‘शेंटिमेंटल’, ‘सातारचा सलमान’, ‘सिनियर सिटीझन’, ‘आम्ही बेफिकीर’ अशा वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्यानंतर अभिनेता सुयोग गोर्हे आता लवकरच ‘स्पेशल’ या सिनेमात एका वेगळ्या धाटणीच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. आपल्या लष्करी खात्याची कामगिरी नेहमीच वाखाणण्याजोगी आहे. आपल्या जवानांनी देशासाठी दिलेले बलिदान आणि देशाच्या हितासाठी त्यांनी केलेली धडपड अनमोल आहे. याच विषयाचा जवानांवर बेतलेला पहिला मराठी लष्करी अॅक्शनपट ‘स्पेशल’ आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.
लेखक, दिग्दर्शक सचिन रामचंद्र आंबात लिखित आणि दिग्दर्शित या सिनेमाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. यावेळी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्यासह चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि इतर टीम हजर होती. ‘स्वप्न स्वरूप’ निर्मित आणि ‘शिव ब्रह्मांड’ सहनिर्मित या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन सचिन आंबात यांनी सांभाळली आहे. यापूर्वी त्यांनी ‘लव लफडे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन व लेखन केले होते. यात अभिनेत्री पायल कबरे हीदेखील आर्मी ऑफिसर म्हणूनच दिसणार आहे. एकंदरीत देशाच्या हिताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढताना सुयोग आणि पायल दिसतील.