पत्र तर लिहितोय दीदी, पण तुम्हाला ते वाचायला कधी फुरसत होणार, माहीत नाही. सध्या तुमच्या राज्यात जी रणधुमाळी चालू आहे, त्यात तुम्ही पूर्ण अडकलेल्या असणार. पण खरं सांगू का ममता दीदी, तुमच्या राज्यात चालू आहे, त्याला रणधुमाळी म्हणणंही कठीण आहे. म्हणे युद्धात कसे, काहीतरी नियम, काहीतरी शौर्य, काहीतरी डावपेच असतात. तुमच्या विरोधकांना मात्र काहीच नियम नाहीत. गेली दोन-अडीच वर्षं, तुम्ही ऐकत नाही म्हटल्यावर, त्यांनी जो निलाजरा नाच चालवलाय, त्याला लढाई म्हणणं कठीण आहे.
आधी त्यांचा लाडका राज्यपाल (हल्ली त्याला देशभारत ‘भाज्यपाल’च म्हणतात म्हणे!) सतत तुमच्या पायात पाय घालत होता. मग त्यांनी तुमच्या राज्यात जागोजागी गुंडागर्दीच सुरू केली. निवडणुका जवळ यायला लागल्या, तसतशा नाथा म्हणून नाही, महादू म्हणून नाही, गंगू म्हणून नाही, जो सापडेल त्याला तुमच्या पक्षातून आपल्याकडे ओढून घ्यायला सुरुवात केली. म्हणजे अहो, ज्याच्या घोटाळ्यांनी तुमच्या सरकारला सगळ्यात बदनाम करायला वापरलं, त्यालाही आपल्यात ओढला (हे आम्हां मराठी माणसांनाही ओळखीचं वाटतंय, पण ते वेगळं). तामिळनाडू वगैरे राज्यात एका दिवसात निवडणूक, पण तुमच्या पश्चिम बंगालात तब्बल आठ टप्पे लावले. यांच्या पक्षाच्या ऐर्या गैर्यापासून पार पंतप्रधानापर्यंत प्रत्येकाने तुमच्याविरुद्ध प्रचारात मुक्काम ठोकला. अगदी त्या लशीच्या कागदावर मोदीबाबांचा चेहरा आहेच. पण या सगळ्यानंतरही तुम्ही यांच्याविरुद्ध खमकेपणी उभ्याच.
तुम्हाला माहीत नव्हतं का हो? यांना लोंबणारे, रेंगणारे, वाकणारे लागतात, उभे ठाकलेले आवडत नाहीत (नितीशकुमारांना विचारायचं की!). तेव्हा सगळे उपाय थकले म्हणून तुमच्यावर हल्ला घालून पाय मोडायचेही प्रयत्न केले. आता तुम्हीच सांगा, याला काय युद्ध म्हणणार? फार तर दरोडा म्हणता येईल. आणि येत्या दोन मेपर्यंत तुमच्या लाडक्या बंगालला या दरोडेखोरांपासून वाचवण्यात तुम्ही पुरत्या बिझी असाल, यात शंका नाही.
पण फुरसत मिळालीच चुकून तर नक्की वाचा हे पत्र दीदी. अहो, बंगालने महाराष्ट्राशी नाही बोलायचं, तर अजून कोणाशी? बंगाल म्हणजे शिक्षण, ज्ञान, संस्कृतीचा वारसा. आणि तुम्ही त्या वारश्याच्या मोठ्या पाईक आहात. या दरोडेखोरांशी चाललेली मारामारी सोडून देऊ, पण तुम्ही रवींद्रनाथ ठाकुरांशी वारसा सांगणार्या एक उत्तम चित्रकार आहात, हे आम्हाला ठाऊक आहे. म्हणूनच असाच दुसरा वारसा असलेल्या महाराष्ट्राशी तुमचं जुनं नातं आहे. तर त्याच निमित्ताने तुम्हाला महाराष्ट्राच्या चार गोष्टी सांगाव्या, असं वाटलं. तशा काही गोष्टी तुम्ही करताच म्हणा. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही तुकाराम महाराज ऐकले नसतील, पण तुम्ही जे करता, त्याबद्दल ते ‘नाठाळाचे माथी हाणू काठी’ असं म्हणून गेलेले आहेत किंवा रामदासांनीही ‘ठकासी व्हावे महाठक’ असा आशीर्वाद तुम्हाला दिलेला आहे.
पण तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. कोणे एके काळी म्हणे महाराष्ट्रातल्या एका (जास्त) शहाण्या राघोबा नावाच्या पेशव्याने अहिल्याबाई होळकरणीवर चाल करून जायचं ठरवलं (आताही काही ज्यादा शहाणे `पेशवे’ आहेतच महाराष्ट्र भूमीत, पण ते वेगळं!) तेव्हा अहिल्याबाईंनी अश्या अर्थाचं उत्तर दिलं, की ‘एवढ्या मोठ्या प्रदेशाचे पेशवे चाल करून आल्यावर मी हरले, तर फार काही आश्चर्य नाही. पण तुम्ही हरलात, तर मात्र एका छोट्या संस्थानाच्या बाईकडून मात खाल्ल्याची बदनामी तुम्हाला सोसावी लागेल’ आणि शर्मिंदा होऊन पेशवे मागे फिरले. आता ही उभ्या भारताचे पंतप्रधान आपली सत्ता, सरकार, राज्यपाल, गुंड, मंत्री आणि अफाट पैसा घेऊन तुमच्यावर चालून आलेले आहेत. अर्थात अहिल्याबाईचं उत्तर देऊन तुमच्या विरोधकांना शरम वाटणार नाही, हा भाग वेगळा…!!
