• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

आघात आणि वाटचाल

सचिन परब प्रबोधन-१००

Marmik Team by Marmik Team
October 3, 2026
in प्रबोधन १००
0
अभद्रावर घाव घालणारे प्रबोधनकार

परिस्थितीने अकस्मात फाटलेले जीवनाचे कांबळे रफू करून कसेबसे ठाकठीक करण्यात मी गुंतलो असता… अशा शब्दांत प्रबोधनकार त्यांच्या दादरमधल्या त्यांच्या वास्तव्याचं वर्णन करतात. त्यांच्या या धडपडीत एकीकडे त्यांच्याकडून शेतकर्‍यांचे स्वराज्य सारखं पुस्तक लिहून होत होतं, पण त्याच वेळेस त्यांच्यावर पुत्रशोकाचा मोठा आघातही झाला. तो आघात पचवून प्रबोधनकार नवी वैचारिक मांडणी करत राहिलेले दिसतात.

शेतकर्‍यांचे स्वराज्य हे पुस्तक प्रबोधनकारांसाठी अत्यंत आर्थिक अडचणीच्या काळात झालेला अनपेक्षित धनलाभ होता. कारण या पुस्तकासाठी दिनकरराव जवळकरांनी त्यांना तब्बल तीनशे रुपये अ‍ॅडवान्स दिला होता. स्वतः कफल्लक आयुष्य जगलेल्या जवळकरांनाही त्यांच्या उपक्रमांसाठी अबकारी खात्याचे मंत्री सत्यशोधक भास्करराव जाधव यांच्यामुळे थोडा आर्थिक आधार मिळाला होता. त्याचाच लाभ अप्रत्यक्षपणे प्रबोधनकारांनाही झाला. त्यांनी याचंही नेहमीप्रमाणे विलक्षण वर्णन माझी जीवनगाथात केलंय- त्या भानगडीत लक्षुंबाईनं अस्मादिकांचा घेतला किस्स, हे आमचे शिक्रीट.
पण ही आर्थिक चणचण काही संपणारी नव्हती. या आर्थिक संकटातच त्यांच्यावर आणखी एक भयंकर आघात झाला. बाळासाहेबांच्या पाठीवरचे प्रबोधनकारांचे सुपुत्र दिवाकर यांचं अवघ्या अडीच वर्षांचे असताना निधन झालं. त्यांना बबन या नावाने हाक मारली जायची, असा संदर्भ ज्ञानेश महाराव लिखित ठाकरे फॅमिली या पुस्तकात आहे. तेव्हा श्रीकांतजीचा जन्म होऊन फक्त चार दिवस झाले होते. रमाबाई ओल्या बाळंतीण होत्या आणि मुलगा तापाने फणफणलेला. आधी ताप भरला. मग आकडी म्हणजे फिट्स येणं सुरू झालं. प्रबोधनकार डॉक्टरांना शोधायला धावले, कुठेच डॉक्टर भेटेना. प्रबोधनकारांच्या नोंदीनुसार तो झेंडा सत्याग्रहाचा दिवस होता. संध्याकाळी
डॉ. माधवराव प्रधान यांनी तपासेपर्यंत छोट्या दिवाकरने प्राण सोडला होता. या धक्क्यामुळे रमाबाईंनी मिरांडा चाळीतली खोली सोडण्याचा फारच आग्रह केला. दुसर्‍या टप्प्यात ठाकरे कुटुंब मिरांडा चाळीत साधारण दहा महिने राहिलं असावं. त्यामुळे प्रबोधनकारांनी नवी जागा शोधली. ते प्लाझा बागेसमोर कामाठ्याच्या चाळीत एका मित्राच्या रिकाम्या जागेत आले. प्रबोधनकारांनी केलेल्या या वर्णनानुसार दादरला प्लाझा सिनेमाच्या परिसरात कामाठी नावाची चाळ सापडत नाही. शंभर वर्षात झालेल्या स्थित्यंतरात बरंच काही बदलल्यामुळे अशा खुणा सापडणं कठीणच असतं. पण दादरच्या जे.के. सावंत मार्गावर कामाठी चाळ किंवा कामाठी वाडी शोधायला हवी.
