
म्युच्युअल फंड म्हणजे अनेक लोकांचे पैसे एकत्र करून तज्ज्ञांकडून केलेली गुंतवणूक. त्यात कमी धोका असतो आणि स्थिर वाढ असते. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घेणे, शिकणे आणि संयम ठेवणे खूपच गरजेचे आहे.
पु ण्यात राहणारा सहावीत शिकणारा नवल अभ्यासात तर हुशार होताच, पण त्याहूनही जास्त त्याला नवीन गोष्टी जाणून घेण्याची प्रचंड आवड होती. ‘का?’, ‘कसं?’, ‘मग पुढे काय?’ असे प्रश्न त्याच्या तोंडामध्ये कायम असायचे. एकदा सकाळी घरी चहा घेताना त्याचे बाबा आणि आई काहीतरी गंभीर चर्चा करत होते. ‘या वेळी शेअरमध्ये थोडी गुंतवणूक वाढवायला हवी,’ बाबा म्हणाले. आई म्हणाली, ‘हो, पण म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी चालू ठेवणंही महत्त्वाचं आहे. हे शब्द नवलच्या कानावर पडले. त्याच्या डोक्यात हे काय आहे, असा प्रश्न घोळू लागला होता. त्याने आईला विचारले, शेअर म्हणजे काय? त्यावर ती घाईत म्हणाली, ‘आम्हाला उशीर होतोय. तुला संध्याकाळी सांगते, ठीक आहे?’
नवल थोडा नाराज झाला. काही न बोलता शाळेत गेला. शाळेत जाताना त्याच्या मनात तोच विषय घोळत होता. शेअर आणि फंड हे नक्की काय असतं? संध्याकाळी शाळेतून आल्यावर नवल सरळ गच्चीत गेला. तिथे त्याचे आजोबा आरामखुर्चीत बसले होते. नवल त्यांच्या जवळ बसला आणि त्याने त्यांना विचारलं, ‘आजोबा, शेअर आणि म्युच्युअल फंड म्हणजे काय?’ हे ऐकून आजोबा थोडे आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारलं, ‘नवल, हा प्रश्न कुठून आला तुझ्या डोक्यात?’
नवल म्हणाला, ‘आज सकाळी आई-बाबा बोलत होते. मला समजलं नाही, पण मला ते समजून घ्यायचे आहे. आजोबांच्या चेहर्यावर समाधान दिसत होते. ते म्हणाले, ‘नवल, माणूस पैसे कमावतो, म्हणजे काय हे तुला माहिती आहे.’ नवल म्हणाला, ‘हो. मोठी माणसं जी कामं करतात, त्याबदल्यात त्यांना पैसे मिळतात पगार म्हणून.’
आजोबा म्हणाले, ‘बरोबर. हे झालं उत्पन्न. त्यातले काही पैसे योग्य ठिकाणी गुंतवणंही तितकंच महत्त्वाचं असतं.’
‘का आजोबा?’ नवलने लगेच विचारलं.
‘कारण पैसे साठवले तर ते तेवढेच राहतात. पण योग्य ठिकाणी गुंतवले तर ते वाढतात.
‘म्हणजे पैसे आपोआप वाढतात?’
आजोबा हसले, ‘आपोआप’ नाही. समजून, विचार करून गुंतवले तर वाढतात! चल, एक उदाहरण देतो. समज तुझा मित्र सतीश याने एक चॉकलेटची फॅक्टरी सुरू केली.’
नवल लगेच म्हणाला, ‘वा! मग मी रोज मोफत चॉकलेट खाईन.’
आजोबा हसले, असं नाही रे, ऐक. सतीशला फॅक्टरी मोठी करायला आणखी पैसे हवेत. मग तो म्हणतो की मी माझ्या फॅक्टरीचे छोटे-छोटे भाग करतो आणि लोकांना विकतो. ते छोटे भाग म्हणजेच शेअर्स.
नवल विचारात पडला. ‘अच्छा, म्हणजे मी त्यातला एक भाग घेतला तर…’

‘तर तू त्या फॅक्टरीचा छोटासा मालकच झालास, तुझ्या हिश्श्यापुरता.’ आजोबा म्हणाले, ‘समज एक मोठा केक आहे. तो १० तुकड्यांमध्ये कापला. प्रत्येक तुकडा म्हणजे एक शेअर. तुझ्याकडे दोन तुकडे असतील, तर केकचा २० टक्के भाग हा तुझा.’
