरेत भरतात, पण सूक्ष्म उद्योगासाठी किती मेहनत घ्यावी लागते हे तुला नाही कळणार. सगळ्यावर बारीक नजर ठेवावी लागते. डोळ्यांच्या खाचा होतात. आता तू म्हणशील सूक्ष्म उद्योगात काय काय येतं? जे जे सूक्ष्म आहे ते ते सर्व सूक्ष्म उद्योगात येतं. काही वेळा ते डोळ्यांनाही दिसत नाही. अंदाजाने सर्व व्यवहार करावे लागतात. अर्थात सूक्ष्म उद्योग काय, मध्यम काय, मोठे काय कोणतेही उद्योग करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी नुसती डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे नजर फिरवली की रांगेतले भलेभले माना खाली घालून चळचळा कापू लागतात. हा इतिहास तुम्हाला माहीत नसला तरी मला माहीत आहे. एवढे उद्योग करूनही शेवटी ‘रंग माझा वेगळा’ म्हणून ते नामानिराळे राहतात हा त्यांचा आध्यात्मिक गुण. अशा देवमाणसावर आजपर्यंत सर्वांनी अन्याय्ाच केला, पण दाढी वाढवल्यापासून मोदींच्या अंगी जे साधुत्व आलं आहे त्यामुळे त्यांच्या अंतरंगात आणि बाह्यरंगात झालेल्या फरकामुळे त्यांची दृष्टी आणि मंत्रिमंडळ व्यापक होत जाईल आणि एक दिवस वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा अशी परिस्थिती येईल. तो खर्‍या अर्थाने सुदिन असेल. मीसुद्धा त्यांच्या जुन्या पावलावर पाऊल ठेवून माझे सध्या बंद पडलेले सूक्ष्म आणि मध्यम लघुउद्योग सुरू करणार आहे. कसले ते तुला माहीत आहेत. आपला एरियासुद्धा त्यांच्या पूर्वीच्या एरियात येतो. आता दादा मंत्री झाल्यावर कुणाची टाप नाही आपल्या लघुउद्योगधंद्याला हात लावण्याची. म्हणून तर सूक्ष्म आणि मध्यम पल्ल्याच्या दुर्बिणी आणल्यात. पोलीस येताना दिसले की या दुर्बिणी ताबडतोब इशारा देतात. जपानी आहेत त्या. मी कसले धंदे करतो ते दादांना पण माहीत आहे. आमचा एक सहकारी देवाघरी गेल्यावर धंद्याला उतरती कळा लागली होती. मी कसा तरी सावरत होतो. पण आता भीती नाही. पंधरा दिवसानंतर उद्योगाच्या उद्घाटनाला दिल्लीहून दादा येतीलच. तेव्हा तुझाही सत्कार करू. कसं?
मी चाटच झालो.

– टोक्या टोचणकर

Previous Post

१७ जुलै भविष्यवाणी

Next Post

कसा पण टाका…

Next Post

कसा पण टाका...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.