• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

महायुतीतील तडे आणि तडाखे!

योगेंद्र ठाकूर बेधडक

Marmik Team by Marmik Team
November 28, 2026
in बेधडक
0
महायुतीतील तडे आणि तडाखे!

नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अप) गटाला अनपेक्षित यश मिळाल्यामुळे सत्तेत बसलेल्या महायुती सरकारच्या दोन वर्षांच्या कारभारात एकवाक्यता, एकसूत्रता दिसत नाही. घटकपक्षांतील धुसफूस, एकमेकांविरुद्ध संशय, शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी ऐनवेळी स्थगिती देणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकमेकांविरुद्ध उमेदवार देणे, एकमेकांवर टीका, वेळप्रसंगी वैयक्तिक टीका-टिप्पणी करून चारित्र्यहनन करणे अशा एक ना अनेक कुरघोड्यांमुळे महायुतीला तडाखे बसले आहेत आणि कितीही एकोप्याचा देखावा केला तरी तिच्यात तडे गेले आहेत. आगामी निवडणुकीपर्यंत ही महायुती राहते की नाही असे चित्र सध्या दिसत आहे.

शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावले यांना रायगड जिल्हा पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर तेथील शिंदेसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील वाद संपले असे काहींना वाटले होते. गोगावले यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधातील तलवार सध्या म्यान केली असली तरी त्यांच्यातील चकमकी काही केल्या थांबत नाहीत. रोज नवनवीन वार-पलटवार पहावयास मिळत आहेत. शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी कुणाचाही आदेश आला तरी आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही तटकरेंना पाडणार असा जाहीर इशारा नुकताच दिला. येत्या काही दिवसांत ही ब्याद त्यांच्या पक्षातून बाहेर पडली तरी आपल्या पक्षात घेऊ नका, असेही ते म्हणाले. कर्जत-खालापूरचे शिंदेसेनेचे आमदार महेंद्र थोरवे हे देखील तटकरेंवर वेळोवेळी तोंडसुख घेताना पहावयास मिळतात. गोगावले, थोरवे आणि दळवी यांनी तटकरे यांच्या रायगडमधून साम्राज्याला तडाखे देण्यास सुरुवात केली असून रायगडचा पुढील खासदार शिंदेसेनेचा असेल अशी घोषणा गोगावलेपुत्र विकास गोगावले यांनी नुकतीच केली. त्याचवेळी तटकरे हा राक्षसी महत्त्वाकांक्षा असलेला माणूस आहे. त्यांना उपमुख्यमंत्री व्हायचे आहे, त्यासाठी ते कुठल्याही थराला जातील, असे सांगून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी तटकरे यांची चौकशी केली जावी, अशी मागणी शिंदेसेनेचे नेते रामदास कदम यांनी केली.

भाजप वि. शिंदेसेना
मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेत केलेल्या ५०० कोटींच्या ऑडियो क्लिपच्या कथित आरोपामुळे गेल्या महिन्यात महाराष्ट्रात खळबळ माजली होती. त्यावेळी शिंदे सेनेचे नेते रामदास कदम यांनी म्हटले होते की ही ऑडियो क्लिप ‘एआय’निर्मित नसून यामागे भाजपची कूटनीती आहे. मित्रपक्षाचे वर्चस्व संपवण्यासाठी एकनाथ शिंदेंचा केसाने गळा कापण्याचे काम भाजपमधील अस्तनीतीतील साप करीत आहे. याचा पुरावा म्हणून भाजप आमदार प्रसाद लाड आणि मनोज जरांगे एकत्रित जेवतानाचे व त्यांच्या चर्चेचे फोटो रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत झळकवले. त्याचवेळी, कदम यांच्या वक्तव्याकडे कुणी लक्ष देऊ नये, वयोमानामुळे ते काहीही असंबद्ध बडबड करतात, असा तडाखा लाड यांनी दिला.
ठाणे महानगरपालिकेत शिंदेसेना आणि भाजप एकमेकांसोबत असतानाही महानगरपालिकेचा कारभार एकदिलाने चालत नाही. बहुमताच्या जोरावर शिंदेसेना अनेक विषय आणि टेंडर मंजूर करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. एवढेच नाही तर भाजप नगरसेवकांनी शिंदेसेनेच्या मनमानी कारभाराविरुद्ध महापौरांच्या आसनासमोर ठिय्या आंदोलनही केले. सहा महिन्यांतच इथे महायुतीला तडे गेले आहेत. उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, नाशिक, अमरावती, जळगाव आदी महानगरपालिकांतही बर्‍याच वेळी सभागृहात शिंदे सेना आणि भाजप नगरसेवक एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना दिसतात. एकमेकांच्या उरावर बसतात. तरी ते सांगतात की महायुतीत एकी आहे.

