– अभय मिश्र
भारत हा उत्सवप्रिय देश आहे. येथील सर्वच सण, उत्सव लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. प्रत्येक सणाबद्दल येथील लोकांच्या मनात वेगवेगळ्या भावना आहेत. जाती, धर्म वेगवेगळे असले तरीही सणांमध्ये सर्वजण एकत्र येतात. एकात्मतेचे ते प्रतीक म्हणून समोर येते. प्रत्येक सणात प्रत्येकजण आनंद आणि उत्साहात एकमेकांची भेट घेतो तेव्हा त्यातून सकारात्मक ऊर्जा पसरते. आपल्या सण आणि उत्सवांबद्दल सखोल विचार केला तर लक्षात येते की या सणांचा निसर्गाशी थेट संबंध आहे. कारण आपले बहुतेक सर्वच सण ऋतू बदलण्याच्या काळातच येतात. वेगवेगळे पर्व आणि सणांच्या तारखांचाही बारकाईने अभ्यास करता लक्षात येईल की हे सगळे सण एक ऋतू बदलून दुसरा ऋतू सुरू होण्याच्या दरम्यानच येत असतात. त्याच कालावधीत व्रत आणि उपवास करायला मान्यता आहे. आयुर्वेदातही ऋतू परिवर्तनाच्या काळात उपवास करण्याचा सल्ला दिला जातो. त्यासोबतच ऋतूनुसारच खाद्यपदार्थ आहारात ठेवले पाहिजेत यावरही आयुर्वेदाचा भर असतो. वास्तविक आपल्या ऋषीमुनींनी निसर्ग आणि मनुष्य यांच्यातील संबंधावर सखोल अभ्यास केला आहे. अशा ऋतू परिवर्तनाच्या काळातच होळी येते. आधी होलिका दहन आणि दुसर्याच दिवशी रंगोत्सव साजरा केला जातो. रंगपंचमीपर्यंत लोक सतत होळीचा सण साजरा करत असतात.
होलिका दहन
होलिका दहन हा एक संदेश आहे. होलिकाची कथा म्हणजे चांगल्याचा वाईटावर असलेला विजय आहे. भक्त प्रल्हाद, हिरण्यकश्पू आणि होलिका यांची कथा सर्वांनाच ठाऊक आहे. या कथेतील होलिका दहनाचा संदेश लक्षात घेण्याची आज गरज आहे. वास्तविक होलिकोत्सवात अग्नीला महत्त्व आहे. पापरूपी कलुषित होलिका हिची विचारधारा पवित्र अग्नीमध्ये जळून भस्म झाली आणि प्रल्हादरूपी भक्ती, शुद्धता बाकी राहिली. या पावित्र्याचे गुणगान आपण अनेक शतकांपासून करत आलो आहोत.
रंगांचा इतिहास
खरे तर रंगांची फक्त पाचच रूपे आहेत. त्यापासूनच अनेक रंग बनतात. मूळ रंग तीनच आहेत. लाल, निळा आणि पिवळा… यात सफेद आणि काळा रंगही योगदान देत असतात. दीडशे वर्षांपूर्वी पश्चिमेकडे झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे कापड उद्योगात वेगाने विकास झाला. त्यात रंगांची विक्री वाढली. नैसर्गिक रंग मर्यादित स्वरूपात उपलब्ध होते. त्यामुळे वाढलेली मागणी नैसर्गिक रंगांने पूर्ण करणे शक्य झाले नाही. अशा स्थितीत कृत्रिम रंगांचा शोध सुरू झाला. त्याच दिवसांत लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ केमिस्ट्रीमध्ये विल्यम पार्किसन एनिलीनपासून ‘क्विनाइन’ हे मलेरियाचे औषध बनवण्याच्या प्रयत्नात होते. अथक प्रयोग करूनही क्विनाइन औषध तर बनले नाही, पण वांगी कलर बनला. १८५६ साली तयार झालेल्या या कृत्रिम रंगाला ‘मोव’ म्हटले गेले. पुढे १८६० साली राणी कलर, १८६२ साली एनलोन निळा आणि एनलोन काळा, १८६५ साली बिस्माई राखाडी, १८८० साली सुती काळा असे रासायनिक रंग अस्तित्त्वात आले होते. सुरुवातीला हे रंग डांबरापासून बनवले जात होते. नंतर त्यांची निर्मिती आणखी काही रासायनिक पदार्थ वापरून होऊ लागली. जर्मन रसायनशास्त्रज्ञ एडॉल्फ फोन यांनी १८६५ साली कृत्रिम नीळ बनविण्याचे काम आपल्या हातात घेतले. अनेक अपयशे आणि कठोर मेहनतीनंतर १८८२ साली ते नीळ बनविण्याची संरचना बनवू शकले. त्याच्या पुढच्याच वर्षी रासायनिक नीळ बनवली जाऊ लागली. या महत्त्वपूर्ण कार्यासाठी बयलर साहेबांना १९०५ साली नोबेल पुरस्कारही मिळाला होता. कामराजजी नावाच्या एका फर्मने सर्वात आधी १८६७मध्ये राणी कलर (मजेंटा) आयात केला होता. १८७२ साली जर्मन विक्रेत्यांचा एक गट एलिजिरीन नावाचा रंग घेऊन येथे आले होते. नैसर्गिक रंगांपेक्षा रासायनिक रंग खूपच स्वस्त होते. याशिवाय त्यात तात्कालिक चमकदारपणाही खूप होता. ते सहज उपलब्धही होत होते. त्यामुळे आपल्या नैसर्गिक रंगांच्या परंपरेत कृत्रिम रंग सहजपणे वाढण्यात यशस्वी झाले.
रंगोत्सव
उत्तर भारतात रंगोत्सवाच्या पहिल्या दिवशी होलिकेचे दहन केले जाते. दुसर्या दिवशी, ज्याला प्रामुख्याने धुलेंडी, धुरड्डी, धुरखेल किंवा धुलिवंदन असेही म्हटले जाते. या दिवशी लोक एकमेकांवर रंग, अबीर-गुलाल वगैरे फेकून हा सण साजरा करतात. ढोल वाजवून होळीची गाणी गायली जातात आणि घरोघरी जाऊन लोकांना रंग लावला जातो. होळीच्या दिवशी कितीही जुनी कटुता असली तरी ती विसरून लोक एकमेकांना रंग लावतात. रंगांचा हा लोकप्रिय सण वसंताचा संदेशवाहक असतो. फाल्गुन महिन्यात साजरा होत असल्यामुळे या सणाला ‘फाल्गुनी’ असेही म्हटले जाते. होळीचा सण वसंत पंचमीपासूनच सुरू होतो. त्या दिवशी पहिल्यांदा गुलाल उडवला जातो. या दिवशी फाग, धमार अशी खास होळी गीतेही गायली जातात. होळीतील मुख्य खाद्यपदार्थ ‘गुझिया’ हा असतो. तो मावा आणि मैदा मिसळून बनवला जातो. या दिवशी कांजीचे वडे खाण्याचा आणि इतरांना खायला देण्याची रीत आहे. नवनवीन कपडे परिधान करून होळीच्या सायंकाळी लोक एकमेकांच्या घरी भेटायला जातात. तेथे त्यांचे स्वागत गुझिया, चटकदार पदार्थ आणि थंडाईने केले जाते.
