‘बर्याच वेळाने अजय बोलायला लागला. त्याने जे काही सांगितले ते ऐकून मी देखील सुन्न झालो साहेब. त्याची आणि आसावरीची ओळख फार पुढे सरकली होती. दोघांनी एकमेकांना लग्नाचा आणाभाका देखील देऊन झाल्या होत्या. एक दिवशी अशाच पावसाळी रात्री आसावरीच्या रूमवर ते दोघे नको तितके जवळ देखील आले होते. आणि त्याच प्रसंगाचे फोटो पाठवून आता कोणीतरी अजयकडे पन्नास लाखाची मागणी करत होते.’
—-
‘सारंग दर्यावर्दी – खाजगी गुप्तहेर’
दाराबाहेरच्या पाटीकडे रंजनाबाई एकटक पाहत उभ्या होत्या. शेवटी त्यांनी मनाशी निश्चय केला आणि दारावरची बेल दाबली. दरवाजा पूर्णपणे व्यापला जाईल अशा अवाढव्य आकाराच्या एका माणसाने दार उघडले आणि रंजनाबाई तो देह बघून दचकल्याच.
‘मला सारंग दर्यावर्दींना भेटायचे होते. तुम्हीच का ते?’
‘नाही. मी त्यांचा मदतनीस जयराम. पण आकारामुळे मला सगळे ‘पर्वत’ नावानेच ओळखतात. तुम्ही बसा ‘साहेब’ येतीलच येवढ्यात.
जयराम पाणी देऊन निघून गेला आणि रंजनाबाई अस्वस्थपणे हॉल न्याहाळत बसल्या. कोचाच्या बाजूच्या खिडकीतून सारंग शांतपणे त्यांच्या हालचाली न्याहाळत होता. त्याच्या स्वत:च्या अशा काही पद्धती होत्या, ज्या तो कायम उपयोगात आणत असे. त्यातलीच एक म्हणजे, आलेल्या नवागताला लगेच भेटायला जायचे नाही. त्या माणसाला थोडा वेळ एकटे सोडायचे. त्याच्यावरचे दडपण तर कमी होतेच, पण हॉलमध्ये वेगवेगळ्या मान्यवर लोकांसोबतचे सांरगचे फोटो, पोलिसांकडून सत्कार करून घेतानाचे फोटो पाहताना आलेल्या माणसाच्या मनात नकळत कुठेतरी ‘आपण एका योग्य व्यक्तीकडे मदतीसाठी आलो आहोत,’ हा विश्वास देखील निर्माण होतो.
थोडा वेळ जाऊन दिल्यावर सारंग बाहेर आला. त्याच्या व्यक्तिमत्त्वाने आणि दिलासा देणार्या आश्वासक हास्याने रंजनाबाईंवरचे राहिलेले थोडेफार दडपण देखील कमी झाले आणि त्या थोड्याश्या रेलून बसल्या.
‘नमस्कार. मी श्रीमती रंजना सडखोलकर. मला बॅरिस्टर धवल राजहंस यांनी तुमच्याकडे येण्याचा सल्ला दिला होता.’
बॅ. धवल राजहंस म्हणजे कायद्याच्या क्षेत्रातले एक चमकते नाव. कोर्टात भल्या भल्या गुंतागुंतीच्या केस बुद्धिचातुर्याच्या जोरावर सहज सोडवणारा आणि गुन्हेगाराला कायद्यासमोर वाकायला लावणारा कायदेपंडित. अनेकदा केसेस सोडवताना धवलला कायद्याच्या बाहेरची कामे देखील करायला लागत. अशावेळी त्याच्या हक्काचा माणूस म्हणजे सारंगच असणार हे नक्की. काही वेळा एखाद्या गुन्ह्यात कायद्याचे हात तोकडे पडतात. अशावेळी गरजवंतांना मग धवल सरळ सारंगचा पत्ता देत असे. सारंगही पठ्ठ्या असा की, वाटेल ती ‘तिकडम’ लढवेल, वेळेला राजरोस कायदे धाब्यावर बसवेल पण गुन्हेगाराच्या मुसक्या आवळेल हे नक्की.
‘नमस्कार. माझा आणि धवलचा रात्रीच फोन झाला. बोला मी तुम्हाला कशी मदत करू शकतो?’
