`माझ्याइतका कडवा प्रयत्नवादी, खटपट्या आणि धडपड्या माझा मीच, असे गर्वाने नव्हे, पण आत्मविश्वासाने म्हणतो. आत्मविश्वास हेच माझ्या जीवनाचे भांडवल आहे. त्याच्याच जोरावर मला शक्य ते मी आजवर केले आहे आणि पुढे आमरण करीन. स्वाध्याय, उद्योग आणि आशावाद या त्रयीच्या जोरावरच मी आपले वर्तमान अस्तित्व कमावलेले आहे.`
– प्रबोधनकार ठाकरे, `शनिमहात्म्य`
१८४५ जे. जे. हॉस्पिटल सुरू. १८५१ पहिली कापडगिरणी. १८५३ देशातली पहिली रेल्वे. १८५७ मुंबई विद्यापीठ. १८६२ मुंबईचा किल्ला पाडला. १८६२लाच मुंबई हायकोर्ट. १८६५ मुंबई नगरपालिका. १८६७ प्रार्थना समाजाची स्थापना. १८६९ सुएज कालव्यामुळे जगाशी जोडणी. १८७४मध्ये पहिली ट्राम. १८७५ मुंबई शेयर बाजाराची सुरूवात. १८७९ कॅपिटल थिएटर सुरू. १८८५ राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. १८९२ बॉम्बे प्रेसिडन्सी क्रिकेट सिरीज सुरू.
एकोणिसाव्या शतकात मुंबई आकार घेत होती. शतक संपेपर्यंत मुंबई भारतातलंच नाही तर जगातलं एक मोठं आणि महत्त्वाचं शहर बनली होती. देशाच्या आणि जगाच्या कानाकोपर्यातली महात्त्वाकांक्षी माणसं मुंबईकडे ओढली जात होती. मुंबईच्या जुन्या किल्ल्यात म्हणजे फोर्टमध्ये जगभरातल्या कंपन्यांची ऑफिसं थाटली गेली. बंदरांच्या दिशेने ओळीत बाजारपेठा सजत गेल्या. त्या सगळ्यांना लागणार्या कारकुनांसाठी गिरगाव वसलं. प्रबोधनकार मुंबईत रुजण्यासाठी आले, तेव्हा गिरगाव नव्या पांढरपेशा मराठी संस्कृतीचं केंद्र बनलेलं होतं. साल १९०४ किंवा १९०५ असावं.
त्याआधीही देवासवरून परतल्यानंतर ते काही महिने गिरगावात राहिले होते. आताचा मुक्काम आधीपेक्षाही जास्त होता. पनवेलहून मुंबईला येण्याचं कारण प्रबोधनकार सांगतात, `आमच्या परीक्षेचा `निकाल’ लागल्यावर कुटुंब पोषणासाठी काहीतरी धडपड करणे आवश्यक होते. नोकरी मिळाली नाही, तरी माझ्यापाशी हुन्नरबाजी होती आणि पनवेलसारख्या चिमुकल्या खेडेगाववजा ठिकाणी तिचा फारसा विकास होणे शक्यच नव्हते. सबब आम्हा दोघा बंधूंनी मुंबईच्या विशाल क्षेत्रात पुन्हा प्रयाण केले.’
मॅट्रिक होण्याची शक्यता संपलेली. वडिलांचं छत्र हरपलेलं. आजोबांची सव्वासात रुपये पेन्शन. मुंबईला जाणं भाग होतं. गिरगावातल्या मुख्य रस्त्यावरचं झावबाचं राममंदिर आणि त्याच्यामागे उभ्या असलेल्या झावबावाडीतल्या चाळी. ते आधी राहायला होते ती धसवाडीही झावबावाडीलाच लागून होती. तेव्हा गिरगावातल्या चाळीत प्रबोधनकारांसारखे अविवाहित राहत. पण त्याहीपेक्षा जास्त संख्येने कुटुंब गावी ठेवून इथे एकट्याने राहणारेच जास्त. या सडाफटिंगांची कुटुंब मुंबईत आणण्याची आर्थिक क्षमता होई, तेव्हा ते वेगळं बिर्हाड थाटत. असाच एक रघुनाथ खोपकर म्हणून वल्ली त्यांचा मित्र होता. तो ट्राम कंपनीत ट्राफिक इन्स्पेक्टर होता.