शिंदे वि. फडणवीस
एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत मंजूर केलेले ११ तलाव संवर्धन प्रकल्प एप्रिल २०२६मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केले. इतकेच नाही तर त्यासाठी दिलेला निधीही व्याजासकट वसूल करण्याचे निर्देश दिले. शिंदेसेनेच्या मंत्र्यांकडील ओएसडी कमी केले. मंत्र्यांच्या अधिकाराला कात्री लावली. निधीवरही अंकुश ठेवला आहे. काही सरकारी कार्यक्रमांत उपमुख्यमंत्र्यांना डावलले गेले आहे. शिंदे यांना भाजपकडून वैयक्तिक लक्ष्य करण्यात येते, असा आरोप शिंदेसेनेचे नेते करतात. सत्तेसाठी एकत्र आलेल्या महायुतीतील घटकपक्षांचे नवलाईचे नऊ दिवस केव्हाच संपले आहेत. कारण ते वरवरचे ‘वधुवर’ आहेत. शिंदेंच्या निर्णयावर फडणवीसांनी स्थगिती दिली की लगेच शिंदे दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतात. मंत्रीमंडळ बैठकीत कधी शिंदे सेनेच्या मंत्र्यांची अनुपस्थिती ठरवून असते. तर कधी रुसून शिंदे आपल्या दरे या गावी जाऊन शेती करीत बसतात.
वनमंत्री आणि भाजपचे नेते गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद फार जुना आहे. शिवसेनेत असतानाही त्यांचे सख्य कधी नव्हते. शिंदेंच्या ठाणे-नवी मुंबईतील ‘क्लस्टर’ योजनेला नाईक यांनी सतत विरोध केला आहे. वरिष्ठांनी आदेश दिला तर शिंदेंचे ठाण्यातील वर्चस्व म्ाी मोडून काढीन, इथपर्यंत टोकाचे वक्तव्य नाईक करतात. दोघेही एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

ऑगस्ट २०२५मध्ये पालघर येथील कार्यक्रमात नाईकांनी शिंदेंचे पुरते वस्त्रहरण केले. शिंदेंना लॉटरी लागली पण कमावलेले टिकवता आले पाहिजे. किती कमावले यावर जनतेची नजर असते. त्यावर ‘शिंदे यांनी उठाव केला नसता तर भाजप सत्तेत बसला नसता आणि तुम्हाला मंत्रीपदही मिळाले नसते,’ असा पलटवार शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला. बदलापूर-अंबरनाथ नगरपरिषदेत शिंदेसेनेचे वर्चस्व आहे. या दोन्ही नगरपरिषदांत विकासकामाच्या नावावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून राज्य सरकारने चौकशी करावी अशी मागणी भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी केली.
मराठवाड्यातही भाजप आणि शिंदेसेना यांच्यात गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी आरोप-प्रत्यारोप झाले. हिंगोलीचे भाजप जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी स्वातंत्र्यदिनी ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यासाठी काही अधिकार्‍यांकडून पैसे घेतल्याचा आरोप शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी केला होता. त्यावर आपले पापकृत्य झाकण्यासाठी बांगर हे बेछूट आरोप करीत आहेत असा पटलवार भाजपने केला.

निवडणुकीतील पानिपत
ऑक्टोबर महिन्यात पार पडलेल्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत महायुतीतील घटकपक्षांनी एकमेकांसमोर उमेदवार दिले. एकमेकांचे उमेदवार पाडले. महायुती भक्कम असल्यामुळे या पाचही जागा जिंकेल अशा गर्जना राणा भीमदेवी थाटात मुख्यमंत्र्यासह सर्व महायुतीतील नेत्यांनी केल्या होत्या. त्यांच्यातील भांडणामुळे पाचपैकी फक्त दोन जागांवरच महायुतीचे उमेदवार विजयी झाले.

पुणे पदवीधर मतदारसंघावर राष्ट्रवादी (अप) गटाचा दावा होता. परंतु भाजपने त्यांना जागा न सोडल्यामुळे हा गट नाराज झाला. त्याचा तडाखा भाजपच्या उमेदवाराला बसला. तिथे राष्ट्रवादी (शप)च्या हर्षदा जाधव निवडून आल्या. पुण्यात शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपला मत देऊ नका असे जाहीर आवाहन केले होते. पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार भाजपचे कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात ऐनवेळी शिंदेसेनेने प्रा. सचिन सानप यांना पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपला विजयासाठी कमालीची पराकाष्ठा करावी लागली. संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातीन सतत तीन वेळा निवडून येणारे राष्ट्रवादी (अप)चे सतीश चव्हाण यांना शिंदेसेनेने तडाखा दिला आणि ते पराभूत झाले. महाविकास आघाडीचे डॉ. प्रतापसिंह पाटील विजयी झाले. त्यांच्या विजयानंतर शिंदेसेनेने जल्लोष केला. शिंदेसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी तर जाहीरपणे कबुली दिली की चव्हाणांचे साम्राज्य संपवण्यात माझा खारीचा वाटा आहे. तर पुणे आणि नागपूरमध्ये शिंदेसेनेने दगाफटका केल्याची टीका भाजपने केली. ‘महायुतीत राहायचे आणि आमचेच पाय तोडायचे’ हा शेखचिल्लीसारखा मूर्खपणा यापुढे खपवून घेणार नाही. असा सज्जड दम भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिंदेसेनेला दिला. महायुतीत एकोपा नाही हे पुन्हा सिद्ध झाले.

नगरसेवकांची पळवापळवी
भाजप आणि शिंदेसेना एकमेकांचे नगरसेवक पळवून आपली सत्ता काही नगरपालिका/नगरपरिषदांमध्ये मजबूत करीत आहेत. बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगरमध्येही हे चित्र दिसले. त्यानंतर आता सोलापूरमध्येही त्याची पुनरावृत्ती झाली आहे. इथे पाच नगरसेवकांना भाजपचे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे विश्वासू जयकुमार गोरे यांनी भाजपवासी करून घेत शिंदेसेनेला तडाखा दिला आहे. सत्तेच्या हव्यासापायी असंगाशी संग केल्याने धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी दयनीय परिस्थिती भाजपची झाली आहे. महायुतीला शेवटची घरघर लागली आहे.

Previous Post

थला फॉर अ रीझन!

Next Post

मुंबईच्या जमिनींवरचा एसआरए घोटाळा!

Next Post
मुंबईच्या जमिनींवरचा एसआरए घोटाळा!

मुंबईच्या जमिनींवरचा एसआरए घोटाळा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.