• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

इथेही अंधभक्तांवर हीच वेळ येणार आहे…

रवींद्र मराठे रवी-किरण

Marmik Team by Marmik Team
November 21, 2026
in विशेष लेख
0
इथेही अंधभक्तांवर हीच वेळ येणार आहे…

एका नेत्याच्या समर्थकांची गोष्ट नाही. अंधभक्ती कोणत्याही झेंड्याखाली, कोणत्याही विचारसरणीत, कोणत्याही नेत्याच्या नावाने जन्माला येऊ शकते; उद्या ती आजच्या विरोधकांच्या घरातही जन्मू शकते. म्हणून हा आरसा सगळ्यांसाठी आहे.

४नोव्हेंबर २०२६. अमेरिकेतल्या मध्यावधी निवडणुकांचे निकाल लागून काही तासच उलटले होते. प्रचारात डोनाल्ड ट्रम्प मतदारांना सांगत होते, ‘मीच मतपत्रिकेवर आहे असं समजा.’ मतदारांनी ते अक्षरशः तसंच समजलं आणि प्रतिनिधी गृह डेमोक्रॅट्सच्या हाती सोपवलं. रिपब्लिकनांचा बालेकिल्ला टेक्सासही हादरला. निकालाच्या रात्री ट्रम्प लिहीत होते, ‘मी मतपत्रिकेवर नव्हतो; असतो, तर प्रचंड बहुमताने जिंकलो असतो!’ पण खरी गंमत दुसर्‍या सकाळी सुरू झाली. कालपर्यंत ट्रम्प यांच्या प्रत्येक शब्दाला अमृतवचन मानणारे रिपब्लिकन नेते आणि भाष्यकार अचानक ‘दिशा बदलण्याची’ भाषा बोलू लागले. उमेदवार चुकले, व्हाइट हाऊसनेच घात केला, आम्ही तर आधीच सावध केलं होतं, वगैरे वगैरे… अमेरिकन मीडियाने त्याला गंमतीने ‘४ नोव्हेंबर क्लब’ असे नाव दिले आहे… आणि त्या क्षणी मला आपल्याकडचा एक जुना दिवस आठवला…
१६ मे २०१४. सकाळचे दहा वाजलेले. टीव्हीच्या पडद्यावर आकड्यांची शर्यत सुरू होती आणि घराघरांत, चहाच्या टपर्‍यांवर, ऑफिसच्या
कॉरिडॉरमध्ये एक विचित्र रूपांतर घडत होतं. कालपर्यंत ‘थांबा, पाहू या’ म्हणणारे दुपारपर्यंत ‘मी तर आधीपासूनच सांगत होतो’ म्हणू लागले. विजयाला शंभर बाप असतात, असे म्हणतात; त्या दिवशी शंभर नव्हे, कोट्यवधी बाप उभे राहिले. जिंकणार्‍याच्या पंगतीत ताट मांडण्याची घाई ही राजकारणातली सर्वात जुनी आणि म्हटलं तर सर्वात प्रामाणिक भावना आहे. उशिरा पंगतीत बसलेल्यांचं एक दुखणं असतं- त्यांना आपली निष्ठा सतत सिद्ध करावी लागते. म्हणून ते सर्वात जोरात घोषणा देतात, सर्वात तिखट शिव्या देतात आणि प्रश्न विचारणार्‍याला सर्वात आधी ‘देशद्रोही’ ठरवतात. नव्याने दीक्षा घेतलेल्यांचा उत्साह जुन्या पुजार्‍यांपेक्षा नेहमीच जास्त असतो.
पण कोणत्याही पंगती कायमच्या नसतात… समजा, एखाद्या सकाळी या देशाच्या मतदाराने कौल बदलला, तर त्या सकाळी सर्वात मोठी पंचाईत कोणाची होईल? नेत्याची नाही. नेत्याकडे पराभवाची भाषा तयार असते. ‘जनतेचा कौल शिरसावंद्य’ हे वाक्य कुठल्याही नेत्याच्या खिशात कायम असतं. पंचाईत होईल ती त्या लाखो अंधभक्तांची, ज्यांनी दहा-बारा वर्षं प्रत्येक निर्णयाचा डोळे मिटून बचाव केला आणि ज्यांना आता आरशासमोर उभं राहून स्वतःशी एक अवघड संवाद साधायचा आहे.