काही क्षण रंजनाबाई डोळे मिटून शांत बसल्या. बहुदा त्या मनातल्या मनात शब्दांची जुळवणी करत असाव्यात. ‘सारंग, माझ्या एकुलत्या एका मुलाचा खून झालाय. पोलिस दफ्तरी त्याची ‘आत्महत्या’ अशी नोंद आहे. पण माझी खात्री आहे की, हा खूनच आहे. माझा मुलगा कधीच आत्महत्या करू शकणार नाही! तो भोळा असेल पण भेकड कधीच नव्हता. मला माझ्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी तुमची मदत हवी आहे!’
‘मला सर्व घटना सविस्तर सांगाल तर बरे होईल.’ जयरामने आणून दिलेला चहाचा कप रंजनाबाईंच्या हातात देत सारंग बोलता झाला.
‘माझा मुलगा अजय एक छोटेसे युनिट चालवायचा. स्कूटरच्या इंजिनासाठी लागणारा एक पार्ट तो बनवायचा. सचोटी आणि प्रामाणिकपणामुळे त्याच्या हाताला यश देखील चांगले मिळत होते. लवकरच तो युनिटचे रूपांतर कारखान्यात करणार होता. आमच्या नव्या बंगल्याचे काम देखील लवकरच सुरू होणार होते. पण अचानक काय घडले कळले नाही. हसता खेळता अजय एकदम अबोल आणि चिंताग्रस्त दिसायला लागला. मला आधी वाटले कामाचे टेंशन, वाढलेली दगदग ह्यामुळे असे झाले असावे. पण दिवसेंदिवस तो अजून कुढायला लागला, चक्क दुपारची दारू पिऊन घरी येण्यापर्यंत त्याची मजल गेली. मग मात्र मी त्याला चांगलेच फैलावर घेतले. हातात पैसा आला म्हणजे मन मानेल तसे वागण्याचा त्याला अधिकार नाही हे त्याला सुनावले. पण तो गप्पच राहिला. माझ्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर त्याने दिले नाही. फक्त ‘लवकरच हा काळोख संपेल,’ असे काहीतरी विचित्र पुटपुटत तो त्याच्या खोलीत निघून गेला. दुसर्या दिवशी सकाळी त्याचे प्रेतच….’ रंजनाबाई हुंदके द्यायला लागल्या आणि सारंग त्यांना सावरायला पुढे झाला.
सारंग तसा पहिल्यापासूनच चुणचुणीत आणि प्रचंड हुषार. सारंगचे वडील इन्स्पेक्टर धुरंधर दर्यावर्दी म्हणजे पोलीस दलाचा वाघच. नुसत्या त्यांच्या नावाने भलेभले बदमाश सुतासारखे सरळ व्हायचे. निवृत्त झाल्यानंतर देखील ते स्वस्थ बसले नाहीत. खाजगी गुप्तहेराचा व्यवसाय उघडून, कायद्याची सेवा करतच राहिले. लहानपणापासून त्यांच्याच तालमीत वाढलेल्या सारंगने स्वमर्जीने हाच व्यवसाय निवडला. वडिलांच्या ओळखी आणि त्याचे स्वतःचे कर्तृत्व ह्यामुळे त्याच्या यशाचा आलेख कायम उंचावतच होता. आपल्या ओळखीचा फायदा घेत, सारंगने अजयच्या आत्महत्या प्रकरणाच्या फाइलची एक कॉपीच चौकीतून मिळवली आणि कामाचा श्रीगणेशा केला.
—
अजय तसा सरळमार्गी तरूण. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचं युनिट सांभाळत त्याने कामाचा पसारा वाढवत ठेवला, यशस्वी देखील केला. अजयला मित्रपरिवार असा फारसा नव्हताच. लहानपणापासूनचा एकमेव मित्र म्हणजे कैलास. कैलासची स्वतःची प्रिटिंग प्रेस होती. दोघांना लोक राम-लक्ष्मणच म्हणायचे. कैलास आणि अजय दोघांनी प्रत्येक सुख-दु:खात एकमेकांना साथ दिलेली होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अजयच्या श्रीमंतीचा कैलासने कधीही हेवा केला नाही. अजयची आर्थिक मदत देखील त्याने नाकारली आणि कर्ज घेऊन प्रेसचा पसारा वाढवला होता.
गेल्या महिन्यात कोल्हापुरात पहिल्या पावसाचा शिडकावा झाला आणि शिरस्त्याप्रमाणे अजय आणि कैलासची दुकली पन्हाळ्याकडे निघाली. कैलासने पहिली दुचाकी घेतली तेव्हापासून त्यांनी जणू हा नियमच बनवला होता. पहिल्या पावसाचे थेंब कोसळले की, पन्हाळ्याकडे निघायचे. गडावर छानसा आडोसा शोधत राजाभाऊंची भेळ आणि एक एक बिअर. तसे दोघेही व्यसनी नव्हते पण आयुष्याचा आनंद मात्र मनमुराद लुटायचे. गेल्या वर्षी अजयची चारचाकी आली आणि त्यांच्या सहलीची मजा आणखीनच वाढली.
