• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

ब्लड रिव्हर– नदीच्या दुःखांची गोष्ट!

समीर गायकवाड बिट्वीन द लाइन्स

Marmik Team by Marmik Team
October 17, 2026
in बिट्वीन द लाइन्स
0
ब्लड रिव्हर– नदीच्या दुःखांची गोष्ट!

नुकताच आपल्या देशाच्या राजधानीत गंगा आणि यमुना नदीच्या अस्वच्छतेवरून मोठा तमाशा झाला, गतवर्षी तर छटपूजेसाठी खोट्या स्वच्छ पाण्याची नौटंकीही करून झाली. बेसिकली आपल्याकडे नद्यांना आपण नावाला पवित्र मानतो, त्यापलीकडे आपली त्यांच्याप्रती आस्था नाही, हे आपण खुल्या मनाने मान्य केले पाहिजे. अमुक एक नदी पुराणात आहे, तमुक एक नदी इतिहासात आहे, अलाण्या नदीचे पाणी पवित्र आणि फलाण्या नदीचे पाणी मोक्ष देते, इत्यादी कल्पनांत आपण आपल्याच स्वार्थासाठी गुंतून पडलो आहोत. उदा. आपले दुष्कर्म कमी व्हावे, आपली पापे कमी व्हावीत, आपल्याला आशीर्वाद लाभावेत, आपलं कल्याण व्हावं, वगैरे वगैरे! म्हणजे आपण नदीला काही देणार नाही, नदीसाठी आपण काही करणार नाही आणि वर तिच्याकडून मात्र आपल्याच कथित भल्याच्या कपोलकल्पित गोष्टी मागणार, पुण्य वाढवून मिळावे म्हणून डुबकी मारणार! आणि नदीला आपण काय देणार तर ड्रेनेजचे पाणी, गटार-नाल्यांचे पाणी, रासायनिक कारखान्यांचे दूषित पाणी आणि आपणच टाकलेला गावभराचा कचरा! नदी गढूळ विषारी घाण होऊन जाते, तरीही आपण तिच्यासाठी झिजत नाही की तिच्यासाठी आपला जीव तीळतीळ तुटत नाही! नद्या आपल्या जीवनदायिनी आहेत वगैरे ज्ञानकण फुंकायला मोकळे होतो. सरकारेही आपल्यासारखीच कागदावर अब्जावधी रुपयांच्या योजना आणतात, काही कोटी खर्च होतात, नदी कणभरच बदलते, पण मणभर पैसा इकडे तिकडे फिरतो! घाण गलिच्छ अवतारात नदी वाहत राहते!

नदीविषयी आपल्यात अनास्था आहे हे कटूसत्य आहे. लोक पापनाशनासाठी नदीच्या पाण्यात डुबक्या मारतात, कुणी परिक्रमा करतात तर कुणी अर्घ्य देतात तर कुठे जलपूजा होते, काही ठिकाणी नदीकाठी दशक्रिया विधी होतात तर नदीपात्रात अस्थीविसर्जनही होते! अशा सर्व गोष्टीपुरताच आपला नदीशी संबंध येतो, त्या गोष्टी उरकून आपण आपल्या वाटेने घराकडे रवाना झालो की नदी जाणे नि नदीचे प्रदूषण जाणे अशी आपली भूमिका असते. सरकारव्यतिरिक्त अभ्यासक काही डेटा मांडत असतात. नद्यांसाठी काम करणार्‍या स्वयंसेवी संस्था आणि काही व्यक्ती मनापासून नदीसाठी तळमळत राहतात. हे सर्व आपण केवळ पाहत असतो, त्याचे आपल्याला काहीही सोयरसुतक नसते. धार्मिक, पौराणिक ग्रंथाखेरीज नद्यांचे उल्लेख कविता, कथा, कादंबर्‍यात येतात. कुणी आत्मीयतेने लिहितो, काही ललित लेखनही केले जाते. काहीजण माहितीपर मांडणी करतात. काहींना अजूनही नद्यांविषयी धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक अंगाने लिहावे वाटते हेही अनाकलनीय आहे! नदीच्या अस्वच्छतेविषयी अतिशय प्रामाणिकपणे परखडपणे दस्तऐवज स्वरूपात खूप कमी लिहिले जाते. एखाद्या नदीच्या उगमापासून ते नदीच्या अंतापर्यंतच्या जलप्रवासावर प्रदूषणाच्या दृष्टिकोनातून सविस्तर मुद्देसूद परखड लेखन केल्याची उदाहरणे कमीच आहेत.