पराभवाची पहिली सकाळ
कल्पना करा. निकालानंतरची पहिली सकाळ. टीव्हीवर तेच चेहरे, तेच स्टुडिओ, तिच भडक ग्राफिक्स; फक्त सूर बदललेला. ‘हा मोदींचा पराभव नाही, स्थानिक उमेदवारांचा आहे.’ ‘संघटनेत समन्वय नव्हता.’ ‘मतदार कृतघ्न निघाला.’ पण स्पष्टीकरणांचा एक क्रूर नियम असतो- जितकी जास्त स्पष्टीकरणं, तितकी कमी विश्वासार्हता. ज्याला कालपर्यंत ‘युगपुरुष’ आणि ‘अवतार’ म्हटलं जात होतं, त्याच्याबद्दल आता खासगीत कुजबुज सुरू होते, ‘खरं तर काही चुका झाल्या हो.’ आणि मग प्रत्येक कुटुंबात, प्रत्येक सोसायटीत, प्रत्येक कँटीनमध्ये एक नवा क्लब जन्म घेतो. त्या क्लबचं नाव- ‘मला तर तेव्हाच शंका होती’ क्लब. त्याचे सदस्य ओळखायला फार अक्कल लागत नाही. ‘मी मनातून नाराजच होतो.’ ‘मी घरी बोललो होतो, कोणी ऐकलंच नाही.’ ‘व्यक्ती वेगळी, विचारधारा वेगळी.’ ‘मी मोदींना नाही, देशाला पाठिंबा दिला होता…’ जणू गेली दहा वर्षं सोशल मीडियावर रोज सकाळी शिव्यांचा रतीब घालण्याचं काम कुणा दुसर्‍याच माणसाने वेषांतर करून केलं होतं!
आणि पहिल्याच रात्री एक मूक क्रांती घडेल- २०२४मध्ये ज्यांनी आपल्या नावापुढे अभिमानाने ‘मोदी का परिवार’ हे अभिधान जोडलं होतं, त्यांची ती शेपटी रातोरात गळून पडेल. भगव्या प्रâेममधले फोटो जाऊन तिथे सूर्यास्त, देवघर, नातवंडांचे हसरे चेहरे आणि ‘शांत राहा, आनंदी राहा’ असे सुविचार येतील. ज्या ट्विटर हँडलवरून रोज सकाळी विरोधकांवर तोफा डागल्या जात होत्या, ते अचानक ‘हँडल आता उपलब्ध नाही’ असं सांगू लागतील. डिजिटल वेषांतराचा हा सर्वात वेगवान प्रयोग असेल.
माध्यमांतला सोहळा तर बघण्यासारखा असेल. जे सूत्रसंचालक दहा वर्षं फक्त विरोधकांनाच पिंजर्‍यात उभं करत राहिले, ते एका रात्रीत सत्ताधार्‍यांवर गरजू लागतील आणि स्वतःला ‘सदैव निर्भीड’ घोषित करतील. प्रेक्षक विसरतील, असा त्यांचा भरवसा. पण डिजिटल युगात विसरणं ही चैन उरलेली नाही. प्रत्येक जुना व्हिडिओ, प्रत्येक ट्वीट, प्रत्येक पोस्ट हजारो स्क्रीन शॉटमध्ये जिवंत आहे. इंटरनेट माफ करत नाही आणि विसरत तर अजिबातच नाही.
आणि मग येतं सर्वात रंजक दृश्य. काही भक्तांना रिकामं देव्हारे सहन होत नाहीत. एक मूर्ती पडली की ते लगेच दुसरी शोधतात- आज नेता, उद्या त्याचा उत्तराधिकारी, परवा एखादा नवा चेहरा. कारण त्यांची निष्ठा विचारावर नसते, ती पूजेच्या सवयीवर असते. अशांना माफी मागायची गरजच वाटत नाही; त्यांच्या मते चूक मूर्तीची होती, पुजार्‍याची नव्हे. पण या धावपळीत मूळ प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो, पूजा करण्याची ग्ारजच का वाटली? ‘यापुढे मी कोणाचा भक्त नाही’ म्हणणं सोपं आहे, पण, ‘मी कधी कोणाचा भक्त होतोच कुठे’ म्हणणं अशक्य आहे, कारण स्मृती कधीच खोटं बोलत नाही. ते व्हॉट्सअ‍ॅपच्या जुन्या मेसेजेसमध्ये, फेसबुकच्या पोस्टमध्ये, कुटुंबाच्या ग्रुपवरच्या ‘फॉरवर्डेड मेनी टाइम्स’मध्ये पुरावे गाडलेले आहेत.
