
माया ब्रह्म ऐसे म्हणती धर्मठक।
आपणासरिसे लोक नागविले ।।१ ।।
विषयी लंपट शिकवी कुविद्या।
मनामागे नांद्या होऊनि फिरे ।।२ ।।
करुनी खाता पाक जिरे सुरण राई।
करिता अतित्याई दुःख पावे ।।३ ।।
औषध द्यावया चाळविले बाळा।
दावूनिया गुळा दृष्टीपुढे ।।४ ।।
तरावया आधी शोधा वेदवाणी।
वांजट बोलणी वारा त्याची ।।५ ।।
तुका म्हणे जया पिंडाचे पाळण।
न घडे नारायणभेट तया ।।६ ।।
तुकोबाराय प्रस्तुत अभंगात विषयासक्त वेदांती पंडितांचं वर्णन करतात. वेदांताची मांडणी माया-ब्रह्माच्या विवेचनावर उभी आहे. हे वेदांती माया-ब्रह्म, घट-पट, रज्जू-सर्प आणि अध्यस्त-विवर्त असा शाब्दिक काथ्याकूट करत असतात. तुकोबाराय म्हणतात की हे लोक ‘धर्मठक’ आहेत, म्हणजे धर्माच्या नावाने फसवणूक करणारे. धर्माचा गाभा कळलेला नसताना ते उपदेश करत फिरतात. त्यामुळे ते इतरांना तर फसवतातच, पण स्वतःचीही फसवणूकच होते.
तुकोबाराय दुसर्या चरणात सांगतात की हे लोक विषयलंपट असतात. ते लोकांना कुविद्या शिकवतात. अविद्या आणि कुविद्या यात फरक आहे. अविद्या म्हणजे विद्या नसणं, तर कुविद्या म्हणजे चुकीची विद्या असणं. अविद्या अहंकार जन्माला घालत नाही. कुविद्या मात्र अहंकार वाढवते. हे लोक आपल्या मनामागे नंदीबैलाप्रमाणे फिरत असतात. नंदीबैल जसा मालकाच्या कोणत्याही गोष्टीला होकार भरतो त्याचप्रमाणे हे लोक त्यांच्या मनाला आवडलेल्या गोष्टी करत राहतात. माणसाचं मन निरंतर सुखाचा शोध घेत असतं. पण त्याला सुख मिळत नाही. मनाची धाव विषयसुखापर्यंतच जाते. ते नाशिवंत आहे. त्यात स्थिरता नाही. मानवी जीवनात या सुखदुःखाच्या लाटा येत-जात राहातात. त्यामुळेच मनाची तगमग वाढतच जाते. ‘सुख पाहता जवापाडे। दुःख पर्वताएवढे।।’ असाच माणसाचा अनुभव असतो. मन मात्र फिरून फिरून परत त्याच त्याकडेच ओढलं जातं. बहिणाबाई चौधरी म्हणतात,
मन वढाय वढाय। उभ्या पिकातलं ढोर।
किती हाकला हाकला। फिरी येतं पिकावरं।
जनावराला कितीही हाकललं तरी ते परत परत पिकातच येतं त्याप्रमाणे मनाला कितीही दुःखाचा अनुभव आला तरी त्याची धाव विषयसुखाकडेच राहते. हे लहरी मन एकदा उंडारलं की वादळासारखं बनतं.
मन लहरी लहरी। त्याले हाती धरे कोन।
उंडारलं उंडारलं। जसा वारा वाहादान।
पाखरू ज्याप्रमाणे खाली जमिनीवर असतं आणि एकदम क्षणात आभाळातही उडतं त्याचप्रमाणे मनाचंही आहे.
मन पाखरु पाखरु। त्याची काय सांगू मात।
आता व्हतं भुईवर। गेलं गेलं आभायात।
मनाला कोणताही लगाम नाही. ते मोकाट आहे. त्याला हित-अहित कळत नाही, सत्य-असत्य कळत नाही. त्यामुळेच मनाच्या मागे धावण्याने माणसाचा घात होतो.