नवलने लगेच हिशोब केला. ‘म्हणजे माझ्याकडे जास्त शेअर्स असतील तर मी मोठा मालक. बरोबर ना? पण, यातून पैसे कसे वाढतात?’
आजोबा म्हणाले, ‘समज, तू १०० रुपयांचा शेअर घेतलास. कंपनी चांगला नफा कमावत असेल, तर काही दिवसांनी त्याची किंमत २५० रुपये होते. म्हणजे तू शेअर विकलास तर तुला १५० रुपयांचा फायदा झाला. वाढले ना पैसे?’
नवल म्हणाला, ‘पण मी नाही विकला शेअर तर?’
आजोबा म्हणाले, ‘तरी तुझा फायदा होतोच. कंपनीला नफा झाला तर तुझ्याकडे किती शेअर आहेत, त्या प्रमाणात त्यातला काही हिस्सा तुला देते. त्याला म्हणतात डिव्हिडंड.’
अरे वा, बेस्टच आहे हे, असं म्हणत आनंदलेल्या नवलला आजोबा म्हणाले, ‘पण लक्षात ठेव. जसा कंपनीला नफा होतो, तसा तोटाही होऊ शकतो.’
‘तोटा?’ नवल गांगरला. ‘हो. कंपनी तोट्यात गेली तर शेअरची किंमत खालीही जाऊ शकते. म्हणून तिथे विचार करून गुंतवणूक करायला हवी.’
नवल म्हणाला, ‘आता मला म्युच्युअल फंड म्हणजे काय ते सांगा ना, आजोबा!
आजोबा म्हणाले, ‘तोही समजून घ्यायला सोपा आहे. समजा, तुमच्या वर्गातील १० मुलांनी पैसे जमा केले आणि एक मोठी
चॉकलेटची बास्केट घेतली. त्यात वेगवेगळ्या चॉकलेट्स असतील ना? ती बास्केट म्हणजे म्युच्युअल फंड. त्यात अनेक लोकांचे पैसे एकत्र जमा होतात. मग एक तज्ज्ञ, ज्याला फंड मॅनेजर असे म्हणतात, तो पैसे वेगवेगळ्या शेअर्समध्ये गुंतवतो. एका कंपनीत शेअर गुंतवले आणि तिला तोटा झाला तर आपले पैसे बुडतात. म्युच्युअल फंडामध्ये पैसे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवले जातात. त्यामुळे नुकसान कमी होतं.’
नवल हसला, म्हणाला, ‘म्हणजे ही गुंतवणूक जास्त सुरक्षित आहे तर.’
त्यावर आजोबा म्हणाले, ‘म्युच्युअल फंडमध्ये कमी पैशात सुरुवात करता येते. थोडे-थोडे पैसे गुंतवले तरी चालतात.’
नवलने उत्सुकतेने विचारलं, ‘मग मी पण करू शकतो का गुंतवणूक?’
आजोबा हसून म्हणाले, ‘तू मोठा झाल्यावर नक्कीच गुंतवणूक करू शकतोस. नव्हे, ती केलीच पाहिजे. त्याची सुरुवात खाऊच्या पैशांतून काही पैसे साठवून करायला पाहिजे. साठवायला शिकलास की वाढवायलाही शिकशील.
थोडक्यात-
पैसे कमावणे महत्त्वाचे आहे, पण ते योग्य ठिकाणी गुंतवणे अधिक महत्त्वाचे आहे. शेअर म्हणजे कंपनीतला छोटासा मालकी हक्क. त्यामध्ये जास्त नफा मिळाला तरी धोका जास्त आहे.म्युच्युअल फंड म्हणजे अनेक लोकांचे पैसे एकत्र करून तज्ज्ञांकडून केलेली गुंतवणूक. त्यामध्ये कमी धोका असतो आणि स्थिर वाढ असते. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घेणे, शिकणे आणि संयम ठेवणे खूपच गरजेचे आहे. पैसा योग्य प्रकारे वापरला तर तोच आपला मित्र बनतो.

