मुंबई दूरदर्शन-सह्याद्री वाहिनीचे माजी ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक विनायक चासकर तथा `भाऊ’ यांचं दु:खद निधन झाल्याची ती बातमी वाचून नि:शब्द, नि:स्तब्ध झालो. एका पर्वाची अखेर झाली होती. `अफाटभाऊं’ची ही अकस्मात झालेली एक्झिट चटका लावून गेली. पस्तीस-चाळीस वर्षांच्या घट्ट अतूट नातेसंबंधांचा एक हळुवार पण घट्ट धागा तुटला होता.
२ ऑक्टोबर १९७२ रोजी मुंबई दूरदर्शनची मुहूर्तमेढ झाली. स्थापनेपासूनच केशव केळकर, सुहासिनी मुळगावकर, डॉ. विश्वास मेहेंदळे, विजया जोगळेकर, सुधा चोप्रा, विनय धुमाळे, आकाशानंद, विरेंद्र शर्मा, अरुण काकतकर, विनय आपटे, शिवाजी फुलसुंदर, डॉ. किरण चित्रे, याकुब सईद आणि अशाच प्रगल्भ, प्रतिभावंत, गुणसंपन्न अशा सृजनशील कर्तबगार मंडळींनी मुंबई दूरदर्शन उभं केलं… घडवलं… महाराष्ट्रातल्या गावखेड्यात पोहोचवलं… याच कर्तबगार, कर्तृत्त्ववान, परिपक्व मंडळीमधले एक नाव म्हणजे विनायक चासकर, उर्फ सर्वप्रिय, अजातशत्रू, गुरुवर्य `भाऊ’ होय…
घरोघरी पोहोचलेल्या आकाशवाणीनंतर ब्लॅक अॅण्ड हाइट मुंबई दूरदर्शनचं आगमन झालं आणि उभा-आडवा महाराष्ट्र मुंबई दूरदर्शनमय झाला…
आज नाटक, चित्रपट, आकाशवाणी, मालिका अशा फोफावलेल्या माध्यमांमध्ये काम मिळवणं, कामाची संधी मिळवणं त्यामानानं अवघड राहिलेलं नाही, मात्र तीस-चाळीस वर्षांपूर्वी दूरदर्शन वा आकाशवाणीचा दरवाजा आपल्यासाठी उघडणं हे माझ्यासारख्या अनेक नवोदित स्ट्रगलर्सना तेवढं सोप्पं नव्हतं.
दूरदर्शनच्या दरवाज्यातून चंचुप्रवेश मला मिळाला होता, ते ‘ज्ञानदीप’, ‘किलबिल’ अशा कार्यक्रमात अभिनेता, दिग्दर्शक म्हणून काम करण्याकरिता…
१९८२मध्ये सुप्रसिद्ध कादंबरीकार गो. नी. दांडेकर यांच्या ‘आनंदवनभुवनी’ या बाबा आमटे यांच्या जीवनावरील ‘विधिलिखित’ या कादंबरीचं नाट्यरूपांतर राजीव जोशीनं केलं होतं आणि मी पहिल्यांदाच पूर्ण लांबीचे नाटक दिग्दर्शित करत होतो (त्यापूर्वी अनेक एकांकिकांचं दिग्दर्शन केले होते) राज्य नाट्य स्पर्धेकरिता…
‘कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनावस्था’ नाटकाची रंगभूषा (मेकअप) ही एक महत्त्वाची व्यक्तिरेखाच होती. त्यासाठी तेव्हाचे तज्ज्ञ, ज्येष्ठ, अभ्यासू, अनुभवी रंगभूषाकार अशोक पांगमसारखा मोठा माणूस आम्हाला लाभला होता. गोवा हिंदू असोसिएशनसारख्या मोठ्या संस्थेकरिता पांगम काम करत होते तेव्हा…
‘विधिलिखित’ नाटकामुळे अशोक पांगम आणि अशोक पांगम यांच्यामुळे विजया मेहता, स्मृतिचित्रे आणि विनायक चासकर माझ्या छोट्या विश्वात आले, माझं अवघं भाग्य-आयुष्यच उजळून गेलं…
