मुंबईतील बंद करण्यात आलेले सर्व कबुतरखाने पूर्ववत सुरू करा, अशी मागणी वादग्रस्त जैन मुनींनी केली असून तसे न केल्यास पायधुणी येथील जैन मंदिरासमोर आंदोलन आणि आमरण उपोषण करण्याचा इशारा जैन मुनींनी दिल्यानंतर मुंबईतील समस्त कबुतर नर-माद्यांनी गुटर्रघू आवाज करत या मागणीला प्रचंड प्रतिसाद दिल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यापासून माझा मानलेला परमप्रिय पोक्या अस्वस्थ झाला आहे. ऑगस्ट २०२५मध्ये मुंबईत दादर व इतर कबुतरखान्यांवरून वाद निर्माण झाला होता. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली १२ सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेने मानवी वस्तीपासून ५०० मीटर दूर असलेल्या चार ठिकाणी कबुतरांना नियंत्रित खाद्य टाकण्यास परवानगी दिली होती. कबुतरांना न्याय दिला जाईल असे आश्वासन सरकारने त्यावेळी दिले होते, तरीही मुंबईतील कबुतरखाने अद्यापही का बंद आहेत, असा सवाल संतप्त जैनमुनींनी विचारला आहे. मंत्री लोढा जैन समाजाचा व कबुतरांचा आवाज दाबत असून मुक्या जिवांना तडफडत मरताना पाहणे हीसुद्धा हिंसाच आहे, अशी भूमिका जैन नेत्यांनी मांडली आहे. हे प्रकरण चिघळत राहणे योग्य नाही, अशी भूमिका पोक्याने घेतली आणि कबुतरांमुळे कोणकोणते रोग होतात याबद्दल पशुवैद्यकांशीही विचारविनिमय केला. नंतर पोक्याने काही नेत्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्याच या प्रतिक्रिया –
मंगलप्रभात लोढा : कबुतरांना न्याय मिळावा यासाठी आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहोत. तिकडे दुष्काळात माणसे तडफडून मरताहेत, आत्महत्या करताहेत आणि इकडे माझी लाडकी कबुतरे नेहमीचा धान्याचा कोटा पुरेसा न मिळाल्यामुळे मरणपंथाला लागली आहेत, हे मी पाहू शकत नाही. त्यांचा जीव वाचवण्यासाठी मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे `लाडकी कबुतरे’ योजना सुरू करून कबुतरांच्या दाणापाण्याची सोय करावी, अशी मागणी करणार आहे. कबुतरे जगली तर देश जगेल, जगातील शांतता जगेल हा विश्वास मला आहे.
देवेंद्र फडणवीस : हा गंभीर प्रश्न निवडणुकीपूर्वी सोडवण्याचे भरीव आश्वासन मी देतो. त्यासाठी वाटल्यास मंत्रिमंडळाची बैठक तातडीने बोलावून ८५ कोटी रुपये मंजूर करण्यात येतील. आपण दोन्ही बाजूंचे समाधान होईल, असा यशस्वी तोडगा नक्कीच काढू. शेवटी मुक्या प्राण्यांच्या आणि बोलक्या माणसांचा प्रश्न आहे. मी त्याबाबत तातडीने दिल्लीला जाऊन आमच्या महानेत्यांची भेट घेईन व त्यांच्या कानावर ही गंभीर समस्या घालीन, एवढेच आता सांगतो.
एकनाथ शिंदे : मी मुख्यमंत्री असतो तर यातून नक्कीच मार्ग काढला असता. तरीही मी लंडनच्या पार्लमेंटशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेईन. तिथल्या कबुतरांच्या दाण्यापाण्याची व्यवस्था ते सरकार कसे करते हेही जाणून घेण्याची गरज आहे. तिथली कबुतरेही तिथल्या लोकांसारखी गोरी असतात की आपल्या इथल्या बहुसंख्य कबुतरांसारखी काळी-करडी असतात हा संशोधनाचा विषय आहे. मला लंडनने फेलोशिप दिली तर मी त्यावर नक्कीच संशोधन करीन. `लाडकी कबुतरे’ योजना विचाराधीन असल्याचे मी लोढा यांना बोललो होतो. पाहुया कधी जमतेय ते.