८ नोव्हेंबर २०१६ ची रात्र आठवा. रात्री आठ वाजता एक घोषणा झाली आणि पाचशे-हजारच्या नोटा क्षणार्धात कागद झाल्या. दुसर्‍या दिवसापासून एटीएमसमोर अजगरासारख्या रांगा. काळा पैसा संपणार, दहशतवाद्यांचं कंबरडं मोडणार, नव्या नोटेत म्हणे जीपीएस चिप! ‘सीमेवर जवान उभे राहतात, तुम्ही रांगेत उभे राहू शकत नाही?’ असं विचारणार्‍यांनी रांगेत घामाघूम झालेल्या आजोबांच्या प्रश्नांना जागाच ठेवली नाही. पुढे रिझर्व्ह बँकेनेच सांगितलं की रद्द झालेल्या नोटांपैकी ९९ टक्क्यांहून अधिक नोटा बँकांत परत आल्या. त्या रात्री ‘सरकारचं चुकलं असेल का?’ असं विचारणारा देशद्रोही ठरत होता. आज त्या प्रश्नाची माफी कोण मागणार?
मार्च २०२०. चार तासांच्या नोटीसवर १३० कोटींचा देश कुलूपबंद झाला. बाल्कनीत टाळ्या, थाळ्या आणि दिवे; आणि खाली महामार्गांवर लाखो मजूर, डोक्यावर बोचकी, कडेवर पोरं, शेकडो किलोमीटरची पायपीट. त्यांच्या पायांतले फोड कोणाच्याच सेल्फीत आले नाहीत. वर्षभराने, एप्रिल-मे २०२१च्या दुसर्‍या लाटेत, रुग्णालयं ऑक्सिजनसाठी याचना करत होती, स्मशानांबाहेर रांगा लागल्या होत्या आणि काही जण मदत मागणार्‍यांनाच दटावत होते, ‘नकारात्मकता पसरवू नका!’
कृषी कायद्यांच्या वेळी वर्षभर दिल्लीच्या सीमेवर थंडी-ऊन झेलत बसलेल्या शेतकर्‍यांना कोणी खलिस्तानी म्हटलं, कोणी दलाल, कोणी ‘आंदोलनजीवी’ आणि मग नोव्हेंबर २०२१मध्ये सरकारनेच ते कायदे मागे घेतले. ज्यांना शिव्या दिल्या, त्यांची माफी राहिली बाजूला; शिव्या देणारे निर्विकारपणे पुढच्या मुद्द्याकडे सरकले. फेब्रुवारी २०२४मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना एकमताने असंवैधानिक ठरवली. मणिपूर महिनोन महिने धगधगत राहिलं आणि ‘अबकी बार चारशे पार’च्या गर्जनेनंतर २०२४चा निकाल आला: भाजपला २४० जागा, बहुमतापेक्षा ३२ कमी, २०१९च्या ३०३पेक्षा कितीतरी खाली. सरकार उभं राहिलं, पण मित्रपक्षांच्या टेकूवर. आपल्या महाराष्ट्रात तर भाजपच्या जागा २३वरून थेट ९ वर आल्या. ४००चं स्वप्न पाहणार्‍यांना मतदारांनी साध्या गणिताचा धडा दिला.
यातल्या प्रत्येक वेळेला तेच झालं. प्रश्न विचारणारे पत्रकार ‘प्रेस्टिट्यूट’, असहमत विचारवंत ‘अर्बन नक्षल’, आंदोलक विद्यार्थी ‘टुकडे-टुकडे गँग’ ठरले आणि टीका करणारा सामान्य नागरिक थेट ‘देशद्रोही’ ठरला, त्याला ‘पाकिस्तानात जा’ हा सल्ला. हे शब्द रोज, हजारो तोंडांनी, लाखो वेळा वापरून धारदार केले गेले. शब्द फेकताना हलके असतात; परत घेताना मात्र डोंगराएवढे जड होतात. इथल्या प्रत्येक घटनेसोबत एक तारीख आहे, प्रत्येक तारखेसोबत एक स्क्रीनशॉट आणि प्रत्येक स्क्रीनशॉटखाली एक नाव. कधी शेजार्‍याचं, कधी मित्राचं, आणि बहुतेक वेळा आपलं स्वतःचं. इतिहास पुस्तकांत लिहिला जायचा; आता तो आपल्या फोनच्या गॅलरीत, आपल्याच अंगठ्याने लिहिला गेला आहे. आता सांगा, या यादीतल्या कोणत्या घटनेची माफी मागायची? आणि कोणत्या तोंडाने?