विशेष वानवा आहे ती नदीच्या जलप्रवाहासोबत साकारत असलेल्या सामाजिक परिस्थितीच्या आकलनाची! नदीच्या उगमापासून ते नदी समुद्रास जिथे मिळते तिथेपर्यंतच्या संपूर्ण जलप्रवासात, नदीच्या काठावर असणार्‍या शेकडो गावांत, शहरांत आणि बदलत्या राज्यांत नदीकिनार्‍यावर सामाजिक स्थिती कशी आहे आणि ती कशी बदलत गेली आहे याचा आढावा घेणारे मराठी पुस्तक माझ्या वाचनात तरी नाही. असे पुस्तक आपल्याकडे लिहिले जाण्याची शक्यता कमीच आहे, कारण अशी मांडणी कुणी केली तर आधी त्याविषयी धार्मिक वाद निर्माण केले जातील, कदाचित पुस्तक प्रकाशनच रोखले जाईल. आणि समजा पुस्तक प्रकाशित झाले तरी किती लोक ते वाचतील आणि वाचन केलेल्या किती लोकांना त्यातले सत्य पचनी पडेल असे प्रश्न आपल्याकडे लेखनाआधीच लेखकाच्या तोंडावर फेकले जातात. कुणाच्या डोक्यात या विषयाचा किडा वळवळला तरी त्याला ठेचण्याचे काम इथला साहित्यव्यवहार पार पाडतो. तशी खबरदारी इथल्या अभिजनवर्गाकडून नक्कीच घेतली जाते. असो.

माझ्या वाचनात असे एक इंग्रजी पुस्तक आलेलं. त्याच्याविषयी चार गोष्टी आवर्जून सांगण्याजोग्या वाटतात. ‘ब्लड रिव्हर: अ जर्नी टू आप्रिâकाज ब्रोकन हार्ट’ हे नॉन फिक्शन पुस्तक ब्रिटिश पत्रकार टिम बुचर यांनी लिहिलंय. २००७मध्ये ते प्रकाशित झालेय. जगातील सर्वात धोकादायक देशांतला भयावह प्रवास, अशीही या पुस्तकातील जलप्रवासाची ओळख आहे. ही केवळ ललितकथा वा रोमांचक गोष्ट नसून, एक खरा प्रवासवृत्तांत आहे, जो बुचर यांच्या धाडसी आणि धोकादायक प्रवासावर आधारित आहे. डेली टेलिग्राफच्या आप्रिâका आवृत्तीचे मुख्य वार्ताहर म्हणून २००० साली ते आप्रिâकेत पोहोचले होते. बुचरला काँगो नदी आणि त्याच्या इतिहासाने इतके आकर्षित केले की, त्यांनी १८७४ साली नेचर एक्सप्लोरर हेन्री मॉर्टन स्टॅनलीने केलेल्या ऐतिहासिक नदी मोहिमेची पुनर्रचना करण्याचे ठरवले. तीन हजार मैल लांबीची काँगो नदी ही जगातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठ्या जलस्त्रोताची नदी आहे. ती डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (डीआरसी) या देशाच्या हृदयातून वाहते असे म्हणता येईल. बुचर मात्र काँगो नदीला आप्रिâकेचे भंगलेले हृदय म्हणतात.
हे पुस्तक म्हणजे केवळ एका व्यक्तीची साहसकथा नसून काँगोच्या खोर्‍यातले वसाहतवादी शोषण, स्वातंत्र्यानंतरची अराजकता आणि आजच्या युद्धग्रस्त अवस्थेचे गहिरे चित्रण आहे. पुस्तकाची सुरुवात एकोणिसाव्या शतकातील हेन्री मॉर्टन स्टॅनलीच्या वारशाने होते. एक ब्रिटिश-अमेरिकन एक्सप्लोरर, डेली टेलिग्राफचा पत्रकार एकत्र येऊन पहिल्यांदाच काँगो नदीचे नकाशे काढतात. १८७४ ते १८७७ सालादरम्यानच्या त्या मोहिमेत स्टॅनलीने पश्चिम आप्रिâकेतील, तेव्हा झैरे नावाने ओळखल्या जात असलेल्या किनशासापासून सुरुवात करून पूर्वेकडे तांझानियाच्या तंगान्यिका तलावापर्यंत, आजच्या कॅलेमीपर्यंत प्रवास केला, ज्यात त्यांनी नदीच्या मूळ स्रोतांचा शोध घेतला आणि मध्य आफ्रिकेच्या उष्णकटिबंधीय भागाची भौगोलिक माहिती गोळा केली. या मोहिमेने बेल्जियन राजा लिओपोल्ड द्वितीय याला काँगोला वसाहत बनवण्यास प्रेरित केले, ज्याने लाखो काँगोवासीयांच्या शोषणाने रबर उद्योग उभारला आणि त्या नदीचे हार्ट ऑफ आफ्रिका हे नाव कायमचे रक्तरंजित केले. त्या मोहिमेनंतर दीडशे वर्षांनी बुचर २००४ साली त्याच मार्गाने ही जलमोहीम पार पाडण्याचे ठरवतात.