मन मोकाट मोकाट। त्याले ठायी ठायी वाटा।
जशा वार्यानं चालल्या पान्ह्यावरल्या रे लाटा।
बहिणाबाई मनाला विषाचीही उपमा देतात आणि हे ‘मनोविष’ साप आणि विंचवाच्या विषापेक्षाही जास्त जहरी असल्याचं सांगतात. एकवेळ सापाच्या आणि विंचवाच्या विषाला उतार तरी मिळतो पण मनाच्या विषाला उतार नाही. ते माणसाचा कायमचा अधःपात घडवतं.
मन जह्यरी जह्यरी। याचं न्यारं रे तंतर।
आरे इचू साप बरा। त्याले उतारे मंतर।
तुकोबाराय प्रस्तुत अभंगातून वेदांती पंडित त्यांच्या मनाचे गुलाम आहेत असं सूचित करतात. वेदांतशास्त्रातील तत्त्वज्ञानच त्यासाठी कारणीभूत आहे. वेदांतात ब्रह्मज्ञानाचा महिमा आहे. हे ब्रह्मज्ञान मनाचा स्वभाव लक्षात घेत नाही. मनाला ज्याचा त्याग करायला सांगितला जातो त्याविषयीच मनात आकर्षणाची भावना निर्माण होते. स्प्रिंगवर जितका जास्त दाब टाकला जातो तितक्याच वेगाने ती वर उसळी मारते. त्याचप्रमाणे मनावर विषयसुखाच्या त्यागाचा जितका दाब आपण टाकू तितक्याच वेगाने मनाची स्प्रिंग भोगवादाच्या दिशेने उसळी मारते. तप म्हणजे कामक्रोधाचं दमन, पण ‘करिता तपे कामक्रोध खवळती।’ असा उलटाच अनुभव येतो. मनाला ज्याचा त्याग करायला सांगू, त्याची भेट वासना घडवून देते. ‘त्यजिले भेटवी आणूनी वासना।’ असाच व्यवहार होतो. त्यामुळे संतांनी मनाला वासनेचा त्याग न करता विषयसुखाचा विधिपूर्वक भोग घेण्याचा मार्ग दाखवला. ‘विधीने सेवन। विषयत्यागाते समान ।।’ असं तुकोबाराय म्हणतात. वेदांती लोक मनाचा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करतात आणि मन स्थिर होईल अशी भाबडी अपेक्षा करतात. संतांनी मात्र मनाला धावण्याची मोकळीक दिली पण धावण्याची दिशा बदलवली. विषयसुखाकडे मनाची धाव होती, संतांनी मनाला परमेश्वराच्या भक्तीसुखाकडे धावण्याची दिशा दाखवली. ‘मना तेथे धाव घेई। राहे विठोबाचे पायी ।।’ असं तुकोबाराय म्हणतात. परमेश्वराच्या भक्तीप्रेमाचा अनुभव आल्यावर ते मन आपोआपच त्या प्रेमाचा आनंद उपभोगत राहील.
मनाला एखाद्याची गोडी लागली की ती सहसा सुटत नाही. ‘लाचाविले मन लागलीसे गोडी। ते जीवे न सोडी ऐसे झाले ।।’ असं तुकोबाराय म्हणतात. मनाला देवाच्या नामस्मरणाचा छंद लागला की संपूर्ण शरीर ब्रह्मरूप होतं.
