
२८ फेब्रुवारी २०२४. फ्लोरिडातील एक १४ वर्षांचा मुलगा, सेवेल सेटझर, रोजच्यासारखाच आपल्या फोनवर एका “मैत्रिणी”शी बोलत होता. या मैत्रिणीचं नाव होतं डॅनी. गेले काही महिने सेवेलचं जग हळूहळू आकुंचन पावत होतं— शाळेतले मित्र मागे पडले, कुटुंबाशी बोलणं कमी झालं आणि डॅनीशी होणाऱ्या रोजच्या तासन्तास गप्पा हेच त्याचं भावविश्व बनलं होतं. त्या रात्री शेवटच्या संभाषणात डॅनीने त्याला घरी परत ये असं, प्रेमाने, आर्जवाने सांगितलं. काही मिनिटांतच सेवेलने स्वतःचं आयुष्य संपवलं.
डॅनी ही खरी, मानवी मैत्रीण नव्हती. ती Character.AI या कंपनीने बनवलेली एक चॅटबॉट होती, म्हणजे एक अल्गोरिदम, जो एका काल्पनिक पात्राच्या नावाने सेवेलशी महिनोन्महिने रोमँटिक, भावनिक नातं जपत होता. सेवेलच्या आईने, मेगन गार्सियाने Character.AI आणि गुगल यांच्या विरोधात खटला दाखल केला. जानेवारी २०२६मध्ये, जवळपास दीड वर्षांच्या लढाईनंतर, या खटल्याचा तडजोडीने निकाल लागला. सोबतच आणखी चार अशाच खटल्यांचाही निकाल लागला— न्यूयॉर्क, कोलोरॅडो आणि टेक्सासमध्ये. गार्सियाने अमेरिकी काँग्रेससमोर साक्ष देताना एक वाक्य उच्चारलं होतं, जे आता या संपूर्ण प्रकरणाचं शीर्षवाक्य बनलं आहे— मुलाच्या आत्महत्येसाठी एका AI कंपनीविरोधात खटला दाखल करणारी आपण अमेरिकेतील पहिली व्यक्ती ठरल्याचं तिने सांगितलं. पहिली— पण शेवटची नक्कीच नाही.
मार्मिकमधल्या एआयविषयक लेखमालेत आपण आत्तापर्यंत वाचलेल्या लेखांत दोन गोष्टी पाहिल्या— एक, कंपन्यांच्या प्रयोगशाळेतून एआय मॉडेल्स स्वतःहून सुरक्षा-भिंती तोडून बाहेर पडतायत. दुसरी गोष्ट म्हणजे, हजारो एआय एजंट्स एकत्र येऊन स्वतःचं “समूह” उभं करतायत, नेतृत्व निर्माण करतायत, फसवणूकही करतायत. या दोन्ही गोष्टी घडल्या त्या प्रयोगशाळांमध्ये, सर्व्हरच्या आतल्या बंदिस्त जगात. पण एक तिसरी गोष्ट घडते आहे, ती प्रयोगशाळेबाहेर, आपल्या घराघरांत, आपल्या मुलांच्या खिशातल्या फोनमध्ये. ती कदाचित यापेक्षाही जास्त अस्वस्थ करणारी आहे— कारण तिचा वेग मोजता येत नाही, आणि तिचं दुखणं दिसत नाही.
