
हरमनप्रीत कौरनं भारताला फक्त एकदिवसीय विश्वविजेतेपद जिंकून दिलं नाही, तर महिला क्रिकेटला रुबाबदार आक्रमकताही दिली. त्यामुळेच हरमनप्रीतचं नेतृत्व आणि कर्तृत्व हे ठसा उमटवणारं ठरतं. नुकतंच ‘बीसीसीआय’च्या निर्देशानुसार, तिला कर्णधारपद सोडावं लागलं. असं का झालं?
६ ऑक्टोबर, २०२६च्या सकाळी हरमनप्रीत कौरनं ‘इन्स्टाग्राम’वर केलेली पोस्ट हा-हा म्हणता वार्यासारखी पसरली. हरमनप्रीतनं भारताच्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटचं कर्णधारपद सोडलं, हीच त्यातली बातमी होती. ‘हा निर्णय घेणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. या निर्णयामागे अनेक वर्षांच्या आठवणी, भावना, त्याग आणि आयुष्यभर मनात राहतील असे अनेक क्षण आहेत. मात्र, आता मी पुन्हा केवळ क्रिकेटच्या प्रेमासाठी खेळण्यास सज्ज आहे,’ अशा आशयाचं भलं मोठं भावनिक वक्तव्य होतं. त्यासोबत भारतीय क्रिकेट संघाच्या ब्लेझरमधील हरमनप्रीत पाठमोरी उभी असल्याचं छायाचित्रही होतं, ते तिचं नेतृत्व, कर्तृत्व आणि एका पर्वाचा शेवट दर्शवत होतं. त्यात ती क्रिकेटमधील माऊंट एव्हरेस्ट मानल्या जाणार्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानाकडे अभिमानानं पाहात होती.
हेच मैदान तिनं का निवडलं?
२०१७पर्यंत महिला क्रिकेट हे अतिदुर्लक्षित प्रकारात मोडलं जात होतं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचं (बीसीसीआय) आर्थिक पाठबळ मिळालं, तरी क्रिकेटचाहत्यांना त्याचं कोडकौतुक नव्हतं. पण इंग्लंडमधील एकदिवसीय विश्वचषकातील भारतीय महिलांच्या कामगिरीनं सर्वांची मनं जिंकली. भारतीय संघानं अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध नऊ धावांनी पत्करलेल्या पराभवामुळे भारताचं जेतेपद निसटलं; पण याच स्पर्धेपासून भारतीय संघ बलाढ्य म्हणून गणला जाऊ लागला. या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या धक्कादायक विजयात हरमनप्रीतनं नाबाद १७१ धावांची संस्मरणीय खेळी साकारली होती. ही फक्त एक सुरुवात होती. हेच विश्वविजेतेपदाचं अधुरं स्वप्न गतवर्षी हरमनप्रीतनं कुशल नेतृत्वाच्या बळावर पूर्ण केलं. मग सप्टेंबर २०२२मध्ये लॉर्ड्सच्याच साक्षीनं तिनं भारताला इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ३-० असा संस्मरणीय आणि निर्भेळ यश मिळवून दिलं. त्यावेळी हरमनप्रीत मालिकावीर पुरस्काराची मानकरी ठरली होती. काही महिन्यांपूर्वी, म्हणजे जुलै २०२६मध्ये
लॉर्ड्सवरच भारतानं इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात २७० धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. ह्या मैदानावरील पुरुषांच्या कसोटी सामन्याला १४२ वर्षं झाल्यानंतर हा पहिलाच महिला कसोटी सामना झाला, हे आणखी एक वैशिष्ट्य. म्हणूनच हरमनप्रीतनं लॉर्ड्सची निवड केली असावी.
हरमनप्रीत आता ३७ वर्षांची आहे. म्हणजेच कारकीर्दीची वाटचाल अस्ताकडे चाललेली. ‘बीसीसीआय’च्या आढावा बैठकीत तिनं ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील नेतृत्वाची जबाबदारी वगळून कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटचं कर्णधारपद कायम ठेवावे, असा प्रस्ताव ठेवला होता. पण ‘बीसीसीआय’ला संपूर्ण संक्रमण हवं होतं. म्हणजे तिन्ही प्रकारच्या क्रिकेटचं नेतृत्व हरमनप्रीतकडून स्मृती मानधनाकडे देण्याचं त्यांनी निश्चित केलेलं. त्यामुळे वास्तव स्वीकारण्याशिवाय तिच्याकडे कोणताही पर्याय नव्हता.
