रवीना टंडन आणि ऐश्वर्या राय यांच्यापैकी तुमची आवडती अभिनेत्री कोण? आणि का?
– शमिका कणसे, बोपोडी
पत्ते खेळत असताना रमी मध्ये दुर्री किंवा तिर्रीला स्वतंत्र काही स्थान, किंवा त्यांची कुणाला आवड निवड नसते. हातात पानं तेरा असण्यासाठी त्या ‘असाव्या’ लागतात. त्यांचा उपयोग सिक्वेन्स पूर्ण करण्यासाठीच असतो आणि कधी जोकर म्हणून आल्याच तर तेवढ्यापुरतं महत्व नक्की असतं. परत पुढचा प्रत्येक डाव वेगळाच असतो…
मनोरूग्णालयातून एखादा मनोरूग्ण ठणठणीत बरा झाला आणि डॉक्टर म्हणून पुन्हा त्याच मनोरुग्णालयात गेला आणि पुन्हा त्याच्या डोक्यावर परिणाम झाला तर तो बरा होईल का?
– विद्याधर पोवळे, भांडुप
असं बर्याचदा होत असेल तर बिचार्याला नक्कीच कोणत्यातरी दवाखान्यात न्यायला हवं.
शीशे के घरों में रहनेवाले दूसरों पर पत्थर नहीं फेका करते, असं म्हणतात. पण आपलं घर बुलेटप्रूफ काचांचं करून घेतलं तर सहज शक्य आहे ना हे?
– मीनल सोनटक्के, बेलापूर
मग आधी आपल्या घरावर दगड मारून बघावेत नक्की आपलं घर बुलेट प्रूफ आहे की नाही ते?? आणि नक्की कितीदा दगड पडले तर त्या काचा फुटतात ते ही तपासावे; मगच पुढचे धाडस करावे.
साखरपुड्यानंतर भावी वधूला फिरायला चौपाटीवर घेऊन गेलो, तर दोन तासांत तिने एकदाही मास्क काढला नाही. ही निव्वळ कोरोना खबरदारी की काही वेगळंच, या प्रश्नाने जीव जळतोय. उपाय सांगा.
– प्रतीक घाटपांडे, दादर
चौपाटीवर मास्क घातला म्हणजे नियमांची तिला चाड आहे, याची भीती आहे का?? मग चार लोकांमध्ये घरीच भेटून बघा. तरीही मास्क काढला नाही तर तुम्ही पीपीई किट घालून भेटायला जा.
सर्वसामान्य माणसं गाय किंवा म्हैस यांचं दूध पितात. गांधीजी बकरीचं दूध का पीत असत?
– वर्षा देशपांडे, पुणे
कारण गाय आणि म्हशीचे दूध आश्रमातले लोक आधीच संपवून टाकत म्हणून.
घाल घाल पिंगा वार्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात, असं एका गाण्यात म्हटलंय? पण परसातून सुगंध माहेरापर्यंत कसा जाईल? कोणत्या फुलांचा हा इतका टिकाऊ सुगंध आहे, याची काही माहितीच दिलेली नाही.
– मालती बोरकर, मंगेशी
सामायिक भिंत असलेल्या सासर माहेरासाठी आहे ते गाणे. आणि अंतर खूप असेल तर, उकाड्याच्या दिवसात माझ्या अंगणात किमान वारं तरी येऊ दे; आणि तसंच माहेरच्या घरच्या अंगणातल्या फुलांचा किमान वास तरी घरात नेऊन पोहचव; अशी वार्याची वेगवेगळी कानउघाडणी आहे त्यात.
टीव्हीवरच्या गाण्यांच्या कार्यक्रमांतील लहान मुलांच्या गाण्यांतली निरागसता इतक्या लहानपणी मिळणार्या प्रसिद्धीमुळे, कॅमेरासमोर वावरण्याचं बनेल चातुर्य अंगात भिनल्यामुळे नष्ट होत नाही का?
– सोनाली व्यवहारे, शिंगणापूर
निरागसता तशीही अल्पकालीनच असते. हल्ली ती अभावालाच उरली आहे फक्त, इतकंच.
सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे माणसाची विचारशक्तीच खुंटून जाईल, अशी भीती तुम्हाला वाटते का?
– बबन शिंदे, शिक्रापूर
मला ते आता वाटायचं देखील बंद झालं आहे एव्हाना.
नाटक बंद, सिरियलींचं शूटिंग बंद, सिनेमांचं शूटिंग बंद; अशा काळात या व्यवसायावर अवलंबून असणार्या कलावंत-तंत्रज्ञांनी पोट भरण्यासाठी करायचं तरी काय?
– रामदास अंतरकर, धुळे
तग धरायचा.
मला व्यावसायिक अभिनेता बनण्याची इच्छा आहे. मी शाळा-
कॉलेजात नाटकात कामं केली आहेत. पण मी पारनेरला राहतो. इथून मुंबईत येऊन स्ट्रगल कसा करायचा? कुणाला भेटायचं?
– किरण पाटील, पारनेर
नाव कमवायला एकदम पारनेरहून थेट मुंबईलाच येऊन धडकायची आवशक्यता नसते. आधी आपल्या गावात नांव कमावलंत की पुढच्या रस्त्यांची आपोआप माहिती होत जाईल.
मंत्रिमंडळ विस्तार तर होऊन गेला. एखाद्या मंत्रिमंडळ विस्तारात तुमचा नंबर लागला आणि चॉइस असला तर कोणतं खातं मागून घ्याल? का?
– इस्माईल शेख, नर्हे, पुणे
हा विस्तार होण्याआधी तुमच्याऐवजी मोदींनी हे मला जर विचारलं असतं तर मला विचार करता आला असता. आता ते होऊन गेलंय, त्यामुळे वार्याला लाथा मारत बसण्यासारखा मी त्याचा निरर्थक विचार करत बसत नाही.