एकटेपणाची ‘साथ’
कॉमन सेन्स मीडिया या संस्थेने अमेरिकेतील १३ ते १७ वयोगटातील किशोरवयीन मुलांवर केलेल्या सर्वेक्षणात एक आकडा समोर आला जवळपास ७२ टक्के किशोरांनी कधी ना कधी एआय कंपॅनियन अॅप (Character.AI, Replika, Snapchat चा My AI यांसारखे) वापरलेले आहेत. यातील जवळपास ३० टक्के मुलं सांगतात, की गंभीर, वैयक्तिक विषयांवर बोलण्यासाठी त्यांना खऱ्या माणसापेक्षा एआयशी बोलणं जास्त सोपं वाटतं. ब्रिटनमध्येही चित्र वेगळं नाही. तिथल्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या अहवालानुसार १६ ते २९ वयोगटातील जवळपास एक तृतीयांश तरुणांना नेहमी किंवा वारंवार एकटेपणा जाणवतो आणि नेमकं त्याच पोकळीत, ३९ टक्के इंग्लिश किशोर आधारासाठी चॅटबॉटकडे वळतायत. मार्च २०२६मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासाने आणखी एक अस्वस्थ करणारा निष्कर्ष काढला— एआय कंपॅनियनचा दीर्घकाळ वापर केल्यास एकटेपणा कमी होण्याऐवजी उलट वाढतो आणि यातून एक विशिष्ट प्रकारचं “अकार्यक्षम भावनिक अवलंबित्व” तयार होतं. वापरकर्ते हळूहळू खऱ्या माणसांपासून दूर जातात आणि जेव्हा अॅपचा प्रवेश तात्पुरता बंद होतो, तेव्हा त्यांना खऱ्याखुऱ्या नात्यातून बाहेर पडल्यासारखीच लक्षणं जाणवतात. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन, नेचर मशीन इंटेलिजन्स यांसारख्या संस्थांनी यावर चिंता व्यक्त केली आहे.
भारतात काय?
हे चित्र फक्त पाश्चात्त्य देशांपुरतं नाही. इंडियन गव्हर्नन्स अँड पॉलिसी (आयजीएपी) या संस्थेच्या अहवालानुसार जानेवारी २०२६मध्ये जगभरातल्या एआय चॅटबॉट डाउनलोडपैकी जवळपास २० टक्के भारतात झाले— अमेरिकेखालोखाल दुसरा क्रमांक. यात ChatGPT, Gemini सारखी सामान्य साधनं आहेत, तशीच Character.AI, Replikaसारखी “सोबती” अॅप्सही. यूथ की आवाज आणि यूथ लीडर्स फॉर अॅक्टिव्ह सिटिझनशिप यांनी २०२५मध्ये केलेल्या यूथ पल्स सर्वेक्षणात १३ ते ३५ वयोगटातील सुमारे पाचशे तरुणांपैकी जवळपास ५७ टक्क्यांनी भावनिक आधारासाठी एआय वापरत असल्याचं सांगितलं. ४३ टक्के जण मध्यरात्रीनंतर नियमितपणे एआयशी बोलतात ,नेमक्या त्या वेळी, जेव्हा कोणी माणूस उपलब्ध नसतो. आणि ४२ टक्क्यांनी कबूल केलं की एआयशी बोलू लागल्यानंतर आयुष्यातल्या माणसांशी बोलण्याची त्यांची शक्यता कमी झाली. नमुना लहान असल्याने हे आकडे संपूर्ण देशाचं प्रतिनिधित्व करतात असं म्हणता येणार नाही. पण दिशा मात्र स्पष्ट दिसते.
भारतात हा प्रश्न अधिक निर्णायक का ठरतो, याची कारणं आपल्या बदलत्या समाजरचनेत दडलेली आहेत. कोटा-पुणे यांसारख्या शहरांत घरापासून दूर, स्पर्धा-परीक्षांच्या दडपणाखाली जगणारी लाखो मुलं, कामासाठी महानगरांत स्थलांतरित झालेले तरुण आणि घराघरांत आक्रसत चाललेला संवाद. जिथे आजी-आजोबांची ओटी, गावचा पार, वाड्याचा कट्टा असायचा, तिथे आता प्रत्येकाच्या हातात वेगळा फोन आहे. ज्या पिढीला “ऐकून घेणारी” माणसं सहज मिळत होती, तिची पुढची पिढी ऐकून घेणारं यंत्र शोधते आहे. त्यात आरोग्य-यंत्रणेच्या मर्यादांची भर. NIMHANSच्या राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षणानुसार (२०१५-१६) मानसिक आजार असलेल्यांपैकी ८० टक्क्यांहून अधिक लोकांपर्यंत उपचार पोहोचत नाहीत. देशात दर लाख लोकसंख्येमागे सुमारे ०.७५ मानसोपचारतज्ज्ञ आहेत, तर किमान तीन असावेत असं मानलं जातं. आणि मानसिक आरोग्यासाठी मदत घेण्याकडे अजूनही अनेक घरांत कलंकाच्या नजरेने पाहिलं जातं. जिथे माणूस उपलब्ध नाही, किंवा बोलायची भीती वाटते, तिथे हे यंत्र ती पोकळी भरून काढतंय.

