
मोदींनी लोकांना गरिबीतून बाहेर काढले असल्याचा केलेला दाव्यात १५ वर्षांच्या काळात लोकसंख्येत झालेल्या लक्षणीय वाढीचाही समावेश आहे का? मोदींनी इतक्या लोकांना गरिबीतून बाहेर काढले तर ८० कोटी लोकांना मोफत अन्न दिले जाते, ती संख्या कमी का झाली नाही?
आपण देशातील ५० कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच केला. २०२०पासून दारिद्र्यरेषेखालील ८१ कोटी लोकांना मोफत अन्न दिले जाते. ते २०२८पर्यंत दिले जाणार आहे. त्याच्याशी मोदी यांचा दावा जोडला तर असा अर्थ होतो की मोदी यांच्या सरकारने हा भीमपराक्रम करण्याच्या आधी देशातील १३० कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली होते, त्यातले ५० कोटी त्यांनी त्या रेषेबाहेर काढले. भारताची लोकसंख्या आहे सुमारे १४० कोटी. याचा अर्थ मोदींच्या हाती सत्ता आली तेव्हा जवळपास संपूर्ण देशच दारिद्र््यात होता. ही आकडेमोड भल्याभल्या अर्थतज्ज्ञांनाही घाम फोडेल अशी आहे. एकीकडे हा दावा करताना त्यांनी देशातील उद्योगांनी सरकारच्या सवलती घेतल्या, पण कर्मचार्यांच्या वेतनात आणि रोजगारांत वाढ केली नाही, अशी आगपाखडही केली आहे. मी तुम्हाला खूप दिले. देतच गेलो. तुम्ही परतफेड मात्र केली नाही, असे ते फिक्कीच्या कार्यक्रमात तमाम उद्योजकांना सुनावत असताना त्यांच्या डोळ्यांसमोर कोणते दोन(च) चेहरे तरळत असतील, ते उघड आहे. उद्योगांनी नोकर्या वाढवल्या नाहीत, पगार वाढवले नाहीत आणि ५० कोटी जनता आपोआप दारिद्र््यरेषेखालून बाहेर आली? हा काय जादूचा प्रयोग आहे!
१९ नोव्हेंबर २०२६ रोजी दिल्लीतील भारत मंडपम येथे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या (फिक्की) शताब्दी संमेलनात बोलताना मोदींनी उद्योगपतींना रोजगार आणि वेतनवाढीबाबत थेट आणि कडक प्रश्न विचारताना सरकारी करसवलतींचा उल्लेख केला. २०१४मध्ये कॉर्पोरेट कराचा मूलभूत दर ३० टक्क्यांहून आता २२ टक्क्यांवर आणला, वैयक्तिक उत्पन्न १२ लाखांपर्यंत आयकरमुक्त केले, याचा उल्लेख केला. मात्र, कडक प्रश्न विचारल्यावर उद्योगविश्वाला ‘भारत प्रथम’ करण्यासाठी ते पुन्हा वीस वर्षांची मुदत देऊन मोकळे झाले. अदानी आणि अंबानी म्हणजे भारताचं संपूर्ण उद्योगविश्व आहे का?
