अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने गुरुवारी फायझर बायोटेकच्या कोरोना लसीला आपात्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. गेल्या ११ महिन्यापासून या लसीच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू होती.
ब्रिटनमध्ये एका नव्वद वर्षीय महिलेला चाचणी व्यतिरिक्त कोरोनाची पहिली लस देण्यात आल्यानंतर अमेरिकेतील अन्न व औषधी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. ब्रिटनने फायझर बायोटेककडून ८ लक्ष लसीच्या डोस प्राप्त केले असून २०२१ मध्ये अजून २० लाख लसी ब्रिटन आपल्या नागरिकांना द्यायला सुरुवात करणार आहे. एवढ्या लसीकरणाने ब्रिटनची एक तृतीयांश लोकसंख्या कोरोनामुक्त होण्यास मदत होणार आहे.
गुरुवारी अमेरिकेच्या अन्न व औषधी प्रशासनाच्या लसीकरण विभागाची बैठक झाली. यात अनेक आरोग्य विषयक तज्ञ आणि संशोधकांचा समावेश आहे. या बैठकीत फायझरच्या EUA वर चर्चा करण्यात आली. फायझर ही पहिली कंपनी आहे जिने आपल्या लसीला तत्काळ मान्यतेसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे पाठवले आहे.
फायझरने नोव्हेंबरमध्ये कोरोना लसीच्या वापरासाठी अमेरिकन अन्न व औषध प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. अमेरिकेबरोबर त्यांनी जपान, कॅनडा, युरोप आणि ऑस्ट्रेलियामध्ये देखील परवानगीसाठी अर्ज केला आहे. फायझर आणि बायो एन टेक या दोन्ही कंपन्या या लसीचे ५ कोटी डोस २०२० च्या अखेरपर्यंत तयार करणार असून १३ अब्ज डोस २०२१ अखेरपर्यंत तयार करणार आहे.
अन्न व औषधी प्रशासनाच्या या लसीकरण विभागाच्या मान्यतेमुळे सामान्य लोकांना ही लस देण्याची मान्यता अमेरिकन सरकारतर्फे देण्यात येणार आहे. अमेरिकेसाठी ही फार महत्वपूर्ण बाब आहे. कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. बुधवारी अमेरिकेत तब्बल ३००० लोकांनी आपला जीव गमावला आहे.
फायझरच्या नव्या लसीला आज अथवा उद्या अमेरिकन प्रशासनाची मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
फायझरची लस ही कोरोना विरोधात ९४% प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला असून फायझरच्या लसीचे डोस घेतल्यावर शरीरातील प्रतिजैविके तयार होण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढत जातो. ही लस अत्यंत प्रभावी असून दोन टप्प्यात देण्यात येते. या लसीमुळे जेष्ठ नागरिकांना कोरोनाचा सामना करण्यासाठी बळ मिळणार आहे.
फायझर लसीच्या प्रयोगावेळी ती १००० जेष्ठ नागरिकांना देण्यात आली होती, त्यांच्यापैकी फक्त ६० लोकांना कोरोनाची लागण झाली, यावरून ही लस किती प्रभावी आहे याचा अंदाज येतो. फायझरने भारतात लसीच्या चाचण्या घेण्यासाठी परवानगी मागितली असून अमेरिकन औषधी प्रशासनाने मान्यता दिल्यामुळे भारत सरकार देखील फायझरला लसीच्या परिक्षणासाठी परवानगी देईल, अशी दाट शक्यता आहे.
भारतात सध्या सिरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवेक्सिन यांच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू असून लवकरच या कंपन्यादेखील लसींना भारत सरकारची मान्यता मिळावी यासाठी अर्ज दाखल करणार आहेत.