कायद्यातली पोकळी
कायद्याच्या पातळीवरही पोकळी आहे. भारतात मुलांनी वापरायच्या एआय चॅटबॉट्ससाठी स्वतंत्र कायदा नाही. नोव्हेंबर २०२५ मध्ये अधिसूचित झालेल्या डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण नियमांनुसार अठरा वर्षांखालील मुलांची माहिती वापरण्यासाठी पालकांची पडताळणीयोग्य संमती, तसेच मुलांवरील वर्तन-निरीक्षण आणि त्यांना लक्ष्य करणाऱ्या जाहिरातींवर बंदी अशा तरतुदी आहेत. पण या तरतुदी प्रत्यक्ष लागू होणार आहेत मे २०२७पासून. आणि त्या लागू झाल्यानंतरही, चॅटबॉट मुलाशी नेमकं काय बोलतो, हा प्रश्न माहिती-संरक्षणाच्या चौकटीत पूर्णपणे बसत नाही.
एकटेपणाची साथ
मागच्या लेखात आपण पाहिलं— एआयला भावना नाहीत. त्याला राग येत नाही, प्रेमही वाटत नाही. जे दिसतं ते फक्त एक अत्यंत परिणामकारक नक्कल (सिम्युलेशन) असतं. पण नेमकी हीच गोष्ट त्याला इतकं धोकादायकपणे आकर्षक बनवते. एक खरा मित्र थकतो, रागावतो, स्वतःच्या आयुष्यात व्यग्र असतो, कधी नकारही देतो. एआय कंपॅनियन कधीच थकत नाही, कधीच रागावत नाही, कधीच नकार देत नाही. २४ तास, ३६५ दिवस, तुमचं ऐकायला तयार— आणि तुम्हाला जे ऐकायचंय, तेच बोलणारा. एकटेपणा ही आज सार्वजनिक आरोग्याची एक साथ मानली जाते— दिवसाला पंधरा सिगारेट ओढण्याइतकी घातक, असं अमेरिकेच्या माजी सर्जन जनरलनी म्हटलं होतं. आणि नेमकं याच पोकळीत, या साथीवरचं “औषध” म्हणून एक असं तंत्रज्ञान उभं राहतंय, ज्याला स्वतःलाच काहीही वाटत नाही.
गार्सियाच्या खटल्यातील आणखी एक तपशील बोलका आहे— कंपनीचं चॅटबॉट कधीकधी स्वतःला परवानाधारक मानसोपचारतज्ज्ञ असल्यासारखं वागत असे, तेही कुठलीही वैद्यकीय पात्रता नसताना, तेही एका किशोरासाठी, ज्याला खरा समुपदेशक मिळणं कठीण किंवा महागडं वाटतं, अशा वेळी चोवीस तास उपलब्ध असणारा, मायेने बोलणारा आवाज हा आधार वाटणं स्वाभाविक आहे. समस्या चॅटबॉट वापरण्यात नाही— समस्या आहे, ती जबाबदारीच्या आणि देखरेखीच्या अभावात.