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्रीय निवडणूक आयोगाने मतचोरी करून मोदींची सत्ता देशात आणली आहे, याबद्दल आता देशात आपल्या धडावर आपले डोके बाळगणार्यांच्या मनात तरी शंका राहिलेली नाही. त्यामुळेच दिवाळीआधी ‘ज्ञानेश, इट्स डन ब्रो’ म्हणून देशभर आंदोलने पेटली होती. नोव्हेंबर अखेर पुन्हा आंदोलने सुरू होतील. ज्ञानेशपाठोपाठ मोदी-शहा यांनाही जावे लागेल, असे वातावरण असताना ईडी, सीबीआय, आयटी, पोलीस, न्यायपालिका, निवडणूक आयोग यांना हाताशी घेऊन सत्तेला घातलेला विळखा मोदी सैल करायला तयार नाहीत. त्याहीपेक्षा भयावह विळखा अदानीने देशाला घातला आहे. आज गौतम अदानी यांचे उद्योग मुख्यतः पायाभूत सुविधा, ऊर्जा, लॉजिस्टिक्स आणि संबंधित क्षेत्रांत आहेत. १९८८मध्ये कमोडिटी ट्रेडिंगने सुरुवात करून आता भारत आणि जागतिक स्तरावर विस्तृत असलेला हा एक मोठा समूह आहे. पोर्ट्स आणि लॉजिस्टिक्स, ऊर्जा आणि युटिलिटीज, थर्मल पॉवर, नवीनीकरण ऊर्जा, सौर, पवन, हायब्रिड ऊर्जा, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन, सिटी गॅस, ग्रीन हायड्रोजन, सोलर मॅन्युफॅक्चरिंग, डेटा सेंटर्स, विमानतळ, अंबुजा सिमेंट आणि बिल्डिंग मटेरियल्स, खनिज आणि मटेरियल्स, कोळसा खनन, कॉपर, अॅल्युमिनियम, पेट्रोकेमिकल्स, माइनिंग सर्व्हिसेस, रोड्स आणि हायवेज, रोड ट्रान्सपोर्ट, डिफेन्स आणि एरोस्पेस, मीडिया, अॅग्रिफूड, खाद्यतेल, डेटा सेंटर्स आणि डिजिटल इन्प्रâा, ग्रीन मॅन्युफॅक्चरिंग, हायड्रोजन इकोसिस्टम ही अदानीच्या पायांखाली अल्लाद सरकवली गेलेली क्षेत्रे आहेत. उद्योगाच्या नावाखाली कुठेही जंगले नष्ट करण्याचा सैतानी परवाना अदानीला दिला जातो. संपूर्ण देशाची नाळ अदानीच्या हाती आहे. देशाला अदानी वाकवेल आणि झुकवेल तसे वाकावे आणि झुकावे लागेल. मोदी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत देशाचा श्वास गुदमरवू शकतात इतके सामर्थ्य अदानीवर केलेल्या उपकाराने त्यांच्यात आले आहे.
देशातील ५० कोटी लोक गरिबीतून बाहेर आल्याचा जागतिक बँकेच्या अहवालातही उल्लेख असला तरी तो थेट रोजगाराशी संबंधित नाही, हेही लक्षात घ्यावे लागेल. जागतिक बँकेच्या ऑक्टोबर २०२६च्या अहवालानुसार २०११ ते २०२३ दरम्यान भारतात सुमारे ४९.६ कोटी लोक दारिद्र््यरेषेबाहेर आले आहेत. हे आकडे मुख्यतः जागतिक बँकेच्या ४.२० डॉलर प्रतिदिन या निम्न-मध्यम-उत्पन्न दारिद्र्यरेषेवर आधारित आहे. दारिद्र्य फक्त उत्पनाच्या आधारावर मोजले जात नाही. जागतिक बँकेनुसार दारिद्र्याच्या दोन मुख्य पद्धती आहेत. पहिले अतिदारिद्र्य- हे २०११मधील २७.