पावसाळा सुरू झालाय आणि हाच हंगाम आहे पावसाळी रानभाज्यांचा. शेकडो प्रकारच्या पावसाळी भाज्या या सुमारास येतात. शहरात कमी पण गावाकडे आणि त्यातही आदिवासी वस्ती जिथे आहे तिथे तर रग्गड! सध्या जागतिक अन्न-नकाशावर ‘स्थानिक खा’ हा विचार प्रबळ होत आहे. स्थानिक आणि मोसमातील अन्न खाणे कधीही हितावह असते.
पावसाळ्यात ज्या भाज्या येतात त्या चवदार असतात आणि औषधी गुणधर्म पण भरपूर असतात त्यांच्यात. पावसाळा हा एकूणच साथीच्या किंवा पाण्यातून होणार्या संसर्गजन्य विकारांचा काळ. योग्य आहार असेल तर त्यावर नैसर्गिकरित्या मात करता येते. मांसाहार करणारे असाल तर हे लक्षात घ्या की या सुमारास माश्यांच्या विणीचा हंगाम असतो, त्यामुळे मासे कमी प्रमाणात किंवा न खाणे गरजेचे असते. निसर्गाचा समतोल साधणे आवश्यक आहे.
मांसासाठी कापल्या जाणार्या प्राण्यांनी नवा चारा खाल्लेला असल्याने प्राण्यांचे मांस पचायला जड होऊ शकते. त्याकरता काही काळ शाकाहार उत्तम ठरतो आणि तेव्हाच या रानभाज्या आहारात असणे उपयुक्त होते.
इथे कंटोळी आणि फोडशी या दोन पावसाळी भाज्यांच्या कृती सांगणार आहे. दोन्ही अतिशय चवदार आणि बनवायला सोप्या भाज्या आहेत.
कंटोळी/ फागले भाजी
साहित्य :
कंटोळी- पाव किलो
कोवळी पाहून घ्यावी.
कांदा- १ मध्यम
हळद
लाल तिखट
मीठ
गूळ
ओले खोबरे.
कृती :
कंटोळी धुवून मधून चिरून घ्यावी. आतील जून बिया चमच्याने काढून टाकाव्यात. तेल तापवून राई, हिंगाची फोडणी करून त्यात कांदा लालसर करावा. आता चिरलेली भाजी, हळद, तिखट, गूळ, मीठ घालून ढवळून मंद आगीवर शिजवावी. शेवटी ओले खोबरे टाकावे.
यात आवडीप्रमाणे सुकी करंदी/ सोडे पण घालू शकता. मग गूळ वगळून कोकम चुरडून टाकावे.
किंचित तुरट अशी ही भाजी पोटाला उपकारक असते.
फोडशी भाजी
ही गवताप्रमाणे दिसते.
साहित्य :
फोडशी जुडी १
कांदे २ मध्यम
भिजवलेली चणा/मूग डाळ : अर्धी वाटी
हिरवी मिरची
लसूण पाकळ्या ४/५
ओले खोबरे थोडे
मीठ
गूळ
कृती :
भाजी सुटी करून, मुळाकडील जून पांढरा भाग काढून, पाण्यात थोडावेळ बुडवून ठेवावी. भाजीला आत माती चिकटलेली असते ती जाते.
चाळणीवर निथळून घ्यावी. कांदा आणि मिरची बारीक चिरावे. तेल तापवून, राई + हिंग + लसूण यांची फोडणी करून कांदा आणि मिरची घालून थोडा वेळ परतावे.
त्यात भिजवलेली डाळ घालून, झाकण ठेवून बोटचेपी शिजवून घ्यावी.
डाळ शिजेतो भाजी चिरून घ्यावी. फार बारीक चिरू नये, बुळबुळीत होते.
शिजलेल्या डाळीत भाजी + गूळ घालून, ढवळून झाकण ठेवून द्यावे.
पाच मिनिटांनी ओले खोबरे + मीठ घालून चरचरू द्यावी.
यापैकी कोणतीही भाजी आणि भाकरी हे जेवण फार समाधान देणारे आहे नक्की.
– शुभा प्रभू साटम
(लेखिकेचे पारंपरिक अन्न या विषयावर प्रभुत्व आहे.)