
‘शेतकर्यांचे स्वराज्य’ हे पुस्तक महान सत्यशोधक विचारवंत दिनकरराव जवळकर यांच्या आग्रहानुसार लिहिलं गेलंय, हे आपण पाहिलंच. जवळकर महाराष्ट्राच्या ब्राह्मणेतर चळवळीचे प्रमुख नेते होते. हीच ब्राह्मणेतर चळवळ शेतकर्यांची खरी चळवळ असल्याचं प्रतिपादन प्रबोधनकारांनी केलंय. या चळवळीला नवं शेतकरीकेंद्री रूप देण्याच्या जवळकरांच्या प्रयत्नांनाही त्यांनी दाद दिलीय.
आता शेतकर्यांचं राज्य हवं तर आतापर्यंत देशावर राज्य करणार्यांत कोण कोण होते, या इतिहासाच्या मुळात प्रबोधनकार जातात. दिल्लीच्या सार्वभौमत्वाच्या किल्ल्या वैदिक हिन्दु, बौद्ध हिन्दु, काबुल्ये पठाण, कंदाहारी मोगल, आणि कडवे रजपूत ह्यांच्या हाती देऊन पाहिल्या. त्यांनी आपली नालायकी सिद्ध केली. दक्षिणेतल्या मर्हाठ्याना आणि चित्पावनांसारख्या अवचित ब्राम्हणांनाहि साम्राज्य प्राप्तीच्या वाटेवर उभे केले. त्यांनीहि त्या संधीचा डुकरांपुढे मोत्यांची रास असा दुरुपयोग केला. हिन्दी समाज नापास झाल्यावर, सातासमुद्रापलीकडच्या जंबुद्वीपस्थ गोर्या महादेवांची दिल्लीच्या तख्तावर योजना झाली. पुढे इंग्रजांची सत्ता आणि सोबत टिळक–गांधींची काँग्रेस यातून शेतकर्यांची दुर्दशा वाढतच गेली. खेडी बकाल होत गेली, यावरही प्रबोधनकारांनी सविस्तर चर्चा केलीय. शहरी-भटी-बांडगुळ्या चळवळींचे हितसंबंध शेतकर्यांच्या विरोधी असल्यामुळे त्यांतून शेतकर्यांचं भलं होण्याची शक्यताच नाही, हेही त्यांनी सांगितलं. अशा वेळेस ब्राह्मणेतर चळवळ हीच एकमेव शेतकर्यांची चळवळ असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढल्याचंही आपण पाहिलं.
या चळवळीनेच देशपातळीवर शेतकर्यांचं संघटन करायला हवं, असा आग्रह प्रबोधनकार धरतात. त्यांना वेगवेगळ्या प्रांतानुसार संघटना बांधून त्याचं नेतृत्व करणारी एक केंद्रीय संघटना ब्राह्मणेतर चळवळीने बांधायला हवीय. पण याच ब्राह्मणेतर चळवळीतून पुढे आलेले नेते ब्राह्मणी नेत्यांचं नेतृत्व आणि वर्चस्व मान्य करत असल्याचं बघून प्रबोधनकार त्यांनाही बाद ठरवतात. छत्रपती शाहूंच्या काळात पुढे आलेल्या नेते सत्ता आणि नोकरशाहीच्या नादी लागल्यामुळे ही चळवळ साठवणीच्या पाण्याचे शेवाळलेले डबके बनल्याचं ते सांगतात, अशावेळेस दिनकरराव जवळकरांनी ब्राह्मणेतर चळवळीसाठी नवा कार्यक्रम दिला होता. त्यात प्रबोधनकारांना आशेचा किरण दिसतो.
कारण प्रबोधनकार जवळकरांना अनेक वर्षं ओळखत होते. ते वयाने तरुण असले तरी त्यांच्या झपाट्याने भलेभले भांबावून जातात, हे त्यांनी पाहिलं होतं. त्याविषयी प्रबोधनकार लिहितात, श्रीयुत दिनकरराव जवळकर हे ब्राम्हणेतर कंपूतले लहानातले लहान आणि तरुणातले तरुण शिंगरू आहे. त्यामुळे, वयाने, कामगिरीने आणि प्रसिद्धीने जरठ ऊर्फ वृद्ध असलेल्या पुष्कळ पंचकल्याणी अबलक घोड्यांना या शिंगराने त्यांच्यावर केलेली मात सहसा सहन होत नाही. पांढर्या काळ्या केसांचा सवतिमत्सर जगाच्या अंतापर्यंत लोकविश्रुत आणि लोकमान्यच राहणार. मात्र या छोट्या शिंगराने आपल्या तारुण्यप्राप्त तडफीच्या वाग्लेखन टापांनी प्रतिस्पर्ध्याची जितकी अभिमन्यूप्रमाणे तुफानी दाणादाण उडविलेली आहे. तितकी ब्राम्हणेतर छावणीतल्या एकाहि भीष्म, द्रोणाने आपल्या लांबलचक आयुष्यात एकदाहि उडविल्याचा दाखला नाही.
