कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यात यश आल्यानंतर मुंबईमधील नियम टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर खासगी वाहनांमधील प्रवाशांना मास्क सक्तीतून वगळण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. मात्र सार्वजनिक वाहनातील प्रवाशांना मास्क सक्ती अजूनही कायम ठेवण्यात आली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशासह राज्यातही लॉकडाऊन लागू करण्यात होते. उद्योग, व्यवसाय आणि सर्वसामान्यांवर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र कोरोना नियंत्रणात आल्यानंतर निर्बंध टप्प्याटप्प्याने उठवण्यात आले आहेत. मात्र हात धुणे, गर्दी न करता सुरक्षित अंतर ठेवणे आणि मास्कची सक्ती अजूनही कायम आहे. मुंबईत खासगी आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ अभियान राबवण्यात आले. मास्क न वापरणाऱया प्रवाशांना प्रवासाला बंदी घाल्नू त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. खासगी वाहनांनादेखील हा नियम लागू केला. मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या रिक्षा, टॅक्सी, बस, लोकलमधील प्रवाशांना मास्क सक्ती कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे असे प्रवासी विनामास्क आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
ओला, उबेर सार्वजनिक की खासगी?
मोबाईल अॅपद्वारे ओला आणि उबेर कंपन्या सेवा पुरवतात. त्या खासगी की सार्वजनिक सेवेत मोडतात, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे अशा वाहनांतील प्रवाशांनी मास्क परिधान करावा की नाही, याचा निर्णय घेतलेला नाही. मात्र तोपर्यंत अशा वाहनांतील विनामास्क प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
कोरोना नियंत्रणात आल्याने घेतला निर्णय
सध्या कोरोना नियंत्रणात आला असून लसीकरण मोहीमदेखील सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत खासगी वाहनातील प्रवाशांना असलेली मास्क सक्ती मागे घेण्यात आली असून पालिका प्रशासन आणि क्लीन-अप मार्शलने अशा खासगी वाहनांतून विनामास्क प्रवास करणाऱयाना दंड आकारू नये, असे निर्देश पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिले आहेत.
सौजन्य : दैनिक सामना