प्रबोधनकारांनी याच प्रसंगात झेंडा सत्याग्रहाचा उल्लेख केलाय. पण इतिहासाच्या पुस्तकांत वर्णन येणारा झेंडा सत्याग्रह नावाची चळवळ १९२३ सालीच झाली होती. मात्र १९३० सालच्या सविनय कायदेभंगात ठिकठिकाणी तिरंगा फडकवण्याचा उपक्रम स्वातंत्र्यसैनिकांनी हिरीरीने चालवला होता. त्याचा हा उल्लेख आहे. १९३० हे वर्ष इतरही संदर्भांना जुळणारं आहे. विशेषतः श्रीकांतजी ठाकरेंचा जन्म याच वर्षी झाल्याचं उपलब्ध ऑनलाईन संदर्भ सांगतात. प्रबोधनकारांना महात्मा गांधींविषयी आदर होता. त्यांनी बहुजन समाजाला स्वातंत्र्य चळवळीत नेतृत्व मिळवून दिलं आणि तळागाळातल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणलं, यासाठी त्यांचं प्रबोधनकार कौतुकही करतात. पण ते सशस्त्र क्रांतीचे समर्थक होते. त्यांना शांतीचा सत्याग्रहाचा मार्ग मवाळ वाटत असे. त्यामुळे त्यांनी विशेषतः सविनय कायदेभंगावर टीका केलीय. ते म्हणतात- मी स्वतः गांधीतत्त्वांचा कट्टा विरोधक, मला ही चळवळ मुळीच मान्य नव्हती.
त्यात त्यांनी केलेलं वर्णन इतिहासात न नोंदवलेल्या गोष्टी सांगतं- हा काळ जोरदार सरकार विरोधी कांग्रेजी आंदोलनाचा होता. जागोजाग सरकारी निमसरकारी इमारतीवर, शाळा-कॉलेजांवर तिरंगा झेंडा फडकविण्याचे सत्याग्रह होत होते. सायक्लोस्टाइलवर छापलेली गुप्त बुलेटिने भर रस्त्यावर विकली जात होती आणि विक्रेत्यांना पोलीस पकडायला आले का लोकांची दंगल चालू व्हायची. याच सुमाराला मिठाचा सत्याग्रहही जोरात होता. जमावाने जाऊन समुद्राचे पाणी आणले नि शिवाजी पार्कमध्ये सरोजिनी नायडूंनी स्टोवर ते तापवून त्याचे चिमूटभर मीठ केले. पोलीस नुसते पहात होते. याच सुमाराला आषाढी एकादशी आली. लोकांत कांग्रेसचा अभिमान एवढा प्रचंड भडकला होता का माटुंग्याच्या विठोबाच्या यात्रेला जाणार्‍या प्रत्येक भजनी मंडळीनी त्यावर्षी भगव्या निशाणाऐवजी कांग्रेजी झेंडे माटुंग्याला फडकावीत नेले. कांग्रेजी निशाणे विकणार्‍या कांग्रेस कमिटीच्या दादर कचेरीने झेंड्यांचा चक्क काळाबाजार करून लाखावर कमाई केली.
सविनय कायदेभंगाच्या आंदोलनातलं त्यातही शाळा कॉलेजांवर बहिष्कार घालण्याचं या आंदोलनातलं आवाहन त्यांना पटलं नव्हतं. त्यावर त्यांनी वारंवार टीका केलीय. त्यातून नुकत्याच शिकू लागलेल्या बहुजन मुलांचं शिक्षण अर्धवट राहील, अशी भीती त्यांना होती. शिवाय उद्या स्वातंत्र्य मिळाल्यावर कायदे तोडण्याची मानसिकता स्वतंत्र भारताला अडचणीची