जवळकरांची पाठराखण करताना ते त्यांचे गुणदोष दाखवायला कमी करत नाहीत- श्रीयुत जवळकर तरुण आहेत. तारुण्याचे निसर्गसिद्ध सर्व गुणदोष त्यांच्या अंगी आहेत. ते विद्यावान् विद्वान् पदवीधर नसले, तरी पदवीधर विद्वानांच्या अंगी सहसा न सापडणारी बुद्धीची कुशाग्रता आणि हवा तो विषय आमूलाग्र चटकन् आकलन करण्याची ग्रहणक्षमता, हाच जवळकरांच्या प्रकृतीचा आणि प्रवृत्तीचा विशेष आहे. ते साधू, संत, गोसावी किंवा फकीर नाहीत; ते उघड उघड संसारी आहेत. अर्थात् संसारी वृत्तीच्या पिण्डाला चिकटणार्या सर्व स्वार्थापासून ते अलिप्त असण्याचा संभवच नाही. ज्या अर्थी ते उमलते जवान आहेत, त्या अर्थी तारुण्याला साजेशोभेशा छानछोकी डामडौल आणि उच्छृंखलपणा या गोष्टी त्यांनी आताच जर अंगाळल्या तोंडाळल्या नाहीत, तर काय रावबहादूर बोल्यांइतके म्हातारपण झाल्यावर त्या नुसत्या बोलाव्या?
ते दुसरा मुद्दा मांडतात, जवळकरांना शेतकरी असल्यामुळे त्यांना त्यांच्या व्यथा कळतात- जवळकर पिढीजात शेतकरी असून, त्यांचा शेवटचा शेतीचा तुकडा सन १९२५ सालीच गुजर सावकाराच्या भक्ष्यस्थानी पडला. चोराच्या आळंदीचे हे मराठे पाटील. मराठशाहीच्या काळात क्रान्तीच्या तलवारीचा यांच्या पूर्वजांचा फासा जर अंदाजाप्रमाणे हुकमी पडता, तर ‘चोराची आळंदी’ आज ‘सावाची आळंदी’ बनून, जवळकर पाटिलांची जहागिरी म्हणून मिरवली असती! सावकारी फासात मान अडकलेल्या गरीब शेतकरी पाटलाच्या पोराला कसली शाळा न् कसले शिक्षण? जगाच्या व्यवहारशाळेतच जवळकरांचे सारे शिक्षण झाले. त्यांच्या विचार-उच्चार-आचाराची घडणी कठोर परिस्थितीच्या घणांच्या धावांनीच घडविलेली असल्यामुळे, जवळकरांच्या कोणत्याहि योजनेतला हेमगर्भाचा एकच वळसा, वयोवृद्ध ज्ञानवृद्ध पुढार्यांच्या काढ्या निकाढ्यांपेक्षा, विशेष हुकमी आणि रामबाण ठरतो.
जवळकरांच्या कल्पनांच्या अस्सलपणाचंही ते कौतुक करतात, त्यासाठी ते मराठा मिशनचं उदाहरण देतात- जवळकरांचे आद्यकल्पनाचातुर्य (ध्rग्ुग्हaत्ग्ूब्) नावाजण्यासारखे आहे. पण त्यांना सहकारी लायक मित्र निवडण्याची अक्कलच नेमकी कमी असल्यामुळे, त्यांच्या पुष्कळ लोकहितवादी कल्पना जन्मताच थोड्या दिवसांनी मरतात. हा शेरा दुसर्याहि रीतीने असा मांडता येईल की, अनुकूल देशकालाच्या जन्मापूर्वीच जवळकरांच्या कल्पना जन्मास येतात. याचे उदाहरण म्हणजे पुणे शिवाजी मराठा मिशन हे होय. जगातल्या कोणत्याहि मनुष्याला अल्प विधीने ‘मराठा’ जातीत समाविष्ट करून घ्यायचा, हे या मिशनचे ध्येय होते. हे मिशन पद्धतशीर चालू होते, तर शुद्धी संघटनांच्या चळवळीचा प्रश्न फार सुटसुटीत सुटला असता. पण नवकोट नारायण तुकोजीराव होळकराच्या अमेरिकन बायडीला हळद-भंडारा चोपडून ‘शुद्ध मराठीण’ बनविण्यास धाधाबलेल्या मराठा पुढार्यांनीच शिवाजी मिशनची मात्र भ्रूणहत्या करून, जवळकरांच्या कल्पनेला वांझोटी ठरविली. सहकारी लायक मित्रांची निवड करण्याची कसोटी जर जवळकरांना कधी साधली, तर भविष्यकाळी ते शेतकरी स्वराज्य कल्पनेला अभिनंदनीय मूर्त स्वरूप आणतील, यात मुळीच शंका नाही.