हरमनप्रीतच्या नेतृत्व कारकीर्दीची आकडेवारीही तितकीच रोचक. पाचपैकी चार कसोटी सामन्यांत विजय आणि एकमेव पराभव. म्हणजे विजयाची टक्केवारी ८० टक्के. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५१ सामन्यांपैकी ३० विजय आणि १९ पराभव. इथे ५८.८२ टक्के विजयाची टक्केवारी. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये १५५ सामन्यांपैकी ९३ विजय आणि ५७ पराभव, तर पाच सामने अनिर्णीत. त्यामुळे टक्केवारी ६०.६० टक्के. एकदिवसीय विश्वविजेतेपद, आशियाई क्रीडा स्पर्धेचं सुवर्णपदक आणि चार आशियाई स्पर्धांची जेतेपदं ही तिची नेतृत्वकमाई.
हरमनप्रीतच्या नेतृत्वपर्वाची सुरुवातही वादळी आणि वादग्रस्त झाली होती. २०१८मध्ये कॅरेबियन बेटांवर झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी मिताली राजची एक जबाबदारी कमी करून हरमनप्रीतकडे कर्णधारपद देण्यात आलं. सलामीच्याच सामन्यात हरमनप्रीतनं शतक साजरं करीत ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये शतक नोंदवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू बनण्याचा मान मिळवला. ह्या स्पर्धेतील भारताकडून सर्वाधिक पाच सामन्यांत १८३ धावा तिच्याच खात्यावर होत्या; पण उपांत्य सामन्यात मितालीला वगळण्याचा निर्णय कमालीचा वादग्रस्त ठरला. त्यावेळी रमेश पोवार संघाचा प्रभारी प्रशिक्षक होता. हे प्रकरण समाजमाध्यमांवर विशेष लक्षवेधी ठरलं. भारतीय संघात फूट पडली. हरमनप्रीत आणि स्मृतीसह काही क्रिकेटपटू पोवारच्या पाठीशी उभे राहिले, तर काही खेळाडूंनी मितालीची बाजू घेतली. हा उपांत्य सामना गमावल्यामुळे भारताचं आव्हान संपुष्टात आलं आणि तात्पुरत्या पदनियुक्तीवर असलेल्या पोवारची गच्छंती झाली. पण, पोवारचं पद टीकावं, म्हणून हरमनप्रीत-स्मृती जोडीनं बरेच प्रयत्न केले.
पुढे मे २०२१मध्ये पोवार पूर्ण वेळ मुख्य प्रशिक्षक म्हणून महिला संघाकडे परतला. पोवारच्याच कार्यकाळात मितालीनं निवृत्ती पत्करली. त्यामुळे २०२२मध्ये एकदिवसीय आणि कसोटी प्रकाराचं कर्णधारपदही आपसुकच हरमनप्रीतच्या वाट्याला आलं. गेल्या चार वर्षांत भारतीय महिला क्रिकेट यशोिशखरावर गेलं. याच वर्षी ‘बीसीसीआय’नं उचललेले एक पाऊल अतिशय महत्त्वाचं ठरलं. त्यांनी करारबद्ध महिला क्रिकेटपटूंसाठी पुरुष क्रिकेटपटूंप्रमाणे सामन्याच्या समान मानधन धोरणाची घोषणा केली. त्यानुसार आता प्रत्येक कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी-२० सामन्यासाठी महिला क्रिकेटपटूंना अनुक्रमे १५ लाख, सहा लाख आणि तीन लाख रुपये मानधन मिळतं आहे. सामन्याच्या मानधनात समानता आली असली तरी करारबद्ध क्रिकेटपटूंच्या वार्षिक वेतनश्रेणीत प्रचंड तफावत आहे. मग २०२३मध्ये सुरू झाली ती महिला प्रीमियर लीग. इथेही चारपैकी दोन जेतेपदं हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सनं जिंकलीयत. हरमनप्रीतनं ऑस्ट्रेलियातली महिला बिग बॅश लीगसुद्धा गाजवली आहे.

