सोपे आणि चविष्ट ब्रेकफास्टचे पदार्थ करताना ते झटपट होतील, पौष्टिक असतील, कमीत कमी साहित्यात होतील असा माझा आग्रह असतो. अशी आखूडशिंगी, बहुगुणी गाय शोधताना अगदी पारंपरिक असे पदार्थ सापडले. कुठल्याही पिठाची चविष्ट उकड काढून गरमागरम खाणं हे सुख असतं. तांदळाची उकड हा तो सुखाचा पदार्थ. याचंच खिचू नामे एक गुजराथी भावंडही अलीकडेच सापडलं. ज्वारी, नाचणीच्या पिठाचीही उकड काढत असतील. पण माझ्या आवडीचे उकडीचे हे तीन प्रकार आहेत.
तांदळाची मऊ मऊ उकड
साहित्य :
तांदळाची पिठी एक वाटी,
दीड/दोन वाटी दाट ताक (आंबट ताक पण चालतं, पण मला ते आवडत नाही),
हिरव्या मिरच्या : दोन तरी घालाव्यात,
अर्धा चमचा आलं किसून,
कढीपत्ता, मीठ, कोथिंबीर.
कृती :
कढईत दोन चमचे तेल घालून फोडणी करायची, हिंग जास्त घालायचं आणि हळद घालायची नाही. फोडणीत कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या वाटून किंवा मोठे तुकडे करून टाकायच्या. आलं किसून घालायचं.
ताकात तांदळाची पिठी आणि मीठ घालून छान नीट सफेटून घेऊन ते मिश्रण फोडणीत घालायचे. एक बेश्ट दणदणीत वाफ आणायची.
उकड तयार आहे. कोथिंबीर घालून खावी.
– काहीजण वरून कच्चे तेल/ तूप घालून खातात.
– काहीजण मिश्रणात हळद घालतात, चव वेगळी लागते.
– काहीजण फोडणीत लसूण ठेचून घालून सात्विक उकडीला भडक मेकअप करतात. आवडत असेल तर तसं करावं.
मोकळी भाजणी/ भाजणीची उकड
रोज नाश्त्याला चविष्ट तरी पौष्टिक असं काहीतरी करायच्या शोधात हा पदार्थ सापडला. वेळणेश्वरला गोखलेकाकूंनी दोन दिवस छान खाऊ घातले. निघायच्या दिवशी सकाळी या भाजणीचा गरमागरम डबा आला. पूर्वी हा पदार्थ मला नीट जमला नव्हता किंवा याचं कोरडं व्हर्जन मला आवडलं नव्हतं. त्यामुळे खाताना साशंक होते. पण अतिशय सुंदर लुसलुशीत मोकळी भाजणी खाऊन तृप्त झाले. खातानाच यामागचं रहस्य लक्षात आलं : मोकळी भाजणी ‘मोकळी’ नव्हती.
– भाजणीच्या मिश्रणात घातलेलं पाण्याचं योग्य प्रमाण
– वाफ आणण्याचं टायमिंग
– वरून सढळ हस्ते ओल्या खोबर्याची पखरण.
(जय कोकण!)
साहित्य :
एक वाटी थालीपीठाची भाजणी,
अडीच/तीन वाट्या पाणी,
कढीपत्ता, दोन हिरव्या मिरच्या,
तिखट, मीठ,
कोथिंबीर, ओलं खोबरं.
कृती :
कढईत अंमळ सढळ हस्ते तेल घालावं (नॉनस्टिकमध्ये एक चमचा पुरेल). एका बाऊलमध्ये भाजणी, तिखट, मीठ आणि अडीच वाट्या पाणी घालून चांगले फेटून घ्यावे. गुठळ्या राहू देऊ नयेत.
तेल नीट तापल्यावर कढीपत्ता, हिंग, हळद, मिरच्या घालून परतून घ्यावं, चिमूटभर साखर घालावी. त्यावर भाजणीचं फेटलेलं मिश्रण घालून नीट ढवळून घ्यावे. एक दणदणीत वाफ काढावी. वरून कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालणं मस्ट आहे.
यात फोडणीत कांदा बारीक चिरून घातलेलाही चांगला लागतो.
मोकळ भाजणीसोबत दही, ताक, भाजलेले शेंगदाणे छान लागतात.
खिचू/ पापडीनू लोट
बडोद्याला गेलेले असताना हा पदार्थ रस्त्यावर गाडीवर विकायला होता. घेऊन खाल्ला. मस्त चविष्ट, हलका पदार्थ. नंतर रेसिपी शोधली आणि करून पाहिला.
आपली तांदळाची उकडच, पण जराशी वेगळी.
साहित्य :
एक वाटी तांदूळपिठी, अडीच वाटी पाणी,
बेकिंग सोडा पाव चमचा, तेल, मीठ,
हिरवी मिरची, जिरं, ओवा, लोणच्याचा मसाला.
कृती अत्यंत सोपी :
कढईत पाणी उकळायला घ्यायचं. पाण्यात एक चमचा तेल, जिरं, ओवा, एक हिरवी मिरची बारीक चिरून, मीठ, आणि बेकिंग सोडा घालून सणसणीत उकळी फुटली की तांदूळपिठी घालायची. लाटण्याने/ उलथण्याने/ व्हिस्करनं मस्त फेटायचं. गुठळी राहिली नाही पाहिजे. पाच दहा मिनिटं झाकण ठेऊन वाफ द्यायची.
खायला घेताना वरून कुठल्याही लोणच्याचा तयार मसाला आणि कच्चं तेल घालायचं.
पारंपारिक पद्धतीत बेकिंग सोड्याऐवजी पापडखार घालतात.
– जुई कुलकर्णी
(लेखिकेला पारंपरिक अन्नपदार्थांविषयी उत्सुकता आहे आणि पाककलेत रुची आहे.)