२०२० हे वर्ष सर्वार्थाने मानवासाठी प्रचंड कष्टदायी ठरलेलं असलं तरी या वर्षाने निसर्गाला नवसंजीवनी दिली आहे. यंदा लॉकदाऊनमुळे जगभरात लोक आप आपल्या घरात बंदिस्त असल्याने कार्बन उत्सर्जनाची पातळी घटली असून गेल्या वर्षभरात वातावरण अधिक शुद्ध झाले आहे.
ग्लोबल कार्बन प्रोजेक्ट या जागतिक वैज्ञानिकांच्या समूहाने केलेल्या अभ्यासानुसार २०२० च्या शेवटी जागतिक कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण हे ३७ बिलियन टन इतके असणार आहे. गेल्यावर्षी हेच प्रमाण ४० बिलियन इतके होते. तब्बल ३ बिलियन टनची घट झाल्यामुळे हे वर्ष पर्यावरणाचा दृष्टीने आशादायी असल्याचे या गटाने नमूद केले आहे.
‘अर्थ सिस्टम सायंटिफिक डेटा’मध्ये ह्या अभ्यासाचे निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले आहेत.
संशोधकांच्या मते लोक घरी राहिल्यामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी आहे. विमान वाहतूक व कार वाहतुक ठप्प असल्यामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण घटले आहे. परंतु ‘Unlock’ सुरु झालं तसं कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण देखील वाढले आहे. रस्ते वाहतूक ही कार्बन उत्सर्जनाला सर्वाधिक कारणीभूत ठरत असल्याचे मत संशोधकानी व्यक्त केले आहे. वाढत्या उष्णतेला देखील रस्ते वाहतूक जबाबदार असल्याचे मत देखील शास्त्रज्ञांनी नोंदवले आहे.
लॉकडाऊनमुळे जरी कार्बन उत्सर्जनात घट झालेली असली तरी हा काही या प्रश्नावर उपाय नाही. या संशोधकांच्या गटाने काही महिन्यांपूर्वी कार्बन उत्सर्जनात ४ ते ७% घट होईल, असे अनुमान लावले होते. यासाठी त्यांनी कोरोनाचा प्रसार किती वेगाने होतो, याला प्रमाण मानले होते.
अमेरिकेत कार्बन उत्सर्जनात १२ टक्के घट नोंदवण्यात आली असून युरोपमध्ये हे प्रमाण ११ टक्के इतके आहे. चीनमध्ये मात्र हे प्रमाण फक्त १.७ टक्के नोंदवण्यात आले आहे. चीनमधून होणारे बव्हंशी उत्सर्जन हे उद्योगातून झाले आहे.
या अभ्यासातून दैनंदिन स्तरावर कार्बन डायॉक्साईड उत्सर्जनाचे प्रमाण देखील घटल्याची नोंद करण्यात आली आहे. या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे की २०१८ व २०१९ या दोन वर्षात कार्बन उत्सर्जन वाढीत फक्त ०.१ टक्के इतकाच फरक होता. शास्त्रज्ञ मानतात की २०१९ हे वर्ष पर्यावरणासाठी सर्वाधिक वाईट वर्ष असल्याचं मत तज्ञांनी नोंदवले आहे.
संशोधक मानतात की २०२० मध्ये लोकांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती मोठ्या प्रमाणात वाढली असून सध्या ऑनलाइन कामकाजाचा पर्याय लोकांना अधिक पसंत पडू लागला आहे, त्यामुळे अनेक लोक अनावश्यक प्रवास टाळण्यावर भर देत आहेत. जर हा ट्रेंड कायम राहिला तर भविष्यात याचा पर्यावरणावर सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.