नरेंद्र मोदी : कबुतर हा माझा आवडता पक्षी आहे. मी शाळेतही माझा आवडता पक्षी कबुतर हा निबंध लिहिला होता. ती शाळा कुठली आणि ते साल कोणते हे मात्र आठवत नाही. मी लहानपणी घरात राहत असताना कबुतरे पाळली होती. नंतर चहाविक्रीच्या धंद्यात आल्यावर ती कुठे उडून गेली याचा पत्ता लागला नाही. अलिकडेच दिल्लीत झालेल्या `ब्रिक्स’ या इंटरनॅशनल नेत्यांच्या परिषदेत मी सर्व नेत्याना कंपल्सरी शाकाहारी-व्हेज अन्नपदार्थ खायला लावले. मला पशुहत्या मान्य नाही. मुंबईतल्या आमच्या जैन बांधवांच्या नेत्यांनी कबुतरांवर होत असलेला अन्याय अलिकडेच मांडला. मी तर पहिल्यापासून कबुतरच नव्हे, तर कोंबडा, कोंबडी तसेच कोणत्याही प्राण्याची शिकार करून त्याला खाण्याच्या विरुद्ध आहे. मी `ब्रिक्स’च्या जागतिक नेत्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की, तुमच्या देशात जाऊन तुम्ही तुम्हाला हव्या त्या प्राण्याचे मांस खा. पण इथे ते चालणार नाही. आतल्या आत धुसफुसत ते जिनपिंग, पुतीन, माझा लाडका डोनाल्ड हे मनातून माझा उद्धार करीत होते, पण मी बधलो नाही. त्यांच्या देशात गेल्यावर ते आजारी पडल्याच्या बातम्यासुद्धा आल्या आमचे शाकाहारी अन्नपदार्थ खाऊन. पण नंतर कळले की त्या बातम्याही खोट्या होत्या. यापुढे मी आपल्या देशातही मांसाहारावर बंदी घालण्याचा विचार करतोय. तसेच जे फक्त शाकाहारी अन्न खातात त्या नागरिकांनी काहीही खरेदी केली, तर त्यावर वीस टक्के सूट देण्याचा आदेश मी `मन की बात’मधून देण्याचा विचार करतोय. शाकाहाराचे महत्त्व जगाला पटवण्यासाठी मी लवकरच विदेश दौरे करणार आहे तोही चीनसकट. चिनी लोक झुरळे, पाली, मच्छर, साप, माशा, कीटकही खातात. मी त्यांना शापूच्या भाजीचे महत्त्व पटवून देणार आहे. पालेभाज्यांत फ जीवनसत्व असते तर झुरळांमध्ये झ जीवनसत्व असते. पण त्याचा शरीराला काही उपयोग नसून ते अपायकारक असते, हे मी त्यांना गोड भाषेत समजावून सांगणार आहे. झुरळांसारख्या तापदायक कीटकाचे खाण्यासाठी फार लाड करू नका असे आवाहनही मी त्यांना करणार आहे. हे विश्व ज्या दिवशी संपूर्ण शाकाहारी होईल तोच जगाच्या उत्थानाचा सर्वात आनंददायी क्षण असेल. हे स्वप्न ज्या दिवशी पुरे होईल त्या दिवशी मी अत्यानंदाने माझी पंतप्रधानकीची मुदत २०४७ सालपर्यंत वाढवून घेईन. निवडणुकांची कटकट यापुढे कधीच होऊ देणार नाही, हे मी या निमित्ताने सांगू इच्छितो!