मुंबई दूरदर्शननं लक्ष्मीबाई टिळक यांच्या स्मृतिचित्रे या आत्मकथनावर आधारित पहिल्या पूर्ण लांबीच्या चित्रपटाच्या निर्मितीची तयारी सुरू केली होती. प्रख्यात अभिनेत्री आणि मराठी प्रायोगिक-व्यावसायिक रंगभूमीला आपल्या सिद्धहस्त दिग्दर्शनाने वेगळे परिमाण मिळवून देणार्या श्रेष्ठतम दिग्दर्शिका विजया मेहता या ‘स्मृतिचित्रे’चे दिग्दर्शन करत होत्या आणि विनायक चासकर ‘स्मृतिचित्रे’ या चित्रपटाचे निर्माते होते. ज्येष्ठ गायक रवींद्र साठे ध्वनीमुद्रक होते. तर अशोक पांगम यांनी मला थेट विजयाबाई आणि विनायक चासकर यांच्यासमोर हजर केलं आणि माझा समावेश निर्मिती सहाय्यक म्हणून ‘स्मृतिचित्रे’च्या टीममध्ये झाला तोही माधव पटवर्धन यांच्या हाताखाली… ‘स्मृतिचित्रे’चे कलादिग्दर्शक अमृतपाल, केशव खंडेलवाल, शशिकांत कुलकर्णी होते. ‘स्मृतिचित्रे’साठी काम करणं म्हणजे खरोखरच खूप काही शिकण्याचा, टिपण्याचा महत्त्वपूर्ण अनुभव होता, पण त्याचसोबत विनायक चासकर नावाच्या एका ज्ञानी, प्रगल्भ, परिपक्व, जबरदस्त आकलनशक्ती असलेल्या विद्यापीठात प्रवेश मिळणं म्हणजे माझं नशीबच होतं.
माझ्या प्रसिद्ध झालेल्या काही कथा मी चासकर भाऊंना वाचायला दिल्या आणि हट्टच धरला की, मला एक तरी लघुनाटक लिहिण्याची संधी द्या! त्यावर ‘बघतो रे…’ असं भाऊ नेहमी म्हणायचे… विषय थांबायचा…
असेच काही महिने गेले… आपला नंबर काही येणार नाही, दूरदर्शनवर नाटक लिहायची संधी मिळणार नाही हे माझ्या मनात पक्कं झालं…
त्यानंतर काही महिन्यांनी सहज म्हणून (स्ट्रगल करायला म्हणून) मी दूरदर्शन वरळीला गेलो. भाऊ त्यांच्या रूममध्ये नव्हते… बाकीचेही नव्हते… रुमच्या बाहेर काही वेळ नुसता उभा राहून मी जायला वळणार तोच साक्षात भाऊ समोर हजर झाले आणि मला बघून ‘अरे तुझ्या लोकप्रभेतल्या कथेवर नाटक करायचंय, लिहून दे बघू पटकन् … ती बेभान कथा खूप आवडलीय मला… लवकर घेऊन ये…’ भाऊंच्या या वाक्यानं मी अक्षरश: तरंगत तरंगतच घरी गेलो… आणि घाईघाईत मी माझ्या कुवतीनं ‘बेभान’चं स्क्रिप्ट लिहिलं…
आणि त्यानंतर विनायक चासकर-भाऊ यांच्या रूपानं मला गुरू लाभले. रंगमंच, आकाशवाणी, चित्रपट, मालिका आणि दूरदर्शनसाठी कसं लिहायचं, या सगळ्या माध्यमात लेखक म्हणून वावरताना काय भान राखावं, पटकथा कशी रचायची, संवाद मोजके, नेमके, बोली भाषेतले कसे लिहायचे हे सगळं सगळं समोर बसवून अत्यंत प्रेमानं, आपुलकीनं (आणि हे एकही शिवी न घालता) शिकवलं.
`प्रत्येक व्यक्तिरेखेचा स्वभाव, शिक्षण, विचार करण्याची पद्धत, कामाचे स्वरूप, प्रोफेशन, वय, वातावरण हे सगळं ध्यानात ठेवून त्या व्यक्ितरेखेत स्वत:ला बघून साधे, सोप्पे, नेमके, परिणामकारक, अलंकारित नसलेले, बोजडपणा नसलेले संवाद लिहिशील तरच तुला प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येईल.’ भाऊंची दिलेली ही शिकवण ही शिदोरी आजपर्यंत मला लिहितं करतेय…
लघुनाटकं लिहिणार्यांमध्ये ज्येष्ठ कथाकार, नाटककार, व. पु. काळे, शं. ना. नवरे, सुरेश खरे, रमेश चौधरी अशा अनेकांचे योगदान मोलाचे, त्यात शं. ना. नवरे यांची सर्वांत जास्त लघुनाटकं तेव्हा झाली… नऊ नाटकं तर माझ्यासारख्या तुलनेन नवोदित लेखकाची आठ नाटकं झाली. माझ्यासारखा भाग्यवान मीच.