ठरेल, असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे आपला हा विचार मांडण्यासाठी कोणतीही संधी सोडत नसत, असं दिसतं. कारण दादर इंग्लिश स्कूलमध्ये सविनय कायदेभंगाच्या संदर्भात मामा वरेरकर यांच्या भाष्ाणात हजर राहून त्यांनी आपली भूमिका मांडली. मामा फक्त एक प्रसिद्ध नाटककार नव्हते, तर स्वातंत्र्यसैनिकही होते. त्यांनी आपल्या नाटकांमधून स्वातंत्र्य, समता, अस्पृश्यता निवारण, स्वदेशी, गिरणी कामगारांचं शोषण असे विषय हाताळून मोठं जनजागरण केलं. ते इतकं महत्त्वांच होतं की पुढे स्वातंत्र्यानंतर त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पण प्रबोधनकारांचं त्यांच्याशी कधीच पटलं नाही.
प्रबोधनकार मामांच्या भाषणाला मुद्दामच गेले आणि भाषणानंतर भर सभेतच त्यांनी आपला निषेध नोंदवला. ते म्हणाले- गांधी बोले नि जग डोले असा हा जमाना असला तरी विद्यार्थ्यांनी आपला शिक्षणक्रम सोडून राजकारणी चळवळीच्या हुल्लडीत पडावे, यात त्यांचाच अखेर नाश होणार आहे. शाळा- कॉलेज सोडा म्हणून सोटा आपटीत सांगायला वरेरकरांचे काय जाते? आहे कोण यांच्यामागे रडायला? हा निपुत्रिक. खड्ड्यात गेली तर इतरांची पोरे जातील. हा नागण्णा काठावर सुखरूप.
प्रबोधनकारांचे मुद्दे कदाचित बरोबर असतील, पण त्यांचा हा हल्ला वैयक्तिक होता आणि विखारीही. विशेषतः प्रवाहपतित विचारांना विरोध करताना प्रबोधनकार आक्रमक होत असत. तेव्हा मुद्दे मांडताना अनेकदा ते चिथावणीखोरही होत. त्यांचे हल्ले कमरेवरच असतील, याची खात्री नसे. सभ्यतेच्या मर्यादेच्या चौकटीत त्यांना बसवणं कठीणच होत असे. पण ही आक्रमकता ही त्यांच्यासारख्या एकांड्या शिलेदाराची अपरिहार्यता होती, हेही लक्षात ठेवायला हवं. त्यांच्या या निषेधाने सभेत आणि सभेबाहेरही खळबळ माजली नसती तरच नवल. दादर इंग्लिश स्कूलचे प्राचार्य प्रिं. कोल्हटकर यांनीही त्यांची बाजू घेतली.
कृष्णाजी अर्जुन केळुसकर म्हणजे सत्यशोधक केळुसकर गुरूजी यांनीही प्रबोधनकारांच्या भूमिकेची पाठराखण केली. प्रबोधनकार अनेकदा त्यांचा उल्लेख गुरुवर्य असा करतात. ते योग्यच असल्याचं त्यांच्या भूमिकेतून दिसून येतं. कारण त्यांची ही मांडणी अत्यंत समतोल अशीच होती. आजही ती शंभर वर्षांआधीइतकीच उपयुक्त आहे. गुरुजी म्हणाले, चळवळी येतात नि जातात, परिणाम लोकांना भोगावे लागतात. पुढारी नामानिराळे रहातात. कांग्रेसच्या झेंड्याखाली नाचणार्‍या अनेक मोठमोठ्या पुढार्‍यांची मुले आज लंडन अमेरिकेत शिकायला गेलेली, मला माहीत आहेत. शाळा-कॉलेजांवरील बहिष्कार म्हणजे तुम्हा आम्हा गोरगरिबांच्या अडाणी होणार्‍या नव्या पिढीवर राज्य करणार्‍या सुशिक्षित फॉरिन रिटर्ण्ड लोकांची एक नवी जात बसविण्याचे हे कारस्थान आहे. याला बळी पडतील त्यांचे भविष्य मला तरी फार भयंकर दिसते.
