• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

तरुणाईला भिडणारी बहिणाबाई

संजय डहाळे तिसरी घंटा

Marmik Team by Marmik Team
November 21, 2026
in तिसरी घंटा
0
तरुणाईला भिडणारी बहिणाबाई


जगण्याला दिशा देण्याचे मोलाचं काम कळत- नकळत साहित्य करीत असतं. एखादी काव्यरचना जगण्याचा आधारही ठरू शकते. मग ते अंगाईगीत का असेना! त्याच वाटेवरचं खानदेशी, अहिराणी बोलीभाषेतलं बहरलेले शब्दवैभव म्हणजे बहिणाबाई चौधरी यांचं काव्य! नुसतं काव्य नव्हे तर त्यातील शब्द न् शब्द हा मानवी विचारांना प्रेरणा अन् चेतना देणारा. बहिणाबाईंच्या काव्यातील निसर्गाआडचा सामाजिक आशय म्हणजे चमत्कारच म्हणावा लागेल. एका निरक्षर महिलेचे हे अक्षरवाङ्मय म्हणजे जणू काही बावन्नकशी सोनेच!

अरे संसार संसार

जसा तवा चुल्यावर
आधी हाताला चटके,
तेव्हा मिळते भाकर
किंवा
माझी माय सरस्वती
माले शिकविते बोली
लेक बहिणीच्या
मनी किती गुपितं पेरली

अशा कितीतरी शब्दपुष्पांतून बहिणाबाई आजही आपल्याशी संवाद साधून आहेत. निसर्गाचे विलक्षण निरीक्षण, त्याचे पडसाद, जगण्याचा आशय त्यामागील अजब तत्त्वज्ञान, शब्दांमध्ये दडलेली सहजसुंदर निरागसता हे सारं लक्ष वेधून घेणारं. बहिणाबाईंची आठवण येण्याला कारण ठरला आहे. अर्थतज्ज्ञ, समीक्षक, नाटककार राजीव जोशी यांचा प्रोजेक्ट ए-बी हा दीर्घांक, जो प्रायोगिक रंगभूमीवर आला आहे. बहिणाबाईंचे तत्त्वज्ञान नव्या रंगरूपात बसविण्याची किमया यातील चपखल कथानकात दिसते. कथानक आजच्या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणार्‍या पिनाकी आणि मिनी या दोघांच्या मैत्रीतून अलगद प्रकाशात येतं. पिनाकी हा संगीतकार तर मिनी ही अभिनयासाठी कामाच्या शोधात भटकंती करतेय. एखादा जबरदस्त प्रोजेक्ट करायचा हे त्याचं कॉमन स्वप्न. जीनियस संगीतकार म्हणून नाव मिळवण्याचा पिनाकीचा ध्यास आहे. मिनीने अभिनयासाठी घरदार सोडलंय. दोघांची वाटेल तेवढे कष्ट करायची तयारी आहे. पण दोघांनाही मनासारखी काम मिळत नाहीत. चढाओढ, स्पर्धा, वशिलेबाजी, फसवा-फसवी, वेळकाढूपणा, खोटी आश्वासने यामुळे हे दोघे वैतागले आहेत पण तरीही त्यांनी आशा सोडलेली नाही.

अखेर एक दिवस एका निमंत्रणामुळे दोघेजण आनंदी होतात. मिनीपुढे अचानक प्रोजेक्ट बहिणाबाई येतो. मराठी माणसाच्या मनात पक्की बसलेली बहिणाबाई. तिच्या रचना एवढ्या काळानंतर रसिकापर्यंत पोहोचतील काय? हा एक प्रश्न असतोच. दोघेही लॅपटॉप, गुगल, पुस्तके या आधारे बहिणाबाईंचा शोध घेतात. बहिणाबाईंचा गेटअप, जीवनशैली, काव्य, नाट्यपूर्ण प्रसंग यावर तालीम करतात. प्रोडक्शन हाऊसशी कनेक्ट होण्याचे प्रयत्न होतात. छोटा कॅप्सूल प्रोग्रामही तयार करतात. त्यासाठी बहिणाबाईंच्या तीन अर्थपूर्ण गाजलेल्या रचनांची निवड होते. पण काही दिवसांतच हा प्रोजेक्ट फ्रीज  होतो. मार्केटिंगवाल्यांना त्यासाठी प्रायोजक मिळत नाहीत. जुना काळ, ग्रामीण वातावरण यामुळे रसिकांना पचनी पडणार नाही म्हणून सारं शांत होतं. अखेर दोघे रंगकर्मी जमिनीवर येतात. यशाच्या ब्रेकच्या प्रतीक्षेत असताना फुल ब्रेक बसतो. बुकमधली बहिणाबाई बुकमध्येच राहते.

