देशात कोरोना महामारी पुन्हा डोके वर काढताना दिसत आहे. महाराष्ट्र आणि पंजाबमधील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने या दोन राज्यांत तातडीने उच्चस्तरीय विशेष पथके पाठवली आहेत.या पथकांत तज्ञ डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी आणि आयसीएमआरच्या संशोधकांचा समावेश आहे. ही पथके राज्य सरकारशी समन्वय साधून राज्यातील वाढत्या कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठीच्या प्रभावी उपाययोजना सुचवणार आहेत.
महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणासाठी आलेल्या पथकाचे नेतृत्व डॉ. पी. रवींद्रन करीत आहेत. रवींद्रन हे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन सेलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत. पंजाबला गेलेल्या केंद्रीय शिष्टमंडळाच्या प्रमुखपदी राष्ट्रीय रोगप्रतिबंधक केंद्राचे संचालक डॉ. एस. के. सिंग हे आहेत. ही पथके राज्यांनी चालवलेल्या कोरोना प्रतिबंधक उपायांची पाहणी करून त्याचा अहवाल केंद्रीय मुख्य सचिव आणि मुख्य गृह सचिवांना पाठवणार आहेत. दोन राज्यांतील कोरोना हॉटस्पॉट्सनाही ही पथके भेट देऊन उपाययोजना सुचवणार आहेत.
z देशभरात आतापर्यंत 1 कोटी 90 लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला आहे. ही संख्या येत्या 24 तासांत 2 कोटींचा आकडा पार करील असा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा अंदाज आहे. जगात सर्वाधिक कोरोना लसीकरण करणाऱ्या देशांत हिंदुस्थान पाचव्या स्थानावर आहे
महाराष्ट्रात एका दिवसात 10 हजारांहून अधिक रुग्ण
महाराष्ट्रात कोरोना महामारीने पुन्हा आपला जोर वाढवला आहे. शनिवारी राज्यात 10,187 कोरोना रुग्ण सापडले आहेत. गेल्या पाच महिन्यांतील ही सर्वाधिक रुग्णसंख्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी महाराष्ट्रात 17 ऑक्टोबर 2020 रोजी 24 तासांत 10,259 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले होते. म्हणजेच कोरोना संसर्गाचा वेग आता 250 टक्क्यांनी वाढल्याचे उघड झाले आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत राज्यात 6,447 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 21 लाख 98 हजार 399 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यातील 20 लाख 55 हजार 951 रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला आहे. राज्यात सध्या 88 हजार 838 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोनाने आतापर्यंत राज्यातील 52 हजार 393 नागरिकांचा बळी घेतला आहे.
सौजन्य : दैनिक सामना