लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी भाग्यवान आहेत. देशात त्यांचे हितचिंतक आणि मोफत सल्लागार पैशाला पासरी झालेले आहेत. त्यांनी आणि काँग्रेसने काय करावं, काय करू नये, याच्या उठाठेवी इतरांनाच अधिक! काही अंशी ते स्वाभाविकही आहे म्हणा. कारण, देशाची सत्ता ज्यांच्या हातात आहे, ते इतके बेलगाम आणि बेगुमान आहेत की ते आपल्या मातृसंस्थेलाही जुमानत नाहीत, कुणाचंही ऐकत नाहीत. आपण अवतार म्हणूनच पृथ्वीवर अवतीर्ण झालो आहोत, असाच एखाद्याला भ्रम झाला असेल, तर तो थोर पुरुष- चार वाक्यं सुसंगत बोलायला टेलिप्रॉम्प्टरचा आधार घ्यावा लागत असला तरीही- स्वत:ला सदैव सर्वोपरि समजणारच. त्यामुळे फुकटचा वावदूक सल्ला द्यायलाही माणूस असा शोधावा लागतो जो लोकांचं किमान ऐकून घेतो!
राहुल यांच्या भवितव्याची काळजी भारतीय जनता पक्षाच्या लोकांना अधिक असणं स्वाभाविक आहे. राहुल यांच्या भवितव्यावर त्यांचं भवितव्य अवलंबून आहे. ज्या क्षणी आपल्याकडे देशाची सूत्रं येतील तेव्हा आपण कोणाकोणाचे काय काय करणार आहोत, हे राहुल हल्ली आक्रमकपणे सुस्पष्ट शब्दांमध्ये सांगत असतात. हा सत्तापालट होईल तेव्हा कदाचित राहुल यांना काही करावे लागणारही नाही. अनेक वर्षे ठगली गेलेली जनताच काय ते करेल. त्यामुळे राहुल यांनी अमुक करावे, तमुक करू नये, याच्या पंचायती भाजपवालेच अधिक करतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल यांना स्टँड अप कॉमेडी करण्याचा सल्ला दिला आहे. अनेक वर्षे एकाच प्रकारची उथळ आणि गेंगाणी कॉमेडी पाहून आणि ऐकून त्यांचेही कान किटलेले दिसतायत!
या अनाहूत सल्ल्याला कारणीभूत ठरला तो इंदूरमधला जोरदार रंगलेला ‘छात्रों की गूँज’ हा राहुल गांधी यांचा कार्यक्रम आणि त्यात पुलकित मणी या विनोदवीराची ‘हॅलो फ्रँड’ शैलीतली गाजलेली एन्ट्री. या पुलकित मणीने इन्स्टाग्रामवर बळजबरीने लोकांच्या गळ्यात पडणार्या नेत्याचं अर्कचित्र अभिनयातून रंगवलं होतं आणि तो व्हिडिओ इतका झोंबला होता की तो तक्रारी करून करून उतरवायला लावला गेला आणि तो त्यानंतर अर्थातच अधिकाधिक व्हायरल झाला. अनेकांनी त्याचा चेहरा, त्याच्या चेहर्यावरचे मद्दड हावभाव यांचा वापर करून अफलातून मीम्स तयार केली. त्याने केलेल्या कॉमेडीपेक्षा त्याने न केलेली कॉमेडी जगभर पोहोचली. तो विनोदाचं माध्यम बनला. हा विनोदवीर त्याची तीच नक्कल सादर करायला छात्रों की गूँजच्या मंचावर पोहोचला आणि राहुल यांना त्याने बळजबरीने मिठी मारली, राहुल यांनी त्याच्याशी ‘मोदीजी’ म्हणून संवाद केला.
राहुल यांच्या काही तासांच्या कार्यक्रमात युवकांबरोबर अनेक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली, ती राहिली बाजूला- हा काही मिनिटांचा कार्यक्रम कसा देशाच्या पंतप्रधानांचा अवमान करणारा आहे, म्हणून भाजपेयींनी आदळआपट केली, हे समजण्यासारखे आहे- त्यांना काही ना काही कारण लागतेच चिडीला यायला! पण, असा सवंगपणा राहुल यांनी आपल्यासमोर होऊ द्यायला नको होता, शेवटी ते ‘गांधी’ आहेत, असा पोक्त सूर भाजपविरोधी गोटातूनही ऐकू येऊ लागला.
