गिरगावात जन्म होऊन इंदुरात अख्खे आयुष्य व्यतीत केलेले श्रीकृष्ण बेडेकर हे एक अष्टपैलू कलावंत़ ते कवी, लेखक, संपादक, चित्रकार, गायक आणि या सगळ्याच्या पलीकडे बरेच काही आहेत. अत्यंत मनस्वी अशा या कलंदराची महाराष्ट्राने उपेक्षाच केली. ती खंत उरात असली तरी सतत झपाटून काम करण्याचा वसा न सोडणारे बेडेकर नुकतेच ७५ वर्षांचे झाले. त्यानिमित्ताने प्रकाशित होत असलेल्या `इत्थंभूत’ या गौरवग्रंथातील एक लेख.
‘दिवाळी अंकाच्या पुरस्कार सोहळ्याला अध्यक्ष म्हणून राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना बोलावता येईल, प्रयत्न करू का?…’ ज्या अंकाला पुरस्कार मिळाला होता, त्याचे संपादक विचारत होते…
…हे ऐकताच कोणाही अन्य पुरस्कारदात्याचे डोळे लकाकले असते… राष्ट्रपती महोदया आल्या की त्यांच्याबरोबर कार्यक्रमाला एकदम राष्ट्रीय वलय लाभणार, त्याची सर्व छापील-इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधून आपोआप दखल घेतली जाणार, तीही कोणतीही निमंत्रणं द्यावी न लागता… गेली अनेक वर्षं निव्वळ एका माणसाच्या अथक मेहनतीतून उभा राहिलेला पुरस्कार एका सोहळ्यात सर्वदूर पोहोचणार… आजवरचे सगळे कष्ट, सगळी एकांडी शिलेदारी सार्थकी लागणार… अन्य कोणीही पुरस्कारदाता निव्वळ या कल्पनेनेही सुखावला असता आणि हपापून ‘हो हो, करा प्रयत्न, नव्हे, आणाच राष्ट्रपतींना,’ असं म्हणून गेला असता… पण, श्रीकृष्ण बेडेकर आणि ‘अन्य’ यांच्यात फरक आहे म्हणून बेडेकर हे बेडेकर आहेत… ते त्यांच्या करकरीत आवाजात म्हणाले, ‘हा सोहळा काही राजकीय नाही. त्या श्रोत्या म्हणून येणार असतील आणि श्रोत्यांमध्ये बसणार असतील, तर आनंदच आहे.’
…अर्थातच प्रतिभा पाटील काही त्या कार्यक्रमाला आल्या नाहीत… त्याची बोच कदाचित त्या दिवाळी अंकाच्या कर्त्यांना लागून राहिली असेल… पण, बेडेकरांना त्याची काहीही खंत असण्याची शक्यताच नाही… त्यांचा पिंडही वेगळा आणि पीळही.
मुंबईला गिरगावातल्या चाळीत जन्मून तिथेच लहानपण व्यतीत केलेल्या आणि तिथून नियतीने थेट इंदुरात नेऊन भिरकावलेल्या बेडेकरांमध्ये हा ‘पुणेरी’ पिंड कुठून आला असेल, असा प्रश्न पडतो… बेडेकर स्पष्टवक्ते आहेत, फटकळ म्हणावेत इतके. त्यांना पटलं नाही तर नाराजी व्यक्त करताना ते शब्दचातुर्य पणाला लावत नाहीत, कोणाची आणि कशाची भीड ठेवत नाहीत (मुळात मिंधेपणच नाही तर भीड ठेवायची कशाला, हा त्यांचा बाणा), ताडकन् बोलून मोकळे होतात.
पुणेरी पाट्यांची आठवण व्हावी असा कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त अपमान करण्याचीही हातोडी (की ‘जिव्हो’टी) त्यांना लाभलेली आहे. पण, हे पुण्याचे आणि बेडेकरांचे दर्शनी गुण झाले.
एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की ती गोष्ट आपल्या बळाने तडीला न्यायची. संस्था, तिचा गोतावळा, तिच्यातल्या लठ्ठालठ्ठ्या यांच्या फंदात पडायचं नाही. भगीरथासारखं स्वत: भिडून चिकाटीने पाठपुरावा करून आपली गंगा आपण भूमीवर आणायची, असा त्यांचा खाक्या आहे. अशा कामांच्या वेळी त्यांच्या बटुमूर्तीमध्ये भीमाला लाजवील, एवढी ताकद भरते आणि ती कमालीची ऊर्जा पाहून त्यांच्या निम्म्या वयाचे त्यांचे मित्रही थक्क होऊन जातात. वयोमानानुसार होणार्या निद्रानाशावरही बेडेकरांकडे एक जालीम उपाय आहे… झोप लागत नसली की ते उठून कामाला बसतात…
एवीतेवी जगायचंच आहे, तर त्यात दोनचार महत्त्वाची कामं तरी हातावेगळी करून घेऊ, ही त्यांची वृत्ती.
