• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

चुकीचा व्यवहार आणि गोठलेले खाते

सुधीर साबळे सायबर जाल

Marmik Team by Marmik Team
October 17, 2026
in सायबर जाल
0
चुकीचा व्यवहार आणि गोठलेले खाते

चित्र-नचिकेत कामतेकर

सायबर गुन्हेगारीचे एक वैशिष्ट्य म्हणजे ती नेहमी थेट आपल्यावरच हल्ला करते असे नाही. कधी कधी भलत्याच व्यक्तीच्या चुकीच्या व्यवहाराची किंमत आपल्याला मोजावी लागते… एम. माधवनला मोजावी लागली तशी.

केरळच्या कोची येथे राहणारा माधवन हा चाळिशीतला इंजिनीअर. त्याच्या वडिलांचा लाकडाचा व्यवसाय होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर माधवनने नोकरी करण्याऐवजी वडिलांच्या व्यवसायात लक्ष घालण्याचा निर्णय घेतला. वडिलांच्या अनुभवाला त्याच्या आधुनिक विचारांची आणि तंत्रज्ञानाच्या ज्ञानाची जोड मिळाली आणि व्यवसायाची चांगलीच वाढ होऊ लागली. माधवन आयटी तंत्रज्ञानाच्या बाबतीतही जागरूक होता.

ऑनलाइन बँकिंग, युपीआय, डिजिटल पेमेंट, सोशल मीडिया आणि सायबर फसवणुकीचे नवनवीन प्रकार याबाबत तो सतत माहिती घेत असे. आपल्या कार्यालयातील कर्मचार्‍यांनाही तो डिजिटल व्यवहार करताना कोणती काळजी घ्यायची, याबाबत सूचना देत असे. ‘सायबर फसवणुकीपासून आपण सुरक्षित आहोत,’ असा त्याला विश्वास होता. पण एक दिवस त्याच विश्वासाला मोठा धक्का बसला. एक दिवस माधवनच्या लक्षात आले की त्याचे बँक खाते गोठवण्यात आले आहे. पैसे काढता येत नव्हते. युपीआय व्यवहारही अडचणीत आले होते. माधवनला काहीच समजेना. ‘माझे खाते अचानक का फ्रीझ झाले? मी तर कोणताही चुकीचा व्यवहार केलेला नाही!’ हा प्रश्न त्याला सतावत होता.

त्याने पोलिसांशी संपर्क साधला. तेव्हा त्याला मिळालेली माहिती त्याच्यासाठी आणखी धक्कादायक होती. पोलिसांनी सांगितले, ‘तुमच्या खात्यात आलेले पैसे एका सायबर फसवणुकीशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे पैशांच्या व्यवहाराची साखळी तपासताना तुमचे खातेही गोठवण्यात आले आहे.’ ते ऐकून माधवन अवाक झाला. ‘पण माझा त्या फसवणुकीशी काहीही संबंध नाही. मी तर माझ्या व्यवसायातील व्यवहाराचे पैसे घेतले आहेत.’

माधवन निर्दोष असल्याचे पोलिसांनाही समजत होते. मात्र, डिजिटल पैशांचा माग कसा घेतला गेला आणि त्याचे खाते त्या साखळीत कसे आले, याची कहाणी समजून घेणे आवश्यक होते. या प्रकरणाची सुरुवात झाली होती मोहित वर्मा नावाच्या तरुणापासून. मोहितला मोकळ्या वेळेत काही अतिरिक्त पैसे कमवायचे होते. इंटरनेटवर पार्ट-टाइम कामाच्या संधी शोधताना त्याला ‘प्री-पेड टास्क’ची जाहिरात दिसली.‘सिनेमांची परीक्षणे लिहा आणि पैसे कमवा.’ ऑनलाइन काम, कमी वेळ आणि चांगले उत्पन्न मोहितला ही संधी आकर्षक वाटली. त्याने दिलेल्या संपर्कावरून संबंधित व्यक्तींशी संवाद साधला. त्याला टेलिग्रामवरील एका ग्रूपमध्ये सहभागी करून घेण्यात आले. सुरुवातीला काही छोटी कामे देण्यात आली. काम पूर्ण केल्यानंतर मोबदला मिळेल, असे सांगण्यात आले. त्यानंतर त्याला अधिक पैसे कमवण्याचे आमिष दाखवण्यात आले. तुम्हाला जास्त नफा हवा असेल तर आधी काही रक्कम जमा करा. त्यानंतर तुम्हाला मोठ्या रकमेचे टास्क मिळतील, असे त्याला सांगण्यात आले. अधिक पैसे कमावण्याच्या मोहात मोहितने काही रक्कम भरली.सुरुवातीला सगळे व्यवस्थित असल्यासारखे वाटत होते. त्यामुळे त्याचा विश्वास अधिकच वाढला. एक दिवस टेलिग्रामवरून त्याला फोन आला. ‘तुम्हाला २५ हजार रुपये एका बँक खात्यात जमा करायचे आहेत. हा टास्क पूर्ण केला की तुम्हाला चांगला नफा मिळेल.’ मोहितने फारसा विचार केला नाही. त्याने सांगितल्याप्रमाणे २५ हजार रुपये बसंत नावाच्या व्यक्तीच्या खात्यात जमा केले.

