• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नीरो खंजिरी वाजवत होता…

मर्मभेद

Marmik Team by Marmik Team
October 1, 2026
in मर्मभेद
0
नीरो खंजिरी वाजवत होता…

रो म जळत होतं तेव्हा (सम्राट) नीरो फिडल (एक वाद्य) वाजवत होता, अशी कहाणी सांगितली जाते. एखादा सम्राट किंवा राजा आपल्या राज्याप्रती किंवा प्रजेप्रती किती बेजबाबदार असावा, किती उदासीन असावा, याचं हे उदाहरण आहे. नीरो सम्राट होता. राजेशाहीच्या काळात जन्माला आलेला होता. राजा हा देवाचा अंश असतो, त्याच्यासमोर बाकी सगळी प्रजा य:कश्चित क:पदार्थ असते, अशी मान्यता असलेल्या काळात जन्माला आलेला होता. तरीही आपलं राज्य जळत असताना, राजधानी धगधगत असताना तो फिडल वाजवण्यात मग्न होता, याची नोंद इतिहासात झालीच.
आपल्याकडे (ज्ञानेशकृपेने) निव्वळ पिचकट सांगाड्याच्या स्वरूपातच शिल्लक राहिलेली का असेना, लोकशाही आहे. इथे मतपेटीतून सरकार निवडून दिलं जातं, असा भ्रम शिल्लक आहे. लोकांनी दिलेलं मत नेमकं कुठे जातं, याची खात्री कुणी देऊ शकत नाही; पण अजून तरी लोक मतदान करायला जात आहेत, तेवढ्यापुरती का होईना, लोकशाही आहे. मोदी सम्राट नाहीत.
आज देशात संविधान कुचकामी करण्याचं षड्यंत्र जोरात सुरू आहे, प्रगतीच्या सर्व मापकांवर देशाची पिछेहाट सुरू आहे, कधीकाळी ज्या उपखंडात ‘बडे भय्या’चा मान भारताला होता, तिथले चिल्लर पिल्लर देशही आता दरडोई उत्पन्नात पुढे गेलेले आहेत, ना भारतीय पासपोर्टला काही मान उरलेला आहे, ना भारतीय रुपयात काही जान उरलेली आहे- सेन्सेक्स रोज गटांगळ्या खातोय, देशातून परदेशी गुंतवणूकदार ‘झोला उठा के’ पळून जात आहेत, चीन रोज वेगवेगळ्या कुरापती काढतो आहे, खासम खास मित्र ‘डोलांड’ दिवसातून तीन वेळा उठाबशा काढायला लावतो आहे आणि आपला नीरो मात्र ‘भजन क्लबिंग’ करण्यात मग्न आहे, मस्तीत खंजिरी वाजवतो आहे…
पंतप्रधान नरेंद्र मोदी बराच काळ भारतातच आहेत, एखादा किरकोळ पुरस्कार स्वीकारायला कोणी कधी नावही न ऐकलेल्या देशात गेलेले नाहीत, हेच एक आश्चर्य आहे. (हे लेखन छापून येईपर्यंत हे विधान शिळं झालं असेल आणि मोदींनी उड्डाण केलं असेल, तर त्यात काही आश्चर्य नसेल.) ते स्वत:ला सम्राट मानू लागलेले आहे. खरंतर २०२४ साली वाराणसीतून त्यांचा झालेला निसटता विजयही वादग्रस्त आहे आणि त्या वर्षीची एकंदर लोकसभा निवडणूकही खरोखरच मुक्त आणि निष्पक्ष होती का, याबद्दल शंका आहेत. म्हणजे मोदी हे खरोखरच लोकनियुक्त सत्ताधीश आहेत की त्यांनी विविध यंत्रणा ताब्यात घेऊन, मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावून घेऊन या निवडणुका जिंकल्याचा बनाव उभा केला आहे, याबद्दलच शंका आहे. त्यानंतरच्या महाराष्ट्रापासून पश्चिम बंगालपर्यंतच्या विधानसभांच्या निवडणुका चढत्या क्रमाने संशयास्पद होत गेलेल्या आहेत. ‘विशेष निवडणूक पुनरीक्षण’ हे हत्यार मतदारांना लोकशाहीतल्या त्यांच्या सर्वात महत्त्वाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यासाठी वापरलं गेलं आहे, अशी ओरड सजग नागरिक आणि विरोधी पक्ष सतत करत होते. दोन निवडणूक आयुक्तांनी वाचलेल्या तक्रारीच्या