त्याच्याबरोबर भागीदारी करून प्रबोधनकारांनी झावबावाडीतल्या एका नव्या चाळीत खोली भाड्याने घेतली. त्या चाळीचं नाव त्यांनी कृष्णाबाई बिल्डिंग असं लिहून ठेवलंय. पण त्या नावाची चाळ झावबावाडीत कुणाला ठाऊक नाही. गिरगावात एक कृष्णाबाई बिल्डिंग आहे, पण ती झावबावाडीपासून लांब आहे. त्यामुळे प्रबोधनकारांनी सांगितलेली झावबावाडीतलीच चाळ शोधायची तर लक्ष्मीबाई बिल्डिंगपाशी जावं लागतं. तिथेच ते राहायला असावेत. या मुक्कामाचं वर्णन प्रबोधनकारांनी अगदी तपशीलात केलंय. ते माझी जीवनगाथामध्ये मुळातून वाचण्यासारखं आहे. त्यातून विसाव्या शतकातल्या पहिल्या दशकात मुंबईकर कसे जगायचे, याचं जिवंत चित्र उभं राहतं.
प्रबोधनकार, त्यांचे भाऊ यशवंतराव आणि खोपकरांसारखे त्यांच्या शब्दांत `सडेसोट बजरंग’ भाड्याने राहत असल्याचं कळल्यावर ती खोली सार्वजनिकच बनत असे. त्यांच्यासारखेच इतरही बजरंग ओळखी काढून गोळा होत. प्रबोधनकार सांगतात तसे थोड्याच दिवसांत त्यांची खोली नरपागा बनली. पनवेल, पेण, उरण या गावांमधून नाटकांचे शौकीन दर शनिवारी संध्याकाळी हमखास येत. रात्री किर्लोस्करसारख्या नाटक कंपन्यांची संगीत नाटकं बघत. सकाळी खरेदी करत. त्यात भुलेश्वरचे लाल दखनी जोडे आवर्जून असत. मग जाताना जुन्या चपला त्यांच्या खोलीवर सोडून जात. त्यामुळे ही खोली `फाटक्या तुटक्या पादत्राणांचा अजायबखाना` बनली होती.
`केशवराव ठाकरे इथंच राहतात ना?’ असं विचारत दर पंधरवड्याला एखादा तरुण ट्रंक वळकटी घेऊन दरवाजावर उभा असायचा. त्याच्यासोबत प्रबोधनकारांच्या नावाने एक चिठ्ठी असायची. त्यातला मजकूर साधारण असा असायचा, `चिरंजीव रघुवीर उर्फ बज्या याला तेथे धाडले आहे. आपण मुंबईचे माहितगार. सबब पूर्व ऋणानुबंध जाणून त्याला कुठेतरी चिकटवून द्यावे. फार उपकार होतील.’ त्यावर प्रबोधनकार लिहितात, `हा बज्या काय नाटकाचे पोस्टर आहे, त्याला खळ माखून एखाद्या भिंतीवर चिकटवायचा?’ प्रबोधनकारांच्या खोलीची कीर्ती वाढत गेली, तसतशी ती बेकार तरुणांचा पांजरपोळ बनत गेली.
हे सगळे बिनहुन्नरी बेकार नोकरीसाठी अर्ज खरडत बसत. पण प्रबोधनकार मात्र नोकरीच्या फंदात पडलेच नाहीत. त्यांनी फोटो एन्लार्जमेंट आणि नेमप्लेट बनवण्याचा व्यवसाय सुरू केला होता. ते करताना प्रबोधनकारांनी एक गोष्ट ठरवली होती की काहीही झालं तरी कुणाचीही उधारी ठेवायची नाही. इतर धंदेवाईक चित्रकार बारा-पंधरा इंचाच्या फोटो एन्लार्जमेंटसाठी पन्नास ते साठ रुपये घेत. तिथे प्रबोधनकार तेच काम पंधरा रुपयात करायला तयार असत. अट एकच असे, पैसे रोख द्या, उधार नको. काम जाऊ नये म्हणून अगदी पाच रुपयांतही काम करायची तयारी ठेवत. त्यामुळे दर महिन्याला वीस ते पंचवीस रुपये कमाई सहज होत असे.
प्रबोधनकारांच्या चोख कामामुळे मुंबईतल्या नामांकित लोकांशी त्यांचा स्नेह जुळला होता. त्यात `अॅडव्होकेट ऑफ इंडिया’ या दैनिकाचे मॅनेजर नानासाहेब चित्रे होते. ते प्रबोधनकारांच्या प्रत्येक धडपडीत आपुलकीने मदत करत. त्यांनी अचानक प्रबोधनकारांचे भाऊ यशवंत यांना जळगावला सरकारी पीडब्ल्यूडी खात्यात नोकरीची सोय केली. तिथे जायचा प्रवासखर्चही दिला. तेव्हा यशवंतराव अवघ्या सोळा वर्षांचे होते. मॅट्रिकची तयारी करत होते. पण अचानक सरकारी नोकरी समोरून आल्याने ते पनवेलच्या घरीही भेट न देताच थेट जळगावला रवाना झाले. प्रबोधनकारांचा खान्देशाशी आलेला हा पहिला संबंध. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी ते खान्देशाशी कायमचे जोडले गेले. त्यांचा खान्देशाशी असलेला ऋणानुबंध हा वेगळ्या शोधाचाच विषय आहे.