पण हे दोघे बहिणाबाईंचा नाद सोडत नाहीत. मार्केटिंगसाठी नव्हे तर एक परिपूर्ण आविष्कार म्हणून आपण आता हा प्रोजेक्ट करायचाच असा निर्धार करून दोघेही नवा डाव मांडण्यासाठी सज्ज होतात. दीर्घांकाच्या दुसर्‍या भागात साक्षात बहिणाबाई प्रगटते. ज्याच्या हाताले घट्टे त्यालाच देव भेटे! हा तिचा संदेश आजही दिशादर्शक ठरतो. शेतामध्ये कष्ट करणारी बहिणाबाई; निसर्गाकडून शिकवण घेणारी बहिणाबाई; विधवा झाल्याने मुक्या भावना शब्द रूपात मांडणार्‍या बहिणाबाई; संकटापुढे खचून न जाणारी बहिणाबाई; देव नाही पोथीत देव आहे शेतात, असं सांगणारी बहिणाबाई… एक ना दोन. अनेक रूपं आकाराला येतात. दोघे रंगकर्मी आविष्कारासोबत पुढली रंगपावले कशी मजबुतीने टाकतात, ते प्रत्यक्ष अनुभवणं उत्तम!

शब्दांची रेंज जर चांगली असेल तर रसिकांशी थेट नेटवर्क कधीही तुटत नाही. यातील नायिका बहिणाबाई हिच्या शब्दांची रेंज नंबर वन आहे. त्यांची मांडणी कल्पकतेने केल्याने संहिता ताकदीने साकार होते. बहिणाबाईंच्या काव्याला मिळणारा टाळ्यांचा प्रतिसाद बोलका आहे. संहिताकार राजीव जोशी यांनी नव्या पिढीची भाषा चपखलपणे वापरली असून नाट्य कुठेही रेंगाळणार नाही याची दक्षता घेतलीय. एकाच वेळी दोन आशयसंपन्न संहिता बघितल्याचे समाधान त्यातून मिळते. पहिला भाग जेन-झी पिढीचा संघर्ष आणि दुसर्‍या भागात बहिणाबाईंची व्यक्तिरेखा. दोन्ही पकड घेतात. या दीर्घांकाला पूर्ण नाट्यरूप मिळावे किंवा बहिणाबाईंवर स्वतंत्र एकपात्री रंगभूमीवर आणावा असे या प्रयोगाच्या निमित्ताने वाटत राहते. बहिणाबाईंवर नाटककारांचा असलेला अभ्यासही नोंद घेण्याजोगा.दिग्दर्शक हेमंत सुहास भालेकर यांनी या काहीशा आव्हानात्मक विषयावरल्या नाट्याचे दिग्दर्शन केलंय. दहा-बारा प्रसंगातून हे नाट्य मजबुतीने बांधले आहे. प्रत्येक फ्रेमवर परिश्रम घेतल्याचे जाणवते. पात्रनिवड आणि त्यांचं ट्युनिंग उत्तम. काव्य आणि नाट्य यांची सांगड चांगली आहे. त्यामुळे उत्कंठा वाढविणारा व खिळवून ठेवणारा प्रयोग झालाय. नावीन्यपूर्ण रचना दीर्घकाळ स्मरणात राहील.
नाटकात तिघेच कलाकार. त्यांनी काही अपवाद वगळता सफाईदारपणा दाखविला आहे. प्रायोगिक किंवा व्यावसायिकावर खास अनुभव नसतानाही भूमिका पेलल्या आहेत. गायक, संगीतकार, अभिनेता ओमकार घाडी यांनी पिनाकीची भूमिका केलीय. त्याचा गळा चांगला आहे, तसंच गाणं व वाद्यवादन यावर प्रभुत्व दिसले. स्ट्रगलर म्हणून आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व त्याने नेमकेपणाने केलंय. तांत्रिक बाजूंवर अवलंबून असल्यामुळे काहीशी संवादफेक बिघडते. पण रंगमंचावरला वावर सहज सुंदर. भविष्यातील गायक-अभिनेता म्हणून नजरेत भरतो. अकोला येथील तरुणी आरोही जैन हिने या नाटकातील मिनी साकारली आहे. कमी वयात मोठी भूमिका तिच्या वाटेला आली आहे. ती शोभून दिसते. ऑडिशनसाठी भटकंती, करिअरसाठीचा संघर्ष ठळकपणे दिसतो. बहिणाबाईंचा चष्मा लावण्याचा प्रसंग अर्थपूर्ण झालाय. दोन्ही कलाकारांच्या भूमिका वयोमानाला फिट्ट आहेत. त्यामुळे सादरीकरणात कुठेही कृत्रिमता वाटत नाही.