मधल्या दीडशे वर्षांत काँगो नदी जगातील सर्वात धोकादायक देशातून वाहत असल्याने बदनाम झाली. गृहयुद्ध, भ्रष्टाचार, रोगराई आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे ती पुरती बेजार झाली. या सफरीवर बुचर एकटे निघतात, फक्त एका बॅकपॅक, शूजमध्ये लपवलेले काही हजार डॉलर आणि एक नोटबुक ते सोबत घेतात. काँगो नदीच्या पात्रातून ४९०० किलोमीटर लांबीचा प्रवास पूर्ण करणे हे त्यांचे ध्येय, जे आजवर कुणालाच पूर्ण करता आलेले नाही. आय अ‍ॅम गोइंग टु टच आप्रिâकाज हार्ट असं ते प्रस्तावनेत लिहितात.

रवांडा या भीषण युद्धग्रस्त देशाच्या सीमेवरील क्वांडा या छोट्याशा गावापासून बुचरच्या मोहिमेस सुरुवात होते. काँगोच्या सीमेवरची अस्थिरता, दंगे, व्याकुळ झालेले शरणार्थी आणि अवैध खाणकाम हळूहळू समोर येऊ लागते. प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात ते कोबाल्ट टाउन (कातांगा प्रांतातले खाणीनी समृद्ध असलेले एक शहर) गाठतात; मोबाईल फोन्स आणि बॅटरीसाठी लागणारे जगातला ३० टक्के कोबाल्टचा साठा या परिसरात आहे. या खाणी बालकामगारांनी ठासून भरल्यात, हिंसाचाराचे भडके इथे रोज उडतात. या भागात बुचरला, बेनॉईटसारखे स्थानिक मार्गदर्शक मिळतात. बेनॉईट हा एक काँगोवियन मोटरसायकल चालक आहे, जो त्यांना शंभर सीसी मोटरसायकलवरून नदीकाठच्या प्रवासाला घेऊन जातो. वास्तवात या भागात डांबरी रस्तेच राहिलेले नसतात. पाहावे तिकडे दलदल, जंगल आणि नदीचे पात्र दिसते! दुसर्‍या टप्प्यात ते ‘कॅलेमी” या आताच्या भग्न शहरात पोहोचतात. तिथल्या जुन्या बेल्जियन रेस्त्रोमध्ये पोहोचल्यावर बुचरला खायला प्यायला काही खास मिळत नाही. येथे ते काँगोच्या वसाहतवादी वैभवाची आठवण करून देतात. १९५०च्या दशकात येथे विमानसेवा, क्रूझ शिप्स आणि क्रीडा क्लब्स होते, पण सेकोच्या शासनाने आणि १९९०च्या दशकातील युद्धाने सर्व काही उद्ध्वस्त केले. दरम्यानच्या चिवट प्रवासात बुचर आजारी पडतात. त्यांना मलेरिया नि डायरिया एकत्रच होतो. पुढचा काही प्रवास त्यांना हेलिकॉप्टरने करावा लागतो. एकाकीपण हा त्यांच्या नियोजनाचा हिस्सा नसूनही वाट्याला येते.