प्राक्तनाने त्यांना महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेशात नेऊन ठेवलं असलं तरी अंतर्बाह्य मराठी असलेल्या बेडेकरांनी तिथे राहून, सगळ्या विवंचनांशी झगडत मराठीसाठी जेवढं कल्पक आणि दर्जेदार काम केलं आहे, तेवढं महाराष्ट्रातही कोणा सुविधासंपन्नाने केलं नसेल. एसेमेसचं युग अवतरण्यापूर्वी केवळ अंतर्देशीय पत्रावर पत्रसारांश हा अनोखा अंक छापून तो वर्गणीदारांना (स्वहस्ताक्षरात सर्व पत्ते लिहून) पाठवण्याचा त्यांचा उपक्रम असाच चमकदारपणे वेगळा होता. त्याने आणि त्यांच्या खुमासदार ‘संतापकीयां’नी (संपादकीयाचा बेडेकरी अवतार) श्रीकृष्ण बेडेकर महाराष्ट्रातल्या सगळ्या नामांकित साहित्यिकांपर्यंत आणि साहित्यरसिकांपर्यंत पोहोचले. त्यांच्या कवितांनी दिवाळी अंक गाजवायला सुरुवात केली होतीच. या कवितांचं सगळं मानधन बेडेकरांनी बँकेत जपून ठेवलं होतं.
पत्रसारांशचा व्याप कालौघात आवरता घ्यायला लागणार, हे लक्षात आल्यावर त्यांनी १९९९ला पत्रसारांश प्रतिष्ठानची स्थापना केली आणि तेव्हापासून त्या वर्षीच्या दर्जेदार दिवाळी अंकाला पुरस्कार द्यायला सुरुवात केली. स्थापनावर्षात मिळून सार्याजणी आणि अंतर्नाद या दिवाळी अंकांना हा पुरस्कार दिला गेला.
महाराष्ट्रात दिवाळी अंकांचं पीकही दरवर्षी तरारून येतं आणि दिवाळी अंकांच्या पुरस्कार स्पर्धाही गावोगाव होतात. पण, त्यात बेडेकरांचा (आता गुणवैभव या नावाने ओळखला जाणारा) पुरस्कार हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वानुसार ‘हट के’ आहे. एकतर हा पुरस्कार सुरू झाला, तेव्हा तो कोणा उदार दात्याच्या गलेलठ्ठ देणगीतून किंवा संस्थेच्या बजेटमधून ‘सीएसआर’ पद्धतीने सुरू झाला नव्हता. बेडेकरांनी आपल्या कवितांच्या मानधनाची जी गंगाजळी साठवली, तिच्या भरवशावर पाचशे रुपयांचा हा पुरस्कार सुरू केला आणि त्याला आपसूकच कवीच्या कमाईचं सात्विक तेज लाभलं. आपल्या पदराला खार लावून दुसर्याचं कौतुक करण्याचा हा गुण बेडेकरांनी पुण्याबाहेरून, बहुदा महाराष्ट्राबाहेरूनच घेतला असावा. बरं, हा सोहळा त्यांनी दर वर्षी इंदुरात केला तर तिथल्या मराठी स्नेहीजनांना वार्षिक साहित्यिक कार्यक्रमाची मेजवानी मिळू शकते आणि पुरस्कार विजेत्यांना इंदुरात बोलावून सन्मानित करणं व्यवहारत: सोपं पडू शकतं.
पण, सोपं काम करतील, ते बेडेकर कसले? ज्या गावातून दिवाळी अंक निघतो त्या गावात, त्या भूमीत अंकाच्या कर्त्यांवर कौतुकाची फुलं पडायला हवीत, ही बेडेकरांची जिद्द. त्यासाठी त्या त्या अंकाच्या प्रकाशनस्थळी पुरस्कार सोहळा होतो आणि बेडेकर इंदुरातून सगळं सूत्रसंचालन करतात, प्रमुख पाहुणे कोण, इतर पाहुणे कोण, कार्यक्रमाचं स्वरूप कसं असावं इथपासून ते अल्पाहार काय असावा, इथपर्यंत सगळ्यावर तिकडून यांची करडी नजर असते.
या सोहळ्याची वाट आणखी एका कारणासाठी पाहिली जाते. ते म्हणजे त्याचं निमंत्रणपत्र. मुळात बेडेकरांनी लोकांना लोणची-मसालेवाल्या बेडेकरांचा विसर पडावा, अशी आपली ‘सुबक हस्ताक्षरवाले बेडेकर’ अशी ओळख प्रस्थापित केली आहे. त्यात त्यांना आणखी एक देणगी लाभली आहे. नामवंतांची गाणी जशी बेडेकरांच्या कंठातून हुबहू उतरतात, तसं त्यांच्या लेखणीतून नामवंतांचं हस्ताक्षरही तंतोतंत उतरतं. त्यामुळे कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, शंकर वैद्य, विजय तेंडुलकरांपासून ते रत्नाकर मतकरींपर्यंत अनेक मान्यवरांच्या हस्ताक्षरात त्यांनी उतरवलेली निमंत्रणं आजही अनेकांच्या संग्रही असतील.
वीस वर्षांपूर्वी पाचशे रुपयांचा असलेला हा पुरस्कार बेडेकरांचे काही गुणग्राहक मित्र आणि संस्था यांच्या पाठबळामुळे आता पाच हजार रुपयांचा झाला आहे. तो देण्याचा खर्चही ५० ते ६० हजारांच्या घरात गेला आहे. त्याची रक्कम महत्त्वाची नाही. त्यामागे बेडेकरांची सच्ची तळमळ आणि सत्तरीतही पायाला भिंगरी लावून फिरून सगळी कामं स्वत: मार्गी लावून हा पुरस्कार सोहळा साजरा करण्याची जी जिगर आहे, ती लाखमोलाची आहे. गुणवैभव हे त्यांच्या पुरस्काराचं नाव आहे… पण, पुरस्कार घेणार्याला आणि बेडेकरांच्या चाहत्यांना, मित्रवर्गाला मात्र गुणवैभव हे बेडेकरांचंच विशेषण वाटत असणार, यात काही शंका नाही.