भित्रेपणा की हिशेब?
काही जण म्हणतील, ‘आम्ही घाबरलो होतो.’ काहींच्या बाबतीत ते खरंही असेल. नोकरी जाण्याची भीती, ट्रोल्सच्या झुंडीची भीती, तपास यंत्रणांच्या नोटिशीची भीती, धंदा बुडण्याची भीती. पण सगळ्यांच्या बाबतीत ते खरं नाही. भित्रेपणा आणि संधिसाधूपणा यात मूलभूत फरक आहे. भ्यालेला शरण जातो; संधिसाधू सौदा करतो. काही वृत्तवाहिन्यांना टीआरपी हवा होता, काही उद्योगपतींना कंत्राटं, काही नेत्यांना मंत्रिपदं, काही विचारवंतांना समित्यांवरच्या खुर्च्या आणि काही सामान्य माणसांना फक्त ‘आपण जिंकणार्‍या टोळीत आहोत’ ही उबदार भावना. हा सगळा व्यवहार होता. आणि व्यवहारात कोणीच निर्दोष नसतो- जितका फायदा उचलला, तितकीच जबाबदारी. जो भीतीपोटी गप्प बसला, त्याच्यासाठी माफी तुलनेने सोपी आहे. ती प्रामाणिक असते आणि समाज ती स्वीकारतोही. पण ज्याने उत्साहाने, चवीने, स्वखुशीने इतरांची हेटाळणी केली, त्याला ते वाक्य वापरताच येत नाही. त्याला खरं बोलावंच लागतं, आणि ते खरं फार कडू आहे, ‘मला ते आवडत होतं.’ 

