बुद्धीची देवता श्री गणेशांचा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. विदेशातही गणेशाची मनोभावे पूजा करण्यात आली. महाराष्ट्रात या सार्वजनिक गणेशोत्सवाचे विशेष महत्त्व आहे. तेल्यातांबोळ्यांचे पुढारी, असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ब्रिटिशांच्या विरोधात घरातला गणपती रस्त्यावर आणून त्याला सार्वजनिक रूप मिळवून देत इंग्रजांना जबरदस्त इशारा दिला. आज या सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप संपूर्ण बदलले असले आणि महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असले तरी उत्साहात कोणतीही कमतरता दिसत नाही. अनंत चतुर्दशीला गिरगांव चौपाटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्यांनी श्रींच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी केली. याही वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना देवाभाऊंनी विरोधकांवर टीका करण्याची संधी सोडली नाही आणि ‘विरोधकांच्या कुबुद्धीचे विसर्जन होवो’, अशी प्रार्थना केली. खरे आहे देवाभाऊंचे, कुबुद्धीचे विसर्जन व्हायलाच हवे, पण कुणाच्या?
१८ फेब्रुवारी २०१९ रोजी वांद्रे कुर्ला संकुलातील हॉटेल सॉफिटेल, नंतर मातोश्री आणि तदनंतर वरळीच्या हॉटेल ब्लू सी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जो शब्द दिला आणि तो विधानसभा निवडणुकीनंतर फिरविला तसेच पावशतकी नैसर्गिक युती तोडण्याची कृती करीत शिवसेनेला सत्तेच्या सोपानापासून दूर ठेवले, ती कुबुद्धी नव्हती का? नाईलाजाने उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारावे लागले. कोरोनाचे भीषण संकट असतानाही मुख्यमंत्री सहाय्यता निधी सोडून पंतप्रधानांच्या पीएम केअर फंडात मदतीचा ओघ वळविण्याचा उद्योग तुम्ही केलात, ही कुबुद्धी नव्हती का?
शिवसेना पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकून एकनाथ शिंदे यांना आपल्या कळपात तुम्ही ओढून घेतले. ज्या अजितदादा पवार यांच्या विरोधात, ते निधी देत नाहीत, पैसे मिळत नाहीत, अशी गरळ ओकत शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या समर्थनावर मुख्यमंत्री पद मिळवलं, घटनेच्या दहाव्या अनुसूचिला धाब्यावर बसवून सत्तेच्या खुर्चीवर ते टुण्णकन जाऊन बसले, ही कुबुद्धी नव्हती का?
बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय, धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार पुढे नेतोय असे सांगत मातोश्रीकडे पाठ फिरवीत सहकुटुंब मोदी दर्शनासाठी नवी दिल्ली येथे जाणे ही कुबुद्धी नाही का? ज्यांनी एबी फॉर्मवर सही करून आमदारक्या, खासदारक्या भरभरून मिळवून दिल्या, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्ष आणि परिवाराला उद्ध्वस्त करण्याचे कारस्थान रचणे, ते प्रत्यक्षात आणणे आणि ज्या पक्षाने आणि ज्या परिवाराने देश आणि राज्यात भाजपचा विस्तार करण्यासाठी भरभरून सहकार्य केले, त्यांना नामोहरम करण्यासाठी अथक परिश्रम करणे, ही कुबुद्धी नाही का?
अशा कुबुद्धींचे विसर्जन निश्चितच होणे आवश्यक आहे.
२०२३ साली सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना वगळून पंतप्रधान, एक केंद्रीय मंत्री आणि विरोधी पक्षनेते अशा (कुचकामी: कारण ठराव दोन विरुद्ध एक मतांनी फेटाळला जाणार हे वास्तव) समितीने देशाचा मुख्य निवडणूक आयुक्त निवडण्याचा निर्णय घेणे, ही कुबुद्धी नाही का? (ज्ञानेशकुमार प्रकरण पाहतोच आहोत). संविधान आणि त्यांच्या विविध कलमांचा यथायोग्य उपयोग करण्यासाठी राज्यकर्त्यांना सुबुद्धी मिळणे हीच खरी आवश्यकता आहे.
देवाभाऊ, खरंय आपलं म्हणणं की कुबुद्धीचे विसर्जन व्हायलाच हवे. आपण कसलेले वकील आहात आणि इथे उद्धृत केलेले ‘कुबुद्धी’चे हे मुद्दे आपणांस निश्चितच पटतील. असे असंख्य मुद्दे आहेत. वानगीदाखल इथे मोजकेच दिले आहेत. तूर्तास इतकेच!
(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत.)
