
मराठी व्यावसायिक नाटकांमध्ये विनोदवीरांची एक परंपरा आहे. त्यांचा स्वतःचा हक्काचा रसिकवर्गही असतो. सातत्याने गंभीर भूमिका करणारे रंगकर्मी सुद्धा एखाद्या विनोदी भूमिकेच्या शोधात असतात. कारण अधून- मधून विनोदी नाटकांचा महापूर हा येतच असतो. अगदी अलीकडच्या काळात भरत जाधव, प्रशांत दामले, सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले, आनंद इंगळे, संजय नार्वेकर, समीर चौघुले, मयुरेश-मनमित हे पेम बंधू, निर्मिती सावंत यांच्या नुसत्या नावावर नाटक हाऊसफुल्ल करण्याची किमया अनुभवली आहे. यांची उपस्थिती निर्मात्याला बुकिंगवर टेन्शन फ्री करते. आजचा आघाडीचा विनोदवीर भाऊ कदम हेही असंच एक चलनी नाणं. त्यांना डोळ्यापुढे ठेवून ‘पहिली लग्नाची, दुसरी प्रेमाची!’ हे नवं आणि मिश्किल नाव धारण करून रंगभूमीवर आलेलं नाटक दोन घटका हास्यदरबाराची मस्त भटकंती घडविते.
पडदा उघडतो. एका मध्यमवर्गीय पण पॉश घरात आपण पोहोचतो. मोहन देसाई हे या घरातले कर्ताकरविता. त्यांची वयात आलेली मुलगी आदिती. तिचं अमेरिकेतील एका मुलाशी जमलंय. प्रेमप्रकरण फोनवर सुरू आहे. मोहनची पत्नी स्वाती ही स्वर्गवासी झालेली. पण ती भिंतीवरच्या फोटोतून आणि प्रत्यक्षही प्रगटते. घरावर आणि खास करून पती मोहनवर ती करडी नजर ठेवून आहे. त्यामुळे मोहन कमालीचा वैतागलाय. टिपिकल भांडकुदळ बायकोप्रमाणे तिचा वावर. आणि ती फक्त मोहनलाच दिसते. त्यातून एक धम्माल घटनाक्रम सुरू होतो.
मोहन आणि आदिती हे दोघे एका मॉलमध्ये गेल्यावर योगायोगाने प्रणोती आणि तिचा ‘मॉड’ पुत्र विहान यांची भेट होते. प्रणोतीही मोहनची शाळा-कॉलेजमधली मैत्रीण. ओळख पटते. आठवणींना उजाळा मिळतो. ती देखील एकाकी विधवा. मुलगा विहान हा मुलींना पटविण्यात नंबर एक. या शहरात आई मुलगा नव्याने आल्याने आता घर शोधताहेत… घराची व्यवस्था होत नाही, तोवर आपल्या घरातच राहण्याचा प्रस्ताव मोहन प्रणोतीला देतो. पण यामुळे दिवंगत स्वाती भडकते. आक्षेप घेते, विरोध करते. यात मोहन मात्र अगतिक. एकीकडे बायको दुसरीकडे प्रेयसी- अशा कचाट्यात सापडतो. यांच्या भांडणासोबतच प्रेमप्रकरणेही सुरू होतात. त्यातून गुंतागुंत वाढत जाते. हे पेच कसे सुटतात ते पाहण्यासाठी थेट नाट्यप्रयोग बघणं उत्तम!
गर्दी आणि प्रयोगसंख्या याच उच्चांक गाठणारा विक्रमवीर दिग्दर्शक व अभिनेता संतोष पवार याचं दिग्दर्शन ही या नाटकाची एक जमेची बाजू. त्याच्या ‘यदाकदाचित’ने व्यावसायिक नाटकांमध्ये एक वेगळी शैली आकाराला आणली. भव्य दिव्य खर्चिकतेला बाजूला काढून लोकनाट्याच्या शैलीत नमननाट्याच्या तालासुरात एक दशावतारी खेळ मांडला. त्याची ताकद आजही कमी झालेली नाही. नाटकाचे सादरीकरण मजबूत असेल तर त्याला उत्स्फूर्त दाद मिळते, हेच त्यातून दिसले. त्यानंतर फार्सिकल विनोदी नाटकांतून संतोषने दिग्दर्शन तसेच अभिनयातलं श्रेष्ठत्वही सिद्ध केले. त्याच्या डझनभर नाटकांनी गेल्या २५ वर्षात रसिकांना खळखळून हसविले. या नाटकातही ‘संतोष टच’ दिग्दर्शनात असल्याने प्रत्येक प्रसंग रंजक करण्याकडे त्याचा अग्रक्रम आहे. यात भाऊ कदमसारखा विनोदवीर गवसल्यामुळे नाट्य अधिकच धमाल उडवते. भाऊला ऐसपैस बागडण्यासाठी मोकळं मैदान दिल्याचंही जाणवतं. एका प्रदीर्घ मध्यंतरानंतर हे दोघे या नाटकाच्या निमित्ताने एकत्र आलेत. संहितेच्या पलीकडे जाऊन अनेक जागांनी नाट्य समर्थपणे उभे राहू शकतं, हेच एकूण सादरीकरणातून दिसते. नाट्य चांगलं बांधलं आहे, तांत्रिक बाजूंचाही अतिरेक टाळला आहे. भावगीतापासून ते चित्रपट गीतांपर्यंत जागोजागी गाण्यांची पेरणी आहे. तालासुरात प्रयोग रंगतदार करण्याचा प्रयत्न त्यामागे दिसतोय.