पुस्तकाचा मध्यवर्ती भाग ताण निर्माण करतो. खास करून नदीकाठच्या जंगलातील प्रवास जीवघेणा वाटू लागतो. ‘कॅलेमी”पासून ते कासोंगोपर्यंत, बुचर कधी मोटरसायकलवर तर पायी चालतात. वॉक टू डेथ, हा टप्पा स्टॅनलीच्या मोहिमेतील एका घातक भागाची आठवण करवतो, जिथे कधीकाळी त्यांचे साथीदार भूक आणि रोगराईने टाचा घासून मारले गेलेत. इथे बुचरला स्थानिक पिग्मी जमातीचे लोक भेटतात, ज्यांचे हक्क लुटले गेलेत आणि जे घरदार सोडून, गावे मागे टाकून, जंगलातील घनदाट वनराईत हरवून गेलेत. टिम नंतर उबुंडूपर्यंत पोहोचतात, जेथे काँगो नदीवर प्रथमच एकल होडक्यात बसून प्रवास करतात. पुढे जाऊन एका मोटरबोटमध्ये बसतात, इथे ऐन नदीच्या मध्यभागी त्यांच्या बोटीचे इंजिन खराब होते. काळजात धडकी भरवणारा पाऊस सुरू होतो आणि नदीला जीवघेणा पूर येतो. जिथे, नदीपात्र पाण्याने फुगते तिथल्या किनार्‍यावर चोरांचा वाढता धोका समोर येतो. या भागात त्यांना साईदी नावाचा बोटचालक भेटतो, जो त्यांना किसांगानीपर्यंत घेऊन जातो. या प्रवासात बुचर काँगोच्या इतिहासाची एक दुःखद आठवण शेयर करतात- लिओपोल्डच्या क्रूर शासनात लाखो लोकांचे हात तोडले गेले, पॅट्रिस लुमुंबाच्या हत्येनंतर, मोबुटूचे बत्तीस वर्षांचे तानाशाही शासन नष्ट झाले. नव्वदच्या दशकातील आप्रिâकेच्या पहिल्या जागतिक युद्धात तब्बल पन्नास लाख लोक मरण पावलेत. हा भूभाग केवळ भौगोलिक विषमतेचा नसून, इथे शोषणाचे भयावह प्रकार समोर येतात. जबरदस्तीने बालकांना सैनिकी पेशात भरती केले जाते, मुलींवर बलात्कार केले जातात आणि कामगारांच्या शोषणाचे अंगावर काटे आणणारे चित्रण हादरवून सोडते!

पुस्तकाच्या अंतिम भागात टिम बुचर, किसांगानी’जवळ (पूर्वीचे स्टॅनलीव्हिल) भूमध्यरेषेला ओलांडतात, मात्र द इक्वेटर एक्सप्रेस’मध्ये ते नदीच्या वेगवान प्रवाहात अडकतात. पुन्हा एकल होडीमधून प्रवास करतात. प्राण्यांच्या वाढत्या धोक्यात नि जंगली धुक्यात ते गुंतून पडतात. येथे ते यूएनच्या सहाय्यक कार्यकर्त्यांना तसेच आणि पिग्मी हक्कांसाठी लढणार्‍या कार्यकर्त्यांना भेटतात; शेवटी, ते मंबासा आणि बूजा गाठतात, जेथे नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वळते. कधी मोटरसायकल तर कधी ट्रकने आणि शेवटी विमानाने प्रवास करत ते नदीच्या अंतिम पडावापाशी पोहोचतात. बुचर काँगोच्या भविष्यावरही प्रकाश टाकतात: ही नदी आप्रिâकेची सर्वात मोठी संपत्ती असू शकते, पण युद्ध आणि भ्रष्टाचाराने ती जागीच स्तब्ध झालीय! त्यांच्या मते काँगो हा देखील एक खंडच आहे, जिथे मानवी प्रगतीचे सामान्य नियम लागू झाले नाहीत! तब्बल ४४ दिवसांच्या या प्रवासानंतर बुचर किनशासातून परत येतात खरे. परंतु, ‘काँगोचा प्रदेश इतका का मागे पडला?’हा प्रश्न त्यांचा पिच्छा पुरवतो.