गेल्या महिन्यात असेच दोघे पन्हाळ्याकडे जात असताना तो लहानसा अपघात घडला आणि त्यामुळे पुढचे सगळे रामायण घडले. अजय तसा गाडी कायमच सावधपणे चालवणारा; पण त्या दिवशीचा जबरदस्त पाऊस आणि अंधारलेल्या दिशा ह्यामुळे बहुदा त्याचा अंदाज चुकला आणि गड चढताना पुढच्या गाडीला त्याचा हलकासा धक्का लागला. पुढच्या गाडीतला प्रवासी समजूतदार असल्याने वाद झडला नाही, पण अजयच्या आग्रहास्तव गड उतरल्यावरती जेवणाचे निमंत्रण मात्र त्याने स्वीकारले. प्रवासी म्हणजे खरेतर चक्क एक तरूण मुलगी होती. पावसाचा आनंद लुटण्याची तिची पद्धतही अगदी अजय आणि कैलास यांच्यासारखीच होती. रात्री गडाखाली आसावरी पुन्हा एकदा भेटली आणि आपल्या अनेक आवडी निवडी समान आहेत हे त्या तिघांनाही जेवताना जाणवले. आसावरी खरेतर मुंबईची; इथे अंबाबाईच्या देवळाचे काही स्केचेस काढण्यासाठी म्हणून मुक्कामी आलेली. त्या दिवशीची भेट तिथेच संपली. संपली असे खरेतर कैलासला वाटले होते, पण ती तर सुरुवात होती.
—
‘कैलास साबळे? मी सारंग… सारंग दर्यावर्दी. मी काल तुम्हाला फोन केला होता.’
‘हो हो.. या ना बसा.’
‘कैलासराव अजयची फाइल मी वाचली आहे. पण तुमच्या तोंडून मला एकदा पुन्हा सगळे सविस्तर ऐकायचे आहे. अर्थात, तुमची हरकत नसेल तर.’
कैलासने आसावरीशी झालेल्या पहिल्या भेटीपासून सुरुवात केली.
‘सारंगराव, त्या भेटीनंतर चारच दिवसांनी अजयच्या गाडीत आसावरीला पाहून मी चांगलाच चमकलो. अजय आणि आसावरी दोघांचेही माझ्याकडे लक्षच नव्हते. आपल्या धुंदीत सिग्नल सुटताच ते निघून देखील गेले. मी अजयकडूनच ह्यासंदर्भात काही कळेल अशी अपेक्षा केली होती, पण झाले उलटेच- पुढच्या काही दिवसांतच अजय आपल्याला टाळतोय हे माझ्या लक्षात आले. आठवड्यातून चारवेळा तरी हमखास आमचे फोनवर बोलणे व्हायचे, पण त्या आठवड्यात एकदाही अजयने स्वत:हून फोन केला नाही. मी फोन केल्यावरही दोन्ही वेळा तो तुटकच बोलला. मला कुठेतरी हे फार लागले आणि रागाच्या भरात मी देखील संपर्क साधायचे टाळले. पण ती माझी फार मोठी चूक ठरली.’
‘पंधरा दिवसांनी अपरात्री माझ्या घराच्या दाराची बेल वाजली. दारात अजय उभा. त्याचा अवतार अक्षरश: बघवत नव्हता; त्यात त्याच्या तोंडाला चक्क दारूचा वास. मी पाणी आणून दिले, त्याच्या शेजारी बसलो, त्याच्या खांद्यावर हात ठेवला. अजय नुसती शून्यात नजर लावून बसला होता. बर्याच वेळाने तो बोलायला लागला. त्याने जे काही सांगितले ते ऐकून मी देखील सुन्न झालो साहेब. त्याची आणि आसावरीची ओळख फार पुढे सरकली होती. दोघांनी एकमेकांना लग्नाचा आणाभाका देखील देऊन झाल्या होत्या. एक दिवशी अशाच पावसाळी रात्री आसावरीच्या रूमवर ते दोघे नको तितके जवळ देखील आले होते. आणि त्याच प्रसंगाचे, दोघांचेही नको त्या अवस्थेतले फोटो पाठवून आता कोणीतरी अजयकडे पन्नास लाखाची मागणी करत होते.’
