जानेवारीत कोरोनाचा प्रकोप बराच कमी झाल्यावर पुन्हा सगळं सुरळीत होतंय असं वाटलं होतं. पण मार्च महिन्यात कोरोनाने पुन्हा आपले दाहक आणि जळजळीत रूप दाखवायला सुरुवात केल्यावर या वर्षाच्याही सर्व सणांच्या उत्साहावर विरजण पडणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. याचा पहिलाच फटका यंदाच्या होळीला बसला आहे. होळीची तयारीही यामुळे करता आलेली नाही. बिग बींच्या जलसा बंगल्यावर दरवर्षी होणारी रंगारंग होळी गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही रद्द करण्यात आली आहे. एकीकडे कोरोना संकटाची भीती असतानाच यंदाची होळी बॉलीवूडमधल्या काही नवदांपत्याची पहिलीच होळी ठरणार आहे.
वरुण धवन, नताशा दलाल
अभिनेता वरुण धवन याने याच वर्षी आपल्या बालपणीची मैत्रीण नताशा दलाल हिच्यासोबत लग्नाचे सात फेरे घेतले आहेत. त्यांच्या लग्नातही सरकारी नियमावलीनुसार मोजकेच पाहुणे हजर होते. त्याने आपल्या लग्नाला खूपच कमी लोकांना निमंत्रण दिले होते म्हणे. अर्थात तरीही सोशल माध्यमांवर त्याच्या लग्नाची धूम चाहत्यांनी मनसोक्त एन्जॉय केलीच. लोकांनी नवीन जोडप्याला भरभरून आशीर्वाद दिले. लग्नानंतर वरुण धवन आणि नताशा दलाल यांची ही पहिलीच होळी आहे बरं का…
काजल अग्रवाल, गौतम किचलू
अभिनेत्री काजल अग्रवाल ही केवळ दक्षिणेतल्या चित्रपटांमुळेच नव्हे, तर बॉलीवूडमध्येही लोकप्रिय आहे. असंख्य चाहत्यांची मनं मोडून काजलने 30 ऑक्टोबरला प्रियकर गौतम किचलू याच्याशी हात पिले केले आहेत. या दोघांचा लग्नसोहळा मुंबईतल्याच ताज हॉटेलमध्ये निवडक नातलग आणि मित्र मंडळींच्या उपस्थितीत पार पडला होता. मंडळी, आपल्यासारख्या सामान्य लोकांना त्या लग्नाला हजर राहता आले नसले तरी नंतर या लग्नाचे फोटो वेगवेगळ्या सोशल माध्यमांवर वायरल झालेच होते. काजल आणि गौतम यंदा आपली पहिलीच होळी साजरी करणार आहेत.
नेहा कक्कड, रोहनप्रीत सिंह
लग्नानंतर पहिला दिवाळसण जेवढा महत्त्वाचा असतो, तेवढाच होळीचाही सण बॉलीवूडकरांसाठी अगत्याचा असतो. ते या सणाचीही वाट पाहात असतात. प्रसिद्ध पार्श्वगायिका नेहा कक्कड हीदेखील याला कशी अपवाद ठरेल? तिने गेल्या 24 ऑक्टोबरला आपला मित्र रोहनप्रीत सिंह याच्याशी दिल्लीत दोनाचे चार हात केले आहेत. बॉलीवूडमधल्या अनेक चर्चित लग्नसोहळ्यांतच नेहा कक्कडचाही एक सोहळा होता. मुळातच नेहा आणि रोहन सोशल माध्यमांवर भलतेच सक्रीय असतात. दररोज ते आपला फोटो इन्स्टाग्रामवर टाकतच असतात. त्यात लग्न म्हटल्यावर तर ते पिसाटलेच होते. लग्नाच्या दिवसांत ते सतत वेगवेगळ्या अँगलने काढलेले आपले फोटो टाकत राहिलेले तुम्ही पाहिलेच असेल. यंदाची होळी तर लग्नानंतरची त्यांची पहिलीच होळी आहे. या दिवसांतही ते उत्साहात फोटो टाकणारच… कोरोना गेला चुलीत म्हणतील.
राणा दग्गुबाती, मिहिका बजाज
केवळ ‘बाहुबली’ चित्रपटामुळेच नव्हे, तर साऊथच्या अनेक चित्रपटांमुळे लोकप्रिय असलेला दणकट अभिनेता राणा दग्गुबाती याने गेल्याच ऑगस्ट महिन्यात मिहिका बजाज हिच्यासोबत लग्न करून चाहत्यांना चकीत केलं होतं. त्याच्या या लग्नाबद्दल कुणालाच कल्पना नव्हती. दोघांची लग्नाच्या पेहरावातील छायाचित्रे सोशल माध्यमांवर प्रसिद्ध झाली तेव्हा लोकांना ही बातमी कळली. यामुळे या दोघांचे फोटो खूपच वायरल झाले होते. या जोडप्याचाही होळीचा हा पहिलाच सण आहे. ते हा सण कसा साजरा करतात ते पाहायचे.
हरमन बावेजा, साशा रामचंदानी
बॉलीवूड अभिनेता हरमन बावेजा यानेही याच वर्षभरात साशा रामचंदानी हिच्यासोबत लग्नाचे बंधन बांधून घेतले आहे. त्यांच्या लग्नाची छायाचित्रेही सोशल माध्यमांवर खूप वायरल झाली होती. त्याचा मित्र राज कुंद्रा याने या लग्नानिमित्त काढलेला व्हिडीओ सोशल मीडियावर नुकताच पोस्ट केला होता. हा व्हिडीओही लोकांना खूप आवडला होता हे लोकांच्या प्रचंड पोस्ट्सवरून कळलेच आहे. लग्नानंतर हरमन आणि साशा यांची ही पहिलीच होळी आहे.
निहारिका कोनिडेला, चैतन्य जेवी
साऊथच्या चित्रपटांमधली प्रसिद्ध अभिनेत्री निहारिका कोनिडेला हिने चारेक महिन्यांपूर्वी 9 डिसेंबर रोजी लग्न केले. त्याआधी त्यांच्या उससे प्री वेडिंग सेरेमनीचे फोटोही सोशल मीडियावर भलतेच वायरल झाले होते. निहारिकाने बिझनेसमन चैतन्य जेवी याच्याशी लग्नगाठ बांधत सात फेरे घेतले आहेत. त्यांच्या लग्नाचे विधी राजस्थानच्या उदयपुर येथे पार पडले होते. निहारिका कोनिडेला खूप काळापासून चैतन्य जेवीला डेट करत होती. लग्नानंतर त्यांचा हा पहिलाच होळी सण आहे.