गोविंद गोविंद ।
मना लागलीया छंद ।।१ ।।
मग गोविंद ते काया।
भेद नाही देवा तया ।।२ ।।
वारकरी संप्रदायानुसार मनाला ‘गोविंद गोविंद’ असा नामस्मरणाचा छंद लागतो. त्यायोगाने शरीर ब्रह्मीभूत होतं. वासना जळून जाते. त्याला कोणतंही बंधन राहत नाही. मनालाच ईश्वराची गोडी लागल्यानं कोणत्या विधीनिषेधाची पर्वा करण्याची त्याला गरज नाही. स्वेच्छा हाच त्याचा विधी, स्वैराचार ही त्याची समाधी आणि त्याची सहज अवस्थाही मोक्ष बनते. अनुभवामृतात ज्ञानेश्वर माऊली म्हणतात-
‘स्वेच्छाचि जाहली विधी।
स्वैर जाहली समाधी।
दशे इये मोक्षरिद्धी।
बैसो घापे ।।’
वैदिक परंपरेत दोन मार्ग आहेत. पहिला ब्रह्मज्ञानी लोकांचा आणि दुसरा कर्मकांडी लोकांचा. या दोघांचाही फोलपणा अभंगातल्या पुढच्या दोन चरणांत आला आहे. तुकोबाराय पहिलं उदाहरण देतात ते सुरणाच्या भाजीचं. सुरण हे कंदमूळ, त्याची व्यवस्थित शिजवून भाजी केली तर ती खाता येते. ती नीट शिजली नाही, तर खाणार्याच्या घशाला खाज सुटते. सुरणातले सुईसारखे तीक्ष्ण स्फटिक घशाला टोचतात. सुरण नीट शिजवल्यानंतर ते नष्ट होतात. वैदिक परंपरेतल्या ब्रह्मज्ञानी लोकांसाठी तुकोबारायांनी हे उदाहरण दिलं आहे. वारकरी परंपरा ज्ञान पचवायला सांगते. ‘ज्ञान गिळोनी गावा गोविंदू’ असा ज्ञानोबारायांचा आदेश आहे. ज्ञान पचलं नाही तर अहंकार उत्पन्न होतो. ज्ञानावर भक्तीची प्रक्रिया झाली नाही तर कंठाला अहंकाराची खाज सुटते. ‘नवल अहंकाराची गोठी। विशेष अज्ञाना न लगे पाठी। सज्ञानाचे झोंबे कंठी। नाना संकटी नाचतसे ।।’ असं ज्ञानोबाराय म्हणतात. दुसर्या उदाहरणात तुकोबाराय वेगळे उदाहरण देतात. समजावतात. बाळाला औषध देताना त्याच्यासमोर गूळ धरून प्रत्यक्षात त्याला गूळ खाऊ न घालता औषध दिलं जातं. कर्मकांडाचंही तसंच आहे. कर्मकांडाने ऐहिक सुखोपभोग मिळतात, त्यासाठी यज्ञादी कर्मकांडाचं प्रयोजन आहे. हा गूळ दाखवून जीवाला भक्तीरसाचं औषध द्यायचं आहे. जीवाला झालेला भवरोग दूर करण्याकरिता ‘ब्रह्मरस घेई काढा। जेणे पीडा वारेल ।।’ असा भक्तिरसाचा काढा द्यायचा आहे. ‘वेदाधारे बोलती। केवळ कर्म प्रतिष्ठिती। परि कर्मफळी आसक्ती। धरुनिया ।।’ असं ज्ञानोबाराय म्हणतात. यज्ञादी कर्मकांड हा केवळ गूळ आहे हे समजून न घेता कर्मकांडी लोक कर्मकांडावरच भर देत राहिले. थोडक्यात वेदातील कर्मकांड आणि ब्रह्मज्ञानातला अहंकार या दोन्ही गोष्टी टाकाऊ आहेत. तुकोबाराय प्रस्तुत अभंगात सांगतात की तुम्हाला भवसागरातून तरायचं असेल तर आधी वेदवाणी ‘शोधा.’ इथे ‘शोधा’ हा शब्द ‘पाहा’ अशा अर्थाने आल्याचा अनेकांचा गैरसमज झाला आहे. त्यामुळेच ‘तरावया आधी शोधा वेदवाणी।’ या चरणात वेदाचा शोध घ्या आणि त्याचा अर्थ समजून घ्या असं तुकोबाराय म्हणत आहेत अशी अनेकांची समजूत झालेली आहे. शोधणे या शब्दाचा एक अर्थ शुद्ध करणे म्हणजेच गाळून घेणे असाही आहे. आमच्याकडे ग्रामीण भागात ‘चहा गाळण्याला’ ‘चहा शोधणे’ असं म्हणतात. गाळणीलाही आमच्याकडे ‘चहाची शोधनी’ म्हणतात. आयुर्वेदात ‘शोधन चिकित्सा’ नावाची एक प्रक्रिया आहे. तिचा अर्थ शरीरातील दोष (वात, कफ, पित्त) काढून टाकणे आणि शरीर शुद्ध करणे. अशुद्ध धातूपासून शुद्ध धातू मिळवण्यासाठीही ‘धातू शोधन’ प्रक्रिया केली जाते.