साहित्यातील होळी
श्रीमद्भागवत महापुराणात रसांचा समूह असलेल्या ‘रास’चे वर्णन आहे. यातच इतर रचनांसोबतच ‘रंग’ नावाच्या उत्सवाचेही वर्णन आले आहे. यात हर्षच्या ‘प्रियदर्शिका’ व ‘रत्नावली’सोबतच कालिदासाच्या ‘कुमारसंभवम’ आणि ‘मालविकाग्निमित्रम’ यांचाही समावेश आहे. कालिदास रचित ‘ऋतुसंहार’मध्ये एक पूर्ण प्रकरणच ‘वसंतोत्सवा’ला अर्पण करण्यात आला आहे. भारवी, माघ आणि इतर अनेक संस्कृत कवींनी वसंतावर खूप चर्चा केली आहे. चंद बरदाई यांनी लिहिलेल्या ‘पृथ्वीराज’ या हिंदीतील पहिल्या महाकाव्यात होळीचे वर्णन आहे. भक्तिकाल आणि रीतीकाल या हिंदी साहित्यात होळी आणि फाल्गुन महिन्याचे विशिष्ट महत्त्व विषद केले आहे. आदिकालीन कवी विद्यापती यांच्यापासून भक्तिकालीन सूरदास, रहीम, रसखान, पद्माकर, जायसी, मीराबाई, कबीर ते रितीकालीन बिहारी, केशव, घनानंद वगैरे अनेक कवींनाही हा विषय प्रिय होता. महाकवी सूरदास यांनी वसंत आणि होळीवर ७८ पदे लिहिली आहेत. पद्माकर यांनीही होळीविषयक मुबलक रचना केल्या आहेत. राधा आणि कृष्णामध्ये खेळली गेलेली प्रेम आणि छेड़छाड़ याने भरलेल्या होळीच्या माध्यमातून सगुण साकार भक्तिमय प्रेम आणि निर्गुण निराकार भक्तिमय प्रेम दिसले होते. अमीर खुसरो आणि बहादूर शाह जफर यांच्यासारख्या मुस्लीम संप्रदायातील कवींनीही होळीवर सुंदर रचना केल्या आहेत, ज्या आजही सर्वसामान्य वाचकांना भावतात. आधुनिक हिंदी साहित्यात प्रेमचंद यांची ‘राजा हरदोल’, प्रभू जोशी यांची ‘अलग अलग तिलीयां’, तेजेंद्र शर्मा यांची ‘एक बार फिर होली’ आणि ओमप्रकाश अवस्थी यांची ‘होली मंगलमय हो’ या रचना प्रसिद्ध आहेत.
संगीत आणि होळी
काही लोक होळी गीतांना ‘फाग’ म्हणतात आणि होळीला ‘फगुआ’ म्हणतात. फगुआ म्हणजे फागुन, होळी. होळीच्या दिवशी परंपरा अशी आहे की, सकाळी सकाळी होळी खेळून, मग कपाळावर अबीर-गुलाल लावून घरोघरी जाऊन दरवाजावर फगुआ गायला जातो. भांगेच्या मस्तीमध्ये फगुआ गाणी बोलायला आणि ऐकायला खूपच चांगली वाटतात. त्याचा आनंद तेव्हा वेगळाच असतो. शास्त्रीय संगीतात धमारच्या होळीशी घट्ट नाते आहे. वास्तविक ध्रुपद, धमार, छोटे-मोठे ख्याल आणि ठुमरीमध्येही होळीच्या गीतांचे सौंदर्य पाहण्यालायक असते. कथक नृत्यासोबत होळी, धमार आणि ठुमरी यांच्यावर सादर केल्या जाणार्या अनेक रचना- उदा. ‘चलो गुंइयां आज खेलें होरी कन्हैया घर’ हे गाणे आजही प्रचंड लोकप्रिय आहे. ध्रुपदात गायली जाणारी आणखी एक बंदीश आहे ‘खेलत हरी संग सकल, रंग भरी होरी सखी’. भारतीय शास्त्रीय संगीतात काही रागही असे आहेत, ज्यांत होळीची गीते खास करून गायली जातात. वसंत, बहार, हिंडोल आणि आणखीही असे बरेच राग आहेत. होळीला गाणी गाणे, वाजवणे यामुळे आपोआप वातावरण तयार होते. लोकांवर त्यामुळे या गीतांचा रंग पसरतो. उपशास्त्रीय संगीतात चैती, दादरा आणि ठुमरीमध्येही अनेक प्रसिद्ध होळी गीते आहेत. होळीच्या प्रसंगी संगीताच्या लोकप्रियतेचा अंदाज एकाच गोष्टीवरून लावला जाऊ शकतो की, संगीतातील एका विशिष्ट शैलीचे नावच ‘होळी’ आहे. यात वेगवेगळ्या प्रांतांतील होळीची वेगवेगळी वर्णने ऐकायला मिळतात. यातच त्या त्या स्थानाचा इतिहास आणि त्याचे धार्मिक महत्त्वही लपलेले असते.
जोगीरा रा सा रा रा रा
होळी गीते हिंदीव्यतिरिक्त राजस्थानी, पहाडी, बिहारी, बंगाली अशा अनेक प्रदेशांमधील बोलींमध्येही गायली जातात. यात देवी-देवतांनी खेळलेल्या होळीसोबतच वेगवेगळ्या शहरांमध्ये लोकांनी खेळलेल्या होळीचे वर्णन असते. या देवी देवतांमध्ये राधा-कृष्ण, राम-सीता आणि शंकराने खेळलेल्या होळीचीही वर्णने मिळतात. याशिवाय होळीमधील वेगवेगळ्या प्रथांचे वर्णनही यात मिळते.