जवळकरांनी शेतकरी पक्षाची कल्पना मांडताच, त्यांना कम्युनिस्ट ठरवण्याची स्पर्धाच सुरू झाली. यात ब्राह्मणी पुढारी जसे होते तसेच ब्राह्मणेतर पक्षातले ढढ्ढाचार्यही होते. पण ब्राह्मणेतर या शब्दाचे गोंधळ दूर करण्यासाठी अधिक व्यापक शेतकरी शब्द उपयुक्त ठरू शकतो. त्यातून ब्राह्मणेतर पक्षातला नेतृत्वाचा गोंधळ दूर करून नव्याने रचना करता येऊ शकते, अशी अपेक्षा प्रबोधनकार व्यक्त करतात – ब्राम्हणेतर पक्ष सुधारा नाहीतर मरा’ असा सडेतोड सवाल श्रीयुत जवळकरांनी पक्षाच्या पुढार्यांपुढे टाकण्यात लक्षावधि शेतकर्यांच्या वतीने वकिली केली आहे. शेतकर्यांना बोलता येत नाही; म्हणून शेतकरी पिण्डाचे जवळकर त्यांच्यासाठी बोलत आहेत. जवळकरी योजना निर्दोष नाही; पण तिच्यात जोम आहे, कार्यक्रमाची नवी धडाडी आहे आणि भावी शेतकरी स्वराज्याच्या कल्पनेचे अमर्त्य तत्त्व त्यात धमधमत आहे.
शेतकर्यांच्या शोषणावर जन्मलेल्यांची एक मोठी फळी देशभर उभी राहिलेली असल्यामुळे तिला पहिला धक्का द्यावा लागेल, असं प्रबोधनकार सांगतात – शेतकर्याला आरपार पोखरून त्याचा खोका बनविणार्या लहानमोठ्या खास देशी जळवांची सांगड, त्याच्या चंद्रमौळी झोपडीत नित्य घुसणार्या पंचांगपण्डित जोशी पाटील कुलकर्ण्यापासून तों त्याच्या भाईबंध पुरुष बायकांना गिरण्यांच्या व कारखान्यांच्या मजुरीत मळणार्या भांडवल्यांपर्यंत, एकसारखी बिनतोड लागलेली आहे. त्याच्या गळ्याला लागलेल्या सावकारी फासाचे धागेदोरे उकलण्याचे एखादे कमिशन सरकारनेच नेमून पाहावे, म्हणजे त्यात कोणकोणत्या वर्गाचे वीरपीर असतात, त्याचा तेव्हाच छडा लागेल. मारवाडी, गुजर, पठाण आणि ब्राम्हण हे तर उघडउघड सावकारांचे कर्मयोगी. पण या महात्म्यांशिवाय शेकडो भट, भटेतर वकील, मामलतदार, मुनसफ, सबरजिष्ट्रार, पाटील, तलाठी इत्यादि बाण्डगुळ्या मध्यम वर्गाचे प्राणीसुद्धा शेतकर्यांवर चरताना आढळतील. खुद्द ब्राम्हणेतर पक्षाच्या पुढार्यांच्या फलटणीतहि शेतकर्यांच्या सावकारीवर जगणार्या भांडवलशाही श्रीमंत जळवा अनेक आहेत. जवळकरी योजनेच्या पम्पाच्या सोसाट्याचा पहिला सपाटा सावकारशाहीच्या उच्चाटनावरच आघात करणारा असल्यामुळे, केवळ श्रीमंतीच्या उबार्यावर पुढारपणाच्या स्थानमाहात्म्याला चटावलेल्या ब्राम्हणेतरी झब्बूंची दाणादाण उडाली असल्यास नवल नाही. उद्धरेत् आत्मनात्मानम् स्वतःचा उद्धार स्वतःच करून घ्यावा लागतो. शेती जर राष्ट्राचा प्राण, तर शेतकरी त्या राष्ट्राचा स्वराज्य-सूत्रधार झालाच पाहिजे.