थोडक्यात, तरण्यासाठी ‘वेदवाणी शोधा’ असं जे तुकोबाराय म्हणत आहेत त्याचा अर्थ वेदातील दोष आणि अशुद्धता काढून टाका असा आहे. तुकोबाराय त्याच चरणाच्या उत्तरार्धात तेच सांगतात. वेदवाणीची शुद्धता करा आणि त्यातील वांजट बोलणी बाजूला करा. वांजट म्हणजे सृजनहीन, वांझोट्या. वेदातील कर्मकांडाचा आणि ब्रह्मज्ञानाच्या अनुषंगाने येणारा वर्णाभिमानाचा अशुद्ध भाग काढून टाकण्याविषयी इतरही अभंगात उल्लेख आलेले आहेत. ‘गाळुनिया भेद। आम्हा प्रमाण तो वेद।।’ असं एके ठिकाणी तुकोबाराय म्हणतात तर ‘खंडे निवडतो वेदांची।’ असंही त्यांनी एका अभंगात म्हटलं आहे. ‘ज्ञानिये जे होती। ते वेदार्थाते विवरती। मग अपेक्षित ते स्वीकारती। शाश्वत जे ।।’ असं माऊली ज्ञानोबाराय म्हणतात. त्यामुळे प्रस्तुत अभंगातील पुढच्या मागच्या चरणांचा आंतरसंबंध लक्षात घेतला असता ‘तरावया आधी शोधा वेदवाणी।’ याचा अर्थ वेदाची शुद्धता करा असाच आहे.
तुकोबाराय अखेरच्या चरणात म्हणतात की जे ब्रह्मज्ञानी लोक पिंडपोषण करतात त्यांना नारायणाची भेट होणं शक्य नाही. ब्रह्मज्ञानी एका बाजूला आत्म्याला ब्रह्मरूप मानून शरीराला जड मानतात. मी ब्रह्म आहे म्हणजेच आत्मा आहे असं म्हणतात. पण त्याचवेळी पिंडपोषण मात्र थांबवत नाहीत. तुकोबारायांनी पिंडपोषणाचा निषेध इतरही अभंगात केला आहे. ‘पिंडपोषकाच्या जळो ज्ञानगोष्टी।’ असं एका अभंगात म्हणतात तर ‘अहंब्रह्म म्हणोनि पाळितसे पिंडा। न बोलवे भांडा तयासवे ।।’ असं आणखी एका अभंगात स्पष्ट करतात. वारकर्यांचीही देहासक्ती संपलेली असते तर मग त्यांनी केलेलं पिंडपोषण कसं यथार्थ आहे, असा प्रश्न पडू शकतो. वास्तविक पाहता वारकरी केवळ आत्मा नव्हे तर ‘ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी।’ या न्यायाने शरीरच ब्रह्मरूप करतात. दुसरी गोष्ट म्हणजे ते शरीराचा वापर परोपकारार्थ करतात. ज्ञानी आत्ममग्न असतात तर संत जनोद्धारक असतात. ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती। देह कष्टविती परोपकारे ।।’ असा संतांचा व्यवहार असतो. त्यामुळे अहंब्रह्मास्मी म्हणणार्या ब्रह्मज्ञान्याला पिंडपोषणाचं स्पष्टीकरण देता येत नाही, वारकर्यांना मात्र ते देता येतं.