अजून एक नातं सांगतो, दीदी. स्वतःच्या खाजगी नफ्यासाठी इथल्या लोकांचं शोषण करणार्या ब्रिटिश राजवटीविरुद्ध १०० वर्षांपूर्वी एक त्रिमूर्ती सर्वात पहिली उभी ठाकली. आजही लाल, बाल आणि पाल, यांचे पंजाब, महाराष्ट्र आणि बंगाल दिल्लीच्या सुलतानशाहीविरुद्ध उभे आहेत, हा काही योगायोग नाही. महाराष्ट्र जसा पंजाबच्या शेतकर्यांसोबत आहे, तसा तुमच्याही सोबत राहणारच!
पण दीदी, बंगालला तुमचं बंडखोर नेतृत्व मिळालंय, त्याचे तर आम्ही पुरते फ्यान आहोत. देशात खेळाला न्याय मिळत नाही, म्हणून तुम्ही स्वतःच क्रीडामंत्री असतानाही तुम्ही सरकारविरुद्ध उभा राहिलात आणि मंत्रिपद सोडलं. हे बर्याच लोकांना आठवत नाही. अहो, महिला आरक्षणाविरुद्ध बोलायला उठलेल्या खासदाराची चक्क कॉलर पकडून तुम्ही रणरागिणीचं रूप दाखवलं. बंगालचा खूप काळ विळखा घालून बसलेल्या साम्यवादी पक्षाविरुद्ध तुम्ही दुर्गेसारखी लढलात. प्रसंगी पक्ष सोडून स्वतःची स्वतंत्र मुळं रोवलीत. खरं तर हे मोदी-शहावाले म्हणजे साम्यवाद्यांचे तुमच्या एवढेच कट्टर विरोधक. पण तुम्ही या टोकाला गेल्या नाहीत तसंच दुसरं अतिरेकी टोकही गाठलं नाहीत आणि आज केंद्राशी तडजोड करणं सहज शक्य असूनही तुम्ही बंगाली अस्मिता कायम राखत संघर्ष करताय. आणि या सर्वासकट तुम्ही एक चांगल्या चित्रकार, कवयित्री आहात. असंख्य दशकं सत्ता भोगूनही तुम्ही अतिशय साध्या राहता, हे सगळं आम्हाला फारच भारी आणि कौतुकाचं वाटतं, हे सांगायलाच पाहिजे.
त्यामुळे तुमच्याच मतदारसंघात तुमच्यावर हल्ला करण्याएवढी विरोधकांची मजल गेली, तेव्हा आम्हाला काळजी वाटली. आता ६५ वर्षाच्या लढवय्या बाईला सत्ता हवी म्हणून कोणी जीवे मारणार का अशी भीती वाटायला लागली. बाकी आता या दरोड्यात तुमच्यावर अजून बरेच घाव होणारेत. आत्ताशी कुठे तो अर्णब नावाचा हाकार्या तुमच्या बंगालमध्ये सोडलाय. आता तो त्याच्या बूमचे ढोल तुमच्याविरुद्ध बडवेल. त्यात निवडणूक आयोग कमालीचा निष्पक्ष आहे. त्यामुळे आधी त्यांनी डीआयजी बदलला. आता अधिकाधिक अधिकारी बदलतील. पुन्हा निकाल आल्यावर म्याच फिक्सिंगला खास माणूस बोलावला जाईल. कोटीमध्ये खेळून आमदार फिरवले जातील. हे लोकं प्रसंगी साम्यवाद्यांसोबतही सत्तेत बसायला जातील. एवढं करून तुम्ही जनतेच्या भरवश्यावर सत्तेत याल, तर तुमचं सरकार पाडण्याचे खेळ सुरू होतील. राजभवन ते दिल्लीपर्यंत षडयंत्रं आखली जातील. तेव्हा रात्रच काय पण येता काळच वैर्याचा आहे, आपल्या सर्वांनाच… म्हणूनच आपण एकमेकांसोबत राहायला पाहिजे.
आणि महाराष्ट्राचा अजून एक अनुभव सांगतो. जे यांच्यासोबत नसतील, ते हिंदू नाहीत, असा यांचा कांगावा असतो. अहो, खुद्द हिंदुहृदयसम्राटांच्या पक्षाला हे हिंदूविरोधी ठरवतात (आणि यांचे पूर्वसुरी फाळणीचा ठराव मांडला जाताना मुस्लीम लीगसोबत सत्ता भोगतच होते!) पण तुम्ही या भंपक गदारोळाकडे दुर्लक्ष करा. अहो, बंगालात साम्यवादी केडरही जिथे दुर्गापूजा भक्तीने करत असे, तिथे तुमच्या धर्मावर का कोणी संशय घ्यावा. पण दांडगटपणा करण्याचाच ज्यांचा धर्म, त्यांना सच्चा हिंदू काय कळणार? तेव्हा तुम्ही नक्की बोला, ते फसलेल्या शेती कायद्यांबद्दल, मनस्ताप बनलेल्या जीएसटीबद्दल, कोरोनानंतर यांचेच मित्र कसे श्रीमंत झाले, त्याच्याबद्दल! यांची राम की बात चालू राहू दे. तुमची काम की बात जास्त महत्त्वाची आहे.
– पत्र ‘कार्टा’