‘आसावरीला ह्याची कल्पना खरंच नव्हती? तिच्या जबाबात तर तसाच उल्लेख आहे.’
‘आसावरीचा मला देखील पहिल्यांदा संशय आला होता, सारंगसाहेब. मला हे सगळे वेल प्लॅन्ड वाटत होते. पण मी जेव्हा खूप प्रयत्नाने आसावरीची माहिती मिळवली, तेव्हा माझी शंका क्षणात दूर झाली. आसावरी कोट्यधीशाची एकुलती एक मुलगी आहे. तिच्या स्वत:च्या नावावर मुंबईत तीन फ्लॅट आहेत, वडिलांची आर्ट गॅलरी देखील तिच्याच नावावर आहे, आणि मुख्य म्हणजे स्वत:च्या कलेतून ती बक्कळ पैसा कमावते आहे.’
‘अजयचा कोणावर संशय होता?’
‘त्याने तसे काही स्पष्ट सांगितले नाही, पण त्यालाही बहुदा आसावरीचाच संशय आला असावा. कारण मी पोलिसांकडे जाण्याची गोष्ट करताच, त्याने ती स्पष्टपणे धुडकावून लावली होती. पुढच्या चारच दिवसात त्याने ब्लॅकमेलरला जवळपास एक कोटी रुपये देखील मोजले.’
‘धन्यवाद कैलासराव. काही मदत लागली, तर पुन्हा तुम्हाला तसदी देईनच.’
‘सारंगसाहेब, तुमच्या कानावर एक गोष्ट घालतो. तिचा ह्या घटनेशी काही संबंध आहे का नाही ह्याची मला खात्री नाही; पण अजयच्या मृत्यूच्या आदल्याच दिवशी त्याचा मामा तुरुंगातून सुटला होता. त्याला अजयच्या तक्रारीवरूनच अटक झाली होती. दोघांच्यात रंजनाबाईंच्या माहेरच्या जमिनीवरून वाद चालू होते.’
सारंगच्या तोंडातून एक शीळ बाहेर पडली आणि टिचकी वाजवत तो तिथून बाहेर पडला.
—
‘रंजनाबाई, मी कालच मुंबईला जाऊन आसावरीची भेट घेतली. तिच्या भेटीत फारसे काही हाताला लागले नाही. ती स्वत: अजून ह्या धक्क्यातून सावरलेली नाहीये. मला देखील पोलीस तपासात जे काही उघड झाले आहे, त्याच्या पलीकडे फारसे काही सापडलेले नाही. मला वाटतं, आपण हा तपास इथेच थांबवावा. कारण अजयचा ब्लॅकमेलर देखील मागे कोणताही पुरावा न सोडता अदृश्य झाला आहे. अर्थात पोलिस त्याच्या मागावर आहेतच. तुमची इच्छा असेल, तर मी तपास पुढे चालू ठेवतो; पण हाताला काही लागेलसे वाटत नाही.’
‘खरे आहे तुमचे सारंग साहेब. माझ्या भावाला देखील असेच वाटते की आता मी जास्ती त्रास सहन करू नये. तोही आता सुधारला आहे, मुख्य म्हणजे त्याला झालेला पश्चात्ताप स्पष्ट दिसतो आहे. मलाही आता त्याचाच आधार उरलेला आहे.’
रंजनाबाईंचा निरोप घेऊन सारंग उठला आणि सहज त्याची नजर मागे भिंतीवर लावलेल्या फोटोंवर पडली.
‘रंजनाबाई.. सारंग डावखोरा होता?’
‘हो! का?’
‘रंजनाबाई तुमच्या मुलाचा खूनच झालाय! आणि आता हे मी सिद्ध केल्याशिवाय सुखाने बसणार नाही!’
धाडकन दरवाजा उघडून बाहेर पडलेल्या सारंगकडे रंजनाबाई ‘आ’ वासून पाहत राहिल्या…
—
‘पर्वत, आज रात्री मला एका घरात घुसायचे आहे. तू फक्त मला ‘कव्हर’ म्हणून बरोबर रहा. त्या आधी मला तातडीने काही माहिती हवी आहे, ती मला मिळवून दे. त्यासाठी तुला कायदा धाब्यावर बसवायला लागला, कोणाला हजार-पाचशेची लाच द्यायला लागली, कोणाचे हात-पाय तोडायला लागले तरी माझी हरकत नाही! कारण ज्यांच्याकडून तुला ही माहिती मिळवायची आहे, ती माणसे कमी आणि जनावरेच जास्ती आहेत.’
