
एकदिवसीय क्रिकेटमधून रोहित शर्माच्या हकालपट्टीची योजना बूमरँग झाल्यापासून अजित आगरकरला राष्ट्रीय निवड समितीचं अध्यक्षपद काट्यासारखं टोचतंय. परिणामी ४ ऑक्टोबरला कार्यकाळ संपवून पदापासून दूर होण्याची योजना आगरकरनं आधीच आखलीय. या निमित्तानं आगरकरच्या या कारकीर्दीचं विश्लेषण.
माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरचा राष्ट्रीय निवड समिती अध्यक्षपदाचा तीन वर्षांचा कार्यकाळ ४ ऑक्टोबरला संपणार आहे. तो वाढवावा, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) मनसुबे होते. पण, तो वाढू नये, असा निर्णय खुद्द आगरकरनं आधीच घेतलाय. ह्या दोन परस्परविरोधी भूमिकांचं कारण ठरलाय, भारताचा सलामीवीर रोहित शर्मा. आगरकरच्या योजनेनुसार ठरवली गेलेली रोहितच्या निवृत्तीची घटिका समीप येऊनही रोहितच्या तडाखेबंद खेळीमुळे टळली. भारतीय क्रिकेट इतिहासात असं प्रथमच घडलं. त्यामुळे आगरकर कमालीचा दुखावलाय. म्हणून आपण कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्या पदावर थांबू इच्छित नाही, असं त्याने कार्यकाळ संपण्याआधीच बीसीसीआयकडे स्पष्ट केलंय. म्हणजे हा पूर्णविराम आता अटळ आहे.
आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीने ४ जुलै २०२३ रोजी पदभार स्वीकारला. त्याआधी चेतन शर्माच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या कार्यकाळात भारतीय संघाची कामगिरी फारशी समाधानकारक झाली नव्हती. पण, आगरकरच्या काळात ही मरगळ झटकून टाकण्यात आली. फक्त चारच महिन्यांत भारतीय संघ २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला; इथपर्यंतचे १० सामने भारत अपराजित. पण ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानं उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. मग मात्र तब्बल ११ वर्षांनी ‘आयसीसी’च्या स्पर्धेत जेतेपद पटकावलं, तेही प्रत्येक वर्षी एक. दोन ट्वेन्टी-२० विश्वविजेतेपदं (२०२४, २०२६) आणि एक चॅम्पियन्स करंडक जेतेपद (२०२५). हे आगरकर पर्वातलं यश; त्याचप्रमाणे काही वाईटही घडल्याचं दिसून आलं. या काळात भारताला कसोटी क्रिकेटमध्ये अपेक्षित यश मिळालं नाही. इंग्लंडमध्ये जाऊन कसोटी मालिकेत बरोबरी साधणं, एवढंच काय ते कर्तृत्व. आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी भारतीय क्रिकेटमध्ये ‘कॉर्पोरेट संस्कृती’ रुजवली. भारतीय क्रिकेट संघाची कशी बांधणी करावी, याबाबत त्यांनी एक विशिष्ट व्यवस्थापकीय प्रणाली राबवली. तिची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे…
१.मोठेपणापेक्षा कामगिरी महत्त्वाची
खराब कामगिरीचा ठपका ठेवत शुभमन गिलला ट्वेन्टी-२० विश्वचषकातील संघातून वगळण्यात आलं. हार्दिक पंड्याच्या अनिश्चित कामगिरीमुळे गिलकडे ट्वेन्टी-२०च्या काही सामन्यांत उपकर्णधारपदही चालून आलं. पण, भविष्यातील कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार ह्या भूमिकेत गिलकडे पाहण्याचा आगरकर आणि गंभीरचा दृष्टिकोन असल्यानं त्याला ट्वेन्टी-२० क्रिकेटपासून दूर करण्यात आलं. अगदी सूर्यकुमारची गच्छंतीही ह्याच पद्धतीनुसार करण्यात आली. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखालील भलेही भारतानं विश्वचषक जिंकला; पण, त्याची वैयक्तिक कामगिरी खालावली होती. व्यवस्थापकीय धोरणात ‘केपीआय’ म्हणजेच प्रमुख कामगिरी निकषांवर आधारित कार्यमूल्यांकन पद्धतीनुसार गिलच्या आणि सूर्याच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला.
२०२३च्या एकदिवसीय विश्वचषकात भारतानं उपविजेतेपद पटकावलं. मग २०२४मध्ये ट्वेंटी-२० विश्वविजेतेपद काबीज केलं, तर २०२५मध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जिंकण्याची किमया साधली. इथपर्यंतचं यश मिळवताना रोहित भारताचा कर्णधार होता. पुढे २०२६चं टी-२० जगज्जेतेपद सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतानं जिंकलं. पण या यशानंतर सूर्याच्या कारकीर्दीचा सूर्यास्त झाला. आगरकरच्या काळात रोहितचं नेतृत्व तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधून संपुष्टात आणण्यात आलं. त्यानंतर गिलकडे कसोटी आणि एकदिवसीय संघाचं कर्णधारपद दिलं गेलं, तर सूर्यानंतर श्रेयस अय्यरची ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदी आश्चर्यकारक निवड करण्यात आली. अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रविचंद्रन अश्विन यांना अपेक्षेपेक्षा खूपच आधी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती पत्करावी लागली. यापैकी पुजारा आणि रहाणे हे चांगली कामगिरी होत नसल्यानं बराच काळ संघात नव्हते, अश्विननं ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावस्कर मालिकेदरम्यान निवृत्ती स्वीकारली. निरोपाचा सामनाही यांच्यापैकी कुणाच्याही वाट्याला आला नाही. ह्या एकंदर प्रक्रियेला ‘संक्रमण’ असं गोंडस नाव देण्यात आलं. 
