
फुलांचा सुगंध घेऊन आलेला गणरायांचा उत्सव संपतो, आरतीचे स्वर शांत होतात, ढोल ताशांचा गजर थांबतो आणि बाप्पाची मूर्ती भक्तिभावाने निरोप घेते; मात्र उत्सवाच्या या भावनिक क्षणानंतर निसर्गासमोर एक वेगळाच प्रश्न उभा राहतो. आपण उत्सवाच्या निमित्ताने मागे काय ठेवून जातो? श्रद्धेच्या हातातील फुलांची ओंजळ जेव्हा प्लास्टिकच्या पिशवीत बंदिस्त होते, तेव्हा निर्माल्याबरोबरच पर्यावरणाचीही परीक्षा सुरू होते. बाप्पाला निरोप देताना जलस्रोत स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला जातो; मात्र त्याच वेळी निर्माल्यासोबत प्लास्टिकच्या पिशव्या आणि पर्यावरणाला घातक ठरणार्या इतर वस्तू विसर्जन घाटांपर्यंत पोहोचत असतील, तर पर्यावरणपूरक उत्सवाची संकल्पना नेमकी किती प्रभावीपणे राबविली जात आहे, हा प्रश्न उपस्थित होणारच.
महाराष्ट्रात गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर सामाजिक सहभाग, सांस्कृतिक परंपरा, लोकभावना आणि सामुदायिक एकतेचा मोठा उत्सव आहे. त्यामुळे त्याचे पर्यावरणीय व्यवस्थापनही तितकेच व्यापक असणे आवश्यक आहे. गणेशमूर्ती विसर्जन, निर्माल्य संकलन, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकचा वापर, जलप्रदूषण, ध्वनिप्रदूषण आणि सार्वजनिक स्वच्छता या सर्व बाबींचा एकत्रित विचार केल्याशिवाय खर्या अर्थाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना पूर्ण होऊ शकत नाही.
गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणावर फुले, हार, पाने, नारळ, दुर्वा आणि इतर पूजासाहित्याचे निर्माल्य तयार होते. ते स्वतंत्रपणे संकलित करून त्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांकडून केली जाते. मात्र या व्यवस्थेची खरी परिणामकारकता केवळ किती निर्माल्य संकलित झाले यावर मोजता येणार नाही. निर्माल्यासोबत किती प्लास्टिक आले, प्लास्टिकच्या पिशव्या, सजावटीचे साहित्य किंवा पर्यावरणाला घातक ठरणार्या वस्तू त्यामध्ये मिसळल्या गेल्या आणि त्यांचे पुढे काय झाले, याचाही विचार करणे आवश्यक आहे. ठाणे महापालिकेतही निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करून त्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था आहे. मात्र प्रत्यक्ष विसर्जन घाटांवर निर्माल्यासोबत प्लास्टिकच्या पिशव्या आणि पर्यावरणाला प्रदूषित करणार्या विविध वस्तू येत असल्याचे चित्र दिसते. त्यामुळे निर्माल्य संकलनाची व्यवस्था उभारली असली तरी निर्माल्य प्लास्टिकमुक्त करण्याच्या मूळ उद्देशात अद्याप मोठी पोकळी असल्याचे दिसून येते. निर्माल्यापासून खतनिर्मिती करायची आणि त्याच निर्माल्यासोबत प्लास्टिक संकलित करायचे, अशी परिस्थिती असेल तर पर्यावरणपूरक व्यवस्थेच्या परिणामकारकतेचा पुनर्विचार करणे आवश्यक ठरते.