हरमनप्रीतच्या संतापानं मर्यादा ओलांडल्याच्या काही घटनाही मैदानावर पाहायला मिळतात. २०२२मध्ये गोलंदाज दीप्ती शर्मानं इंग्लंडची फलंदाज चार्ली डीनला मंकडिंगद्वारे धावचीत केलं. त्याबद्दल कोणतीही सहानुभूती न प्रकट केल्यामुळे वाद उद्भवला. पण हरमनप्रीतनं दीप्तीचं समर्थन करीत आम्ही नियमानुसार खेळलो, असं स्पष्टीकरण दिलं. जुलै २०२३च्या बांगलादेश दौर्यावरील शेवटच्या एकदिवसीय सामन्यात पंचांनी वादग्रस्तरीत्या पायचीत दिल्यामुळे हरमनप्रीतला रागावर नियंत्रण ठेवता आलं नाही आणि तिनं बॅटनं यष्ट्यांवर हल्ला केला. मग तंबूकडे परतताना पंचांनाही सुनावलं. परिणामी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) तिला दंड ठोठावून दोन सामन्यांसाठी निलंबितही केलं. नंतर इंग्लंडमध्ये ‘द हंड्रेड’ स्पर्धेसाठी गेली असताना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी हरमनप्रीतला विचारलं, तुझ्या कृत्याची तुला खंत वाटते का? ती ठामपणे म्हणाली, ‘एक खेळाडू म्हणून स्वतःला व्यक्त करण्याचा आणि भावना मांडण्याचा अधिकार नेहमीच असतो. मी कोणत्याही खेळाडूला किंवा व्यक्तीला काही चुकीचं बोलले, असं मला वाटत नाही. मी फक्त तेच सांगितलं, जे घडलं. मला कशाचाही पश्चात्ताप नाही.’
२०२५चा एकदिवसीय विश्वचषक ‘आयसीसी’चे अध्यक्ष जय शाह यांच्या हस्ते स्वीकारण्यापूर्वी ती चक्क त्यांच्या पाया पडली. या कृतीमुळे समाजमाध्यमांवर तिला बरीच टीका सहन करावी लागली. २०२०च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी देशांतर्गत क्रिकेटमधील आक्रमकतेच्या बळावर फक्त १५ वर्षांच्या शफाली वर्माची निवड करताना हरमनप्रीतचा सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा ठरला. मग सूर हरवल्यामुळे शफालीनं संघातलं स्थानही गमावलं; पण गतवर्षीच्या विश्वविजेतेपदाच्या मोहिमेत प्रतिका रावल दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेल्यावर हरमनप्रीतला आठवण झाली ती शफालीची. मग अंतिम सामन्यात शफालीनंच सामनावीर खेळी करीत देशाला जेतेपद मिळवून दिलं.
पंजाबच्या मोगा जिल्ह्यात जन्मलेल्या हरमनप्रीतचे वडील न्यायालयात कारकून होते; पण त्यांना खेळाची खूप आवड होती. भारतीय क्रिकेट संघातून खेळायचंय, ही इच्छा नव्वदीच्या दशकातल्या बालपणात तिनं प्रदर्शित केली, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटायचं. ज्ञानज्योती क्रिकेट अकादमी घरापासून ३० किलोमीटर अंतरावर होती; तरीही तिने जिद्दीनं आपलं स्वप्न जपलं. सुरुवातीच्या कारकीर्दीत भारतीय रेल्वेकडून ती खेळायची. २०१८मध्ये पंजाब पोलीस दलात ती पोलीस उपाधीक्षक पदावर रुजू झाली. ह्या हट्टी मुलीनं भारतीय महिला क्रिकेटला रुबाबदार आक्रमकता दिली. त्यात चूक नसेल तिथे दिलगिरी प्रकट करायची नाही, हे आत्मभानही दिलं. त्यामुळेच मागील दशकभरात महिला क्रिकेटमधील स्थित्यंतर पाहायला मिळतंय!
[email protected]