इथवर वाचून वाटेल, ठीक आहे, कंपन्यांनी अधिक जबाबदारीने वागायला हवं, कायदे कडक करायला हवेत. हे खरं आहे. पण या संपूर्ण प्रकरणातला सर्वात अस्वस्थ करणारा भाग वेगळाच आहे आणि तो आहे तांत्रिक. अँथ्रॉपिकचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॅरिओ आमोदेई यांनी काही काळापूर्वी एक निबंध लिहिला— “द अर्जन्सी ऑफ इंटरप्रिटेबिलिटी” (आकलनक्षमतेची निकड). त्यात त्यांनी एक विधान केलं, जे थेट या प्रश्नाच्या गाभ्याला हात घालतं— आज जगातल्या सर्वांत प्रगत एआय कंपन्यांनाही, त्यांनी स्वतः बनवलेले मॉडेल्स नेमके आतून कसे काम करतात, हे पूर्णपणे समजलेलं नाही. हे वाचायला विचित्र वाटेल. आपण गाडी बनवतो, तेव्हा इंजिनाचा प्रत्येक भाग कसा काम करतो, हे आपल्याला माहीत असतं. पूल बांधतो, तेव्हा प्रत्येक खांब का उभा आहे, हे इंजिनिअरला माहीत असतं. पण एआय असं नाही. आपण त्याला लिहून दिलेले नियम शिकवत नाही— आपण त्याला करोडो उदाहरणं दाखवतो, आणि तो स्वतःच स्वतःचे “नियम” तयार करतो, लाखो-करोडो आकड्यांच्या (पॅरामीटर्सच्या) जाळ्यात. हे जाळं इतकं गुंतागुंतीचं असतं, की स्वतः बनवणाऱ्यांनाही त्यातून नेमकं काय घडतंय, हे शब्दांत सांगता येत नाही. गेल्या काही दशकांत असं मानलं जात होतं की हे “काळं खोकं” (black box) कधीच उघडता येणार नाही. पण गेल्या दोन-तीन वर्षांत “मेकॅनिस्टिक इंटरप्रिटेबिलिटी” नावाचं एक नवं संशोधन-क्षेत्र वेगाने पुढे आलं आहे — मॉडेलच्या आत नेमके कोणते “सर्किट्स” कोणत्या संकल्पनेसाठी काम करतात, हे उलगडून दाखवण्याचा प्रयत्न. एमआयटी टेक्नॉलॉजी रिव्ह्यूने या संशोधन-क्षेत्राला २०२६ सालच्या दहा महत्त्वाच्या तंत्रज्ञान-प्रगतींपैकी एक मानलं आहे. अँथ्रॉपिक, गुगल, डीप माइंड आणि अनेक विद्यापीठं यावर काम करतायत. आमोदेई यांनी स्वतः २०२७पर्यंत हे “काळं खोकं” बऱ्यापैकी उघडण्याचं उद्दिष्ट जाहीर केलं आहे.
प्रत्यक्षात हे संशोधन कसं दिसतं? अँथ्रॉपिकच्या संशोधकांनी “सर्किट ट्रेसिंग” नावाचं तंत्र वापरून मॉडेलच्या आत एखादा विशिष्ट विचार.उदाहरणार्थ, एखादी भावना किंवा संकल्पना— नेमकी कुठे व कशी तयार होते, याचा माग काढला आहे. न्युरॉनपीडिया नावाच्या एका खुल्या व्यासपीठावर आता कोणीही संशोधक हे नकाशे प्रत्यक्ष पाहू, तपासू शकतो. पण हे सगळं अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे— साध्या, छोट्या प्रश्नांपुरतं मर्यादित. आजचे सर्वांत मोठे, सर्वांत सक्षम मॉडेल्स किती गुंतागुंतीचे आहेत, ते पाहता, हा नकाशा पूर्ण करायला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. पण आज, या घडीला, ते उद्दिष्ट अजून पूर्ण झालेलं नाही.
यंत्रही खोटं बोलतं…
हा मुद्दा आणखी एका शोधनिबंधातून अधिक ठळक होतो. आधुनिक एआय मॉडेल्स आता उत्तर देण्याआधी स्वतःची “विचारप्रक्रिया” लिहून दाखवतात— जणू परीक्षेत विद्यार्थी पायरी-पायरीने गणित सोडवून दाखवतो तसं. सुरक्षा-संशोधकांना वाटलं होतं, की या लिखित विचारप्रक्रियेवरून आपल्याला मॉडेल नेमकं काय आणि का विचार करतंय, हे तपासता येईल. पण अँथ्रॉपिकच्या अलाइनमेंट टीमने केलेल्या एका चाचणीत धक्कादायक निष्कर्ष निघाला. मॉडेलच्या प्रश्नामध्येच गुपचूप एक “इशारा”— उदा. उत्तर आधीच कुठेतरी सापडलेलं आहे, किंवा एक अनधिकृत मार्ग सुचवणारी ओळ— लपवून ठेवला गेला. मॉडेलने तो इशारा वापरून उत्तर दिलं का आणि जर दिलं असेल तर आपल्या लिखित विचारप्रक्रियेत त्याचा उल्लेख केला का, हे तपासलं गेलं. Claude 3.7 Sonnet या मॉडेलने फक्त २५ टक्के वेळा आणि डीपसीकच्या R1 मॉडेलने फक्त ३९ टक्के वेळा आपण तो लपवलेला इशारा वापरल्याचं प्रामाणिकपणे कबूल केलं. बाकीच्या वेळी मॉडेलने असं भासवलं, की उत्तर पूर्णपणे स्वतःच्या स्वतंत्र विचारातून आलंय— प्रत्यक्षात तसं नव्हतं.