पाढ्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. मतदान प्रक्रियेचा संपूर्ण सत्यानाश करून भारतीय जनता पक्षाला बनावट विजय मिळवून देण्यासाठी नेमलेले ज्ञानेश कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त आपल्या दोन्ही सहकार्‍यांच्या मतांना केराच्या टोपलीत टाकून एकट्यानेच सगळे निर्णय घेत होते, हे आता स्पष्ट झालेलं आहे. विरोधी पक्ष ज्ञानेश कुमारांवर महाभियोग आणण्याच्या तयारीत आहेत. धर्मेंद्र प्रधान या शिक्षणमंत्र्याचा राजीनामा घेण्यात यशस्वी झालेली कॉक्रोच जनता पार्टी आता ‘ज्ञानेश, इट्स डन ब्रो’ असं सांगून त्यांचा राजीनामा घेण्यासाठी आंदोलन करण्याच्या तयारीत आहे… मुंबईत शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही रस्त्यावर उतरणार आहे… अशाच प्रकारची आंदोलनं विरोधी पक्षही करणार आहेत… देशात असंतोष धुमसतो आहे आणि आपला नीरो जेन झीला भजन मंडळी बनवून खंजिरी वाजवतो आहे…
पंतप्रधान मोदी धार्मिक वृत्तीचे आहेत, असं मानलं जातं. ही धार्मिकता भाजप हा ज्या अर्थाने धार्मिक पक्ष आहे, तेवढ्यापुरतीच आहे. धर्माचा राजकारणात हत्यार म्हणून वापर करण्यापुरती. आपण इतरांसारखे जैविक व्यक्ती नाही, ईश्वराने काही कार्य करायला पाठवलेले अवतार पुरुषच आहोत, अशी देशाची समजूत करून देण्यासाठी ते ही धार्मिकता चातुर्याने वापरतात. म्हणूनच रामजन्मभूमीच्या आंदोलनात, खटल्यात आणि निकालात शून्य योगदान असताना मोदीच बाल रामचंद्रांना बोट धरून अयोध्येत आणत आहोत, असं अगोचर पोस्टर लावण्यापर्यंत त्यांच्या भक्तांची मजल गेली होती.
हे तथाकथित अवतारपुरुष असणं मोदींनी जरा जास्तच सिरियसली घेतलं आहे. आता आपण सर्व नश्वर गोष्टींच्या वर आलो आहोत. देशाचा कारभार वगैरे किरकोळ गोष्टी आपल्या दैवी अवतारकार्यापुढे फारच किरकोळ आहेत. त्यातल्या कशाला आपण उत्तरदायी नाही. देश जळतो आहे, जळू दे. लोक होरपळत आहेत, होरपळू देत. आपल्या निर्णयांमुळे आणि आपल्या पक्षाच्या, नेत्यांच्या बेजबाबदार हाताळणीमुळे देश सर्व आघाड्यांवर पिछाडीला गेला आहे, जाऊ दे; आपण रोज नवनवीन कपडे परिधान करायचे, नवनवीन शिरस्त्राणं घालायची, फोटो सेशन करायची, आंतरराष्ट्रीय मंचावर देशाचं हसं होईल अशा प्रकारचं वर्तन करायचं, आंतरराष्ट्रीय नेते आपले अरे तुरेत्ाले मित्र आहेत, अशा प्रकारे त्यांच्याशी नको ती सलगी करायची, मनाला येईल तेव्हा एक दीर्घ भाषण ठोकायचं, त्यात काहीही दावे करायचे; मज्जा नी लाईफ!
देश संकटात असण्या-नसण्याची फिकीर मोदींनी गेल्या १२ वर्षांत केलेली नाही. त्यांचा फोकस कायम स्पष्ट राहिलेला आहे. ठरावीक उद्योगपतींच्या हितामध्येच आपलं हित सामावलेलं आहे. विषय संपला. पण आता त्यांचं सरकार, त्यांचा पक्ष आणि त्यांची संघटना हे सगळेच सर्व बाजूंनी अडचणीत आलेले आहेत… आपण सर्वोपरि आहोत, असं दाखवणारी त्यांची नीरोगिरी अशीच सुरू राहिली तर लवकरच त्यांच्याबरोबर सगळ्या पक्षाला आणि परिवाराला खंजिरी वाजवत भजनं गाण्यापलीकडे दुसरं काम राहणार नाही!
बाकी देशाला तालात टाळ्या पिटायची सवय एव्हाना लागली आहेच!

Previous Post

दरवळ दाटे चोहीकडे

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.