१ टक्क्यांवरून २०२३मध्ये २.६ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. दुसरी निम्न-मध्यम-उत्पन्न दारिद्र््यरेषा! बहुआयामी दारिद्र््यात आरोग्य, शिक्षण आणि जीवनमान- यात स्वच्छता, वीज, पाणी, घर, बँक खाते आदींचा समावेश होतो. २०१३-१४मध्ये सुमारे २९.१७ टक्क्यांवर असलेले हे दारिद्र््य २०२२-२३मध्ये ११.२८ टक्क्यांपर्यंत घसरले Dााहे. या काळात सुमारे २४.८ कोटी लोक बहुआयामी दारिद्र््यातून बाहेर आले आहेत. भारतातील तीव्र गरिबी २००५-०६मध्ये ५३.८ टक्क्यांवरून २०१९-२१मध्ये १६.४ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार मे २०१४नंतर मोदी सरकारच्या काळात ही घट अधिक वेगाने झाली असे दिसते, पण २०११-२०१४चा काळही या आकड्यात समाविष्ट आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारमधील धोरणे, आर्थिक वाढ आणि सामाजिक योजनांचा एकत्रित परिणामही या अहवालातून स्पष्टपणे जाणवतो. जागतिक बँकेने मजबूत उपभोग वाढ, रोजगार वाढ आणि सामाजिक हस्तांतर या तीन गोष्टींना श्रेय दिले आहे. ग्रामीण महिलांचा कामात सहभाग, २०१७-२०२३दरम्यान सुमारे १३.४ कोटी नोकर्यांची भर या बाबी यात नोंदवल्या आहेत. याशिवाय डिजिटल वितरणात जन धन खाती, आधार आणि मोबाइल, मूलभूत सुविधामध्ये स्वच्छ भारत अंतर्गत शौचालये, उज्ज्वला योजना, जल जीवन मिशन, सौभाग्य, पीएम आवास योजना, आयुष्मान भारत आदींचा समावेश आहे. नीती आयोगानेही उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये वेगाने सुधारणा दिसून आल्याचे नोंदवले आहे. अहवालात नोंद होणे म्हणजे देशाची प्रगती होणे असे आहे का? योजना आणि प्रत्यक्षात विकास याची सांगड घालता येते का? तेही तपासले पाहिजे. अलीकडेच महाराष्ट्रात दुष्काळ घोषित झाला. प्रत्येक शेतकर्याला पाच हजार रुपये मदतीची घोषणा झाली. दिवाळीच्या चार दिवस आदी काहींच्या खात्यात ही मदत जमा झाली. परंतु लाखो शेतकर्यांना ठेंगा दाखवण्यात आला आहे. त्यांची दखल घ्यायला प्रशासन तयार नाही. परंतु गोदी मीडिया काय दाखवतो, लिहितो, तर ‘शेतकर्यांची दिवाळी आनंदात!’ अशी ही अवस्था आहे.
मोदींनी लोकांना गरिबीतून बाहेर काढले असल्याचा केलेला दाव्यात १५ वर्षांच्या काळात लोकसंख्येत झालेल्या लक्षणीय वाढीचाही समावेश आहे का, ही बाब गुलदस्त्यात आहे. मोदींनी इतक्या लोकांना गरिबीतून बाहेर काढले तर ८० कोटी लोकांना मोफत अन्न दिले जाते, ती संख्या कमी का झाली नाही? एरवी जागतिक निर्देशांकावर विदेशी अहवाल म्हणून टीका करणारे सरकार आणि त्यांचा भाडोत्री
मीडिया हा अहवाल कसा स्वीकारतो?