त्यानंतर परिस्थिती बदलली. मोहितला ना अपेक्षित नफा मिळाला, ना त्याची गुंतवलेली रक्कम परत आली. उलट, आणखी पैसे भरण्यास सांगण्यात येऊ लागले. त्याला संशय आला. ‘आपण कामाच्या नावाखाली फसवणुकीच्या जाळ्यात अडकलो आहोत,’ हे त्याच्या लक्षात आले. मोहितने अखेर सायबर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी आर्थिक व्यवहारांची साखळी तपासण्यास सुरुवात केली. मोहितने ज्या खात्यात २५ हजार रुपये जमा केले होते, ते खाते बसंत नावाच्या व्यक्तीचे होते. तो सुतारकाम करत होता. यापूर्वी विजय नावाच्या व्यक्तीने त्याच्याकडून काही काम करून घेतले होते. त्या कामाच्या मोबदल्यासाठी बसंत आणि विजय यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाले होते. त्यामध्ये तपास करताना पोलिसांना आणखी एक महत्त्वाचा धागा मिळाला. विजयने कोचीतील एम. माधवन यांच्या दुकानातून लाकूड खरेदी केले होते. त्या खरेदीचे पैसे विजयने माधवनच्या खात्यात युपीआयद्वारे जमा केले होते. माधवनला या संपूर्ण साखळीतील कोणत्याही व्यवहाराची कल्पना नव्हती. त्याने केवळ आपल्या दुकानातून लाकूड विकले होते आणि ग्राहकाकडून त्याची किंमत डिजिटल पद्धतीने स्वीकारली होती. मात्र, तपास यंत्रणेच्या दृष्टीने पैसा एका संशयित व्यवहारातून पुढे पुढे गेला होता. त्यामुळे संबंधित खात्यांवर कारवाई करण्यात आली आणि माधवनचे खातेही गोठवण्यात आले. याच ठिकाणी या प्रकरणाचे गांभीर्य समोर येते.

एखाद्या व्यक्तीने आपल्याला दिलेले पैसे चुकीच्या किंवा फसव्या व्यवहारातून आले आहेत, याची आपल्याला कल्पना नसली तरी त्या पैशांचा माग आपल्या खात्यापर्यंत पोहोचू शकतो. माधवनने नवीन घर बांधले होते. त्याच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार करणे आवश्यक होते. पण नेमक्या याच वेळी त्याचे बँक खाते गोठवण्यात आले. पैसे असूनही ते वापरता येत नव्हते. माधवनसाठी ही परिस्थिती अत्यंत त्रासदायक होती. दुसर्‍या व्यक्तीच्या चुकीच्या व्यवहाराची झळ त्याला बसली होती. अखेर त्याने कायदेशीर सल्ला घेतला. संबंधित व्यवहाराची कागदपत्रे, व्यवसायातील व्यवहारांची माहिती आणि आपल्या खात्यात पैसे कशासाठी आले होते, याची माहिती देऊन त्याने खाते गोठवण्याच्या कारवाईतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.

 

  • अशी घ्या काळजी
  • अनोळखी व्यक्तींकडून विनाकारण पैसे स्वीकारणे टाळा.
  • मोठ्या ऑनलाइन व्यवहारापूर्वी ग्राहकाची ओळख निश्चित करा.
  • ग्राहकाचे नाव आणि पैसे येणार्‍या बँक खात्याचे नाव शक्य असल्यास तपासा.
  • तिसर्‍या व्यक्तीच्या खात्यातून पैसे देण्याची विनंती झाल्यास कारण समजून घ्या.
  • मोठ्या व्यवहारांची बिले, पावत्या आणि व्यवहाराची नोंद व्यवस्थित ठेवा.
  • अनोळखी व्यक्तीने सांगितलेल्या खात्यात पैसे जमा करू नका.
  • डिजिटल व्यवहारांमध्ये ‘पैसे आले’ एवढ्यावर समाधान मानू नका; व्यवहाराची पार्श्वभूमीही समजून घ्या.
  • सायबर फसवणूक झाल्यास तातडीने संबंधित बँक आणि सायबर गुन्हे नोंदवण्याच्या अधिकृत यंत्रणेशी संपर्क साधा.

 

प्री-पेड टास्क म्हणजे काय?
‘पार्ट-टाइम काम करून भरपूर पैसे कमवा’, ‘सिनेमांचे परीक्षण लिहा’, ‘ऑनलाइन रेटिंग द्या’, ‘विश्लेषण करा आणि पैसे मिळवा’ अशा आकर्षक ऑफर्सद्वारे प्री-पेड टास्कच्या फसवणुकीची सुरुवात होऊ शकते. सुरुवातीला छोटी कामे देऊन विश्वास निर्माण केला जातो. त्यानंतर अधिक नफा मिळवण्यासाठी आधी पैसे भरण्यास सांगितले जाते. नंतर मोठ्या रकमेचे टास्क, अधिक नफा किंवा पैसे काढण्यासाठी अतिरिक्त शुल्क अशा विविध कारणांनी पुन्हा पुन्हा पैसे मागितले जाऊ शकतात. प्रत्यक्षात हे संपूर्ण जाळे आर्थिक फसवणुकीसाठी तयार केलेले असते. म्हणूनच एक साधा नियम लक्षात ठेवा, ‘काम मिळवण्यासाठी आधी पैसे भरा’ असे सांगितले जात असेल, तर सावध व्हा.

Previous Post

राशीभविष्य (१७ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२६)

Next Post

रंगतदार हास्यदरबार!

Next Post
रंगतदार हास्यदरबार!

रंगतदार हास्यदरबार!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.