२.तारांकितांची संस्कृती मोडीत काढली
आगरकर-गंभीर जोडीनं भारतीय क्रिकेटमध्ये प्रदीर्घ काळ चालत आलेली तारांकितांची संस्कृती मोडीत काढली. ह्या संस्कृतीनुसार काही दिग्गज क्रिकेटपटूंना राजेशाही वागणूक दिली जायची. देशांतर्गत क्रिकेटमध्ये कामगिरी सिद्ध करण्याची त्यांना आवश्यकता नसायची. पण, आगरकरच्या कालखंडात व्यक्तीच्या प्रतिष्ठेपेक्षा प्रक्रिया आणि कार्यपद्धतीला अधिक महत्त्व दिलं गेलं. दिग्गज असो किंवा नवोदित- प्रत्येक खेळाडूचं मूल्यमापन समान कामगिरी निर्देशांकांच्या आधारे केलं जाऊ लागलं. त्यामुळेच विराट कोहली, रोहित, जसप्रीत बुमरा, हार्दिक, श्रेयस अय्यर, ईशान किशन हे खेळाडू सुतासारखे सरळ झाले. रोहित, विराट आणि रवींद्र जडेजानं २०२४च्या विश्वचषकानंतर ट्वेंटी-२० क्रिकेटला अलविदा केला. पुढे २०२४च्या उत्तरार्धात भारतानं न्यूझीलंडकडून मायदेशात ०-३ असा मानहानीकारक पराभव पत्करला, तर ऑस्ट्रेलिया दौर्यावर १-३ अशा फरकानं मालिका गमावली. ह्या मालिकेत विराटची सरासरी २३ धावा आणि रोहितची सरासरी फक्त ६.२ धावा अशी होती. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये दोघांनी थांबावं, अशी चर्चा सुरू झाली. पण, माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्यासह अनेक ज्येष्ठ खेळाडूंनी यावर तीव्र आक्षेप घेतला. तरीही इंग्लंडमधील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आठवड्याभराचा अवधी असताना मे २०२५मध्ये फक्त पाच दिवसांच्या अंतरानं रोहित आणि विराट यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. आता हे दोन दिग्गज फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळतायत; तेही २०२७च्या विश्वचषकापर्यंत. पण, आगरकरच्या नियोजन आराखड्यात त्या दोघांनाही स्थान नव्हतं.
३.मनमानीला आळा; शिस्तीचा बडगा
दिग्गज खेळाडू स्वत:च्या सोयीनुसार कार्यभार व्यवस्थापनाचं कारण देत मालिका किंवा स्पर्धेतून विश्रांती घ्यायचे. २०२५च्या इंग्लंड दौर्यानंतर करारबद्ध खेळाडूंच्या ह्या मनमानीला चाप लावण्यात आला. त्याऐवजी अधिक वस्तुनिष्ठ धोरण राबवण्यात आलं. हा आगरकरच्या कॉर्पोरेट संस्कृतीमधील एक महत्त्वाचा बदल. अनौपचारिक आणि प्रत्येक प्रकरणानुसार दिल्या जाणार्या अपवादांची जागा सर्व खेळाडूंना त्यांच्या पद किंवा मोठेपणाचा विचार न करता समानपणे लागू होणार्या एकसमान धोरणानं घेतली. त्यामुळेच खेळाडूंना शिस्त लागली.
४.प्रशिक्षक ‘सीईओ’च्या भूमिकेत,
निवड समिती संचालक मंडळासारखी ह्या कॉर्पोरेट संस्कृतीमध्ये गंभीर हे मुख्य कार्यकारी अधिकार्याच्या (सीईओ), तर राष्ट्रीय निवड समितीचं कार्य संचालक मंडळासारखं होतं. भारतीय क्रिकेटनं आतापर्यंत बरेच प्रशिक्षक पाहिले. पण, गंभीरला ड्रेसिंग रूमध्ये त्या सर्वांपेक्षा अधिक अधिकार होते. कॉर्पोरेट संस्कृतीमध्ये संचालक मंडळ धोरण आणि कृती आराखडा ठरवतं आणि ‘सीईओ’ तो प्रत्यक्षात राबवतो. त्यामुळेच आगरकरच्या नेतृत्वाखालील समितीनं काही नवे धक्कादायक प्रयोग केले आणि गंभीरनं ते अंमलात आणले.
५.व्यक्तीपेक्षा संघाला प्राधान्य
एखाद्या खेळाडूच्या वैयक्तिक यशाला महत्त्व देण्यापेक्षा सांघिकतेला प्राधान्य देण्यात आलं. कारण शतक-अर्धशतक, बळी, इत्यादी वैयक्तिक कामगिरीतून तो खेळाडू मोठा होतो; संघाच्या कामगिरीमुळे तो जिंकतो, हे व्यवस्थापकीय सूत्र. भारताचं ट्वेंटी-२० विश्वविजेतेपद हे त्याचं उत्तम उदाहरण. जसप्रीत बुमरा हा जगातला सर्वोत्तम वेगवान गोलंदाज. पण तो संघातला एक खेळाडू आहे. त्यामुळेच सर्वसमान वागणूक त्यालाही लागू झाली.
निष्कर्ष : आगरकरचा कार्यकाळ संपल्यानंतर कॉर्पोरेट संस्कृतीचा अस्त होईल, असं खात्रीनं नाही सांगता येणार. कारण गंभीर अजूनही २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत मार्गदर्शकाच्या भूमिकेत असेल. तसंच राष्ट्रीय निवड समितीचा नवा अध्यक्ष आगरकरचाच कित्ता गिरवणार नाही कशावरून? त्यामुळे तूर्तास आगरकरला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया!