१) ‘बेफाम’ (रीमा, विवेक लागू, मोहन कोठीवान) २) ‘मिसेस प्रधान निष्पाप आहेत का?’ (विक्रम गोखले, मंगला पटवर्धन, मृणाल देव) ३) ‘गँगरीन’ (सुजाता भिडे, इर्शाद हाश्मी, अविनाश खर्शीकर) ही तीन नाटकं भाऊंनी अक्षरश: लिहून घेतली आणि माझं नाव सर्वत्र पोहोचवले. भाऊ आणि माझ्यातलं गुरु – शिष्यातलं नातं दिवसागणिक बहरत गेलं आणि भाऊ नव्हे अफाट भाऊंची ओळख हळूहळू होत गेली. तेव्हा जाणवलं वरवर दिसणारे भाऊ हे हिमनगाच्या वरून दिसणार्या टोकासारखे तर अफाट भाऊ हे वरून न दिसणारे, पण पार अथांग तळापर्यंत पोहोचलेले होते.
विनायक चासकर हे मूळचे इंदौरचे. त्याचा वागण्या-बोलण्यातली मधुरता, मिठास, लाजबाब. भाऊ मला तर कोकणातल्या फणसासारखेच नेहमी वाटले. वाटायचे. बाहेरून काटेरी आतून रसाळ गोड.
भाऊ हे इंग्रजी, फिलॉसॉफी, सोशयॉलॉजी घेऊन पदवीधर झाले. त्यानंतर भाऊ आणि त्यांच्या पत्नी ज्या उत्तम अभिनेत्री होत्या. कुमुदताई चासकर हे दोघे दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये महागुरु अल्काझी सरांच्या तालमीत प्रशिक्षण घ्यायला गेले. त्यावेळेस सई परांजपे त्यांना एक वर्ष ज्युनियर होत्या.
तिथं नाटकातील सर्वांगांचे म्हणजे सेट, लाईटस, अभिनय, दिग्दर्शन, प्रॉडक्शन, कॉश्च्यूम आदीचे त्यांनी तनमनधन अर्पून शिक्षण घेतले. वेस्ट जर्मनी, मंडी हाऊस दिल्ली, फ्रान्स, कॅनडा, मद्रास, पुणे अशा अनेक ठिकाणी भाऊंनी वेळोवेळी ट्रेनिंग घेऊन आपल्या गुणवत्तेला, ज्ञानाला धारदार केले. स्वत:ला घडवले, परिपक्व केलं.
दिल्लीहून करिअर करण्यासाठी भाऊ आणि कुमुदताई मुंबईत आले. कुमुदताईंनी व्यावसायिक नाटकात अभिनय केला तर भाऊ…
त्या काळातले ज्येष्ठ-श्रेष्ठ छायाचित्रकार प्रभाकर निकळंकर यांनी भाऊमधल्या धडपड, मेहनती, हुशार प्रामाणिक, जिद्दी आणि कल्पक ‘बहुआयामी’ कलाकाराला ओळखले आणि त्यांनी भाऊंना हिंदी चित्रपटसृष्टीतील कॉमेडीचा बादशहा, दिग्दर्शक, निर्माता `मेहमूद’ यांना भेटवलं. आणि मेहमूदने अल्काझी सरांच्या या शिष्याला भाऊंना आपल्या दिग्दर्शक म्हणून आपल्या चित्रपटासाठी १९७४मध्ये आलेल्या ‘कुंवारा बाप’साठी आर्ट डिरेक्टर म्हणून पहिल्यांदा संधी दिली. त्यानंतर भाऊंनी आपल्या कर्तबगारीवर ‘सबसे बडा रुपय्या’, ‘जिनी और जानी’ या चित्रपटांसाठी आर्ट डिरेक्टर म्हणून काम केले होतं.
भाऊ हे उत्तम शीळ वायवायचे. सई परांपजे यांच्या ‘चष्मेबद्दूर’साठी भाऊंनी शीळवादन मोठ्या उत्साहात केलं होतं. मुंबई दूरदर्शनमधल्या १६ वर्षांच्या कारकिर्दीत भाऊंनी केलेल्या कामगिरीची झलक जरी बघितली तरी चकित व्हायला होते. एकूण १४० नाटकांची निर्मिती-दिग्दर्शन ९६ मनोरंजनाचे कार्यक्रम, दोन वर्ष स्पोर्टस, ३२ टेस्ट मॅचेस व वनडे मॅचेस त्यांनी कव्हर केल्या होत्या, तर मोटोक्रॉस, टेनिस मॅचेस, ब्रिटीश रॉयल बॅले, नॅशनल खो-खो, कबड्डी मॅचेस, एशियाडमधल्या स्वीमिंग मॅचेस… त्यांनी कव्हर केल्या होत्या.