सेंद्रिय कचर्यापासून खतनिर्मिती करण्याची प्रक्रिया ही मूलतः जैविक कचर्याच्या योग्य व्यवस्थापनावर आधारित असते. त्यामध्ये प्लास्टिक किंवा इतर विघटन न होणार्या वस्तू मिसळल्या तर त्यांचे आधी वर्गीकरण करावे लागते. यामुळे मनुष्यबळ, वेळ आणि व्यवस्थापनावर अतिरिक्त भार पडतो. त्याहून महत्त्वाचे म्हणजे नागरिकांच्या मनात निर्माल्य म्हणजे काहीही पूजासाहित्य आणि त्यासोबत आलेली पिशवी अशी चुकीची कल्पना कायम राहू शकतो. त्यामुळे समस्या केवळ संकलन केंद्रावर निर्माण होत नाही; ती नागरिकांच्या सवयींपासून सुरू होते. म्हणूनच निर्माल्य संकलनाची सुरुवात विसर्जन घाटावर नव्हे, तर घरापासून झाली पाहिजे. घरातूनच निर्माल्य वेगळे करणे, ते प्लास्टिकच्या पिशवीऐवजी पर्यावरणपूरक माध्यमातून आणणे आणि प्लास्टिक किंवा इतर अ-विघटनशील वस्तू निर्माल्यात मिसळू न देणे, ही सवय नागरिकांमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. यासाठी दरवेळी उत्सवाच्या जेमतेम दोन-चार दिवस आधी होणारी वरवरची जनजागृती पुरेशी ठरणार नाही. वर्षभर सातत्याने पर्यावरणपूरक सवयी रुजविण्याची गरज आहे.
याच ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका महत्त्वाची ठरते. नागरिकांना केवळ ‘प्लास्टिक वापरू नका’ असे उंटावर बसून सांगण्यापेक्षा प्लास्टिकला पर्याय कोणता, निर्माल्य कसे आणावे, कोणत्या वस्तू निर्माल्यात देऊ नयेत, घरातील निर्माल्याचे व्यवस्थापन कसे करावे, याबाबत स्पष्ट आणि व्यवहार्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. विसर्जन घाटांवरही निर्माल्य आणि प्लास्टिक यांचे स्वतंत्र संकलन, तपासणी आणि वर्गीकरणाची प्रभावी व्यवस्था असणे गरजेचे आहे. ठाणे महापालिकेचे उदाहरण राज्यातील इतर शहरांसाठीही महत्त्वाचे आहे. तलावांचे शहर म्हणून ठाण्याची ओळख असल्याने येथील जलस्रोतांचे संरक्षण ही विशेष जबाबदारी आहे. शहरातील तलाव, खाडी परिसर आणि विसर्जन घाट यांच्यावर गणेशोत्सवाच्या काळात मोठा पर्यावरणीय दबाव निर्माण होतो. त्यामुळे निर्माल्य संकलन, कचरा व्यवस्थापन आणि विसर्जनानंतरची स्वच्छता या सर्व प्रक्रियांमध्ये केवळ संख्यात्मक कामगिरीपेक्षा प्रत्यक्ष पर्यावरणीय परिणाम तपासणे आवश्यक आहे.
उदाहरणार्थ, किती टन निर्माल्य संकलित झाले, किती खतनिर्मिती झाली किंवा किती कचरा उचलला गेला, ही आकडेवारी महत्त्वाची असली तरी त्यासोबत निर्माल्यातून किती प्लास्टिक वेगळे करण्यात आले, किती प्लास्टिक किंवा पर्यावरणघातक वस्तू आढळल्या, त्यांची स्वतंत्रपणे विल्हेवाट कशी लावली आणि पुढील वर्षी ही समस्या कमी करण्यास्ााठी काय उपाय केले जाणार आहेत, याची माहितीही सार्वजनिक होणे गरजेचे आहे. पर्यावरणपूरक उत्सवाची खरी कसोटी आकडेवारीच्या आकारात नसून पर्यावरणावर झालेल्या परिणामात आहे. संकलित निर्माल्याचे प्रमाण वाढत असेल, पण त्यासोबत प्लास्टिकचे प्रमाणही मोठे असेल, तर केवळ संकलनाची संख्या वाढल्याने पर्यावरणीय समस्या सुटत नाही. त्याचप्रमाणे कृत्रिम तलावांची संख्या वाढविणे किंवा विसर्जनासाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे असले, तरी त्या व्यवस्थेमुळे निर्माण होणार्या कचर्याचे आणि पर्यावरणीय परिणामांचे स्वतंत्र मूल्यमापनही आवश्यक आहे.