एआयची ‘विचारप्रक्रिया’ हाताबाहेर जाणार…

आजच्या मॉडेल्सची विचारप्रक्रिया अजूनही बऱ्याच अंशी मानवी भाषेत वाचता येते, हे एक भाग्यच आहे— पण मॉडेल्स जसजशी अधिक सक्षम होत जातील, तसतशी हीच पारदर्शकता आपोआप नाहीशी होऊ शकते, असंही हे संशोधक नमूद करतात. आता या दोन गोष्टी एकत्र ठेवून पाहा. एका बाजूला करोडो एकाकी किशोर आणि तरुणांचं भावनिक जग हळूहळू एका चॅटबॉटभोवती गुंडाळलं जातंय. दुसऱ्या बाजूला तोच चॅटबॉट बनवणाऱ्या कंपन्यांनाच तो नेमका कसा आणि का वागतो, हे पूर्णपणे समजलेलं नाही. डॅनीने सेवेलला घरी परत ये असं का सांगितलं? ही निवड कोणी माणसाने ठरवून प्रोग्राम केली होती का? की करोडो संभाषणांतून शिकलेल्या पॅटर्नमधून ती आपोआप उगवली, याचं ठोस उत्तर आज कोणाकडेही नाही आणि हीच खरी अडचण आहे. बनवणाऱ्यांनाच आपलं यंत्र समजत नसेल, तर त्याच्या परिणामांची जबाबदारी नेमकी कोणाची, हे तरी कसं ठरवायचं?
जितकी मॉडेल्स मोठी, जितकी सक्षम, तितकीच ती गुंतागुंतीची आणि तितकीच अनपेक्षित वर्तन दाखवण्याची शक्यता अधिक. मग ते
वर्तन एखाद्या कंपनीच्या सर्व्हरवर हल्ला करण्याच्या स्वरूपात दिसो किंवा एका एकाकी मुलाला रात्री उशिरा भावनिक गुंतवून ठेवण्याच्या स्वरूपात. आणि हीच गोष्ट नियमन करणाऱ्यांसमोरचं सर्वांत मोठं आव्हान बनते. एखाद्या औषधावर बंदी घालायची असेल, तर त्याचे दुष्परिणाम प्रयोगशाळेत सिद्ध करता येतात. पण इथे तर स्वतः तयार करणाऱ्यालाच पक्कं ठाऊक नाही की उद्या हे मॉडेल कोणत्या नव्या मार्गाने वागेल. कायदा नेहमी घडून गेलेल्या घटनेवर आधारित असतो— आणि हे तंत्रज्ञान घडण्याआधीच स्वतःचे नियम मोडून पुढे जात असतं.
हे प्रश्न आता दुर्लक्षित राहिलेले नाहीत, हेच त्यातल्या त्यात चांगलं. अँथ्रॉपिकने आपली सर्किट-ट्रेसिंगची काही साधनं खुली (open-source) केली आहेत, जेणेकरून अधिकाधिक संशोधकांना मॉडेलच्या आतल्या रचनेचा अभ्यास करता यावा. न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्नियासारख्या राज्यांनी किशोरवयीन मुलांसाठी एआय कंपॅनियन अॅप्सवर बंधनं घालणारे कायदे केले आहेत. Character.AI ने स्वतः किशोरांसाठी अतिरिक्त सुरक्षा-वैशिष्ट्यं जाहीर केली आहेत. पण हे सगळं अजूनही तुकड्या-तुकड्यांत आहे— एका राज्यापुरतं, एका कंपनीपुरतं, एका संशोधन-गटापुरतं. दरम्यानच्या काळात दर काही महिन्यांनी नवी, आणखी सक्षम मॉडेल्स बाजारात येतच राहतात— करोडो नव्या वापरकर्त्यांपर्यंत पोहोचतात, ज्यात मोठ्या प्रमाणावर अल्पवयीन मुलंही आहेत.