होळी गीतांमध्ये ‘जोगीरा’ गीताचे मोठे महत्त्व आहे. मूलत: हे समूहगान असते. प्रश्नोत्तर शैलीत एक समूह प्रश्न विचारतो, तर दुसरा त्याचे उत्तर देतो. हे उत्तर सहसा चकित करणारेच असते. जोगीराच्या गाण्यात समाजातील विडंबना आणि विद्रूपता दिसते. होळीच्या मौजमजेबरोबरच ही गाणी आसपासच्या समाजावर प्रहार करताना दिसतात.
उदाहरणच घ्यायचे तर…
काहे खातिर राजा रूसे काहे खातिर रानी।
काहे खातिर बकुला रूसे कइलें ढबरी पानी।।
जोगीरा रा सा रा रा रा…
राज खातिर राजा रूसे सेज खातिर रानी।
मछरी खातिर बकुला रूसे कइलें ढबरी पानी।।
जोगीरा रा सा रा रा रा…
दुसरीकडे, प्रभू श्रीराम आणि त्यांच्या भावंडांवरील एक गीत खूपच प्रसिद्ध आहे…
होली खेलैं रघुबीरा अवध में,
होली खेलैं रघुबीरा।
केकरे हाथे ढोलक भल सोहै,
केकरे हाथे मजीरा।।
राम के हाथे ढोलक भल सोहै,
लछिमन हाथे मजीरा।
केकरे हाथे कनक पिचकारी,
केकरे हाथे अबीरा।।
भरत के हाथे कनक पिचकारी,
शत्रुघ्न हाथे अबीरा।
होली खेलैं रघुबीरा अवध में,
होली खेलैं रघुबीरा।।
भक्तिकालीन कवींची होळी गीते
भक्तिकालीन कवींमध्ये सूरदास, रहीम, रसखान, पद्माकर, जायसी, मीराबाई, कबीर आणि रितीकालीन कवी बिहारी, केशव वगैरेंनीही होळी गीते लिहिली आहेत. (एकट्या सूरदास यांनीच वसंत आणि होळीवर ७५हून अधिक रचना केल्या आहेत.) या कवींच्या रचनांमध्ये श्रृंगार रसापासून सगुण आणि निर्गुण भक्तिमय रचनांपर्यंत असंख्य होळ्या पाहायला मिळतात. पद्माकर यांची एक लोकप्रिय रचना आहे…
फाग के भीर अभीरन में गहि गोविन्दै लै गई भारतर गोरी।
भाई करी मन की ‘पद्माकर’ ऊपर नाई अबीर की झोरी।
छीन पिताम्बर कम्मर ते सु बिदा दई मीड़ कपालन रोरी।
नैन नचाइ, कही मुसकाइ लला फिरी अइयो खेलन होरी।।
बरसण्याची होळी
होळीमध्ये बरसण्याची होळी सर्वात प्रसिद्ध मानली जाते. ब्रजमध्ये होळीच्या सणाची धूम वसंत पंचमीपासून सुरू होते. वसंत पंचमीच्या दिवसापासूनच होळीच्या सणाला खरी सुरुवात होते. त्यानंतर महाशिवरात्रीला श्रीजी मंदिरात राधारानीला ५६ नैवेद्य ठेवले जातात. अष्टमीच्या दिवशी नंदगावात होळीचे निमंत्रण दिले जाते. त्यानंतर नवमी या तिथीला होळीचा जल्लोष सुरू होतो. सगळीकडे वातावरण रंगांनी भरलेले होऊन जाते. नंदगावात पुरुष नाचत-गात बरसण्यासाठी पोहोचतात. सर्वप्रथम हे लोक पिली पोखर येथे पोहोचतात. हा त्यांचा पहिला थांबा असतो. त्यानंतर सर्वजण राधाराणीच्या मंदिरात दर्शनासाठी जातात. मग रंगीला चौकात लठ्ठमार होळीला सुरुवात होते. दशमी तिथीला नंदगावात अशाच प्रकारे होळी खेळली जाते. रंगांच्या उत्सवात सर्वजण बुडून जातात.
(लेखक ‘दोपहर का सामना’चे मुख्य उपसंपादक आहेत)
(अनुवाद : नितीन फणसे)