कौटुंबिक ग्रुपमधली शांतता
एक दृश्य पाहू. रविवारची दुपार. ‘आपलं कुटुंब’ नावाचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप. त्यावर एक काका आहेत, ज्यांनी गेली दहा वर्षं रोज सकाळी ‘सुप्रभात’च्या फुलांसोबत एक फॉरवर्ड पाठवलं- कधी तथाकथित ‘लपवलेला इतिहास’, कधी ‘देशद्रोही विरोधक’, कधी नेहरूंबद्दलची एखादी ‘धक्कादायक’ माहिती. एका पुतण्याने एकदा पुरावा मागितला, तर अख्ख्या ग्रुपसमोर ऐकावं लागलं, ‘तू तर पाकिस्तानी वाटतोस!’ आता निकाल लागलाय. काका शांत आहेत. ग्रुप शांत आहे. पुतण्याही काही बोलत नाही. त्या शांततेत एक माफी दबा धरून बसलेली आहे. ती बाहेर यायला फक्त दोन शब्द लागतात, ‘मी चुकलो.’ पण हे दोन शब्द दोन तासांच्या भाषणापेक्षा जड असतात.
आणि इथे पुतण्याचीही परीक्षा आहे. त्याच्या बोटांना खाज सुटलेली आहे. दहा वर्षांचा राग, अपमानाचे ते सगळे क्षण, एका ‘काय काका, आता बोला!’मध्ये ओतून टाकायचा मोह प्रचंड आहे. एक मीम, एक टोमणा, एक जुना स्क्रीनशॉट; बस्स, हिशेब चुकता! पण तो क्षणिक विजय त्या ग्रुपला कायमचं स्मशान करून टाकेल. काका कधीच माफी मागणार नाहीत; उलट नव्या जोमाने बचावाच्या खंदकात उतरतील. सुडाच्या आनंदापेक्षा संयमाचं मौन कधी कधी जास्त क्रांतिकारी असतं.
माफी इतकी अवघड का? कारण भक्ती हे केवळ राजकीय मत नसतं, ती ओळख बनते. त्यात मित्र असतात, मंडळं असतात, फॉलोअर्स असतात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दहा वर्षांच्या भांडणांचं समर्थन असतं. ‘मी चुकलो’ म्हणणं म्हणजे ती सगळी भांडणं, तुटलेली नाती, दुरावलेले भाऊ, अबोला धरलेले जुने मित्र, हे सगळं व्यर्थ होतं हे मान्य करणं. म्हणूनच माणूस पुराव्यापेक्षा सवयीला कवटाळतो. मानसशास्त्र याला ‘सन्क कॉस्ट फॅलसी’ म्हणतं- जितकं जास्त आपण एखाद्या गोष्टीत गुंतवतो, वेळ, भावना, प्रतिष्ठा, तितकं तिच्यातून बाहेर पडणं कठीण होतं. हरत चाललेल्या जुगार्‍याचा पुढच्या डावावर जसा विश्वास असतो, तसाच भक्ताचा पुढच्या स्पष्टीकरणावर. आणखी एक तर्क, आणखी एक बहाणा, आणखी एक वर्ष आणि प्रत्येक बहाण्यासोबत माफीची किंमत चक्रवाढ व्याजाने वाढत जाते. भक्तीची माफी हे कुठल्या राजकीय पक्षाला दिलेलं उत्तर नसतं; ते स्वतःच्या आरशाला दिलेलं उत्तर असतं.
आपल्या महाराष्ट्रातलं चित्र तर आणखी जवळचं, आणखी बोचरं आहे. पुण्या-मुंबईच्या सोसायट्यांत एकेकाळी ‘आपण कुणाच्याच बाजूचे नाही’ म्हणणार्‍यांनी कधी हळूच, कधी गर्जत, एका बाजूचा झेंडा खांद्यावर घेतला. गणेशोत्सवाच्या मंडपात, ऑफिसच्या चहाच्या टपरीवर, लग्नाच्या पंगतीत राजकारण घुसलं आणि वर्षानुवर्षांची मैत्री दाराबाहेर उभी राहिली. उद्या त्याच पंगतीत शेजारी बसून ‘जाऊ दे रे, सोडून दे’ म्हणायची वेळ आली, तर हात आधी कोण पुढे करणार? पुढे केलेला हात ही माफीची पहिली पायरी आणि तो धरणं ही क्षमेची. टाळी दोन्ही हातांनीच वाजते.