रात्रीच्या अंधारात एखाद्या मांजराच्या सावधतेने सारंग ‘त्या’ घरात शिरला. आपल्याला शोधायची आहे ती वस्तू इथे असेलच अशी त्याला खात्री होती. सावधपणे तो घराचा कानाकोपरा धुंडाळत होता. बाथरूमच्या वरच्या माळ्यावर त्याला हवी असलेली वस्तू दिसली, आणि महत्प्रयासाने त्याने तोंडातून बाहेर पडणारी शीळ थांबवली.
—
‘चिअर्स फॉर युवर सक्सेस सारंगा!!’ धवल राजहंस सारंगच्या ग्लासाला ग्लास भिडवत म्हणाला.
‘सारंग तुला खुनी सापडला तरी कसा?’
‘माझ्या पहिल्या तपासात खरेतर फारसे काही हाताला लागले नाही. ब्लॅकमेलर मोठा हुशार होता. ज्या नंबरवरून एकदा फोन केला, तो नंबर तो पुन्हा वापरत नव्हता. तो फोन आणि सिमकार्ड दोन्ही तो नाहीसे करत होता. त्याचा माग काढणे अशक्य बनले होते. त्यातच अजयच्या मृत्यूनंतर तो जणू हवेतच विरला. अजयनेही गळफास लावून घेतल्याचे स्पष्ट दिसत होते. पंचनाम्यात देखील तसेच दिसून आले. एक क्षण तर मलाही वाटायला लागले होते, की ही आत्महत्याच आहे.’
‘मग अचानक असे काय घडले की, तुला हा खूनच आहे ह्याची खात्री पटली?’
‘मी त्या दिवशी रंजनाबाईंचा निरोप घ्यायला म्हणून बंगल्यावर गेलो होतो. अगदी बाहेर पडत असतानाच सहज माझे लक्ष मागे भिंतींवर लावलेल्या फोटोंवरती पडले. एका फोटोत अजय डाव्या हातात मिळालेले बक्षीस उंचावून उभा होता, तर एका फोटोत तो टेबलावरती बसून लिखाण करताना दिसत होता. त्याने पेन डाव्या हातात धरले होते.’
‘मग?’ धवलची उत्सुकता आता चांगलीच वाढली होती.
‘अजय डावखोरा होता हा दुवा माझ्या मेंदूत क्लिक झाला आणि मी माझ्या पद्धतीने कामाला लागलो. रंजनाबाई तर ह्या प्रकरणाच्या आसपास देखील नव्हत्या. आसावरी माझ्या दृष्टीने पूर्ण निरागस होती. कैलास तर स्वत:हून पोलिसांकडे जाण्याचा हट्ट अजयकडे करत राहिला होता. राहिला अजयचा मामा. पण जेव्हा मी माहिती काढली होती, तेव्हा अजयच्या मामाला जरी अजयच्या खुनाच्या आदल्या दिवशीच जामिन मिळाला असला, तरी काही तांत्रिक अडचणीमुळे तो अजयच्या मृत्यूच्या दिवशी संध्याकाळी सातला तुरुंगातून बाहेर पडला होता आणि नाशिकहून कोल्हापुराचे ४५० किलोमीटरचे अंतर पाच तासात गाठणे नक्कीच अशक्य होते!’
‘मग मी ‘पर्वत’ला कामाला लावले आणि माझ्या अपेक्षेपेक्षा बरीच जास्ती माहिती माझ्या हाताला लागली. त्यातच ज्या हॉटेलमध्ये अजय आणि आसावरीचे फोटो काढले गेले होते, त्या हॉटेलचा एक वेटर बॅग घेऊन बाहेर पडताना पर्वतला सापडला आणि पुढचे चित्र स्पष्ट झाले. फक्त हे सगळे ‘का’ घडले, ते मला जाणून घ्यायचे होते. मग मी पर्वतकडून खुन्याची पूर्ण माहिती काढून घेतली आणि रात्री खुन्याच्या घरात शिरलो. माझ्या अपेक्षेप्रमाणे अजयकडून मिळवलेले एक कोटी रुपये मला तिथेच सापडले आणि सगळा खुलासा झाला!’
‘ओह! सो.. ज्याला जिवाचा सखा मानला त्यानेच घात केला म्हण की..’