नाटकभर भरपेट हसविल्यानंतर शेवटच्या काही मिनिटात मेसेज मांडताना डोळ्यात आसवं उभी करण्याची किमया दिग्दर्शनात इथेही दिसते. त्यामुळे नाटक केवळ दोन घटकांची करमणूक ठरत नाही, तर उभ्या कुटुंबाला काही संदेश देण्याचाही प्रयत्न करते. फॅन्टॅसी तसंच कॉमेडी यात रंगलीय. नाट्य वेगवान गतीने गुंतवून ठेवते. हसून पुरेवाट होते.

तर्कशास्त्राची फुटपट्टी अशा नाटकांना लावणं शक्य नाही का? कशाला? कसं काय या प्रश्नांना इथे उत्तर नाही. कारण नाटककाराची संहिता ही निव्वळ हसवणुकीच्या जागांसाठी तयार झालेली. ‘हसविण्याचा आमुचा धंदा’ हे ब्रीदवाक्य जणू संहितेतल्या प्रत्येक प्रसंगात असल्याने सादरीकरणात अक्षरशः कळसच गाठला जातो. नाटक, चित्रपटात लेखक, दिग्दर्शक म्हणून कारकीर्द असलेल्या स्वप्नील बारसकर यांची संहिता आहे. वेगळे विषय मांडण्याचा आजवर त्यांचा प्रयत्न दिसला. मराठीप्रमाणे गुजराती रंगभूमीवरही काही नाटकांसाठी त्यांची ओळख. यातील संवादात उत्स्फूर्तता आहे. नेमकेपणा दिसतो. प्रसंग कुठेही रेंगाळत नाही.
पडदा उघडण्यापूर्वीच प्रेक्षागृहातल्या प्रत्येक प्रेक्षकावर बॅटरीने प्रकाश टाकून जमवलेली वेगळ्याच शैलीतली गंमत. त्यातच कल्पकतेने पडद्यामागल्या कलाकारांची नावे वैशिष्ट्यांसह सांगितली जातात. त्यातून नाटकाची उत्स्फूर्तता वाढते. प्रयोग संपल्यानंतरही प्रेक्षकांशी थेट संवाद साधण्याचा प्रकार मात्र जरा खटकतो. त्यामुळे एकूणच नाटकाचा परिणाम आणि प्रभाव हा कमी होऊ शकतो. असो.
रंगमंचावर सबकुछ विनोदवीर भाऊ कदम! एकखंबी तंबूमध्ये मोहन देसाई या भूमिकेला त्याने पेललंय. देहबोलीतली सहजता, अभिनयातला भोळेपणा, संवादातील उत्स्फूर्तता आणि मस्त गाणी याचे मिश्रण यात आहे. त्यातून नॉन स्टॉप कॉमेडीचा बार उडत राहतो. रसिकांना हसविण्यासाठी मोकाट सुटल्यासारखा प्रकार काहीदा वाटतो खरा, पण त्याला रसिकांची चांगली दाद मिळते. तेच आकर्षण ठरते. फु बाई फु, चला हवा येऊ द्या यातून घराघरात पोहोचल्यामुळे भाऊचा स्वतःचा रसिक वर्ग आहे. तो गाण्यांसह काही संवादांनाही वन्समोअरची मागणी करतो. ‘सिरीयल किलर’नंतर भाऊ या नाटकातून रंगभूमीवर आलाय. त्याच्या भेटीसाठी रंगपटात उसळलेली गर्दी बोलकी ठरते. तू अशी जवळी रहा… किंवा स्वरगंगेच्या काठावरती… या गाण्यांनी भाऊचा सुरेल स्वर नजरेत भरतो.
