देशभरात आजपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झालेली असतानाच आता बडय़ा कॉर्पोरेट कंपन्यांनीही आपल्या कर्मचाऱयांसह त्यांच्या कुटुंबीयांना लस देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार लस खरेदीसाठी लस उत्पादक कंपन्यांसोबत चर्चा सुरू केली आहे.
केंद्र सरकारने सिरमच्या कोव्हीशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचा आपत्कालीन वापर करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सरकारच्या माध्यमातून कोरोना योद्धय़ांसह फ्रंटलाइनवर काम करणाऱया कर्मचाऱयांना लस दिली जाणार आहे. त्यांनतरच बाजारात लस उपलब्ध होणार आहे. त्याची दखल घेत रिलायन्स, टाटा, वेदान्त, जेएसडब्ल्यू आदी बडय़ा कंपन्या आपल्या कर्मचाऱयांबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांसाठी लसीची खरेदी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
वेदान्त रिसोर्सचे कार्यकारी अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी ट्विट करत सरकारच्या लसीकरण मोहिमेला शुभेच्छा देतानाच आपण एक जबाबदार कंपनी म्हणून आपल्या कर्मचाऱयांचे लवकरच लसीकरण करणार असल्याचे म्हटले आहे. वेदान्त कंपनी 25 हजार लसीचे डोस खरेदी करणार असल्याचे कंपनीच्या एका अधिकाऱयाने सांगितले. जेएसडब्ल्यूनेही आपल्या कर्मचाऱयांसाठी 55 हजार डोस खरेदी करण्यासाठी लस निर्मिती करणाऱया कंपन्यांसोबत चर्चा सुरू केली आहे. त्यासाठी एका लसीला जवळपास एक हजार रुपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान, लसीच्या खासगी वितरणाला केंद्र सरकारने अद्याप मंजुरी दिलेली नाही.
सौजन्य : दैनिक सामना