– शुभा प्रभू साटम
नावे वेगवेगळी पण पदार्थ एक. आंबट तिखट गोड आमटीत/डाळीत, बेसन कणीक याच्या कच्च्या पोळ्या/ पट्ट्या टाकून शिजवतात. उत्तर प्रदेशात त्यांना फुलाचा आकार असतो तर गुजराथमध्ये शेंगदाणे असतात. गाभा एकच. माझ्या दृष्टीने हा पदार्थ पूर्ण अन्न आहे. मेक्सिकन तोर्तिया सूप मिटक्या मारत खाणारे याला मात्र नाक मुरडतात. वास्तविक अतिशय स्वस्त आणि सोप्पं असे हे अन्न आहे. जसजसे पाहत जातो तसतसे पारंपरिक अन्न किती उत्तम असते हे पटू लागते. किती सुटसुटीत आणि पौष्टिक! कोकणात मात्र अभावाने आढळेल. बाकी देशावर, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा इथे वेगवेगळ्या नावाने केले जाते. गुजराथमध्ये हा पदार्थ थोडा आंबट आणि गुळमट असतो, वरून मनमुराद तूप घेतात. बिहार पूर्वांचल इथे वरून लसूण लाल मिरचीचा तडका देतात. जरा झणझणीत असते.
कसेही केले तरी चवदार!!! एका वाडग्यात पूर्ण जेवण. गुजराथ आणि महाराष्ट्राच्या काही भागात पिठात किंवा डाळीत मेथी/चुका/राजगिरा अशी पालेभाजी जाडसर चिरून घातली जाते. म्हणजे पोषण जास्त. इतके गुण असूनही अन्न नकाशावर ही आढळून येत नाही.अनेक भारतीय पारंपरिक पदार्थ स्वस्त आणि पोषण मूल्य असणारे आहेत. स्वस्त का? तर स्थानिक साहित्य असते आणि ऋतुमानानुसार ते पालटते. पूर्ण भारतभर असेच चालू होते, पण त्या नुडल्स, पीझ्झे, पाव, पास्ता आले आणि पारंपरिक पदार्थ मागे पडले. इथे पिझ्झा किंवा नुडल्स यांना कमी लेखायचे नाही, रूचीपालट म्हणून ठीक आहे, तथापि आपण ते किती खातो? आणि त्यावर किती पैसे खर्च होतात? याचा आढावा घेणे गरजेचे आहे. ही वरण फळे घ्या. यात काहीही महाग असे नाही. नेहमीचे साहित्य.. आणि पौष्टिक. उन्हाळा चालू झालाय, पाणी पाणी तहान तहान होते.. आणि साहजिक भूक मंदावते. अशावेळी ही वरण फळे मस्त पर्याय. वरून तूप घाला किंवा कोथिंबीर चव कायम असेल नक्की!
वरणफळे/ चकोल्या/ डाळ ढोकळी/दाल की दुल्हन/डाळ पीठी
कृती :
साहित्य: तुरीची डाळ -१ मध्यम वाटी, हळद घालून नरम शिजवून
कणीक बेसन/ज्वारी पीठ -२:१प्रमाण
चिंच/आमसूल
गूळ चवीनुसार
लाल तिखट
गोडा/ गरम मसाला/
धणे जिरे पूड.
शेंगदाणे पाव वाटी भिजवून आणि उकडून. मीठ
फोडणी साहित्य
कृती :
पिठात मीठ, तिखट, हळद, धणे जिरे पूड, हिंग घालून, तिंबून बाजूला झाकून ठेवायचे. शिजलेल्या डाळीत मीठ, गूळ, गोडा मसाला/तिखट/धणे जिरे पूड, चिंच/कोकम, उकडलेले शेंगदाणे घालून, थोडी जास्त सरसरीत करून मंद आगीवर उकळत ठेवायची (चकोल्या घातल्या की, नंतर डाळ घट्ट होते)
उकळी येतेय असे दिसले, की भिजवलेल्या पिठाच्या लांबट पट्ट्या कापून, अथवा फुलाचा आकार देवून, डाळीत सोडायच्या. सतत ढवळत राहायचे. पट्ट्या वर यायला लागल्या की, मीठ पाहून, वरून राई, लाल मिरच्या, हिंग, कडूलिंब यांची सणसणीत पळी फोडणी द्यायची. शेवटी कोथींबीर.
फोडणी तुपाची छान लागते, पण आवडीने ठरवायचे.
– शुभा प्रभू साटम
(लेखिकेचे ‘पारंपरिक अन्न’ या विषयावर प्रभुत्व आहे.)