अनेक आंतरराष्ट्रीय संस्था विविध विषयांवर जागतिक निर्देशांक तयार करतात. त्यात भूक, गरिबी, आनंद, लोकशाही, प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य, भ्रष्टाचार, मानवी विकास, पर्यावरण, महिला समानता, शांतता, कायद्याचे राज्य अशा अनेक विषयांचा समावेश होतो. साहजिकच भारताची आर्थिक प्रगती, जागतिक महासत्ता होण्याचा दावा आणि प्रत्यक्ष नागरिकांचे जीवनमान, सामाजिक स्थिती, स्वातंत्र्य व मूलभूत सुविधा याचे दर्शनही या निर्देशांकांमधून होते. सामाजिक परिस्थिती, जीवनमान आणि मानवी विकास यासाठी जागतिक भूक निर्देशांक आहे. यात कुपोषण, बालकांचे वजन, वाढ खुंटणे, बालमृत्यू मोजले जाते. यात १२२ देशांमध्ये भारताचा क्रमांक १००वा आहे. जागतिक आनंद निर्देशांकात जीवनाविषयी समाधान, सामाजिक आधार, उत्पन्न, आरोग्य, स्वातंत्र्य यांच्या मोजपट्टीवर भारत १४७ देशांमध्ये ११६व्या क्रमांकावर आहे. मानवी विकास निर्देशांकात आरोग्य, शिक्षण आणि उत्पन्न या घटकांत आपण १९३ देशांत १३०व्या क्रमांकावर येतो. जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांक भारताला १०९ देशांमध्ये ६६व्या स्थानावर नेतो. शाश्वत विकास उद्दिष्टांमधील आमची प्रगती १६७ देशांमध्ये ९४व्या स्थानावर आहे. सामाजिक विकासातील आरोग्य, शिक्षण, सुरक्षितता, मानवी हक्क, जीवनमान यात १७१ देशांमध्ये भारत ११२व्या स्थानावर आहे. लोकशाही, स्वातंत्र्य, राजकीय व्यवस्था व प्रशासन या वर्गवारीत लोकशाही निर्देशांकाची नोंद होते. त्यात निवडणुका, सरकारची कार्यक्षमता, राजकीय सहभाग, नागरी स्वातंत्र्य यात भारत ४१व्या स्थानावर आहे. पत्रकारिता स्वातंत्र्य, पत्रकारांची सुरक्षा, माध्यमांवरील दबाव यात १८०देशांमध्ये आपण तळाकडे घसरून १५७वा नंबर पटकावला आहे. कायद्याचे राज्य, न्यायव्यवस्था, भ्रष्टाचार, अधिकारांचे संरक्षण यात आपण ८८व्या क्रमांकावर येतो. सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचारात भारत ९१व्या स्थानावर आहे. विद्यापीठे, संशोधन, शैक्षणिक आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यातही भारत पिछाडीला पडला असून त्याने १५६वे स्थान गाठले आहे. अर्थव्यवस्था, शिक्षण, आरोग्य, राजकीय सहभाग यांतील महिलांच्या सहभागात भारत १४५ देशांमध्ये १३५व्या क्रमांकावर आहे. महिला व मुलींच्या विकासाशी संबंधित विषयात आपण ९१व्या स्थानावर आहोत. व्यवसाय, कर, सरकारी नियंत्रण, आर्थिक स्वातंत्र्य यात १३२, बाजारव्यवस्था, व्यापार, सरकारी आकारमान, आर्थिक स्वातंत्र्य यात ८८, पर्यटन व्यवस्था, पायाभूत सुविधा, सुरक्षितता, पर्यटन सुविधा यात ३९, जागतिक प्रतिमा, प्रभाव, प्रतिष्ठा, संस्कृती व मुत्सद्देगिरी यात ३०, पर्यावरण, हवामान आणि निसर्ग यात देश दुर्दशेकडे गेला आहे. शुद्ध हवा, पाणी, पर्यावरणीय आरोग्य, जैवविविधता, हवामान यात आपण शेवटून दुसरा क्रमांक पटकावला आहे, १७७ देशांमध्ये १७६व्या क्रमांकावर आहोत. ऊर्जा संक्रमण, ऊर्जा सुरक्षा, शाश्वतता यात ७१, जैवविविधता, वनसंरक्षण, निसर्ग संवर्धन यात १७६ वा क्रमांक गाठला आहे. अंतर्गत शांतता, युद्ध, हिंसाचार, सुरक्षा यामध्ये १६३ देशांत १२७ व्या स्थानावर आहोत. भारताची राजकीय, सामाज्िाक व आर्थिक अस्थिरता ७५व्या क्रमांकावर आहे. पासपोर्ट, जागतिक प्रभाव व इतर निर्देशांकही भारतासाठी समाधानकारक नाही. किती देशांत व्हिसाशिवाय किंवा व्हिसा ऑन अरायव्हल प्रवेश यामध्ये ८१व्या क्रमांकावर आहोत. शाश्वत विकासात ९४व्या क्रमांकावर भारत आहे. हे सगळे निर्देशांक भारत जगात कुठे आहे हे सांगतात.