अशी एखाद्याला नोकरी लागली, पण खोलीवरच्या बेकारांची संख्या काही कमी होत नव्हती. सगळे बेकार रोज नोकरीसाठी अर्ज खरडत बसायचे. त्यातल्या एखाद्याला कॉल यायचा. कधीतरी एकदम दोघातिघांना कॉल यायचा. साहेबापुढे जायचं तर नीट कपडे हवेत. पण यांच्याकडे तेव्हाच्या रीतीप्रमाणे लाँगकोटही नसायचा. आप्पा कुलकर्णी नावाच्या एका मेंबरकडे तसा कोट होता. बहुतेक मुंजीत शिवलेला. तो एकच कोट अनेक जण इंटरव्यूला जाताना घालून जायचे.
उत्पन्न नाही, त्यामुळे या बेकार रूम मेंबरांचे जेवायचे वांदे होतेच, पण साध्या चहाचेही होते. गावावरून येताना आणलेले किंवा घरच्यांनी पाठवलेले पैसे हाच आधार असायचा. सुरुवातीला काही महिने ते खानावळ लावत. सकाळी हॉटेलात जाऊन चहा पीत. पण हे फार दिवस चालत नसे. मग ते प्रबोधनकार किंवा खोपकारांच्या मागे लागत. सोबत राहून राहून हे फुकटे आता मित्र बनले होते. त्यामुळे त्यांच्या पोटापाण्याची सोय ही प्रबोधनकारांची जणू जबाबदारीच बनली होती. त्यासाठी त्यांनी एक शक्कल लढवली होती.
तेव्हा खानावळीत जेवणार्यांना महिन्याला चार पाहुणे माफ असत. खोपकर आणि प्रबोधनकारांचे पाहुणे लगेच संपत. मग खानावळ लावलेल्या इतरांचे पाहुणे उरलेत का, याची चौकशी करावी लागे. अशा शिलकी पाहुण्यांत मग मित्रांपैकी कुणाचा तरी नंबर लावावा लागे. इतकी धावपळ करूनही ते मित्र निर्ल्लज्जपणे विचारत, `अहो ठाकरे, जेवण नसले तरी चालेल. पण चहाची तरी सोय करा हो. सकाळपासून पाण्यावर आहोत.’ दीडकीला फूल चहा मिळत असला, तरी दहा जण गोळा झाले की चटकन अडीच आणा उडून जायचा. तो अडीच आणा प्रबोधनकारांसाठी खूप होता.
एकीकडे ते मेहनत करून पनवेलला घरी पाठवण्यासाठी पै पै जोडत होते आणि दुसरीकडे ही बेकार मित्रमंडळी त्यांच्या खिशावर डोळा ठेवून होती. मुंबईत चाळीतल्या खोलीत महिन्याला आठ रुपये भाडं होतं. बाराजण राहत होते, पण कमावते दोघेच. त्यामुळे या चिकटून घेण्यासाठी आलेल्या आणि सहवासामुळे मित्र बनलेल्या या चिकट्यांचा चिकटा कसा सोडवायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला होता. मित्रांना तोडताही येत नाही आणि घरची आबाळही करता येत नाही, या त्रांगड्यात असलेल्या प्रबोधनकारांना थोडी उसंत मिळाली बेकारांच्या काही भानगडबाज युक्त्यांमुळे.
या सगळ्या काळात त्यांना बेरोजगार तरुणांचं जग जवळून बघता आलं. शाळेत शिक्षण घेतलं म्हणजे रोजगार मिळत नाही, हे त्यांना कळलं होतं. फक्त नोकरी म्हणजे रोजगार नाही, हेदेखील पक्कं लक्षात आलं होतं. उद्योजकता हाच बेकारीवरचा अक्सीर इलाज त्यांना सापडला होताच. त्यांच्या हुन्नरबाजीच्या जोरावर ते बेकारीवर मात करत राहिले. संकटांचा सामना करत राहिले. स्वाभिमानाने जगत राहिले आणि बेकारांच्या मिंधेपणावर कायम टीका करत राहिले.
(लेखक ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या वेबसाईटचे संपादक आहेत.)