इथे एक भेद करायलाच हवा. जे नेते आणि प्रचारक जाणूनबुजून द्वेष पेरत राहिले, खोटे व्हिडिओ आणि अपप्रचार हत्यार म्हणून वापरत राहिले, त्यांची जबाबदारी वेगळी आणि कितीतरी मोठी आहे. लोकशाहीत त्याचा हिशेब व्हायलाच हवा. संसदेत, न्यायालयात, माध्यमांत. पण तो सुडाच्या नावाने नव्हे, सत्याच्या नावाने. दुसरीकडे, जे सामान्य मतदार वेगवेगळ्या कारणांनी या लाटेत सामील झाले, कोणी राममंदिरासाठी, कोणी स्थैर्यासाठी, कोणी घरच्या दबावामुळे, कोणी फक्त ‘दुसरा पर्यायच दिसत नव्हता’ म्हणून, त्यांना सततच्या तुच्छतेने वागवलं तर ते आणखी घट्ट आपल्या कोषात जातील. ‘अरे, तुम्ही तर अंधभक्त!’ अशी हेटाळणी केली की संवादाचं दार धाडकन बंद होतं.
व्हेनेझुएलाचे लेखक आंद्रेस मिगेल रोंदोन यांनी ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळाच्या सुरुवातीला अमेरिकनांना आपल्या देशाच्या अनुभवातून असाच इशारा दिला होता. चावेझ-समर्थकांना मूर्ख ठरवत राहिल्याने समाज दुभंगला आणि ती दरी पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचली, असं त्यांचं निरीक्षण होतं. त्यांचा सल्ला साधा होता- ध्रुवीकरणाला खतपाणी घालू नका, ते निःशस्त्र करा. भारतात हे आणखी कठीण आहे, कारण आपलं ध्रुवीकरण केवळ मतपेटीपुरतं नाही; ते धर्म, जात, भाषा, ताटातलं अन्न आणि अंगावरचे कपडे इथपर्यंत झिरपलं आहे. म्हणूनच अशी सकाळ उगवलीच, तर पुढचा रस्ता सुडाचा नसावा, संवादाचा असावा. विस्मरणाची गरज नाही; पण द्वेषाचीही नाही.
भक्तीची माफी म्हणजे पक्ष बदलणं नव्हे. नवा झेंडा हाती घेऊन तेवढ्याच जोशात दुसर्‍या कुणाचा जयघोष सुरू करणं ही माफी नाही; तो फक्त नव्या भक्तीचा श्रीगणेशा आहे. खरी माफी म्हणजे प्रश्न विचारण्याची सवय अंगी बाणवणं. नेता कोणताही असो, सत्ता कुणाचीही असो: ‘हे का?’, ‘कुणाच्या फायद्यासाठी?’, ‘पुरावा काय?’ हे तीन प्रश्न विचारायला शिकणं.
‘मला तर तेव्हाच शंका होती’ म्हणणार्‍यांना एकच विचारायचं आहे. मग तेव्हा तोंड का उघडलं नाहीत? आणि ज्यांना खरंच आता जाग आलीय, त्यांना एकच सांगायचं आहे. उशीर झाला असला तरी ‘मी चुकलो’ हे वाक्य उच्चारायला अजून वेळ आहे. ते बोला. ते कठीण आहे, पण तीच लोकशाहीच्या तब्येतीची खरी नाडी आहे. ज्या देशात सत्ताधारी चुकू शकतात आणि समर्थक ते कबूल करू शकतात, तोच देश खर्‍या अर्थाने प्रौढ असतो.
आणि शेवटी, ही फक्त एका नेत्याच्या समर्थकांची गोष्ट नाही. अंधभक्ती कोणत्याही झेंड्याखाली, कोणत्याही विचारसरणीत, कोणत्याही नेत्याच्या नावाने जन्माला येऊ शकते; उद्या ती आजच्या विरोधकांच्या घरातही जन्मू शकते. म्हणून हा आरसा सगळ्यांसाठी आहे. उजव्यांसाठी आणि डाव्यांसाठी, सत्ताधार्‍यांसाठी आणि विरोधकांसाठी. आरसा कोणाचीच बाजू घेत नाही; तो फक्त दाखवतो. प्रश्न इतकाच आहे: त्यात पाहण्याची हिंमत आपल्यात आहे का?

(लेखक अमेरिकेतील रिचमंड, व्हर्जिनिया येथे राहणारे राजकीय विश्लेषक असून ते २५ वर्षांहून अधिक काळ परदेशात वास्तव्य करीत आहेत.
ईमेल पत्ता : [email protected]

 

Previous Post

खळबळ माजवा, आत्मचरित्र खपवा!

Next Post

दिवाळी संपली! काजळी दूर करण्याची वेळ आली!

Next Post
दिवाळी संपली! काजळी दूर करण्याची वेळ आली!

दिवाळी संपली! काजळी दूर करण्याची वेळ आली!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.