तेव्हा देशाला जे राजकीय हक्क मिळाले होते, त्यानुसार कायदेमंडळातली सगळी पदं वकील, भिक्षुक आणि भांडवलशाह यांनीच बळकावलेली होती. शेतकर्यांची मतं घेऊन मंत्री बनायचं पण शेतकर्यांचा दबाव निर्माण करण्यासाठी संघटना नसल्यामुळे त्यांच्या हिताची पर्वा करायची नाही, अशी परिस्थिती होती. त्यामुळे शेतकर्यांच्या खर्या प्रतिनिधींचं सरकार पार्लमेंटमध्ये बसायला हवं, अशी मांडणी प्रबोधनकारांनी केलेली आहे- शेतकर्यांचे स्वराज्य कल्पना फार गोड. पण तिच्या साध्याचा मार्ग अनंत परिश्रमांच्या आणि प्रतिकारांच्या काट्याकुट्यांनी भरलेला आहे. शेतकरी पक्ष स्थापन करून, शेतकरी स्वराज्याचा मार्ग अखिल भरतखंडाला महाराष्ट्रातील शिवाजीच्या मावळ्यांनी दाखवावा अशी मनीषा श्रीयुत जवळकरांनी व्यक्त केली आहे. शेतकर्यांचा वैâवारी म्हणविणार्या ब्राम्हणेतर पक्षानेच या नवीन स्वराज्याचे नांगरी ध्वजारोपण करून स्वराज्यसंस्थापक शिवरायाचा हा नवावतार जगाला दाखवावा आणि ब्रिटिश-मजूर-मंत्रिमण्डळाच्या तोडीस तोड आणि जोडीस जोड असे हिन्दवी शेतकरी मंत्रिमण्डळ हिन्दी पार्लमेण्टात बसवून, सम्राट जॉर्ज बादशहांची महत्त्वाकांक्षा याच देही याच डोळां त्यांना फलवती झालेली दाखवावी, या जवळकरी योजनेची किंमत भविष्यकाळानेच ठरविलेली बरी.
शेतकर्यांचं प्रतीक नांगराचं चित्र असणारा मराठी साम्राज्याची आठवण करून देणारा भगवा झेंडा या शेतकर्यांच्या स्वराज्याचा ध्वज असावा अशी इच्छा व्यक्त करून प्रबोधनकारांनी या पुस्तकाला विराम दिला आहे. प्रबोधनकारांची शेतकर्यांविषयी असलेली आत्यंतिक कळकळ हे या पुस्तकाचं सर्वात मोठं वैशिष्ट्यं ठरावं. स्वतः शेतकरी समाजाचा भाग नसूनही त्यांच्या कळवळ्यात कुठेच कमतरता दिसत नाही. त्यातूनच शेतकर्यांची स्वतःची सत्ता आल्यााfशवाय शेतकर्यांचं भलं होणार नाही, हा आजच्या काळालाही लागू होणारा विचार ते या पुस्तकात सलग मांडतात.
किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते, ज्येष्ठ शेतकरी कार्यकर्ते अमर हबीब यांनी एका लेखात या पुस्तकाचं नेमकं मर्म उलगडून सांगितलं आहे, शेतकर्यांचे स्वराज्य या पुस्तकात प्रबोधनकारांनी शेती आणि शेतकर्यांचे महत्व स्पष्ट केले. सुमारे शंभर वर्षांपूर्वी शेतकर्यांच्या समाजातील भूमिकेचे जे आकलन प्रबोधनकारांना झाले होते तेवढे आकलन स्वातंत्र्यानंतर झालेल्या शेतकरी आंदोलनातील कार्यकर्त्यांना झाले नाही. शेतकरी उद्ध्वस्त झाला तर सगळा समाज पंगू होतो. मूठभर लोकांची चंगळ होते. त्यांनी ‘भारत’ आणि ‘इंडिया’ हे शब्द वापरले नाहीत परंतु संपूर्ण विश्लेषण त्याच पद्धतीचे केले आहे. शेतकर्याची भूमिका मध्यवर्ती स्वरुपाची आहे हे आग्रहपूर्वक मांडले आहे. ‘शेतकर्यांचे स्वराज्य’ हेच आमच्या देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे खरे स्वप्न होते. दुर्दैवाने ते साकार झाले नाही. गोरे इंग्रज गेले आणि काळे इंग्रज आले एवढाच काय तो फरक. प्रबोधनकारांना ही भीती स्वातंत्र्य आंदोलन चालू असतानाच वाटत होती. ती खरी ठरली. शेतकर्यांच्या मालाची कमी किंमत देऊन लूट होत राहिली. त्यांना चोहोबाजूने जायबंदी करण्यात आले. आज जेव्हा शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करू लागले आहेत, अशा काळात प्रबोधनकारांसारख्या माणसाची गरज तीव्रतेने जाणवते. प्रबोधनकार ठाकरे आज असते तर त्यांनी किती किती आणि कोठे कोठे आग लावली असती!