‘जिवाचा सखा हा आता जिवाचा सखा राहिलेला नाही, हे अजयच्या लक्षात यायला लागले होते; म्हणून तर हे सगळे ‘नाट्य’ घडले.’
‘कैलास ह्या सगळ्यामागे असेल असे मला क्षणभर देखील वाटले नव्हते! विशेषतः ज्या तडफेने तो ह्या सगळ्यात मदत करत होता ते पाहता..’
‘खरे आहे धवल! मला देखील त्याच्यावर संशय नव्हता, मी जुजबी माहिती काढली त्यावरती तरी तो मला चांगला मनुष्य वाटला होता. पण हा चांगला मनुष्य पक्का जुगारी होता आणि लाखोंचे कर्ज डोक्यावर घेऊन फिरत होता. हे कर्ज फेडण्यासाठीच त्याला पैशाची गरज होती; आणि त्यासाठी तो अजयला गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या स्कीम सांगून भुरळ घालत होता. पण आसावरी आली आणि सगळे चित्रच बदलले. सतत पैशाची भुणभूण लावणार्या कैलासपेक्षा आसावरीचा सहवास आता अजयला जास्ती महत्त्वाचा वाटू लागला होता. हातातला डाव उधळायची परिस्थिती निर्माण झाली आणि कैलास पेटून उठला.’
‘अजय आणि आसावरीच्या पाळतीवर असलेल्या कैलासला त्यांचे हॉटेलचे गुपित कळले आणि पैशाचे आमिष दाखवून त्याने तिथल्या वेटरला हाताशी धरले. त्याच्या अपेक्षेप्रमाणेच सगळे घडत होते. ब्लॅकमेलचा तडाखा बसताच, अजयने कैलासकडेच मदतीची धाव घेतली होती. खरेतर अजय पोलिसांकडेच जाण्याच्या विचारात होता, पण कैलासने त्याला थांबवले. मात्र जबाबात त्याने उलटे सांगितले की, ‘आपण पोलिसांकडे जाऊ म्हणत होतो, पण अजयने नकार दिला.’ पुढच्या गोष्टी मात्र कैलासच्या अपेक्षेप्रमाणे घडतच नव्हत्या. अजय ब्लॅकमेलरला पैसे देण्याची टाळाटाळ करत होता. त्या दिवशी अजयच्या घरी गेलेला असताना, बोलता बोलता कैलासला अजयने जमिनीच्या व्यवहार पूर्ण करण्यासाठी एक कोटी सत्तर लाखाची रक्कम बँकेतून काढल्याचे समजले. ह्या संधीचा फायदा कसा घ्यावा ह्याचा विचार करत असतानाच, त्याची नजर सहजपणे अजयच्या डायरीवर पडली. त्या डायरीत लिहिलेला नंबर पाहून कैलासचे धाबेच दणाणले. तो नंबर अजयने कसा मिळवला कल्पना नाही, पण तो त्या हॉटेलच्या वेटरचा नंबर होता. पैशाची निकड आणि त्यातच हा पुरावा पाहून कैलासने एकच निर्णय घेतला आणि तो म्हणजे अजयला संपवण्याचा. अजय पुढची हालचाल करण्याच्या आतच त्याला संपवायला हवे होते. त्या रात्री कैलासने अजयला भरपूर दारू पाजली. पोलिसात आपण ओळख काढली असून, अजयच्या मागचा त्रास आता दोनच दिवसात संपणार असल्याची त्याला भुरळ देखील त्यासाठी घातली. अजय बेसावध होताच, त्याने बेडशीटचा वापर करून त्याला लटकवले आणि पैशाची बॅग घेऊन पोबारा केला.’
‘पण सारंग, अजयच्या डावखोरा असण्याचा आणि तुझा हा खून आहे ह्याची खात्री पटण्याचा संबंध अजूनही माझ्या लक्षात आलेला नाही.’
‘अजयच्या फाइलमध्ये अजयने जिथे सो-कॉल्ड आत्महत्या केली त्या बेडरूमचे देखील फोटो होते. त्यातच एक फोटो अजयच्या रायटिंग टेबलचा देखील होता. ज्यात एक वरचे पान फाटलेली डायरी आणि शेजारी ठेवलेले पेन स्पष्ट दिसत होते. ते पेन डायरीच्या उजव्या हाताला होते धवल!’ डोळे मिचकावत सारंग म्हणाला आणि धवल खदखदून हसत सारंगच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारायला उठला.
– प्रसाद ताम्हनकर
(लेखकाचे गुन्हेगारी कथालेखनावर प्रभुत्व आहे)