हे सगळं घडत होतं, ते १९३० सालात. प्रबोधनकारांच्या सडेतोडपणामुळे त्यांना व्याख्यानांची निमंत्रणं येत असत. त्या वर्षी किंवा त्याच्या आदल्या वर्षीच्या गणेशोत्सवात प्रबोधनकारांनी एका वेगळ्याच विषयावर भाषणं केली. तो विषय होता हिंदवी नीळकंठीझम. हा शब्द त्या आधी किंवा त्यानंतर कुणी वापरलेला दिसत नाही. त्यामुळे श्रोत्यांना त्याचं कुतूहल असे. प्रबोधनकारांच्या आकर्षक मांडणीमुळे त्याला जोरदार प्रतिसादही मिळत असे. प्रबोधनकारांनी माझी जीवनगाथामध्ये या भाषणांचा सारांशही दिला आहे, तो असा–
हिंदुस्थान आणि प्रामुख्याने महाराष्ट्र हा शिवोपासक शैव आहे. सागर मंथनातून निघालेले हलाहल विष पहाताच देव दैत्यांची दाणादाण उडाली, पण शिवशंकराने ते असूरपणे प्राशन केले म्हणून नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. शंकराचा कंठ त्या विषप्राशनाने निळा झाला. शंकराने ही जी धडाडी दाखविली तिचे नाव नीलकंठीझम्. आजकाल हिंदुस्थानावर अनेक बाहेरच्या (इ) झमांचा झम्झमाट आक्रमण करू पहात आहे. पण हिंदुधर्म असा बहाद्दर आहे का त्याने आपल्या नीलकंठीझमने अनेक (इ)झम् आपल्या पचनी पाडून त्यांना हिंदुत्वाची दीक्षा दिलेली आहे. इस्लामी धर्मात मूर्तिपूजा नाही, पण येथल्या मुसलमानांना डोले नि पंजे पुजायला लावले कोणी? आमच्या नीलकंठीझमने, क्रिस्ती धर्मात म्हणे जातिभेद नाही. तसे म्हणायला कोणाच्या बापाचे काय जाते? पण येथल्या किरिस्तावांत लग्ने जुळविताना आजही तो बामन क्रिश्चन नि हा कोळी क्रिश्चन भेद पहातातच ना? आक्रमणाला समोर येईल त्या संस्कृतीतले चांगले घ्यायचे आणि चोथा भिरकावून द्यायचा, हा नीलकंठीझमचा धर्म आहे… हिंदुस्थानावर अनेक परधर्माची परचक्रे आली. त्या सगळ्यांना पचनी पाडून हिंदू धर्म आणि संस्कृती आजही आपापल्या पायांवर ताठ उभी आहे. यातले मर्म शोधणारांना ते हिंदवी नीलकंठीझममध्येच सापडेल. इतरत्र नाही.
प्रबोधकारांची ही मांडणी फक्त आकर्षक नव्हती तर महत्त्वाचीही होती. एका अर्थाने हिंदवी नीलकंठीझम हे प्रबोधनकारांचं हिंदुत्व होतं. याच विषयावर त्यांनी प्रबोधनमध्ये दोन लेखही लिहिले आहेत. त्यांच्या आधारे प्रबोधनकारांची ही मांडणी समजून घेण्याच्या प्रयत्न आपण पुढच्या आठवड्यांत करणार आहोत.

Previous Post

एकमताने’ नव्हे, `एकट्याच्या’ मताने!

Next Post

धर्मठकांपासून सावधान

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.