मैथिली वारंग हिची प्रणोती शोभून दिसते. मोहनसोबतचे प्रसंग रंगतदार होतात. लग्नाच्या प्रसंगातील प्रसन्नता वातावरण बदलते. स्वातीच्या भूमिकेत सुजाता किरण ‘ओव्हर अक्टिंग’ केल्यागत आहे. अभिनयातला भडकपणा अतिरेकी वाटतो. पूनम सरोदे हिची मुलगी आदिती शोभून दिसते. साकार देसाई याचा प्रेमवीर विहानने नव्या पिढीच प्रतिनिधीत्व केलंय. पाच जणांची टीम उत्तम. सार्यांच्या गाठीशी नाटक, चित्रपट, मालिकांचा अनुभव आहे.
अभ्यासू नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी देसाई कुटुंबाचं देखणं घर उभं केलंय. पत्नी स्वातीचा फोटो सुरक्षित स्थळी तसेच मध्यभागी भिंतीवर उभा केला असून फोटो आणि प्रत्यक्षही दिसते. त्यासाठी फोटोची उघडझाप करणारी व्यवस्था आहे. बेडरूम, हॉल, गॅलरी, किचन यासाठी नेपथ्याचा नेमका वापर करण्यात आलाय. रंगसंगती चांगली जमलीय. नेपथ्य आराखड्यात कल्पकता दिसते. मॉल आणि बगीचा यातले दोन प्रसंग ठीक. सर्वात आकर्षण ठरते ती भिंतीवरील फोटो प्रâेम! ती भांडकुदळ बया कधी त्यातून डोकावेल याचा काही भरवसा नसतो. नेपथ्यरचनेत कुठेही अडगळ नाही. हालचालींना पुरेपूर जागा उपलब्ध करून दिलीय.

हास्या पवार यांनी भाऊ कदम यांच्या मोहनसाठी मॉडर्न टी-शर्ट दिलेत. ज्यामुळे प्रसंगात तरुणाई आलीय. पत्नी स्वातीचा भडक गेटअप भूमिकेला साजेसा. शेवटच्या प्रसंगातील प्रणोती सुरेखच. पाचही पात्रांचा गेटअप विचारपूर्वक आहे. शितल तळपदे यांची प्रकाश योजना आणि साई-पीयूष याचे संगीत नाट्याला पूरक असून ते यथायोग्य. निवडक गाण्यांचे मुखडे तसेच टायटल साँग श्रवणीय. साध्या तांत्रिक बाजू चांगल्या जमल्या आहेत.
मराठी नाटकांवर काही वर्षात विविध प्रकारची अतिक्रमणे झाली, पर्याय ही निर्माण झाले आहेत. त्यात नाट्यसृष्टी धडपड करताना दिसतेय. मालिका, चित्रपट, इलेक्ट्रॉनिक माध्यमे यांचे आकर्षण वाढतेय. पण मराठी नाटक एक लाइव्ह शो म्हणून जिवंत आहे. प्रसंगी सार्यांना पुरून उतरतेय. नाट्यनिर्मितीचे आव्हान स्वीकारून काही नाट्यप्रेमी आज जाणीवपूर्वक निर्माते म्हणून ठामपणे उभे ठाकतात. त्यात डॉ. उमेश आजगावकर आणि सचिन सुभाष अवस्थी यांनी या नाटकाची निर्मिती केलीय. जी परिपूर्ण आहे. निर्मितीमूल्यात कुठेही तडजोड दिसत नाही.
चॅनलवरल्या लाफ्टर शोच्या सुळसुळाटामुळे आज-काल विनोदी नाटक म्हणजे निव्वळ इम्प्रोव्हायझेशन असं समीकरणच बनलय. पण या नाटकात एक गमतीदार लवचिक गोष्ट अनुभविण्यास मिळते. जी ‘टेन्शन फ्री ‘ करू शकेल. ‘कॅप्टन ऑफ द शिप’ असलेले पडद्यामागे संतोष पवार आणि रंगमंचावर भाऊ कदम या दोघांनी या ‘विनोदी फॅन्टॅसी’चा खेळ मस्त मांडलाय. प्रेक्षक कुटुंबाचे दोन अडीच तास निश्चितच मनोरंजन होईल आणि प्रयोगानंतर भाऊ सोबत फोटोसेशनचाही योग जुळून येईल.
पहिली लग्नाची; दुसरी प्रेमाची!
लेखन- स्वप्नील बारसकर
दिग्दर्शन- संतोष पवार
नेपथ्य- संदेश बेंद्रे
संगीत- साई पियुष
प्रकाश- शितल तळपदे
वेशभूषा- हास्या पवार
रंगभूषा- राजेश परब
निर्माते- डॉ उमेश आजगावकर/ सचिन सुभाष अवस्थी
सूत्रधार- नितीन नाईक
निर्मिती- नवनीत प्रोडक्शन्स
व्यवस्थापक- कल्पेश बाविस्कर