या नाटकाचा आधारस्तंभ असणार्‍या बहिणाबाईंच्या भूमिकेत कविता मानकर-जाधव आहेत. अशा व्यक्तिरेखा पटकन रसिकांशी जवळीक साधतात. पण त्या शोभून दिसल्या तरच. अहिराणी भाषेतली सहजता आणि गोडवा तसेच त्यांचे दिसणं ही जमेची बाजू. अभिनयाची उत्तम जाण दिसते. काही कवितांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद नाट्याची रंगत वाढवितो. काही काव्यरचनांमुळे रसिकांचे डोळेही पाणावतात. शेवटच्या प्रसंगात बहिणाबाई बाजी मारतात आणि त्यामुळे विषय आशय अर्थ पूर्ण बनतो. व्यक्तिचित्र माफक देहबोलीतूनही ठसतं.

तांत्रिक बाजूंनीही नाट्य रंगतदार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिसतोय. ज्येष्ठ वेशभूषाकार प्रकाश निमकर यांनी बहिणाबाईचा गेटअप तसेच दोघा रंगकर्मींची वेशभूषा नेमकेपणाने केलीय. रंगसंगती शोभून दिसते. प्रदीप पाटील यांनी प्रतीकात्मक नेपथ्य रचना केलीय. मध्यभागी असलेले बहिणाबाईंचे छायाचित्र लक्ष वेधून घेते. प्रतीकात्मक जाते परिणामकारक ठरते. विलास हुमणे यांची प्रकाशयोजनाही पूरक आहे. ओमकार घाडी यांनीच नाटकाला संगीत दिलंय. देवेंद्र शेलार यांनी नृत्य आलेखनची जबाबदारी पार पाडली आहे. एकूणच टीमवर्क चांगलं जुळलंय.

निनाद मुंबई या नाट्यसंस्थेची ही निर्मिती. या नाटकामुळे एका मध्यंतरानंतर पुन्हा एकदा ही नाट्य चळवळ सुरू झाली आहे. शाळा-कॉलेजात याचे अधिकाधिक प्रयोग झाल्यास ही बोलीभाषा आणि त्याचे सौंदर्य हे नव्या पिढीपर्यंत पोहोचू शकेल. महाराष्ट्र सरकारने अशा प्रयोगांना दत्तक घेतल्यास राज्यभरात त्यामागला सकारात्मक सामाजिक आशय पोहोचू शकेल. नव्या पिढीची भावनिक कोंडी आणि त्यावरील बहिणाबाईंचं तरुणाईला भिडणारे, हेलावणार तत्त्वज्ञान निश्चितच प्रबोधन करणारे. प्रायोगिक समांतर रंगभूमीवर सुरू असलेल्या प्रोजेक्टच्या या प्रयोगामुळे बोलीभाषेतलं एक दालन खुलं झालंय. अशा प्रयत्नांचे प्रयोग जागोजागी व्हावेत, ही अपेक्षा.

प्रोजेक्ट-एबी
लेखन- राजीव जोशी
दिग्दर्शन- हेमंत भालेकर
नेपथ्य- प्रदीप पाटील
संगीत- ओमकार घाडी
प्रकाश- विलास हुमणे
वेशभूषा- प्रकाश निमकर
रंगमंच व्यवस्था- प्रभाकर नरवणे
छायाचित्र- संजय पेठे
निर्मिती- निनाद , मुंबई.
[email protected]

Previous Post

शेअर आणि म्युच्युअल फंड

Next Post

तणाव : शत्रू की शिक्षक?

Next Post
तणाव : शत्रू की शिक्षक?

तणाव : शत्रू की शिक्षक?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.