लष्करी शक्ती, नवकल्पना, अर्थव्यवस्था आणि जागतिक प्रभावाच्या काही मापदंडांवर भारत चांगली कामगिरी करतो. परंतु भूक, मानवी विकास, महिला समानता, प्रेस स्वातंत्र्य, पर्यावरण आणि जीवनसमाधान यांसारख्या क्षेत्रांतील क्रमवारी वेगळे चित्र दाखवते. त्यामुळे भारताच्या प्रगतीचे मूल्यमापन केवळ जीडीपी किंवा आर्थिक आकारावर नव्हे, तर नागरिकांच्या प्रत्यक्ष जीवनमानावरूनही करावे लागणार आहे.
देशात महागाईचे सामान्यांना बसणारे चटके तीव्र होत आहेत. जागतिक महासत्तेचे मनोरे रचताना आपल्या देशातील गरिबांना मोफत धान्य दिले नाही तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे हे नजरेआड करायचे का? कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर पंतप्रधानांनी टाळेबंदीची घोषणा करताना गरिबांना पाच किलो धान्य मोफत देण्याची योजना सुरू केली. मोदी सरकारला या योजनेचा कालावधी सातत्याने वाढवावा लागला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) अहवालात म्हटले की, कोरोनाकाळात भारत सरकारच्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमुळे देशातील गरिबी थोपविण्यात बरीच मदत झाली. अन्य अहवालांनी देशातील गरीबी वाढल्याचे निष्कर्ष काढले होते. नंतर याला थेट व्होट बँकेशी जोडले गेले. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या राज्यात होणार्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अशा खिरापत योजनेचा लाभ होत असल्याचे सरकारला पटले आणि रेवडीवाटप जोरात सुरू राहिले. आता डिसेंबर २०२८पर्यंत धान्य मोफत दिले जाईल. यामुळे केंद्र सरकारवर १० लाख कोटींचा अतिरिक्त भार पडत आहे. सरकार दरवर्षी दोन लाख कोटी यावर खर्च करते. भारत हा तरुणांचा देश असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या हाताला काम देण्याची क्षमता सरकारमध्ये नाही. देशातील लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांची स्थिती वाईट आहे. आयटी क्षेत्रातही मोठी घसरण झाली आहे. गेल्या चार वर्षांत दोन लाख कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या. याआधीच्या १४ पंतप्रधानांनी जितके कर्ज घेतले होते त्यापेक्षा तिप्पट कर्ज मोदींनी गेल्या १२ वर्षांमध्ये घेतले आहे. मोदींनी ‘रेवडी कल्चर’ देशाच्या विकासासाठी अत्यंत घातक आहे असे सांगितले होते. परंतु मोफतच्या योजनांची आमिषे दाखवून मते घेण्याची संस्कृती त्यांनीच रुजवली. सामान्यजनांच्या करातून मोदी उद्योगपती मित्रांचे दहा लाख कोटींचे कर्ज माफ करतात, त्यांचा पाच लाख कोटींचा कर माफ करतात, त्याला कोणते ‘कल्चर’ म्हणायचे? कोणत्या उद्योगपतींना किती कर्ज माफ केले यावर माहितीच्या अधिकारात विचारले तर हा विषय गोपनीयतेच्या वर्गवारीत टाकला जातो. म्हणूनच मोदींच्या विकासाच्या वल्गना आणि भ्रमित करणारी आकडेवारी केवळ राजकीय स्वार्थापुरती आहे, जुमलेबाजी आहे, ती विश्वासार्ह नाही, असेच खेदाने म्हणावेसे वाटते.