गणेशोत्सवाच्या काळात प्लास्टिकचा प्रश्न केवळ निर्माल्यापुरता मर्यादित नसतो. पूजा साहित्य, सजावट, खाद्यपदार्थांचे पॅकिंग, पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास, थर्माकोलसदृश साहित्य आणि इतर एकदाच वापरल्या जाणार्या वस्तूंचाही त्यात समावेश होतो. त्यामुळे ‘प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव’ ही संकल्पना फक्त निर्माल्याच्या पिशवीपुरती मर्यादित ठेवणे योग्य ठरणार नाही. संपूर्ण उत्सवाच्या कचरा व्यवस्थापनाचा त्यात समावेश करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शहराने गणेशोत्सवानंतर स्वतःचे पर्यावरणीय मूल्यांकन करायला हवे. कोणत्या ठिकाणी किती कचरा निर्माण झाला, त्यामध्ये प्लास्टिकचे प्रमाण किती होते, निर्माल्य किती होते, किती कचर्यावर पुनर्वापर किंवा प्रक्रिया झाली आणि किती कचरा अंतिम विल्हेवाटीकडे गेला, याची माहिती पुढील वर्षाच्या नियोजनासाठी वापरली पाहिजे. अशा प्रकारचा उत्सवोत्तर पर्यावरणीय आढावा घेतल्यास प्रत्येक वर्षी चुका सुधारण्याची आणि व्यवस्थेत सुधारणा करण्याची संधी मिळू शकते.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रशासन, गणेश मंडळे आणि नागरिक या तिन्ही घटकांची भूमिका समान महत्त्वाची आहे. प्रशासनाने आवश्यक सुविधा आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून द्यावेत. गणेश मंडळांनी आपल्या परिसरात जनजागृती करावी आणि निर्माल्य व कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारावी. नागरिकांनीही सुविधा उपलब्ध असताना त्यांचा योग्य वापर करणे आणि पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. यासाठी जनजागृतीचा कालावधी वाढविण्याची गरज आहे. गणेशोत्सवाच्या आधी काही दिवस आणि उत्सवाच्या काळातच पर्यावरणाचा संदेश देण्याऐवजी वर्षभर शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था, बाजारपेठा, सार्वजनिक मंडळे आणि नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक कचरा व्यवस्थापनाची चळवळ उभी करावी लागेल. ‘निर्माल्य प्लास्टिकमुक्त’ हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचला, तर विसर्जन घाटांवरील व्यवस्थेवरील ताणही कमी होऊ शकतो.

परंपरा आणि पर्यावरण यांचा संघर्ष होण्याची गरज नाही. उलट गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाची मोठी लोकचळवळ उभी करता येऊ शकते. श्रद्धा कायम ठेवून पर्यावरणाची काळजी घेणे शक्य आहे. उत्सवाची भव्यता कमी करण्याची गरज नाही; मात्र त्यातून निर्माण होणारा पर्यावरणीय भार कमी करण्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल. आज गरज आहे उत्सवाची प्रत्येक पायरी पर्यावरणपूरक करण्याची. मूर्तीपासून सजावटीपर्यंत, पूजेपासून निर्माल्यापर्यंत, विसर्जनापासून कचरा व्यवस्थापनापर्यंत आणि उत्सवाच्या सुरुवातीपासून शेवटच्या स्वच्छतेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पर्यावरणाच्या कसोटीवर तपासली पाहिजे. बाप्पाला निरोप देताना फुलांचा सुगंध मागे राहावा; प्लास्टिकच्या पिशव्यांचा ठसा नाही. निर्माल्याचे खत व्हावे; ते जलस्रोतांचे ओझे बनू नये. श्रद्धेची ज्योत तेवत राहावी; पण निसर्गाची किंमत मोजून नव्हे. कारण उत्सव काही दिवसांचा असतो, पण त्याचा पर्यावरणीय परिणाम अनेक वर्षे जाणवू शकतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची खरी दिशा आता ‘निर्माल्य संकलन’पासून ‘निर्माल्य प्लास्टिकमुक्ती’कडे आणि उत्सवकालीन जनजागृतीपासून वर्षभराच्या पर्यावरणीय संस्काराकडे वळण्याची गरज आहे.