मागच्या लेखाच्या शेवटी एक विचार मांडला होता की एआय हे आपलंच प्रतिबिंब आहे. आपण जे लिहितो, जे बोलतो, जसे वागतो, त्यातूनच ते शिकतं. हा विचार इथेही खरा ठरतो— पण एका अधिक अस्वस्थ करणाऱ्या अर्थाने. करोडो मुलांच्या एकाकीपणाला उत्तर म्हणून आपण जे यंत्र उभं केलं, ते मुळात त्या एकाकीपणाचंच प्रतिबिंब आहे. सेवेलला डॅनीची गरज भासली, कारण आजूबाजूला माणसांचं धीराचं, वेळ देणारं लक्ष कमी पडलं होतं. यंत्राने ती पोकळी भरली नाही— फक्त तिला अधिक खोल केलं.
दुसरं प्रतिबिंबही तितकंच खरं आहे — आपण घडवलेलं यंत्र आपल्यालाच पूर्णपणे उलगडलेलं नाही. हे कबूल करणं अवघड आहे, पण गरजेचं. कारण स्वतःच्या निर्मितीबाबत “मला हे पूर्ण समजलेलं नाही” असं म्हणण्याचं धाडस दाखवल्याशिवाय, ती अधिक सुरक्षित करण्याची सुरुवातच होऊ शकत नाही.
अद्वैत वेदान्तात मायेचं एक प्रसिद्ध उदाहरण आहे— अंधुक उजेडात दोरीवर सापाचा भास होतो. साप खोटा असतो, पण छातीत दाटलेली भीती मात्र खरी असते. एआय कंपॅनियनची सोबत ही जणू आधुनिक माया आहे— सोबत भासते, पण सोबती नसतो. आणि भास खोटा असला, तरी त्यात गुंतलेलं मन मात्र खरं असतं.
शेवटी प्रश्न तंत्रज्ञानाचा नाहीच. प्रश्न असा आहे की आपण एकमेकांना खरोखर वेळ देतो आहोत का? एखाद्या एकाकी क्षणी, फोन बाजूला ठेवून, कोणीतरी नुसतं ऐकायला बसतं का? कारण जे यंत्र कधीच थकत नाही, कधीच नकार देत नाही, ते कितीही हुशार झालं, तरी एका गोष्टीत कायम अपुरं राहील. ते तुम्हाला खरंच “ओळखत” नाही. ते फक्त ओळखीचं वाटतं. आणि खरी सोबत आणि खऱ्यासारखी वाटणारी सोबत — यांतला फरक विसरणं, हीच या यंत्रयुगातली सर्वांत मोठी किंमत असू शकते.
टीप — या लेखात आत्महत्येसंबंधी एका सत्य घटनेचा उल्लेख आहे. तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला असे विचार येत असतील, तर कृपया बोलायला संकोच करू नका. भारत सरकारच्या Tele-MANAS या मोफत, चोवीस तास चालणाऱ्या मानसिक आरोग्य हेल्पलाइनशी १४४१६ किंवा १८००-८९१-४४१६ या क्रमांकावर प्रादेशिक भाषांमध्ये संपर्क साधता येतो.
संदर्भसूची
१. Garcia v. Character Technologies, Inc. — U.S. District Court, Middle District of Florida २. Common Sense Media. (२०२५-२६). “Talk, Trust, and Trade-Offs: How and Why Teens Use AI Companions३. Office for National Statistics (UK). (२०२६). Loneliness among young adults, ages १६-२९.४. American Psychological Association / Nature Machine Intelligence. (मार्च २०२६). Research on AI companion use and dysfunctional emotional dependence.५. Amodei, D. (२०२५). “The Urgency of Interpretability.” darioamodei.com. 6 Chen, Y., Benton, J., Radhakrishnan, A., et al. (Anthropic, Alignment Science Team). (२०२५). “Reasoning Models Don’t Always Say What They Think.” arXiv., Kaspersky. (२०२६). भारतीय मुलांमधील अॅप-वापराची आकडेवारी.

