• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

कमालीची सहनशीलता मराठवाड्याच्या मुळावर!

गणेश पोकळे राज्यकारण

Marmik Team by Marmik Team
November 28, 2026
in राज्यकारण
0
कमालीची सहनशीलता मराठवाड्याच्या मुळावर!

मराठवाड्याच्या वाट्याला दुष्काळ नवा नाही, मग तो कोणताही असो. महापूर येऊन, होत नव्हतं ते सगळं नाहीसं होऊद्या नाहीतर पावसाचा ठिपका नाही पडला म्हणून जमिनीला माणूस मावेल इतक्या भेगळा पडूद्या. काहीच आणि कुणीच डगमगत नाही. मुळात हा प्रदेशच सहनशील आहे. या मातीतच सहनशीलता रुजलेली असल्याने माणसंही तशीच तयार झाली. या सहनशीलतेची अनेक धागे आहेत, अनेक पदर आहेत आणि अनेक अंग आहेत. त्यातला आजचा महत्त्वाचा धागा… पाणी…

मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावं, ही मागणी कालची किंवा अलीकडच्या काळातील नाही, तिची पहिली ठिणगी पडली ती १९५१ साली, म्हणजे हे महाराष्ट्र राज्य स्थापन होण्याच्या सुमारे ९ वर्षे अगोदर. आता चालू आहे २०२६ म्हणजे ७५ वर्षे झाली. आणि सांगायची गोष्ट म्हणजे या हक्काच्या पाण्याची मागणी आजही जशी आहे तशीच आहे, जी ७५ वर्षांपूर्वी होती. यावरून तुम्ही अंदाज लावा हा प्रदेश सहनशीलतेच्या पातळीवर कुठं आहे? यातला घटनाक्रम पहिला तर ते लक्षातही येईल.
जायकवाडी प्रकल्पाची मूळ संकल्पना जुन्या हैदराबाद संस्थानाच्या काळात मांडली होती. सुरुवातीला बीड जिल्ह्यातील जयकुचीवाडी येथे धरण बांधण्याचं नियोजन होतं. राज्य पुनर्रचनेनंतर पर्यायी जागांचा विचार झाला आणि ते पैठणला बांधलं गेलं. १९६४मध्ये प्रकल्पाचा अहवाल पूर्ण झाला आणि १३ जानेवारी १९६५ रोजी प्रकल्पाला मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली. १८ ऑक्टोबर १९६५ रोजी तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते पहिल्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ झाला आणि पुढे ते काम मार्गी लागलं. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश मराठवाड्यातील दुष्काळी भागाला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणं, शेतीला पाणी देणं आणि प्रादेशिक विकासाला चालना देणं हा होता. मात्र, आजपर्यंतचं वास्तव चित्र पाहता हे सगळं झालंय का? तर त्याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे अजिबात नाही. का नाही झालं? त्याचं मूळ कमालीची सहनशीलता…

अगदी सुरुवातीला जे नियोजन झालं त्यावेळी पैठण धरणाच्या ठिकाणी सुमारे १९६.५ टीएमसी पाणी उपलब्ध होईल, असा अंदाज होता. त्यापैकी ११५.५ टीएमसी पाणी गोदावरीच्या वरच्या भागातील प्रकल्पांसाठी, तर ८१ टीएमसी पाणी जायकवाडी प्रकल्पासाठी नियोजित करण्यात आलं होतं. याच पाणीवाटपाच्या नियोजनातून पुढं नाशिक-अहिल्यानगर (पूर्वीचं अहमदनगर) आणि मराठवाडा यांच्यातील पाण्याच्या वाटपाचा वाद निर्माण झाला. वरच्या गोदावरी खोर्‍यात धरणं आणि सिंचन प्रकल्पांची संख्या वाढत गेल्याने जायकवाडीपर्यंत येणार्‍या पाण्याच्या उपलब्धतेचा प्रश्न गंभीर झाला. त्यामुळं जायकवाडीच्या मूळ नियोजनानुसार पाणी मिळावं आणि पाणीटंचाईच्या काळात वरच्या व खालच्या भागातील धरणांमधील उपलब्ध पाण्याचं समन्यायी वाटप व्हावं, ही मागणी पुढं जोर धरू लागली, जी आजही त्याच जोरात आहे. तो जोर वाढलेला नाही. आणि त्याचमुळं कोणताही ठोस निर्णय न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेली सात-आठ वर्षे दर वर्षी म्हणतात की मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही. ते हे वाक्य प्रत्येक वर्षी म्हणत असल्याने, यावर्षी त्यांची आजपर्यंतची सगळी वाक्ये एकत्र करून राज्यभर त्यांचा व्हिडीओ व्हायरल केला गेला.

कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत कृष्णा खोर्‍यातील पाणी मराठवाड्यातील दुष्काळी भागाला उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सरकारने फेब्रुवारी २००५मध्ये या योजनेतून २१ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यात धाराशिव जिल्ह्यासाठी १९ टीएमसी आणि बीडसाठी २ टीएमसी पाणी प्रस्तावित होतं. पुढे २७ ऑगस्ट २००९ रोजी प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानुसार एकूण २३.६६ टीएमसी पाण्याचे नियोजन करण्यात आलं होतं. त्यात धाराशिवसाठी १७.९८ टीएमसी आणि बीडसाठी ५.६८ टीएमसी पाणी प्रस्तावित होतं. मात्र कृष्णा खोर्‍यातील पाणी दुसर्‍या नदीखोर्‍यात वळवण्यासंदर्भातील कृष्णा पाणीवाटप लवादाच्या २०१३ मधील निर्णयामुळं मूळ योजनेच्या अंमलबजावणीसमोर पाणी उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळं २०१६मध्ये शासनाने पहिल्या टप्प्यात सात टीएमसी पाणी उपलब्धतेनुसार कामं करण्यास मान्यता दिली. त्यात धाराशिवसाठी ५.३२ टीएमसी आणि बीडसाठी १.६८ टीएमसी पाणी नियोजित करण्यात आलं. या टप्प्यात ३३ हजार ९४५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचं उद्दिष्ट होतं. नोव्हेंबर २०२६ उजाडलं पण हे सात टीएमसी पाणी प्रत्यक्ष लाभक्षेत्रात पोहोचलं नाही, उरलेलं सुधारित नियोजनातील १६.६६ टीएमसी तर दूरच. कारण तेच, मराठवाड्याची सहनशीलता.

शेवटी मी हे प्रत्यक्ष अनुभवतोय आणि जवळून पाहतोय म्हणून एक उदाहरण देतो. मी स्वतः बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आहे. मतदारसंघ म्हणून आष्टी, पाटोदा, शिरूर असे तालुके एकत्र आहेत. मी जास्त लांब नाही, गेल्या २० ते २२ वर्षांपासून फक्त पाणी, टीएमसी, कुकडी, जायकवाडी, शिंपोरा, कुंठेफळ अशी धरणांची आणि योजनांची नावं ऐकतोय. पण यातील एकही प्रकल्प पूर्ण झाला नाही आणि सगळ्यात विशेष म्हणजे यासाठी एकही आंदोलन झालं नाही. कारण काय ते आपण आता समजून घ्या. या मतदारसंघाचं ज्यांनी २० वर्ष नेतृत्व केलं ते माजी आमदार भीमराव धोंडे अनेक दिवसांपासून, आमच्या वाट्याचं किंवा वाहून जाणार पाणी आम्हाला द्या, अशी मागणी करतात. तेही १५ ते २० टीएमसी असं बोलत असतात आणि सांगत असतात. पुढं विद्यमान आमदार सुरेश धस हेही गेली २० ते २५ वर्षांपासून आमदार आहेत. तेही उजनी धरणातून शिंपोरामार्गे खुंटेफळ तलावात पाणी आणण्याची योजना मांडत असतात. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शिंपोरा-खुंटेफळ बोगदा कामाचा शुभारंभ झाला. आमच्या वाट्याचं ५.६८ टीएमसी पाणी द्या किंवा मी आणतो, असं ते सांगत असतात. मध्ये ५ वर्षासाठी आमदार झालेले बाळासाहेब आजबे यांनीही आष्टी तालुक्यासाठी उजनी धरणातून थेट पाइपलाइनद्वारे पाणी आणण्याची योजना मांडली, असं ते सांगत असतात. संपूर्ण मराठवाड्यात हे चित्र आहे. म्हणजे असे अनेकांनी अनेक दावे अनेक वर्षांपासून केले, पण आजही म्हणजे तब्ब्ल ७५ वर्षांनंतरही दुष्काळ कायम आहे. कोणतीच योजना पूर्ण होऊन, पाण्याचा वाद मिटून आणि हक्काचं पाणी मिळून प्रश्न सुटला नाही. कारण काय?…. कमालीची सहनशीलता…
(लेखक पत्रकार, राजकीय सामाजिक विश्लेषक.)

ईमेल [email protected]

Previous Post

मुंबईच्या जमिनींवरचा एसआरए घोटाळा!

Next Post

‘मोदीनॉमिक्स’चा भुलभुलय्या!

Next Post
‘मोदीनॉमिक्स’चा भुलभुलय्या!

‘मोदीनॉमिक्स’चा भुलभुलय्या!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.