पुस्तकाचा शेवट निराशावादी आहे. ते काँगोच्या भविष्याबद्दल शोक व्यक्त करतात आणि वाचकांना विनंती करतात की जमेल त्याने इथे गेलेच पाहिजेत! वसाहतवादापासून ते आधुनिक युद्धांपर्यंतच्या सर्व गोष्टीवर साधक बाधक मत मांडतात. नदीकाठच्या ज्या शहरात, गावांत गुन्हेगारीचे भयंकर पेव फुटले आहे तिथे नदीच नसती तर ते चित्र बदलले असते का याचे शानदार विश्लेषण ते करतात, हे वाचताना आपल्याकडचे वाळूमाफिया आणि त्यातून निर्माण होणारा आणि अनेक टेबलांवर फिरणारा पैसा आठवतो. नदीपात्र ज्या भागात खोल होते तिथे खून हाणामार्‍या अधिक आहेत, असे निरीक्षणही ते नोंदवतात. नदीपात्रापासून दूर असणारी गावे आर्थिक दृष्ट्या सक्षम नसली तरी ती गावे आंनदी आहेत असाही निष्कर्ष मांडतात. नदीकाठच्या काही गावात पूर्वजांसाठी विशेष पूजा केली जाते याचा उल्लेख करतात. ज्या भागात पाऊस कमी पडतो पण नदीपात्र दुथडी भरून वाहू लागते तिथे पिण्याचे पाणी मिळत नाही, मात्र रक्ताचे पाट सहज वाहू शकतात हे सत्यही मांडतात. खाणींचे आणि उद्योगांचे पाणी जिथे नदीत सोडले जाते तिथे अनारोग्य, गरिबी, गुन्हेगारी आणि भणंगतेचे प्रमाण जास्ती असल्याची नोंद करतात. गरीब आणि श्रीमंत यांच्या मनात नदीविषयी असणार्‍या भिन्न भावना आणि त्या मागची भूमिका स्पष्ट करतात. नदी जिथे समुद्राला मिळते तिथे मोठे अवजड उद्योग आहेत, बंदर आहे, मात्र तिथे नदीचे रूप एखाद्या कॉर्पोरेट ऑफिससारखे होऊन जाते ही फॅक्टदेखील मांडतात. नदीत होणारे प्रदूषण आणि नदीतले जलजीवन यांचा संबंध स्पष्ट करताना त्याचा सामाजिक जीवनाशी असणारा थेट संबंध समोर आणतात. ही तथ्ये मन विषण्ण करतात. काँगोकाठच्या श्रीमंत शहरातले पैशांचे सूत्र नदीशी कसे जुळले आहे, याचे हुशारीने गणित मांडतात. काँगो नदीचा प्रवास वाचून आपण उद्विग्न होऊन जातो.

हे पुस्तक वाचताना माझ्या डोळ्यासमोर आपल्या अनेक नद्या आल्या. खास करून गंगा आणि यमुना! गंगेच्या उगमापासून ते हिंद महासागरात विलय होईपर्यंत तिच्या काठावर किती नि काय काय होते, याचा एक अल्पसा आराखडा मांडला तरी शरमेने मान खाली जाते! आपल्या नद्यांची अवस्था आपण काय करून ठेवलीय! खर्‍या अर्थाने आपण नद्यांचे गुन्हेगार आहोत, नदीचे पाणी वापरण्याचा वा नदीपात्रात उतरण्याचा आपल्याला कोणताही नैतिक अधिकार नाही हे कधीतरी निसर्गच आपल्याला ठणकावून सांगेल तेव्हा सारं काही संपलेलं असू नये! खरे तर आपल्या नद्यांत पाणी वाहत नसून बुचर म्हणतात तसं आपण नद्यांना विद्ध केलंय, नद्यांच्या प्रवाहात त्यांचं रक्त वाहतंय आणि आपल्याला त्याचे जराही सोयरसुतक नाही, ही खंत पोखरून टाकणारी आहे!

Previous Post

रंगतदार हास्यदरबार!

Next Post

पहिली पायरी काढून घेऊ नका!

Next Post
पहिली पायरी काढून घेऊ नका!

पहिली पायरी काढून घेऊ नका!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.