पहिला विषय पंतप्रधानांच्या अवमानाचा. खरंतर हा मुद्दा याआधी अनेकदा चर्चेला आला आणि त्यावर अनेकांनी अनेकदा हे स्पष्ट केले की या पदाचा मान राखण्याची जबाबदारी त्या पदावरच्या व्यक्तीची अधिक असते आणि तसे न झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. दीदी ओ दीदी, शूर्पणखा, पचास करोड की गर्लफ्रेंड हे आणि याच प्रकारचे उद्गार काही त्या पदाची गरिमा राखणारे नाहीत. निवडणूक प्रचाराच्या व्यासपीठापासून संसदेच्या सभागृहापर्यंत मनाला येईल तिथे, प्रसंग आणि औचित्य यांचा जराही विचार न करता जर कोणी सवंग स्टँड अप कॉमेडी करणार असेल, तर तिचं उत्तर त्याच भाषेत मिळणारच. जेन झी आंदोलनात जंतर मंतरवर ज्या प्रकारे अब्रू निघाली, त्यापेक्षा पुलकित मणी करतो, ते किमान अर्कचित्रात्मक स्केच तरी आहे; त्याला वास्तवातल्या हावभावांचा, वर्तनाचा आधार तरी आहे. सोनिया गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या विद्वान पंतप्रधानांची बाहुली नाचवताना भाजपचा आयटी सेल आणि गोदी मीडिया यांनी तेही भान ठेवले नव्हते.
दुसरा विषय, राहुल हे ‘गांधी’ असण्याचा! मूळ गांधी म्हणजे महात्मा गांधी. गांधीजींच्या अहिंसा, सत्याग्रह वगैरे तत्त्वांची खिल्ली उडवण्यासाठी नेहमी हिटलरचे उदाहरण दिले जाते; ब्रिटिशांसारखे राज्यकर्ते होते म्हणून गांधीजींची ही शस्त्रे चालली, हिटलरसारखा क्रूरकर्मा समोर असता तर तो या शस्त्रांनी पराजित झाला असता का, असा या मंडळींचा बिनतोड सवाल असतो. हिटलरसारखा शत्रू समोर असता तर गांधींनी वेगळी शस्त्रे शोधली असती, हे या तथाकथित बिनतोड सवालाचे उत्तर आहे. राहुल गांधींनीही ‘भारत जोडो’ यात्रा काढली आणि नफरतीच्या बाजारात ‘मुहब्बत की दुकान’ काढण्याचं धाडस दाखवलंच. पण, ते सर्वसामान्य जनतेमधली सलोख्याची, परस्परप्रेमाची भाजपने खुडून काढलेली भावना नव्याने रुजवण्यासाठी ते करत होते. लोकशाहीचा आणि संविधानाचा देशातला पायाच उखडून टाकायला निघालेल्या बुलडोझरी महाशक्तीपुढे प्रेमाची गीता वाचून उपयोग नाही, हे न कळायला ते दुधखुळे नाहीत. ते भाजपला जी समजते तीच भाषा बोलू लागले आहेत. दिवसेंदिवस अधिकाधिक आक्रमक होत चालले आहेत.
या नेत्याला पप्पू ठरवण्यासाठी १२ वर्षांत हजारो कोटी रुपये खर्च केले गेले. अजूनही तोच अजागळ प्रयत्न सुरू असतोच. पण, त्याने सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी असल्याचं नंतर सिद्ध होतंच आणि तो जे करण्याचा सल्ला देतो, ते सरकारला, बरीच माती खाऊन झाल्यावर का होईना करावं लागतंच.
असंवैधानिक मार्गांनी संसदेपर्यंत पोहोचलेली अशिष्ट, अर्वाच्य, उथळ आणि सवंग स्टँड अप कॉमेडी निव्वळ संविधानिक मार्गांनी पायउतार करता येणार नाही, तिला तिच्या भाषेतच उत्तर दिले पाहिजे, हे राहुल यांना कळले आहे. राहुल यांना न मागता सल्ले देणार्यांची खरी ठसठस तीच आहे.