त्याचबरोबर इंदिरा गांधी, व्ही. शांताराम, वसंत देसाई, मंगेश देसाई, मा. विनायक, गुरुदत्त, मा. दत्ताराम, एस. एस. वासू अशा महान व्यक्तिमत्त्वांच्या जीवनप्रवासाचा वेध घेणारे अनुबोधपट त्यांनी निर्मिती करून दिग्दर्शित केले होते. भाऊंना स्मृतिचित्रेच्या निर्मितीकरिता राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तर ‘आश्रित’ या त्यांच्या लघुनाटकास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
दूरदर्शनमधली भाऊंची रूम म्हणजे मान्यवरांसह नवोदितांचे हक्काचे स्थान… अनेक प्रकल्प, उपक्रम, कार्यक्रम भाऊंनी केले तेव्हा त्यांना मीना गोखले, विलास वंजारी, शुभदा रेगे, श्रीकला हट्टंगडी यांच्यासारख्ये जीवाला जीव देणारे, गुणी साथीदार लाभले होते. मुंबई दूरदर्शनला लोकांच्या घरात-मनात नेऊन पोहोचवण्यात भाऊंसारख्या झपाटलेल्या सर्वांचाच वाटा होता. अनेक लोकप्रिय कार्यक्रमातला एक म्हणजे ‘गजरा’ हा कार्यक्रम होता. एखादा ज्वलंत विषय, पाणी, महागाई, कागदटंचाई त्यावर विनोदी, मर्मभेदी शैलीत त्यात भाष्य केलं जायचं. सुरेश खरे, व. पु. काळे, दिलीप प्रभावळकर, दया डोंगरे, लक्ष्मीकांत बेर्डे अशा नामवंताचा सहभाग हे ‘गजरा’ सदोदित ताजा टवटवीत राहण्याचं एक कारणं होतं. दूरदर्शन, ‘गजरा’ आणि भाऊ हे सर्वात लोकप्रियता लाभलेलं. यशस्वी समीकरण लोकांच्या आजही स्मरणात आहे.
१६ वर्षाच्या मुंबई दूरदर्शनवरच्या कारकिर्दीत भाऊंनी असंख्य माणसं जोडली, घडवली, उभी केली. भक्ती बर्वे, मोहन तोंडवळकर आणि कमलाकर सारंग म्हणजे भाऊंचे जिवलगच. सारंग, भक्ती आणि कुमुदताई हे तिघेच भाऊंना बोलू शकत होते. त्यांच्यासमोर भाऊ काहीच बोलायचे नाहीत. सारंग आणि भाऊ म्हणजे घट्ट मैत्रीचा दुर्मिळ नमुनाच. कलावैभवच्या मोहन तोंडवळकरांसाठी भाऊंनी जयवंत दळवीचं ‘मुक्ता’ हे नाटक दिग्दर्शित केलं होतं. दूरदर्शन सोडल्यावरही भाऊ नव्या उमेदीनं, जोमात काम करत होते. ‘कमांडर’, ‘अघोरी’, ‘फिलिप्स टॉप-१०’, ‘तिसरा डोळा’, ‘मिसळ’ अशा त्यांच्या मालिका खाजगी वाहिन्यांवर गाजल्या होत्या.
आपल्या कामावर अपार प्रेम, श्रद्धा आणि त्यासाठी प्रचंड मेहनत कष्ट करण्याची तयारी, माध्यमावर मजबूत पकड, तीक्ष्ण निरीक्षण आकलनशक्ती, अफाट बुद्धिमत्ता कमालीचा आत्मविश्वास म्हणजे विनायक चासकर म्हणजेच भाऊ होय. लांबलचक केस, गळ्यात माळा, शर्टाची बटणं उघडी ही भाऊंची ओळख… उत्साहाचा वाहणारा अखंड धबधबा आणि सदैव वेगळ्या कल्पनांचा पाठलाग करण्यासाठी तयार म्हणजेच अफाट भाऊ होय.
(या लेखासाठी श्रीकला हट्टंगडी, जितेंद्र चासकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.)